तितली ते आग्रा : कुटुंब नावाचं मिथक मोडीत काढणारे, अस्वस्थ शहरी मध्यमवर्गातल्या नात्यातलं राजकारण मांडणारे सिनेमे

    • Author, नरेंद्र बंडबे
    • Role, बीबीसी मराठीसाठी

गेल्या काही दिवसांपासून कनु बहल हे नाव गाजतंय. भारतातल्या इंडी फिल्ममेकर्सची मोट त्याने बांधलेय. 50 हून अधिक दिग्दर्शकांनी आता फिल्म डिस्ट्रिब्युटर (वितरक) आणि फिल्म एक्सिबिटर्स (सिनेमागृह मालक)यांच्या विरोधात मोर्चा उघडला आहे. देशात पहिल्यांदा असं घडतंय. सर्वच इंडिपेन्डन्ट फिल्ममेकर्स यात सहभागी झालेत.

कनु बहलच्या मते सिनेमावर प्रेक्षकांचा अधिकार असायला हवा. इंडिपेन्डन्ट फिल्मचा प्रेक्षक वर्ग आहे. त्यांना आग्रासारख्या फिल्म पाहायला आवडतात. पण फिल्म डिस्ट्रिब्युटर (वितरक) आणि फिल्म एक्सिबिटर्स (सिनेमागृह मालक) यांना जास्त फायदा कमवायचा असतो. मग एखादी इंडिपेन्डन्ट फिल्म आली की तिला स्क्रिन कमी देणं, कमी कालावधीसाठी फिल्म दाखवणं असं बरंच काही होतं. प्रेक्षकांना ही प्रक्रिया माहीत असावी यासाठी हा आटापिटा करण्यात येतोय.

संपूर्ण सोशल मीडिया या इंडिपेन्डन्ट फिल्ममेकर्सच्या अपीलने भरला आहे. स्वतः कनु रोज नवीन किती स्क्रिन मिळाल्या, त्या कुठल्या शहरात आहेत याचे अपडेट देतोय. यातून इंडिपेन्डन्ट सिनेमासाठीची नवी मुहूर्तमेढ होऊ शकेल.

कनु बहल हा सध्याच्या घडीचा सर्वोत्तम इंडिपेन्डन्ट सिनेमा दिग्दर्शक आहे. बॉलीवुडमध्ये नाच-गाण्याच्या पलिकडे गोष्टीला महत्त्व देणारे काही मोजके दिग्दर्शक आहेत. कनु बहल त्यापैकी एक आहे. त्याचा आग्रा(2023) नुकताच रिलीज झाला.

यापूर्वी तितली (2013) आणि डिस्पॅच (2024) असे दोन सिनेमे त्याने केलेत. तितली आणि आग्रा या दोन्ही सिनेमांची प्रतिष्ठित कान फिल्म फेस्टिव्हलमध्ये वर्णी लागली. आपल्या कारकिर्दीतले सलग दोन सिनेमे कानमध्ये सिलेक्ट होण्याचा विक्रम कनुच्या नावावर आहे.

तितली दिल्लीतल्या यमुनापार परिसरात घडतो. आग्रा सिनेमाचं कथानक शहराच्या मध्यवर्ती भागात घडतं. या दोन्ही सिनेमांना बांधून ठेवणारा समान दुवा आहे तो म्हणजे त्यातलं अस्वस्थ निम्न मध्यमवर्गीय शहरी कुटुंब आणि त्या कुटुंबातलं राजकारण.

दोन्ही सिनेमाचं रोनाल्ड डेव्हिड लँग यांच्या ' द पॉलिटिक्स ऑफ फॅमिली एन्ड अदर एसे' या पुस्तकाशी साधर्म्य आहे.

कुटुंबाचं राजकारण आणि त्यामागची मानसिकता

रोनाल्ड डेव्हिड लँग हे स्कॉटिश मानसोपचारतज्ज्ञ आहेत. पॉलिटिक्स ऑफ फॅमिली एन्ड अदर एसेपूर्वी त्यांनी 'द डिव्हायडेड सेल्फ (1960)' आणि 'सॅनिटी मॅडनेस एन्ड फॅमिली (1964)' अशी दोन पुस्तकं लिहिली होती.

'कुटुंब' हे फक्त एक सामाजिक युनिट राहिलेलं नाही, तर समाजानं लादलेल्या दडपशाहीचं सत्ताकारण आहे अशी भूमिका लँग यांनी मांडली होती. 'पॉलिटिक्स ऑफ फॅमिली एन्ड अदर एसे या पुस्तकाची विभागणी दोन भागांमध्ये करण्यात आली आहे.

पहिल्या भागात तीन दीर्घ निबंध आहेत. त्यात कुटुंब व्यवस्था आणि त्याचा मानसिक स्वास्थावर होणारा परिणाम तर दुसऱ्या भागात कुटुंबातल्या अंतर्गत राजकारणला हात घालण्यात आला आहे. या अभ्यासपूर्ण लिखाणात कुटुंबव्यवस्थेचा मानसोपचारात्मक दृष्टीकोनावर भर देण्यात आलाय.

लँग यांनी कुटुंब बनण्याची मानसिक प्रक्रिया या पुस्तकात दिलीय. भिन्न व्यक्ती एका जागेत एकत्र येतात, सहजीवनाला सुरुवात होते म्हणजे कुटुंब नव्हे. त्या एकत्र आल्यानंतर 'आपण' ची भावना तयार झाली म्हणजे कुटुंब बनतं. जेव्हा 'तू' आणि 'मी' असे एकत्र येऊन 'आपण' बनतो तेव्हा एकमेकांना एक-दुसऱ्यावर लादण्याची प्रक्रियाही सुरू होते. यातूनच मग कुटुंबात राजकारणाचा शिरकाव होतो.

एक 'पॉवर स्ट्रक्चर' तयार होतं. आपलेपणामुळं एकमेकांवर अधिकार गाजवण्याची प्रक्रिया सुरू होते. ही आपलेपणाची भावना या कुटुंबाला वेगळ्याच पॉवर संघर्षात घेऊन जाते. पौरुषी समाजात महिलांचं स्थान दुय्यम होतं. सहजीवनात राहणारे हे लोक एकमेकांशी स्पर्धा करू लागतात. हा सर्व मानसशास्त्रीय प्रक्रियेचा भाग आहे.

लंग म्हणतात कुटुंब म्हणजे सहजीवन नाही. ती 'सत्ता' आणि 'नियंत्रण' अशी मानसिक स्थिती आहे. 'आपण' म्हणून 'कुटुंब' तयार होतं तेव्हा त्याचे नियम तयार होतात. पालक मुलांवर अधिकार गाजवायला लागतात. समाजव्यवस्थेचा भाग म्हणून मग मुलं त्यांच्या आदेशाचं पालन करतात. पण हे जास्त दिवस टिकत नाही.

मुलं कधी ना कधी उठाव करतात. पालकांविरोधात भूमिका घेतात. यातून मग संघर्ष सुरू होतो. सहजीवनात 'आपण' ही भावना असली तरी प्रत्येकाचं स्वतंत्र असं अस्तित्व आहे. त्यातून कुटुंबातला सत्तासंघर्ष सुरू राहतो. कनु बहलच्या तितली आणि आग्रा सिनेमात या गोष्टी प्रकर्षानं आलेल्या आहे.

तितली - बंदिस्त कुटुंबातला आत्मकेंद्रीपणा

तितली सिनेमातलं कथानक दिल्लीत घडतं. दिल्लीत जमनापार ही एक वेगळीच संकल्पना आहे. हा भाग शहरी मध्यमवर्ग आणि निम्न-मध्यमवर्गाचं प्रतिनिधित्व करतो. झोपडपट्टी, किंवा अगदी दाटीवाटीनं वसलेलं ठिकाण म्हणून जमनापारकडे पाहिलं जातं. ही खरी दिल्ली आहे.

ल्युटियन्स किंवा करोलबागसारख्या प्रतिष्ठीत भागातली सहजता इथं नाही. इथं आहे ती फक्त धारावीसारखी दाटीवाटी. यामुळं इथल्या कुटुंबांमध्ये ही क्लॉस्ट्रोफोबिया पाहायला मिळतो.

म्हणजे बंद असलेल्या जागेविषयीजशी भीती तयार होते. त्यातून बाहेर पडावंसं वाटत असतं, तसंच सिनेमाचं मुख्य पात्रं असलेल्या तितलीचं होतं. वडील काही करत नाहीत.

मोठा भाऊ विक्रमवर (रणवीर शौरी) कुटुंबाची जबाबदारी आहे. विक्रमची बायको त्याला सोडून गेलीय. आता तिला घटस्फोट हवा आहे. मधला भाऊ बाबला समलैंगिक आहे. घरात हे सर्वांना माहितेय. पण कोण काही बोलत नाही. विक्रम आणि बाबला लोकांना लुबाडण्याचे, चोरी करतात. अनेकदा लोकांना मारतात.

गंभीर जखमी करतात. लुटीच्या पैश्यातून कुटुंब चालतं. कुटुंबात विक्रम जे बोलेल तेच होतं. कारण वडिलांपेक्षा घर चालवण्यात त्याचा हिस्सा मोठा आहे. त्यामुळे तो घराचा कर्तापुरूष आहे.

तितलीला आपल्या या मिसफिट फॅमिलीतून बाहेर पडायचं आहे. नव्यानं बनणाऱ्या मॉलमध्ये त्याला एका पार्किंग लॉट हवाय, ज्यातून नियमित पैसे मिळतील. यासाठी तो विक्रमने सांगितलेला लग्नाचा पर्याय निवडतो.

विक्रम तितलीच्या बायकोलाही आपल्या कुटुंबाच्या चोरीच्या व्यवसायात सामील करुन घेतो. आता तितलीचं काय होणार यावर संपूर्ण पुढचा सिनेमा चालतो. तितली यातून बाहेर पडेल का? त्याच्या बायकोचं काय? असे अनेक प्रश्न घेऊन कथानक पुढे जातं आणि त्यावर सर्व पात्रं प्रॅक्टिकल म्हणजे व्यवहारी उत्तरं शोधतात.

आग्रा - एका खोलीची गोष्ट

आग्रा सिनेमाचं कथानक हे आग्रा शहरात घडतं. आता आग्रा हे काही मेट्रो शहर नाही. ते दुय्यम दर्जाचं शहर आहे. या दुय्यम दर्जाच्या शहरात गुरू आपल्या कुटुंबासोबत राहतोय. वडिलांच्या दोन बायका आहेत. दुसऱ्या बायकोसोबत ते पहिल्या मजल्यावर राहतात तर गुरू आणि त्याच्या आईचं तळमजल्यावर बस्तान आहे. गुरु हायपर सेक्शुएलिटीचं पात्रं आहे. त्याची एक आभासी गर्लफ्रेंड आहे. तो तिच्यासोबत सतत सेक्सची कल्पना करतो. शिवाय सेक्सचॅट ॲपवर जाऊन तिथं मुलींशी अश्लील गप्पा मारतो. सतत हैस्तमैथुन करतो. म्हणूनच त्याला स्व:ची रुम हवेय.

आग्रा हा सिनेमा कुटुंबात स्पेस देणाऱ्या एका खोलीच्या गरजेभोवती फिरतो. जागतिकीकरण आणि आधुनिकीकरणाच्या फेऱ्यात भारताच्या शहरी मध्यम आणि निम्नमध्यम वर्गाची कशी कुतरओढ होत चालली आहे, हे या सिनेमात दाखवण्यात आली आहे.

या कुटुंबातला प्रत्येकजण स्वयंकेंद्री आहे. तो फक्त आपला विचार करतोय. आणि टेरेसवरची ही जागा ज्यावर या कुटुंबातलं सर्व राजकारण सुरू आहे ती सत्तासंघर्षाचं मुख्य कारण बनतेय.

तितली आणि आग्रा या कनु बहलच्या सिनेमांना जोडणारा एक समान दुवा आहे. तो म्हणजे मुख्य पात्र तितली आणि गुरू दोघं कुटुंबाच्या राजकारणात तावून सुलाखून निघाल्यावर परिस्थिती आपल्या हातात घेतात. त्यावर व्यवहारिक तोडगा काढतात. ती काढण्याची प्रक्रिया क्लिष्ट आहे. ती आजच्या 'फ्रॅक्चर्ड भारतीय कुटुंबव्यवस्थेचं' दर्शन घडवते.

लँग यांच्या पुस्तकातलं कुटुंबातलं राजकारण या दोन्ही सिनेमात अनुभवायला मिळतं. पितृसत्ताक देशात बायकांची अवस्था किती बिकट आहे हे आपल्या सर्वांना माहितेय. पण दोन्ही सिनेमातल्या महिला पात्रं आप-आपलं राजकारण खेळतात आणि स्वत:चा टिकाव लावतात. त्या ही पुरुष पात्रांप्रमाणेच प्रॅक्टिकल आहेत.

आदर्श कुटुंबाच्या मिथकाची मोडतोड

कनु बहल भारताच्या परफ़ेक्ट फॅमिली सिस्टम म्हणजे आदर्श कुटुंब व्यवस्थेचं मिथक तोडतो. तो व्यवस्थेला नागडं करतो आणि त्याकडे त्रयस्थपणे पाहायला लावतो ही कनुच्या दिग्दर्शनाची खासियत आहे.

आज सर्वकाही मोबाईल आणि आभासी झालेलं असताना याचा कुटुंब या संकल्पनेवर किती परिणाम झाला आहे हे प्रकर्षानं दाखवतो. भारतीय कुटुंबात सर्वकाही आलबेल नाही तर ते आतून किती पोखरलेलं आहे याचा आरसा तो प्रेक्षकांना दाखवतो.

बाहेरुन हे कुटुंब अगदी चांगलं वाटतं. जेव्हा आपण आत जातो तेव्हा समजतं की प्रत्येक जण आपआपलं खासगी आयुष्य जगत आहे. एकमेकांवर कुरघोडी करतायत. आपण आणि आपलेपण या भावना आता निघून गेल्यात. कुटुंब म्हणजे सुरक्षित जागा असं म्हटलं जातं. पण आता तो एक पिंजरा झालाय आणि त्यातून प्रत्येकाला बाहेर पडायचं आहे. त्यासाठी प्रत्येकाची धडपड सुरू आहे.

बाहेर पडण्याची प्रत्येकाची वेगवेगळी कारणं आहेत. पण आता या कौटुंबिक बंधनातून मुक्त व्हायचंय हे नव्या भारताच्या आधुनिक मध्यमवर्गीय कुटुंब व्यवस्थेचं नागडं सत्य कनु आपल्या सिनेमांमधून दाखवतो.

पौरुषी कुटुंबात स्त्रीचं अस्तित्व

लग्नानंतर बायकोला तिच्या प्रियकराकडे घेऊन जाणारा नवरा ( हम दिल दे चुके सनम - दिग्दर्शक संजय लीला भन्साळी) आपण पाहिलाय. पण तितली पैशासाठी बायकोला तिच्या प्रियकराला भेटायला घेऊन जातो. तिच्या प्रियकराचे दुसऱ्या मुलीशी लग्न झालेलं आहे आणि त्याला त्याचं कुटुंब देखील आहे.

आग्रातला गुरू आपल्या सेक्सुअल फॅन्टसीसाठी पायानं अधु असलेल्या प्रितीसोबत लग्न करायचा निर्णय घेतो. तिची आधीच दोन लग्नं झाली आहेत. गुरुसोबत हे तिसरं लग्न. प्रिती व्यवहारी आहे. गुरुचं जे स्वत:च्या रुमचं स्वप्न आहे ते पुरं करण्यासाठी तिची मदत होते.

दोन्ही सिनेमातली स्त्री पात्रं सुरुवातीला कमकुवत वाटत असली तरी जास्त कणखर आणि व्यवहारी ठरतात. इथं खरंतर कनुच्या तिसऱ्या सिनेमाचा विचार ही व्हायला हवा. 'डिस्पॅच' हा सिनेमा झी 5 वर प्रसिद्ध झाला.

मुंबईतल्या एका मोठ्या पत्रकाराचा दिवसाढवळ्या गोळ्या घालून खून करण्यात आला. या सत्यघटनेच्या आसपास डिस्पॅचचं कथानक आहे. यात दोन महत्त्वाची स्त्री पात्रं आहेत. एक त्या पत्रकाराची बायको आणि दुसरी त्याची प्रेयसी. या दोघी आणि तितली आणि आग्रातली स्त्री पात्रं यांचा पोत समान आहे.

पुरुषप्रधान समाजात स्त्रीकडे बघण्याचा पुरुषाचा दृष्टीकोन हा कमालीचा कलुषित असतो. तितलीत विक्रम आणि तितलीची बायको यांच्याकडे ही दोन्ही पुरुष पात्र आपल्या गरजेपुरतं पाहत असतात. जेव्हा त्या कंट्रोलमध्ये किंवा नियंत्रणात येत नाहीत असं दिसतं तेव्हा हे दोघे त्यांच्यावर कुरघोडी करतात.

आग्रामध्ये मुख्य सात पैकी चार स्त्री पात्रं आहेत. गुरुची आई, त्याची बहीण, वडिलांची दुसरी बायको आणि गुरुची होणारी बायको प्रिती. या सर्वजणी सेल्फसेंटर्ड आहेत. आपल्या सोबतचा पुरुष कमकुवत आहे. त्याने पलटी मारलेय किंवा तो पलटी मारू शकतो याची त्यांना जाणीव आहे. यातून प्रॅक्टिकल सोल्युशन किंवा व्यवहारिक उपाय काढण्यावर त्यांचा भर आहे. म्हणजे प्रितीला गुरू सापडला त्यापूर्वी तिची दोन लग्न झालीयत. गुरु तिसरा आहे. त्याला काय हवंय (लैंगिक सुख) याची तिला कल्पना आहे.

ते दिल्यावर हा बाहेर जाणार नाही आणि आपल्याला स्थैर्य येईल याची तिला कल्पना आहे. आणि म्हणूनच ती नवं घर तयार करण्यासाठी व्यवहारिक तोडगा काढायला मदत करते. गुरुची आई, बहीण आणि वडिलांची दुसरी बायको यांना आपआपली स्पेस (जागा) मिळणार यात ते समाधानी आहेत.

डिस्पॅचमधल्या स्त्री पात्र या पुरुषाशी समान वागणुकीसाठी प्रयत्न करतायत. बायकोला घटस्फोट नकोय तर तडजोड हवीय, प्रेयसीला करियर महत्त्वाचं आहे. त्यासाठीच तिने या ऑफिसमधल्या सिनियर पत्रकाराला जवळ केलंय.

तितलीतली निलूदेखील व्यवहारी आहे. पैशाच्या बदल्यात प्रियकराकडे जाण्याची अट ती तितलीसमोर ठेवते. आणि त्याच्यासमोर प्रियकराच्या मिठीत जाते.

एकूण काय तर ही सर्व स्त्री पात्रं बोल्ड आणि ब्युटिफुल सोबत प्रचंड प्रॅक्टिकल आहेत. भारतीय कुटुंबातल्या सोशिक बाईचे नियम तिला लागू होत नाहीत. पण कनुच्या सिनेमाचा दृष्टिकोन हा पुरुषाचा आहे. त्यामुळं या बायकांच्या कणखर व्यक्तिमत्त्वांकडे दुर्लक्ष होतं. पण त्यांना नाकारता येत नाही.

तिन्ही सिनेमावर कनुशी बोलताना जाणवलं की ही सर्व पात्र आपल्याकडे जी आदर्श समाजाची चौकट तयार केलेली आहे त्यात मिसफिट आहेत. कनु म्हणतो की, "आपण सर्व जण मिसफिट आहोत, आत्मकेंद्री आहोत. आतलं आणि बाहेरचं असं बरंच काही भारतीय कुटुंबात सुरू आहे. बाहेरचा रेटा आतला कौटुंबिक ढाचा कमकुवत करत आहे, हे सत्य आपण नाकारु शकत नाही."

(लेखक सिने-समीक्षक आणि गोल्डन ग्लोब्स अवार्डचे आंतरराष्ट्रीय मतदार आहेत. या लेखात व्यक्त केलेली मतं ही वैयक्तिक आहेत. )

बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.