पाकिस्तानी सैन्याचं नेतृत्व 2030 पर्यंत आसिम मुनीर यांच्याकडे का देण्यात आलं?

फील्ड मार्शल आसिम मुनीर, पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यासोबत

फोटो स्रोत, ISPR

फोटो कॅप्शन, फील्ड मार्शल आसिम मुनीर, पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यासोबत

पाकिस्तानचे लष्करप्रमुख, चीफ ऑफ डिफेन्स फोर्सेस, फील्ड मार्शल जनरल आसिम मुनीर म्हणाले आहेत की, पाकिस्तानची परिस्थिती आता सुधारते आहे आणि देश आता प्रगतीची झेप घेईल.

गुरुवारी (4 डिसेंबर) ऐवान-ए-सद्र (राष्ट्रपती भवन) मध्ये किर्गिजस्तानच्या राष्ट्राध्यक्षांच्या सन्मानार्थ रात्रीची मेजवानी आयोजित करण्यात आली होती. त्यावेळेस पाकिस्तानचे अनेक मंत्री, लष्करी अधिकारी आणि फील्ड मार्शल आसिम मुनीर उपस्थित होते.

फील्ड मार्शल आसिम मुनीर यांनी रात्रीच्या मेजवानीला उपस्थित असलेल्या पत्रकारांबरोबर अनौपचारिक गप्पा मारल्या.

रात्रीच्या जेवणाला उपस्थित असलेल्या पत्रकारांनुसार, 'फील्ड मार्शल म्हणाले की देशात सर्वकाही ठीक आहे आणि पाकिस्तानातील परिस्थिती सुधारते आहे. इथून पुढे देश प्रगतीची झेप घेईल.'

फील्ड मार्शल आसिम मुनीर यांची चीफ ऑफ डिफेन्स फोर्सेस म्हणून नियुक्ती झाल्यानंतर पाकिस्तानी प्रसारमाध्यमांमध्ये प्रकाशित झालेलं त्यांचं हे पहिलंच वक्तव्यं आहे.

रात्रीच्या मेजवानीला उपस्थित असलेले वरिष्ठ पत्रकार तारिक चौधरी बीबीसीला म्हणाले की फील्ड मार्शल आसिम मुनीर पत्रकारांबरोबर फक्त काही सेंकदच बोलले.

पाकिस्तानच्या राष्ट्राध्यक्ष कार्यालयातून गुरुवारी (4 डिसेंबर) अधिसूचना जारी झाल्यानंतर गेल्या काही दिवसांपासून देशभरात फील्ड मार्शल आसिम मुनीर यांची चीफ ऑफ डिफेन्स फोर्सेस म्हणून नियुक्ती होण्याबाबत व्यक्त होणारे अंदाज आणि अफवांना पूर्णविराम लागला आहे.

राष्ट्राध्यक्ष आसिफ अली झरदारी यांनी गुरूवारी (4 डिसेंबर) फील्ड मार्शल आसिम मुनीर यांना लष्कर प्रमुख आणि संरक्षण दलांचे प्रमुख म्हणून नियुक्त करण्यास मंजूरी दिली.

किती दिवसांचा कार्यकाळ असतो?

पाकिस्तानच्या राष्ट्राध्यक्ष कार्यालयाकडून जारी करण्यात आलेल्या एका वक्तव्यानुसार, लष्करप्रमुख फील्ड मार्शल आसिम मुनीर यांचा कार्यकाळ पाच वर्षांचा आहे.

ही अधिसूचना जारी झाल्यानंतर फील्ड मार्शल आसिम मुनीर यांचा कार्यकाळ 2030 मध्ये संपणार आहे.

4 डिसेंबर 2025 ला जारी झालेल्या अधिसूचनेनुसार, फील्ड मार्शल आसिम मुनीर पुढील पाच वर्षांसाठी पाकिस्तानचे चीफ ऑफ डिफेन्स फोर्सेस आणि चीफ ऑफ आर्मी स्टाफ असतील.

नोव्हेंबर 2022 मध्ये जनरल आसिम मुनीर लष्करप्रमुख झाले होते.

मात्र नंतर पाकिस्तानच्या सैन्याच्या अधिनियमात बदल झाल्यानंतर, लष्करप्रमुखांचा कार्यकाळ तीन वर्षांऐवजी वाढवून पाच वर्षांचा करण्यात आला होता.

लष्करप्रमुख म्हणून मुनीर यांचा कार्यकाळ नोव्हेंबर 2027 मध्ये संपणार होता.

पाकिस्तानचे चीफ ऑफ डिफेन्स फोर्सेस, फील्ड मार्शल आसिम मुनीर

फोटो स्रोत, ISPR

फोटो कॅप्शन, पाकिस्तानचे चीफ ऑफ डिफेन्स फोर्सेस, फील्ड मार्शल आसिम मुनीर

आता 27 व्या दुरुस्तीनंतर लष्करप्रमुखाकडे चीफ ऑफ डिफेन्स फोर्सेसचं अतिरिक्त पददेखील आहे. अधिसूचनेअंतर्गत पुढील पाच वर्षांसाठी ते चीफ ऑफ डिफेन्स फोर्सेस आणि चीफ ऑफ आर्मी स्टाफ असतील.

फील्ड मार्शल आसिम मुनीर यांना त्यांच्या नियुक्तीबद्दल शुभेच्छा देत पंतप्रधान म्हणाले, "देशाच्या संरक्षणात आणखी सुधारणा केल्या जातील. ही गोष्ट आधुनिक आणि समकालीन आवश्यकतांनुरुप आहे."

ते म्हणाले, "पाकिस्तानची सुरक्षा, प्रगती आणि समृद्धीसाठी सर्व संस्था एकत्रितपणे काम करतील."

अधिसूचनेला विलंब का करण्यात आला?

27 नोव्हेंबरला, जनरल साहिर शमशाद मिर्झा, पाकिस्तानच्या सशस्त्र दलांच्या जॉईंट चीफ्स ऑफ स्टाफ कमिटीच्या पदावरून सेवानिवृत्त झाले. त्यावेळेस अशी अपेक्षा बाळगली जात होती की केंद्रीय सरकार या पदासाठी बदली नियुक्तीसाठी चीफ ऑफ डिफेन्स स्टाफच्या नियुक्तीसाठी अधिसूचना जारी करेल.

अर्थात, सोशल मीडियावर यासंदर्भात अनेक प्रकारच्या अफवा पसरत होत्या.

पाकिस्तानचे गृहराज्य मंत्री तलाल चौधरी म्हणाले की चीफ ऑफ डिफेन्स फोर्सेसची अधिसूचना जारी करण्याबाबतचे अंदाज 'अयोग्य' आहेत.

जिओ न्यूजच्या 'आज शहजेब खानजादा के साथ' या कार्यक्रमात तलाल चौधरी म्हणाले, 'याबाबत कोणतीही समस्या नव्हती.'

आसिम मुनीर यांचं पोस्टर घेतलेल्या पाकिस्तानी नागरिकांचा (फाईल फोटो)

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, आसिम मुनीर यांचं पोस्टर घेतलेल्या पाकिस्तानी नागरिकांचा (फाईल फोटो)

ते म्हणाले, "सरकारनं आधी दोन-तृतियांश बहुमतानं राज्यघटनेत सुधारणा मंजूर करवून घेतली. कायद्यात सुधारणा केली आणि नियम बनवले. ही सर्व एक प्रक्रिया आहे. हे सर्व नियमांनुसार करण्यात आलं आहे."

ते पुढे म्हणाले, 'यासंदर्भात एक नवीन सचिवालय स्थापन करण्यात आलं आहे. त्यामुळे यासाठी काही वेळ लागला.'

पाकिस्तान तहरीक-ए-इंसाफ (पीटीआय) च्या अंदाजांचा उल्लेख करत ते म्हणाले, 'भूतकाळात होते, त्याच्या उलट सध्याचं सरकार आणि सैन्य यामध्ये चांगले संबंध आहेत. हे संबंध वैयक्तिक हितांवर आधारित नाहीत.'

ते म्हणाले की 'सैन्य आणि सरकारमधील या आघाडीमुळेच पाकिस्तानात स्थैर्य आलं आहे.'

'भारतापासून काही धोका आहे का?'

पाकिस्तान सरकार आणि लष्करी अधिकाऱ्यांमधील संबंध चांगले होण्यास सर्वसामान्यपणे देशातील स्थैर्याची गॅरंटी म्हणून पाहिलं जातं.

पाकिस्तानातील वरिष्ठ पत्रकार हामिद मीर म्हणाले, "ऐतिहासिकदृष्ट्या, पाकिस्तानातील राजकीय सरकारांनी, लष्करप्रमुखाची नियुक्ती त्यांच्या इच्छेनं व्हावी यासाठी नेहमीच प्रयत्न केले आहेत. मात्र बऱ्याचवेळा या संबंधांचा शेवट मतभेदात झाला आहे."

बीबीसीशी बोलताना ते म्हणाले, "सरकारनं अलीकडेच राज्यघटनेत ज्या सुधारणा केल्या आहेत, त्यात पीपीपी आणि पीएमएल-एन ला राजकीय लाभ मिळाला आहे. मात्र देश आणि संस्था कमकुवत झाल्या आहेत."

हामिद मीर म्हणाले, 'या नियुक्तीनंतर असं वाटतं की पीटीआयबरोबर उघड संघर्ष सुरू झाला आहे. हे लक्षात घेतलं पाहिजे की माजी पंतप्रधान इम्रान खान यांनी विद्यमान लष्करप्रमुख फील्ड मार्शल यांच्यावर वारंवार टीका केली आहे.'

या नियुक्तीमुळे देशात स्थैर्य येईल, असं हामिद मीर यांना वाटत नाही.

पाकिस्तान सैन्यातील अधिकारी

फोटो स्रोत, Getty Images

मीर म्हणाले, 'अमेरिकेत पाकिस्तान विरोधी लॉबी इम्रान खानचा मुद्दा वारंवार उपस्थित करून पाकिस्तानचं नुकसान करून इच्छिते आणि अमेरिकेतील सीनेटर्सनी पाकिस्तानवर निर्बंध घालण्याची मागणी केली आहे.'

अर्थात, हामिद मीर म्हणाले की, 'पाकिस्तानचं सैन्य आणि सुरक्षा कमांडमध्ये अलीकडेच झालेल्या नियुक्त्यांमधून हे संकेत मिळतात की पाकिस्तान सरकारला अजूनही भारताकडून कोणत्या तरी धोक्याची शक्यता वाटते आहे.'

'याच कारणामुळे फील्ड मार्शल आसिम मुनीर यांना संरक्षण दलांचं प्रमुख पद देण्यात आलं आहे. तसंच हवाई दलाच्या प्रमुखांचा कार्यकाळदेखील वाढवण्यात आला आहे.'

सोशल मीडियावर का होतेय चर्चा?

पाकिस्तानातील सोशल मीडियावर फील्ड मार्शल आसिम मुनीरदेखील ट्रेंड करत आहेत. काही युजर्स याला असामान्य नियुक्ती म्हणत आहेत. तर काही युजर पाकिस्तानच्या राजकारणावरील याच्या प्रभावाबद्दल चर्चा करत आहेत.

एक्स या सोशल मीडियावर उमर अजहर या एका युजरनं 2030 पर्यंत आसिम मुनीर यांची संरक्षण दलांचे प्रमुख म्हणून झालेल्या नियुक्तीला 'असामान्य' म्हटलं आहे.

या युजरनं म्हटलं आहे, 'याच्या आधी सेवेत असणाऱ्या कोणत्याही लष्करप्रमुखाला घटनात्मक सूट देण्यात आलेली नाही. तसंच त्यांचा कार्यकाळदेखील इतका वाढवण्यात आलेला नाही की त्यांना तीन वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केल्यानंतर पाच वर्षांचा कालावधी मिळेल.'

त्यांनी लिहिलं आहे, 'ते जेव्हा निवृत्त होतील, तेव्हा पाकिस्तानच्या इतिहासातील सर्वाधिक काळ सेवेत राहिलेले लष्करप्रमुख ठरतील.'

एका युजरनं लिहिलं, "हे पाहणं सोपं आहे की पाच वर्षांसाठी राजकीय आघाडीवर निश्चितता आहे. मात्र यामुळे आर्थिक स्थैर्य आणि विकासदेखील होईल का? सरकारकडे आता एक व्यापक व्यूहरचना तयार करण्यासाठी आणि ती लागू करण्यासाठी वेळ असेल का?"

याच वर्षी मे महिन्यात पाकिस्तानचे लष्करप्रमुख जनरल आसिम मुनीर यांना पदोन्नती देऊन फील्ड मार्शल करण्यात आलं होतं

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, याच वर्षी मे महिन्यात पाकिस्तानचे लष्करप्रमुख जनरल आसिम मुनीर यांना पदोन्नती देऊन फील्ड मार्शल करण्यात आलं होतं

पत्रकार फहाद हुसैन यांनी लिहिलं, 'सीडीएफच्या अधिसूचनेनंतर पाकिस्तानात या आठवड्यात होणारे टॉक शो खूपच कंटाळवाणे होणार आहे.'

पाकिस्तानातील पत्रकार हामिद मीर यांनीदेखील लिहिलं आहे, "हा अध्याय संपला आहे."

एक्सवर पोस्ट केलेल्या एका वक्तव्यात त्यांनी म्हटलं आहे की 'पाकिस्तानच्या 78 वर्षांच्या इतिहासात दोन वेळा हवाई दल प्रमुखांचा कार्यकाळ दोन लष्करी हुकुमशहांनी वाढवला आहे. फील्ड मार्शल अय्यूब खान यांनी एअर मार्शल असगर खान यांच्या सेवेचा कार्यकाळ वाढवला होता. तर जनरल झिया-उल-हक यांनी एअर मार्शल मुहम्मद अनवर शमीम यांचा कार्यकाळ वाढवला होता.'

राष्ट्राध्यक्ष निवासस्थानानं गुरुवारी (4 डिसेंबर) हवाई दल प्रमुख, एअर चीफ मार्शल जहीर अहमद बाबर सिद्दीकी यांचा कार्यकाळ दोन वर्षांसाठी वाढवण्यास देखील मंजूरी दिली आहे.

कार्यकाळ वाढवण्याचा हा निर्णय मार्च 2026 मध्ये त्यांचा सध्याचा पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण झाल्यावर लागू होईल.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)