मोंथा चक्रीवादळामुळे महाराष्ट्रावर 'इथे' पाऊस, कोकणात वादळी हवामान तर हिमालयातही परिणाम

फोटो स्रोत, Getty Images
- Author, जान्हवी मुळे
- Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी
मोंथा चक्रीवादळाच्या प्रभावामुळे महाराष्ट्रातल्या विदर्भातही काही ठिकाणी वादळी वारा आणि हलक्या ते मध्यम पावसानं हजेरी लावली. या वादळामुळे निर्माण झालेल्या हवामानाचा परिणाम थेट हिमालयापर्यंत जाणवतो आहे.
28 ऑक्टोबरच्या संध्याकाळी आंध्र प्रदेशात मछलीपट्टनम आणि काकीनाडादरम्यान किनाऱ्यावर धडकल्यानंतर तिथे अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस झाला आहे. घरं आणि रस्त्यांचंही नुकसान झालं.
मात्र या चक्रीवादळाची तीव्रता कमी होऊन 29 तारखेला त्याचं डीप डिप्रेशनमध्ये रुपांतर झालं.
हे वादळ हळूहळू पुढे सरकतंय, तसं त्याच्या प्रभावामुळे आंध्र प्रदेश, तेलंगणासह विदर्भ आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे.

फोटो स्रोत, IMD
पुढे या चक्रीवादाचे अवशेष बिहार आणि पश्चिम बंगालच्या दिशेनं पुढे सरकण्याची शक्यता आहे. गुरुवार आणि शुक्रवारी ही प्रणाली नेपाळपर्यंत पोहोचेल, तेव्हा तिथे मोठ्या प्रमाणात पाऊस आणि बर्फवृष्टी होऊ शकते.

फोटो स्रोत, ANI
दरम्यान, या वादळाच्या प्रभावामुळे नेपळामध्ये हिमालयातल्या खालच्या भागात अनेक ठिकाणी पाऊस आणि जोरदार बर्फवृष्टी झाली असून अनेक गिर्यारोहण मोहिमा स्थगित करण्यात आल्याचं तिथल्या सरकारनं जाहीर केलं आहे.
एव्हरेस्टसह अन्नपूर्णा, मन्सालू आणि धौलागिरीसारख्या शिखरांवर चढाई करण्यासाठी सध्या गिर्यारोहकांनी जाऊ नये, असा इशारा नेपाळ सरकारनं दिला आहे.

फोटो स्रोत, Kaji Bista/BBCNepali
रॉयटर्स वृत्तसंस्थेनं दिलेल्या माहितीनुसार एव्हरेस्ट बेस कँपजवळ लोबुचे इथे अडकलेल्या गिर्यारोहकांना वाचवण्यासाठी आलेलं हेलिकॉप्टर बर्फावरून घसरून कोसळलं.
नेपाळमध्ये साधारण 1,500 गिर्यारोहक वेगवेगळ्या ठिकाणी ट्रेक करत आहेत, ज्यातले 200 जण परदेशी नागरीक आहेत. अनेक ठिकाणी बर्फवृष्टीमुळे ते अडकले आहेत.
असा झाला 'मोंथा'चा प्रवास
बंगालच्या उपसागरात 22 ऑक्टोबरच्या आसपास तयार झालेल्या कमी दाबाच्या प्रणालीचं 26 ऑक्टोबर 2025 च्या रात्री चक्रीवादळात रुपांतर झालं आणि त्याला मोंथा हे नाव देण्यात आलं.
मोंथा हे थायलंडनं सुचवलेलं नाव असून, त्याचा अर्थ होतो 'सुंदर आणि सुवासिक फुल'.
27 ऑक्टोबरला या वादळाच सीव्हियर सायक्लॉनिक स्टॉर्म म्हणजे अतीतीव्र चक्रीवादळात रुपांतर झालं.
एखाद्या चक्रीवादळातील वाऱ्यांचा वेग ताशी 88-117 किमीपर्यंत पोहोचतो, तेव्हा त्याला सीव्हियर सायक्लॉनिक स्टॉर्म म्हणजे अतीतीव्र चक्रीवादळ म्हटलं जातं.
मोंथा चक्रीवादळातील किनाऱ्यावर धडकताना ताशी 90-100 किलोमीटर वेगाने वारे वाहात होते तर काही वेळा वाऱ्याच्या झोतांचा वेग ताशी 110 किलोमीटरपर्यंत पोहोचला.
काकीनाडा आणि मछलीपट्नमदरम्यान हे वादळ किनाऱ्याला धडकलं.

फोटो स्रोत, IMD
उत्तर हिंद महासागर क्षेत्रात म्हणजे भारतीय उपखंडाच्या आसपासच्या परिसरात साधारणपणे नैऋत्य मान्सून येण्याआधीच्या काळात आणि नैऋत्य मान्सूननं माघार घेतल्यानंतरच्या काही आठवड्यांत चक्रीवादळं तयार होतात.
मोंथा चक्रीवादळ हे यंदाच्या मोसमातलं आणि यंदाच्या वर्षातलं दुसरं चक्रीवादळ आहे. याआधी ऑक्टोबरच्या सुरुवातीला अरबी समुद्रात शक्ती चक्रीवादळ तयार झालं होतं.
बंगालच्या उपसागरातून महाराष्ट्रात आलेल्या कमी दाबाच्या प्रणालीनं 29 सप्टेंबरनंतर पुन्हा अरबी समुद्रात प्रवेश केला होता आणि त्यातूनच शक्ती चक्रीवादळाची निर्मिती झाली होती.
अरबी समुद्रात वादळ रेंगाळलं
अरबी समुद्रातलं डिप्रेशन म्हणजे कमी दाबाची तीव्र प्रणाली अजूनही कायम आहे. 22 ऑक्टोबरला हे वादळ तयार झालं होतं आणि अजूनही ते रेंगाळतंय.
त्यामुळे पश्चिम किनाऱ्यावर मासेमारीसाठी जाणाऱ्यांना आणि जहाजांनाही खबरदारीचा इशारा देण्यात आला आहे.
या डिप्रेशनच्या प्रभावामुळे कोकण आणि घाट प्रदेशात अनेक ठिकाणी गेल्या 24 तासांत वादळी वारा, विजा आणि गडगडटासह मुसळधार पावसानं हजेरी लावली.

फोटो स्रोत, IMD
29 ऑक्टोबरला गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ, नांदेड, हिंगोली आणि परभणी या जिल्ह्यांत जोरदार पावसासाठी ऑरेंज अलर्ट आहे तर राज्यात इतर सर्वच जिल्ह्यांत वादळी वारे आणि पावसासाठी यलो अलर्ट आहे.
30 ऑक्टोबरला पालघर, नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, संभाजीनगर, जालना, परभणी, बुलढाणा, अकोला, अमरावती, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली आणि चंद्रपूर इथे मेघगर्जनेसह पावसासाठी यलो अलर्ट आहे.
चक्रीवादळांना नावं कशी दिली जातात?
सामान्य लोकांना हवामानाची माहिती किंवा इशारा देताना केवळ वादळाची आकडेवारी किंवा तांत्रिक संज्ञांऐवजी नावं वापरणं सोपं जातं, म्हणून वादळांना नावं देण्याचा प्रघात पडला.
तसंच वादळ नेमकं कुठे आहे, यावरून ते हरिकेन आहे की टायफून की सायक्लोन, म्हणजे चक्रीवादळ हे ठरतं.
वादळांना नावं देण्याची पद्धत तशी जुनी आहे, पण भारतात अलीकडेच वादळांना अशी नावं देण्याची पद्धत सुरू झाली.
या बातम्याही वाचा :
अगदी सोळाव्या शतकातही प्युर्टो रिकोमध्ये आलेल्या वादळाला सेंट फ्रांसिस यांचं नाव दिल्याचे उल्लेख आहेत.
19व्या शतकातले हवामानतज्ज्ञ क्लेमेंट व्रॅग ऑस्ट्रेलियात राहायला गेले, तेव्हा तिथे येणाऱ्या वादळांना नावं देण्यास सुरुवात केली होती.
1953पासून मायामी नॅशनल हरिकेन सेंटर आणि जागतिक हवामानशास्त्र संघटना म्हणजे वर्ल्ड मेटिरिओलॉजिकल ऑर्गनायजेशन (डब्ल्यूएमओ) या संस्था उष्णकटीबंधीय चक्रीवादळांना नावं देत आले आहेत.
चक्रीवादळाला नावं कशी दिली जातात, ते कोण देतं, यासंदर्भात सविस्तर बातमी तुम्ही इथे वाचू शकता.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)











