'एका ध्येयासाठी शत्रूही एकत्र आले'; भारत आणि पाकिस्तानी लष्करानं केलेल्या बचाव कार्यांची श्रीलंकेत चर्चा

पुरात अडकलेले लोक

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, दितवा चक्रीवादळामुळे श्रीलंकेत प्रचंड विध्वंस झाला आहे. यात 400 हून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे, तर शेकडो लोक बेपत्ता आहेत.

"श्रीलंकेतील पूरग्रस्त भागात भारत आणि पाकिस्तानची हेलिकॉप्टर्स बचाव कार्य करत आहेत. लोकांना मदत करण्याच्या निमित्तानं हे दोन्ही जुने शत्रू एकत्र आले आहेत. बंधूंनो धन्यवाद."

श्रीलंकेतील शेन प्रियाविक्रमा यांनी हा संदेश पाठवला आहे. दितवा चक्रीवादळानं श्रीलंकेला झोडपून काढल्यानंतर भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांनी श्रीलंकेला मदत पाठवली. या देशांच्या लष्करी सेवांबद्दल आभार मानणारे संदेश अनेकांनी पाठवले आहेत. शेन प्रियाविक्रमा त्यातील एक होते.

भारत आणि पाकिस्तानमध्ये दीर्घकाळापासून असलेल्या मतभेदांबद्दल त्यांनी स्पष्टपणे मत मांडलं. यात अलीकडेच मे महिन्यात दोन्ही देशांमध्ये झालेल्या संघर्षाचाही समावेश आहे.

दितवा चक्रीवादळामुळे श्रीलंकेत प्रचंड विध्वंस झाला आहे. यात 400 हून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे, तर शेकडो लोक बेपत्ता आहेत. चक्रीवादळानं झालेलं नुकसान लक्षात घेऊन श्रीलंकेत आणीबाणीची स्थिती जाहीर करण्यात आली आहे. चक्रीवादळाचा तडाखा बसलेल्या भागात अडकलेल्या लोकांना वाचवण्यासाठी बचाव कार्य सुरू आहे.

भारत आणि पाकिस्तान या दक्षिण आशियातील दोन प्रतिस्पर्धी देशांनी श्रीलंकेतील या नैसर्गिक संकटाच्या काळात बचाव कार्यात जी मदत केली आहे, त्याचं वर्णन 'स्वागतार्ह घडामोड' असं केलं जातं आहे.

"भारताच्या 'शेजारी प्रथम' धोरणाअंतर्गत, श्रीलंकेत दितवा चक्रीवादळाचा तडाखा बसलेल्या कुटुंबांना मदत करण्यासाठी आणि अत्यावश्यक सेवा पुन्हा सुरू करण्यासाठी शत्रुजीत ब्रिगेडमधील एक टास्क फोर्स तैनात केली जाते आहे," अशी पोस्ट भारतीय लष्कराच्या अतिरिक्त सार्वजनिक माहिती महासंचालकांनी त्यांच्या अधिकृत एक्स (ट्विटर) अकाउंटवर टाकली आहे.

त्यात पुढे म्हटलं, "या अभियानातून वसुधैव कुटुंबकम (संपूर्ण विश्वर हे एक कुटुंब आहे) या विचाराबद्दलची आमची सांस्कृतिक बांधिलकी दिसून येते. भारतीय लष्कर संकटकाळात श्रीलंकेच्या पाठिशी आहे."

दितवा चक्रीवादळामुळे श्रीलंकेत मुसळधार पाऊस झाला आहे. त्यामुळे तिथे मोठ्या प्रमाणात पूर आले आहेत. या चक्रीवादळामुळे तिथे मृत्यूमुखी पडलेल्यांची संख्या 460 वर पोहोचली आहे. याशिवाय अजूनही शेकडो जण बेपत्ता आहेत.

एक्स पोस्ट

फोटो स्रोत, X post

फोटो कॅप्शन, श्रीलंकेतील शेन प्रियाविक्रमा यांनी हा संदेश पाठवला आहे.

'भारतानं दिलेल्या परवानगी'बाबत पाकिस्ताननं काय आरोप केले आहेत?

Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

दुसऱ्या बाजूला, पाकिस्तानच्या सैन्याचं म्हणणं आहे की, ते हेलिकॉप्टर्सच्या मदतीनं श्रीलंकेत पुरात अडकलेल्या लोकांना बाहेर काढत आहेत. तसंच त्यांनी पूरग्रस्तांना मदत पाठवली आहे.

"पाकिस्ताननं श्रीलंकेला पाठवलेली मदत भारताकडून सातत्यानं रोखली जाते आहे. पाकिस्तानातून श्रीलंकेला मदत पोहोचवण्यासाठी पाठवण्यात आलेलं एक विशेष विमान 60 तास अडकलं होतं," असं पाकिस्तानच्या परराष्ट्र कार्यालयानं मंगळवारी (2 डिसेंबर) जारी केलेल्या एका निवेदनात म्हटल्याचं वृत्त बीबीसी उर्दूनं दिलं.

"भारतानं 48 तासांनी दिलेली आंशिक परवानगी व्यवहार्य नव्हती. त्यामुळे परतीचा प्रवासदेखील करता आला नाही आणि त्यातून श्रीलंकेत अडकलेल्या लोकांना करण्यात येत असलेल्या मदत कार्यात गंभीर अडथळा निर्माण झाला," असं त्या निवेदनात म्हटलं आहे.

पाकिस्तानच्या या आरोपांवर भारतानं प्रतिक्रिया दिली आहे.

पाकिस्तानकडून श्रीलंकेला पाठवण्यात येत असलेली मानवीय मदत भारतानं रोखल्याचं पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाचं वक्तव्यं 'हास्यास्पद' आहे, असं भारताच्या परराष्ट्र मंत्रालयानं म्हटलं.

भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जसस्वाल म्हणाले की, पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयानं केलेलं 'हास्यास्पद' वक्तव्यं आम्ही नाकारतो. भारताच्या विरोधात चुकीची माहिती पसरवण्याचा हा आणखी एक प्रयत्न आहे.

 हेलिकॉप्टर्सच्या मदतीनं श्रीलंकेत पुरात अडकलेल्या लोकांना बाहेर काढतानाचं दृश्य

फोटो स्रोत, X@dgprPaknavy

फोटो कॅप्शन, पाकिस्तानच्या सैन्याचं म्हणणं आहे की ते हेलिकॉप्टर्सच्या मदतीनं श्रीलंकेत पुरात अडकलेल्या लोकांना बाहेर काढत आहेत.

इस्लामाबादमधील भारताच्या उच्चायुक्तालयाला, 1 डिसेंबर 2025 ला दुपारी 1 वाजता, श्रीलंकेला मानवीय मदत पोहोचवणाऱ्या पाकिस्तानी विमानाला उड्डाण करण्याची (ओव्हरफ्लाय) परवानगी देण्याची विनंती मिळाली.

मानवीय मदत करण्यासाठीची आवश्यकता लक्षात घेऊन,भारत सरकारनं त्याच दिवशी लगेचच ही विनंती मंजूर केली होती. भारतानं 1 डिसेंबर 2025 ला संध्याकाळी 5:30 वाजताउड्डाण करण्याची परवानगी दिली होती.

"या कठीण काळात श्रीलंकेला सर्व उपलब्ध मार्गांनी मदत करण्यास भारत कटिबद्ध आहे," असं भारताच्या परराष्ट्र मंत्रालयानं म्हटलं.

भारताच्या परराष्ट्र मंत्रालयानं म्हटलं आहे की, त्यांनी मदत साहित्य असलेली जहाजं, मदत कार्यासाठी 3 विमानं आणि एक वैद्यकीय आणि बचाव पथक श्रीलंकेत पाठवलं आहे.

आयएनएस विक्रांत या भारताच्या विमानवाहू जहाजावरील भारतीय हवाई दलाची एमआय-17 हेलिकॉप्टर्स श्रीलंकेतील पूरग्रस्त भागात अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्याचं काम करत आहेत. श्रीलंकेतील लोकांबरोबरच ब्रिटन, जर्मनी, इराण, ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तानसह विविध देशांमधील लोकांना पूरग्रस्त भागातून वाचवण्यात आलं आहे, असं भारताच्या परराष्ट्र मंत्रालयानं एका निवेदनात म्हटलं आहे.

श्रीलंकेतील लोक काय म्हणत आहेत?

श्रीलंकेतील या संकटात करण्यात येत असलेल्या मदतकार्यात, भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांच्या लष्कराकडून करण्यात येत असलेल्या मदतीकडे अनेकजण सकारात्मक दृष्टीकोनातून पाहत आहेत.

"या संकट काळात भारत आणि पाकिस्तान श्रीलंकेला मदत करत आहेत. दोन्ही देशांकडून मिळालेल्या मानवीय मदतीबद्दल मी मनापासून आभार व्यक्त करतो," असं सेहन मधू नावाच्या युजरनं एक्स या सोशल मीडियावर लिहिलं.

मदत पुरवणारे जवान

फोटो स्रोत, X/@adgpi

फोटो कॅप्शन, श्रीलंकेतीललोक भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांच्या लष्कराकडून करण्यात येत असलेल्या मदतीकडे अनेकजण सकारात्मक दृष्टीकोनातून पाहत आहेत.

"भारतानं पुन्हा एकदा सिद्ध केलं आहे की, या प्रदेशातील प्रत्येकाला मदत करण्याची क्षमता त्यांच्यामध्ये आहे," असं शेन प्रियाक कर्मा या युजरनं एक्सवर लिहिलं.

त्यानं पुढे म्हटलं, "भारत आणि पाकिस्तानमध्ये ऐतिहासिक तणाव असूनदेखील भारतानं श्रीलंकेला मानवीय मदत पुरवण्यासाठी पाकिस्तानच्या विमानाला उड्डाण करण्याची परवानगी दिली. श्रीलंकेतील लोकांसाठी ही खूप मोठी गोष्ट आहे."

"भारत आणि पाकिस्तान यांनी पुन्हा एकदा सिद्ध केलं आहे की, कठीण काळात मदत करण्यात ते सर्वोत्तम आहेत," असंही त्यांनी नमूद केलं.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)