आशियामध्ये आलेल्या पुरामुळे 600 हून अधिक जणांचा मृत्यू; इंडोनेशिया, थायलंड, मलेशिया आणि श्रीलंकेत शेकडो बेपत्ता

इंडोनेशिया, थायलंड, मलेशिया आणि श्रीलंकेत शोध आणि बचाव कार्य सुरू आहे. शेकडो लोक अजूनही बेपत्ता आहेत.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, इंडोनेशिया, थायलंड, मलेशिया आणि श्रीलंकेत शोध आणि बचाव कार्य सुरू आहे. शेकडो लोक अजूनही बेपत्ता आहेत.

आशिया खंडातील अनेक देशांमध्ये मुसळधार पावसामुळे आणि दुर्मिळ उष्णकटिबंधीय वादळांमुळे प्रचंड आपत्तीग्रस्त परिस्थिती ओढावली आहे.

आशियातील प्रामुख्याने इंडोनेशिया, मलेशिया, थायलंड आणि श्रीलंकेमध्ये भीषण पूर आणि भूस्खलनामुळं अक्षरश: हाहाकार निर्माण झाला आहे.

या परिस्थितीमुळे, आशिया खंडातील सुमारे 600 हून लोकांचा मृत्यू झाला आहे.

यामुळे लाखो लोक प्रभावित झाले आहेत, त्यांची घरं वाहून गेली आहेत आणि हजारो लोक बेपत्ता झालेले आहेत.

या पूरपरिस्थीमुळे इंडोनेशियामध्ये सर्वात जास्त नुकसान झालं आहे. विशेषतः सुमात्रामध्ये हे नुकसान सर्वाधिक दिसून येतं. तिथे वेगाने वाढणाऱ्या पाण्यामुळे काही सेकंदातच घरं उद्ध्वस्त झालेली आहेत.

अनेक लोक अजूनही बेपत्ता असून खराब हवामानामुळे बचाव कार्य करणं कठीण झालेलं आहे.

दुसऱ्या बाजूला, श्रीलंकेमध्ये दितवा या चक्रीवादळामुळे 159 हून अधिक लोक मृत्युमुखी पडले आहेत तसेच अनेक लोक बेपत्ता आहेत.

प्रभावित लोकांना बाहेर काढण्याचे प्रयत्न मोठ्या प्रमाणात करूनही, शेकडो लोक अडकले आहेत तर हजारो इमारती पाण्याखाली आहेत.

दितवा चक्रीवादळामुळे श्रीलंकेत आतापर्यंत 159 जणांचा मृत्यू, 200 बेपत्ता

भारताचा शेजारी देश असलेल्या श्रीलंकेमध्ये दितवा चक्रीवादळामुळे हाहाकार झाला आहे.

या चक्रीवादळामुळे श्रीलंका, इंडोनेशिया, व्हिएतनाम, थायलंड आणि मलेशियामध्ये लाखो लोकांना फटका बसला आहे.

श्रीलंकेत चक्रीवादळामुळे होत असलेल्या पावसामुळे आणि भूस्खलनामुळे आतापर्यंत 159 जणांचा मृत्यू झाला आहे, तर 200 जण बेपत्ता झाले आहेत.

अलीकडच्या काळात श्रीलंकेत झालेलं हे सर्वात भीषण नैसर्गिक संकट असल्याचं म्हटलं जातं आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये भीषण परिस्थिती उद्भवली आहे.

आपत्ती व्यवस्थापन केंद्राने दिलेल्या वृत्तानुसार, 20 हजारहून अधिक घरे उद्ध्वस्त झाली आहेत. त्यामुळे 1 लाख 8 हजार लोकांना सरकारी तात्पुरत्या निवार्यांमध्ये पाठवण्यात आले आहे.

अधिकाऱ्यांनी सांगितले की, दितवा चक्रीवादळानंतर आणीबाणीची घोषणा करण्यात आली होती आणि त्यामुळे देशातील सुमारे एक तृतीयांश भागामध्ये वीज आणि पाण्याशिवाय जगण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे.

दितवा चक्रीवादळामुळे निर्माण झालेली पूरस्थिती

फोटो स्रोत, CHAIDEER MAHYUDDIN / AFP/Chaideer MAHYUDDIN / AFP via Getty Images

Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

सोशल मीडियावरील फोटोंमधून दिसतं आहे की भूस्खलनामुळे पुराच्या पाण्यात अनेक घरं वाहून गेली.

मुसळधार पावसामुळे प्रांतांना जोडणारे मुख्य रस्ते बंद करण्यात आले आहेत. रेल्वेनं शुक्रवारी (28 नोव्हेंबर) सकाळी सहा वाजेपर्यंत काही अत्यावश्यक सेवा सोडून सर्व ट्रेन रद्द केल्या आहेत.

श्रीलंकेतील नद्यांची पातळी सातत्यानं वाढते आहे. आपत्ती व्यवस्थापन केंद्रानं सखल भागात राहणाऱ्या लोकांना इशारा दिला आहे की त्यांनी उंच ठिकाणी जावं.

श्रीलंकेच्या सिंचन विभागाचं म्हणणं आहे की केलानी नदीच्या जवळपासच्या सखल भागांसाठी पुढील 48 तासांसाठी पुराची रेड लेव्हल वॉर्निंगदेखील देण्यात आली आहे.

धोका असलेल्या भागांमध्ये कोलंबोचाही समावेश आहे.

श्रीलंकेत पुरात अडकलेल्या लोकांची मदत करण्यासाठी सैन्य तैनात करण्यात आलं आहे. त्याचबरोबर बचाव कार्यासाठी हेलिकॉप्टरच्या वापरालाही परवानगी देण्यात आली आहे.

परिस्थिती लक्षात घेऊन ॲडव्हान्स लेव्हल एक्झाम (ए लेव्हल परीक्षा) देखील पुढे ढकलण्यात आली आहे.

यापूर्वी श्रीलंकेत सर्वात भयंकर पूर जून 2003 मध्ये आला होता. या पुरामुळे 254 जणांचा मृत्यू झाला होता आणि हजारो घरं उदध्वस्त झाली होती.

भारताकडून मदतीचा हात

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी श्रीलंकेतील भीषण पुरामुळे झालेल्या मृत्यूंबद्दल दु:ख व्यक्त केलं आहे. तसंच या परिस्थितीतून सावरण्यासाठी मदत पाठवली आहे.

पंतप्रधानांनी एक्स या सोशल मीडियावर पोस्ट केलं आहे, "सर्व प्रभावित कुटुंबांची सुरक्षा, त्यांच्याबद्दल संवेदना आणि ते लवकर बरे होण्याची इच्छा व्यक्त करतो."

त्यांनी लिहिलं आहे, "आपल्या शेजारी देशाशी एकजुटीची भावना राखत, भारतानं ऑपरेशन सागर बंधूअंतर्गत तात्काळ मदत साहित्य आणि आवश्यक मानवीय मदत श्रीलंकेला पाठवली आहे. परिस्थितीनुसार, आम्ही आणखी मदत पाठवण्यास तयार आहोत."

ग्राफिक कार्ड

मोदींनी लिहिलं आहे की "भारताच्या नेबरहूड फर्स्ट धोरण आणि व्हिजन 'महासागर' अंतर्गत, या संकटाच्या परिस्थितीत भारत श्रीलंकेच्या पाठिशी भक्कमपणे उभा आहे."

श्रीलंकेच्या मदतीसाठी भारतानं ऑपरेशन सागर बंधू सुरू केलं आहे. याची माहिती परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी दिली आहे.

त्यांनी एक्स या सोशल मीडियावर लिहिलं आहे, "ऑपरेशन सागर बंधू सुरू झालं आहे. आयएनएस विक्रांत आणि आयएनएस उदयगिरीतून कोलंबोमध्ये मदत साहित्य पोहोचवण्यात आलं. पुढील कारवाई सुरू आहे."

श्रीलंकेतील परिस्थिती

दितवा चक्रीवादळामुळे निर्माण झालेली पूरस्थिती

फोटो स्रोत, Ishara S. KODIKARA / AFP via Getty Images

श्रीलंकेत दितवा चक्रीवादळाचा कहर

  • किमान 90 जणांचा मृत्यू, 100 जण बेपत्ता
  • अत्यावश्यक सेवा सोडून सर्व ट्रेन रद्द
  • परिस्थिती पाहून सैन्य तैनात करण्यात आलं
  • बचाव कार्यात हेलिकॉप्टरचा वापर
  • कोलंबोदेखील धोक्याच्या सावटाखाली

आग्नेय आशियात चक्रीवादळाचा कहर

दितवा चक्रीवादळामुळे निर्माण झालेली पूरस्थिती

फोटो स्रोत, AFP via Getty Images

इंडोनेशियातील सुमात्रामध्ये चक्रीवादळामुळे प्रचंड पूर आले आहेत. त्यात किमान 90 जणांचा मृत्यू झाला आहे.

तिथे 10 हून अधिकजण अजूनही बेपत्ता आहेत. थायलंडच्या दक्षिण भागात चक्रीवादळाचा मोठा फटका बसला आहे.

सरकारी प्रवक्त्यानुसार, आतापर्यंत तिथे 145 जणांचा मृत्यू झाला आहे. थायलंडमध्ये पुढील महिन्यात होणाऱ्या साऊथ ईस्ट एशियन गेम्सची तयारी सुरू होती.

मात्र आता भयानक पूर आल्यामुळे या स्पर्धेचं आयोजन बँकॉकमध्ये हलवण्यात आलं आहे. व्हिएतनाममध्ये पुरामुळे आतापर्यंत 98 हून जणांचा मृत्यू झाला आहे.

तर मलेशियामध्ये 19,000 हून जणांना त्यांच्या घरातून विस्थापित व्हावं लागलं आहे.

उत्तर हिंद महासागर क्षेत्रात दोन दिवसांत दुसरं चक्रीवादळं

उत्तर हिंद महासागर क्षेत्रात दोन दिवसांत दुसरं चक्रीवादळं तयार झालं आहे.

बंगालच्या उपसागराच्या दक्षिणेकडील कमी दाबाच्या प्रणालीचं 27 नोव्हेंबरला दितवा चक्रीवादळात रुपांतर झालं आहे.

या वादळाला दितवा हे नाव देण्यात आलं आहे. दितवा हे येमेननं सुचवलेलं नाव असून येमेनच्या सोकोत्रा बेटावरील एका किनारी सरोवराच्या (लगून) नावावरून हे नाव देण्यात आलं आहे.

याआधी 26 नोव्हेंबरला मलाक्काच्या सामुद्रधुनीत सेन्यार चक्रीवादळ तयार झालं होतं पण त्याची तीव्रता आता कमी झाली आहे.

पण इकडे दितवा चक्रीवादळामुळे श्रीलंकेत पूर आला असून ते श्रीलंकेच्या पूर्व किनाऱ्यालगत उत्तरेकडे प्रवास करत आहे. पुढच्या काही दिवसांत हे वादळ चेन्नईच्या दिशेनं सरकू शकेल, असं हवामान विभागानं जारी केलेल्या नकाशात दिसतं.

दितवा चक्रीवादळाचा मार्ग दर्शवणारा भारतीय हवामान विभागानं जाहीर केेलेला नकाशा

फोटो स्रोत, IMD

फोटो कॅप्शन, दितवा चक्रीवादळाचा मार्ग दर्शवणारा भारतीय हवामान विभागानं जाहीर केेलेला नकाशा

30 नोव्हेंबरपर्यंत हे चक्रीवादळ पाँडिचेरी, चेन्नई आणि आंध्र प्रदेशच्या किनाऱ्यालगत प्रवास करण्याची शक्यता आहे. या परिसरात आतापासूनच मुसळधार पाऊस हजेरी लावतो आहे.

महाराष्ट्रातल्या हवामानावर या चक्रीवादळाचा सध्या तरी कुठलाही थेट परिणाम होण्याची शक्यता दिसत नाही. पण पुढच्या काही दिवसांत हे वादळ कसा प्रवास करत यावरही बरंच अवलंबून राहील.

भारताच्या इन्सॅट उपग्रहानं 27 नोव्हेंबरला संध्याकाळी 7 च्या सुमारास टिपलेलं दृश्यं.

फोटो स्रोत, IMD

फोटो कॅप्शन, भारताच्या इन्सॅट उपग्रहानं 27 नोव्हेंबरला संध्याकाळी 7 च्या सुमारास टिपलेलं दृश्यं.

यंदाच्या वर्षातलं चौथं चक्रीवादळ

उत्तर हिंद महासागर क्षेत्रात म्हणजे भारतीय उपखंडाच्या आसपासच्या परिसरात साधारणपणे नैऋत्य मान्सून येण्याआधीच्या काळात आणि नैऋत्य मान्सूननं माघार घेतल्यानंतरच्या काही आठवड्यांत चक्रीवादळं तयार होतात.

दितवा हे यावर्षी ऑक्टोबर-नोव्हेंबरदरम्यान आलेलं चौथं चक्रीवादळ ठरलं आहे.

सेन्यार चक्रीवादळाचा मार्ग दर्शवणारा भारतीय हवामान विभागाचा नकाशा

फोटो स्रोत, IMD

फोटो कॅप्शन, सेन्यार चक्रीवादळाचा मार्ग दर्शवणारा भारतीय हवामान विभागाचा नकाशा

26 नोव्हेंबरला दक्षिण अंदमानजवळ मलाक्काच्या सामुद्रधुनीत सेन्यार चक्रीवादळ तयार झालं होतं. अनेक वर्षांनी मलाक्काच्या सामुद्रधुनीतच चक्रीवादळ तयार झालं.

सेन्यार चक्रीवादळ तयार होण्याआधी ही प्रणाली पश्चिमेला सरकण्याची शक्यता अनेक हवामान मॉडेल्सनी दाखली होती.

पण नंतर हे वादळ पूर्वेला इंडोनेशियातच वळलं.

मोंथा चक्रीवादळाचा मार्ग दर्शवणारा नकाशा

फोटो स्रोत, IMD

फोटो कॅप्शन, मोंथा चक्रीवादळाचा मार्ग

त्याआधी बंगालच्या उपसागरात मोंथा चक्रीवादळ आलं होतं. 22 ऑक्टोबरच्या बंगालच्या उपसागरात कमी दाबाची प्रणाली तयार झाली आणि तिचं 26 ऑक्टोबर 2025 च्या रात्री चक्रीवादळात रुपांतर झालं.

मोंथा हे थायलंडनं सुचवलेलं नाव असून, त्याचा अर्थ होतो 'सुंदर आणि सुवासिक फुल'. 27 ऑक्टोबरला या वादळाच सीव्हियर सायक्लॉनिक स्टॉर्म म्हणजे अतीतीव्र चक्रीवादळात रुपांतर झालं.

एखाद्या चक्रीवादळातील वाऱ्यांचा वेग ताशी 88-117 किमीपर्यंत पोहोचतो, तेव्हा त्याला सीव्हियर सायक्लॉनिक स्टॉर्म म्हणजे अतीतीव्र चक्रीवादळ म्हटलं जातं. मोंथा चक्रीवादळातील किनाऱ्यावर धडकताना ताशी 90-100 किलोमीटर वेगाने वारे वाहात होते तर काही वेळा वाऱ्याच्या झोतांचा वेग ताशी 110 किलोमीटरपर्यंत पोहोचला.

काकीनाडा आणि मछलीपट्नमदरम्यान हे वादळ किनाऱ्याला धडकलं.

मोंथा चक्रीवादळाच्या प्रभावामुळे महाराष्ट्रातल्या विदर्भातही काही ठिकाणी वादळी वारा आणि हलक्या ते मध्यम पावसानं हजेरी लावली.

हे वादळ पुढे सरकलं तसं त्या प्रणालीतून तयार झालेल्या हवामानाचा परिणाम थेट हिमालयापर्यंत जाणवला. नेपाळमध्येही या वादळामुळे बर्फवृष्टी झाली.

शक्ती चक्रीवादळाचा मार्ग

फोटो स्रोत, IMD

फोटो कॅप्शन, शक्ती चक्रीवादळाचा मार्ग

त्याआधी ऑक्टोबरच्या सुरुवातीला अरबी समुद्रात 'शक्ती' हे अतीतीव्र चक्रीवादळ तयार झालं.

सप्टेंबरमध्ये महाराष्ट्रात धुमाकूळ घालणाऱ्या कमी दाबाच्या प्रणालीनं 29 सप्टेंबरनंतर पुन्हा अरबी समुद्रात प्रवेश केला होता. त्यातूनच या चक्रीवादळाची निर्मिती झाली होती.

यंदाच्या वर्षातलं आणि या हंगामातलं हे दक्षिण आशियातलं पहिलं चक्रीवादळ ठरलं.

चक्रीवादळांना नावं कशी दिली जातात?

सामान्य लोकांना हवामानाची माहिती किंवा इशारा देताना केवळ वादळाची आकडेवारी किंवा तांत्रिक संज्ञांऐवजी नावं वापरणं सोपं जातं, म्हणून वादळांना नावं देण्याचा प्रघात पडला.

तसंच वादळ नेमकं कुठे आहे, यावरून ते हरिकेन आहे की टायफून की सायक्लोन, म्हणजे चक्रीवादळ हे ठरतं.

वादळांना नावं देण्याची पद्धत तशी जुनी आहे, पण भारतात अलीकडेच वादळांना अशी नावं देण्याची पद्धत सुरू झाली.

अगदी सोळाव्या शतकातही प्युर्टो रिकोमध्ये आलेल्या वादळाला सेंट फ्रांसिस यांचं नाव दिल्याचे उल्लेख आहेत.

19व्या शतकातले हवामानतज्ज्ञ क्लेमेंट व्रॅग ऑस्ट्रेलियात राहायला गेले, तेव्हा तिथे येणाऱ्या वादळांना नावं देण्यास सुरुवात केली होती.

1953पासून मायामी नॅशनल हरिकेन सेंटर आणि जागतिक हवामानशास्त्र संघटना म्हणजे वर्ल्ड मेटिरिओलॉजिकल ऑर्गनायजेशन (डब्ल्यूएमओ) या संस्था उष्णकटीबंधीय चक्रीवादळांना नावं देत आले आहेत.

चक्रीवादळाला नावं कशी दिली जातात, ते कोण देतं, यासंदर्भात सविस्तर बातमी तुम्ही इथे वाचू शकता.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)