गोंधळ: लोककलेचा बाज, एका रात्रीतलं नाट्य आणि परफेक्ट सिनेमॅटिक अनुभव; या सिनेमाची चर्चा का होत आहे?

फोटो स्रोत, Instagram/gondhalfilm
- Author, नरेंद्र बंडबे
- Role, बीबीसी मराठीसाठी
ग्रामीण भागात गोंधळ ही प्रचलित लोककला आहे. लग्न कार्य असो किंवा मुलांचा जन्म, गोंधळ घालणं ही परंपरा आहे.
गोंधळ हा फक्त नाच-गाण्याचा कार्यक्रम नाही. तो एक ध्वनी-यज्ञ आहे, एक आवाहन-विधी आहे. गोंधळी रात्रभर ओरडतो, ढोल बडवतो, तुणतुण्याची तार ताणतो आणि सतत एकच गोष्ट सांगत राहतो -
"ये रे बया, ये रे माये, ये रे खंडोबा, ये…
कथा ऐक, कवन ऐक,
आमच्या अंगणात ये
आणि आमचा आनंद घे."
गोंधळात हे आवाहन देव-दैवतांना केलं जातं. तुणतुण्याची एकच तार सतत वाजवली जाते. ती कंपनं थेट देवापर्यंत पोचतात, असं मानलं जातं. ढोलाचा ठेका हा 'हृदयाचा ठोका' बनतो. म्हणूनच गोंधळात कधी शांतता नसते – कारण शांतता आली की, देव-दैवत परत जातील, अशी भाबडी समजूत आहे.
दिग्दर्शक संतोष डावखरच्या 'गोंधळ' या सिनेमात ही असंच घडतं. सतत काही ना काही घडत असतं. सिनेमाच्या सुरुवातीला अंधारातून आजोबा आणि नातू गोंधळाला निघालेत. वाटेत त्यांना काही गावकरी भेटतात. मग कथानकातल्या एक एक पात्राचा परिचय होतो. त्यांच्यामागे कॅमेरा सतत फिरत राहतो.
हे म्हणजे प्रेक्षकांचा कथानकात होणारा प्रवेश. गोंधळाचे सैद्धांतीक निकष सिनेमाच्या कॅमेऱ्याला लावलेत. प्रत्येक पात्र आणि प्रेक्षकांची गाठभेट घालून दिली जाते आणि अखेर विधीवत पुजेनंतर खऱ्या गोंधळाला सुरुवात होते.
गावातल्या पाटलाच्या मुलाचं लग्न झालंय. नवीन जोडप्यासाठी गोंधळ ठेवण्यात आलाय. या पार्श्वभूमीवर एका सूड कथेची गुंफन विनण्यात आलीय. यामुळं जसजसा गोंधळाचा रंग चढतो, तस तसा सिनेमातल्या कथानकातली रंजकता वाढत जाते आणि अखेर म्हणजे कळसच होतो.
लोककलेतून मिळणारा सिनेमॅटिक अनुभव
गोंधळ ही लोककला नाट्यधर्मी प्रकारात मोडते. तिथं वाघ्या-मुरळी आणि बतावणीच्या माध्यमातून लोकांच्या जगण्याशी संबंधित कवन किंवा कथन केलं जातं.
मोठा स्टेज नाही, भडक मेकअप नाही, दिव्याच्या प्रकाशात रंगबेरंगी कपडे घालून नाट्य सादर करणारे कलाकार, लिहिलेली स्क्रिप्ट नाही, शाब्दिक कोट्यांतून लोकांना आनंद द्यायचा, चिमटे काढायचं, हसवायचं, खुश करायचं हे गोंधळींचं मुख्य काम.
हे असं रात्रभर चालतं. तिमिरीकडून तेजाकडे जाणारा गोंधळ सकाळी संपतो.
गोंधळ हा रौद्र-वीर-अद्भुत-भयानक रसांचा मेल आहे. जो शेवटी भक्ती आणि शांत रसात विरघळतो. म्हणूनच महाराष्ट्रात आजही गोंधळ पाहिल्यावर लोक म्हणतात: "गोंधळ पाहिला की सगळे पाप धुऊन जातात आणि जीव तृप्त होतो."

फोटो स्रोत, Instagram/gondhalfilm
तो खरा नाट्यधर्मी रस-उत्सव आहे. या सर्व पार्श्वभूमीवर संतोष डावखरचा गोंधळ सिनेमा फक्त एक थ्रिलर सूड कथा राहत नाही, तर लोककलेतून मिळणारा सिनेमॅटिक अनुभव बनतो.
गोंधळ सिनेमात दु:ख (नको असलेल्या लग्नात अडकलेली नवरी मुलगी), लोभ किंवा लालसा (सत्तेची भूक असलेले पाटील), वासना ( नव्या नवरीशी संगत करण्याची इच्छा असणारा पाटलाचा मुलगा), इर्षा ( पाटालाचं नेतृत्व मान्य नसलेला गावकरी) आणि क्रोध (पाटलानं केलेल्या अन्यायाचा बदला घेण्याची जोरदार इच्छा असलेला आजोबा) असे सर्व इमोशन एका रात्रीतल्या कथानकात घडतात.
जसजसं कथानक पुढे जातं तसतशी एकेक भावना अधिक तीव्र होत जाते आणि त्यातून घडणाऱ्या नाट्यातून प्रेक्षकांना शेवटपर्यंत हा अंदाज येत नाही की पुढे नक्की काय घडणार आहे. कोण कोणाला मारणार, कोण कोणासोबत जाणार, घडतंही तसंच.
दिग्दर्शक संतोष डावखर प्रेक्षकांना कथेत इतका गुंतवतो की, त्याला आता शेवट काय होणार याची प्रचंड आसक्ती असते आणि शेवट जो होतो तो एक उत्कृष्ठ नाट्य पाहिल्याचा आनंद देतो.
सोबत सिनेमामध्ये चालेल्या गोंधळातली रंगतही वाढत जाते. एक जबरदस्त सिनेमा पाहिल्याची अनुभूती प्रेक्षकांना मिळते. ही गोंधळ सिनेमाची खासियत.
शुद्ध लोककलेचा बाज जपत रचलेलं सूडनाट्य
ह्युगो मनस्टरबर्ग (1863-1916) या मानसशास्त्रज्ज्ञानं पहिल्यांदा सिनेमाचा सिध्दांत मांडला. सिनेमा ही कला त्यावेळी नवीन होती. 1895 ते 1915 या कालावधीत त्याने सिनेमाचा अभ्यास केला आणि 1916 मध्ये पुस्तक लिहिलं, 'द फोटोप्ले - एक सायकोलॉजिकल स्टडी'.
सिनेमा पाहताना प्रेक्षकांना आनंद कसा आणि का मिळतो? त्याची मानसशास्त्रीय प्रक्रिया काय असते? याचं विश्लेषण या पुस्तकात केलं आहे.
प्रेक्षक थिएटरच्या अंधारात प्रवेश करतात. त्यानंतर पडद्यावर येणाऱ्या प्रकाशझोताचं त्यांच्या मेंदूशी थेट कनेक्शन होतं. हे थेट कम्युनिकेशन आहे. त्यामुळं थेट इम्पॅक्ट.
पडद्यावर गोष्ट सुरू होते, त्या गोष्टीत प्रेक्षक मानसिकरित्या गुंतायला लागतो, हसतो रडतो, टाळ्या वाजवतो, त्या कथानकाशी स्वत:च्या भावविश्वाला जोडतो.
ह्युगोच्या मते प्रेक्षकांचा सक्रीय मानसिक सहभाग वाढतो. म्हणजे काय होतं तर हिरोला त्यांची सहानभूती मिळते. व्हिलनला तो शिव्या देतो. त्याबद्दल राग तयार होतो. म्हणजे काय तर अटेन्शन, मेमरी, इमोशन आणि इमॅजिनेशन असं सर्व काही घडतं. सिनेमाच्या माध्यमातून त्याच्या मेंदूत रसनिर्मिती होते. तो सिनेमाशी एकरुप होतो. त्याला आनंद मिळतो.
भरतमुनीच्या नाट्यशास्त्रानुसार ही रसनिर्मिती ही स्टेजवर आणि प्रेक्षागृहात दोन्हीकडे होत असते. कलाकार परकायाप्रवेश करतो, म्हणजे काय तर त्या पात्राशी समरुप होतो आणि अभिनयातून ते पात्रं उभं करतो, मग त्या पात्राशी प्रेक्षकांचा कनेट सुरू होतो.
मुखवटे, खंडोबा, त्याची गोष्ट, त्याचं युध्द असं कथानकाशी प्रेक्षकांची एकरुप होण्याची प्रक्रिया सुरू होते. संतोष डावखरच्या गोंधळ सिनेमात या दोन्ही गोष्टी होतात. सिनेमाची मांडणीच इतकी प्रभावी आहे.
सुरुवातीला ही फक्त गोंधळाची गोष्ट वाटत असते. मग कथानकातल्या पात्रामधला राग, लोभ, मोह, माया, मत्सर असा खेळ सुरू होतो आणि शेवटाची उत्कंठा वाढत जाते.
गेल्या काही दिवसांमध्ये अशाप्रकारे परफेक्ट सिनेमॅटीक एक्सपिरियन्स देणारा हा मराठीतला महत्त्वाचा सिनेमा ठरला आहे.
गोंधळ सिनेमा शुध्द लोककलेचा बाज कायम ठेवत सूडकथेच्या प्रत्येक दृश्यांतून उत्कंठा वाढवत जातो. सिनेमाची गोष्ट सांगण्यासाठी लोककलेचा उत्तम वापर केल्याचं हे मराठीतलं हे अलिकडचं उत्तम उदाहरण आहे.
गोष्टीशी शेवटपर्यंत प्रामाणिक राहिलेला सिनेमा
कन्नड भाषेतल्या सिनेमानं नवी उभारी घेतलेय. ऋषभ शेट्टी, राज बी शेट्टी सारख्या कलाकारांनी अस्सल कन्नड लोककला आणि मिथकांचा वापर करत गरुड गमना, ऋषभ वाहना (2021) आणि कांतारा (2022) सारखे सिनेमे बनवले.
त्यांनी बॉक्स ऑफिसवर एक नवा रेकॉर्ड केला. या दोन्ही सिनेमात मिथकांचा प्रभावी वापर हा कॉमन फॅक्टर आहे. कांताराने तर कर्नाटकातल्या कोला या लोककलेला जगभरात पोचवलं. आता कांतारा फ्रँचायसी लोकांना गारुड घालतेय.
गोंधळ सिनेमानंतर मराठीतही असं काही घडू शकतं, असा आशावाद ठेवायला हरकत नाही. शेवटी आशेवर जग चालतंय मराठीचा प्रेक्षक हा विखुरला गेलाय. मराठी सिनेमाची थेट लढत आहे ती हिंदीशी. मराठी माणसाला हिंदी समजतं. हिंदीत स्टार सिस्टम आहे. ग्लॅमर आहे. त्यामुळं हिंदी सिनेमा पाहण्याचा ओढा जास्त आहे.
यातून मग आशयघन सिनेमा या गोंडस नावाखाली पुणे-मुंबईची शहरी पार्श्वभूमी असलेले टुकार सिनेमे, टीव्ही-नाटक आणि सिनेमात एकाचवेळी काम करणारे मराठीतले स्टार यामुळं प्रेक्षकांना एक्सक्लुझिव्ह सिनेमा अनुभवायला मिळण्याची शक्यता फारच कमी आहे.
अशावेळी चांगली गोष्टच मराठी सिनेमाला तारू शकेल. गोंधळ सिनेमात ती गोष्ट आहे आणि दिग्दर्शक या गोष्टीशी शेवटपर्यंत प्रामाणिक राहिलाय.

फोटो स्रोत, Instagram/gondhalfilm
गावातलं क्लिष्ट राजकारण, समाजकारण आणि धार्मिक कर्मकांड
लयभारी (2014) सिनेमातून ग्रामीण बाज असलेला मसाला सिनेमा रितेश देशमुख यांनी दिला. पहिल्यांदा मराठी सिनेमानं 50 कोटींचा गल्ला पार केला. त्यानंतर नागराज मंजुळेंचा सैराट (2016) आला. बार्शी-सोलापूरची भाषा आणि तिथले लोक पडद्यावर दिसले, अजय-अतुलच्या गाण्यांनी देशाला झिंगाट केलं. पुन्हा ग्रामीण बाज जिंकला आणि सैराट 100 कोटीपार झाला.
त्यानंतर मराठी सिनेमाला 'तू चाल पुढे' अशी हाक देण्यात आली, पण गोष्टी पुणे-मुंबईत अडकल्या. नाही म्हणायला पुण्याच्या गुंठा माफियांवर आलेला मुळशी पॅटर्ननं (2018) चांगली हवा केली. आशयघन या गोंडस नावाखाली 'पुन्हा येरे माझ्या मागल्या' म्हणत मराठी सिनेमा तिकिट खिडकीवर ढेपाळत गेला. प्रेक्षकांनी पाठ फिरवली आणि पुन्हा मराठी सिनेमाचं आर्थिक गणित बिघडलं.

फोटो स्रोत, Instagram/gondhalfilm
गोंधळ सिनेमाच्या माध्यमातून पुन्हा एकदा उमेद मिळालीय. लोककलेला ग्रामीण सूड कथेत जोडताना प्रेक्षकांना चांगली गोष्ट देण्याचा प्रामाणिक प्रयत्न झालाय. त्यातून हा सिनेमा तीन आठवड्यापेक्षा जास्त चालला हे विशेष.
चॉकलेट हिरो नाहीत, पुणे-मुंबईची शहरी भाषा नाही, रांगडं गावठीपण आणि गावातलं क्लिष्ट राजकारण, समाजकारण आणि धार्मिक कर्मकांड असे रोज आजूूबाजूला घडणाऱ्या आणि रिलेट होणाऱ्या गोष्टी गोंधळ सिनेमात आहेत.
कांतारा इतका मसालेदार नसला तरी गोष्ट सांगण्याच्या बाबतीत तेव्हढाच किंवा त्यापेक्षा जास्त प्रभावी असल्यानं गोंधळ सिनेमा महत्त्वाचा ठरलाय.
दादा कोंडके यांचे 70-80 च्या दशकातले सिनेमे मराठी माणसानी उचलून धरले. वेडागबाळा हिरो आणि टंच हिरॉईन, गावचा पाटील आणि चड्डीतल्या बोबड्या हिरोचा संघर्ष यातून घडणारं नाट्य, सर्वात महत्त्वाचं म्हणजे ग्रामीण भाषा. लोकनाट्याचा प्रभाव असल्यानं द्विअर्थी म्हणजे डबल मिनिंग संवाद आणि सिनेमाची नावं ही. यातून दादा कोंडकेंनी सलग 9 सिनेमे हिट केले.
'...तर मराठी सिनेमा स्पर्धेत टिकेल आणि पुढे जाईल'
आज मराठी सिनेमाची अवस्था फार बिकट आहे असं म्हणटलं जातंय. काही प्रमाणात ते खरंही आहे. मराठीतल्या दिग्दर्शकांना आता एआयची भीती वाटायला लागलीये. एक-दोन वर्षांत सिनेमाचं मरेल, असं भाकित करायला ते मागे पुढे पाहत नाहीत. असं असतं तर टिव्ही आला तेव्हाच सिनेमा मेला असता. इंटरनेटचं जाळं घट्ट झालं आणि टोरंटसारखे पीअर टू पीअर पायरेटेड सॉफ्टवेअर आले तेव्हाच सिनेमा मेला असता. 1895 पासून सिनेमाची घोडदौड अविरत सुरु आहे. सिनेमा पाहणं हा एक अनुभव आहे. तो थिएटरच्या अंधारात मिळतो. ह्युगो मन्स्टरबर्गनं सांगितल्याप्रमाणे हा अनुभव म्हणजे प्रेक्षकाच्या 'इनर अँड आऊटर वर्ल्ड'चं कोलॅबरेशन आहे. म्हणजे काय तर सिनेमाच्या कथानकात प्रेक्षकाची एकरुपता होते. हे असं होतं तेव्हा सिनेमा घडतो.

फोटो स्रोत, Instagram/gondhalfilm
अगदी सुरुवातीच्या काळात सिनेमाला कलेचा दर्जा दिला गेला नाही. ह्युगो मन्स्टबर्गनं ही सिनेमा लपून-छपून पाहिला. त्यावेळी ऑपरा ही सर्वात प्रतिष्ठीत कला होती. नाटकाचा बोलबाला होता. सिनमे हे प्रतिष्ठितांचं काम नव्हतं. ते महागडं तांत्रिक प्रकरण होतं. पण या तंत्रानं हळूहळू लोकांना गारुड केलं आणि आज ती जगातली सर्वात श्रीमंती मिळवून देणारी कला झालीय. ती सहजासहजी संपेल असं म्हणणाऱ्यांनी हॉलिवूडकडून काहीतरी शिकायला हवं. एआयचा शिरकाव झाला असला तरी माझ्या कल्पनाशक्तीला एआय हा पर्याय देऊ शकत नाही असं छातीठोकपणे सांगणाऱ्या गुलर्मा डेल टोरासारखे दिग्दर्शक 17 व्या शतकातली फ्रँकेस्टाईन (2025) ची गोष्ट घेऊन जग काबीज करतात, तर दुसरीकडे दीड वर्षात सिनेमा संपेल असं निराशावादी वक्तव्य करुन मराठी दिग्दर्शक आपल्या कोत्या मानसिकतेचे दर्शन घडवतात.
पुणे-मुंबईच्या कोंडवाड्यातून बाहेर पडून ग्रामीण बाज, ग्रामीण भाषा, त्यातून घडणारं नाट्य आणि व्यवसायिकतेच्या निकषावर मराठी सिनेमा खरा उतरेल तेव्हा तो जिंकेलही, टिकेल ही आणि स्पर्धेत पुढे ही जाईल अशी आशा बाळगायला हरकत नाही. गोंधळ सिनेमानं ही सुरुवात झालीय, असं म्हणायला हरकत नाही.
(लेखक सिने-समीक्षक आणि गोल्डन ग्लोब्स अवार्डचे आंतरराष्ट्रीय मतदार आहेत. या लेखात व्यक्त केलेली मतं ही वैयक्तिक आहेत. )
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)











