नागनाथअण्णा नायकवडी : इंग्रजांशी भिडण्यासाठी 'आझाद हिंद फौजी' सेनेची स्थापना करणारा सांगलीचा 'सिंह'

- Author, विनायक होगाडे
- Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी
इंग्रज मागावर होते. डोक्यावर हजार रुपयांचं बक्षीस होतं. पण त्याचं लक्ष्य एकच, इंग्रजांना सळो की पळो करुन सोडणं.
त्यांनी धडपड करुन गोव्याहून हत्यारं आणली, धुळ्यातला सरकारी खजिना लुटला, पोलीस चौकीतून बंदूका लुटल्या, बेसावध असताना अटक झाली तर तुरुंग फोडून पोबारा केला.
अशा किती धाडसी मोहिमांची यादी सांगावी? त्यांच्या बंदूक पकडण्याच्या कृतीमागे इंग्रजांना पिटाळून लावणं हे उद्दिष्ट्य तर होतं. पण त्याहून मोठं स्वप्न होतं ते स्वातंत्र्यानंतर समताधिष्ठित समाजनिर्मितीचं.
कष्टकऱ्यांचं, शोषित-वंचितांचं राज्य यावं, हेच स्वप्न उराशी घेऊन, अगदी स्वातंत्र्यानंतरही ते लोकांच्या प्रश्नांसाठी अविरत झटत राहिले.
नागनाथ अण्णा नायकवडी नावाच्या वादळाची ही गोष्ट. आज, 15 जुलै त्यांचा जन्मदिन!
आणि नागनाथ अण्णांनी तुरुंग फोडला...
29 जुलै 1944 ची ती रात्र. कुणी दगाबाजी केली माहिती नाही. पण, रात्रीच्या एका बेसावध क्षणी इंग्रजांनी भूमिगत नागनाथअण्णांना पकडलं. त्याआधी दोन ते तीन वर्षे नागनाथअण्णा इंग्रजांना चकवा देत त्यांना जेरीस आणत होते.
क्रांतिकारक चळवळी मोडून काढण्यात प्रसिद्ध असलेला इंग्रज अधिकारी मूर गिल्बर्टची खास नेमणूक सातारा-सांगली भागातील क्रांतीकारक चळवळ मोडून काढण्यासाठी झाली होती.
वाळवाभर बातमी पसरली. नागनाथ पकडला गेला. त्यांना इस्लामपूर तुरुंगात ठेवण्यात आलं होतं. पण, नागनाथअण्णांचा इतिहास पाहता त्यांना त्यापेक्षा मजबूत नि सुरक्षित तुरुंगात ठेवणंच इंग्रजांना योग्य वाटलं.
सातारा जेलमध्ये आणून फक्त तीन दिवस झाले होते. अंघोळीसाठी सर्व कैद्यांना मोकळं करण्यात आलं. ठरल्याप्रमाणे नागनाथअण्णा त्यांच्या तीन साथीदारांसह तुरुंगाच्या त्या भल्या-उंच भिंतीजवळ गेले. दोघांच्या खांद्यावर तिसरा नि तिसऱ्याच्या खांद्यावर नागनाथअण्णा...
कुणाला काही संशय यायच्या आतच नागनाथअण्णा भिंतीवरुन उडी मारुन इंग्रजांच्या हातावर तुरी देऊन कधीचेच पसार झाले होते.
सायरन वाजला होता. नागनाथ अण्णांना पकडण्यासाठी पोलीस पुन्हा धावाधाव करु लागले होते. मात्र अण्णा, जमिनीचं पोट फाडून एखाद्यानं गायब व्हावं, तसं कधीचेच पुन्हा भूमिगत झाले होते.
क्रांतीसिंह नाना पाटलांचा पठ्ठ्या
15 जुलै 1922 साली एका गरीब शेतकरी कुटुंबात जन्म झालेल्या नागनाथ अण्णांची जडणघडण क्रांतीसिंह नाना पाटलांच्या तालमीत झाली होती. नाना पाटलांचं वाळव्याला सतत जाणं-येणं होतं.
वाळव्याच्या माळावरच्या मारुती देवळाच्या पटांगणात नाना पाटील यायचे. शड्डू मारुन छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाची घोषणा द्यायचे.
ही घोषणा ऐकून जो मुलगा सर्वांत आधी धावत यायचा त्याच्या हातात तिरंगा द्यायचे नि मग त्याच्या नेतृत्वात निघायची ती स्वातंत्र्यासाठीची प्रभात फेरी. वाळव्यातल्या फेरीचा हा मान नागनाथअण्णांनी चुकवला, असं कधीच झालं नाही.
त्यामुळे, पुढे जाऊन नागनाथअण्णा नाना पाटलांच्या प्रतिसरकारमधील एक महत्त्वाचे शिलेदार झाले, यात काही नवल नव्हतं.
अण्णांनी वाळव्यातील तरुणांची मोट बांधली. त्यांना सशस्त्र क्रांतीसाठी तयार केलं.

फोटो स्रोत, www.nagnathanna.com
देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी घरादाराच्या त्याग केला. वडिलांची इच्छा होती, पोरानं शिकून-सवरून सरकारी नोकरी करावी, खाऊन-पिऊन पैलवान व्हावं, कुस्त्या माराव्यात. शांततेत समाधानानं आयुष्य काढावं.
नागनाथ अण्णांनी त्यातली एकच गोष्ट ऐकली. त्यांनी आयुष्यभर कुस्ती खेळली खरी, पण मैदान निवडलं ते वेगळंच. त्यांनी जीवावर उदार होऊन सतत असे डाव टाकले, की इंग्रजांना आता त्यांचा वीट आला होता.
खरं तर, या सगळ्या क्रांतिकार्याचा त्रास अगदी घरातल्यांनाही भोगावा लागला. अगदी, आई-वडिलांनाही तुरुंगात जावं लागलं.
पण, इंग्रज जाऊन देशातील कष्टकऱ्यांचं, श्रमणाऱ्यांचं राज्य यावं, यासाठी अण्णा भारावलेले होते.
सरकारी खजिन्याची लूट ते सोनवड्याची लढाई
वयाच्या विशीतले अण्णा 1942 च्या 'चले जाव' आंदोलनावेळी मुंबईला गेले. तिथल्या वातावरणाने ते प्रचंड प्रेरणा घेऊन वाळव्याला परत आले.
पण, आता महात्मा गांधींच्या सत्याग्रही अहिंसक मार्गाने जावं, की सुभाषचंद्र बोसांच्या सशस्त्र मार्गाने जावं, याबद्दलचं त्यांच्या मनातलं द्वंद्व अधिकच गहिरं झालं होतं.
कारण, 'चले जाव' म्हणत इस्लामपूरच्या मामलेदार कचेरीवर काढलेल्या मोर्चावेळी इंग्रजांनी झाडलेल्या गोळ्यांनी साऱ्या गर्दीची पांगापाग होताना अण्णांनी पाहिलं.
मनानं अखेरचा कौल दिला. इंग्रजांना 'जशास तसं' उत्तर देण्याचं धैर्य आता त्यांच्या मनात एकवटलेलं होतं.
एकीकडे, क्रांतीसिंह नाना पाटलांची सावली डोक्यावर होती तर दुसरीकडे, बाबूजी पाटणकर, जी. डी. बापू लाड, किसनराव अहिर, वसंतदादा पाटील यांसारख्या मित्रांची साथ होती.
नागनाथअण्णांनी सशस्त्र लढा उभारण्यासाठीचा खटाटोप सुरू केला. माहिती काढून लपत-छपत गोव्याहून हत्यारं आणली आणि तिथून सुरू झाली सांगली-सातारा भागातील सशस्त्र क्रांती.
1942 ते 1947 म्हणजे स्वातंत्र्य मिळेपर्यंत, सलग पाच वर्षे अण्णा इंग्रजांसाठी प्रचंड डोकेदुखी ठरले होते.
याच काळात त्यांनी क्रांतिकार्यासाठी स्पेशल ट्रेनची लूट केली. धुळ्यातला सरकारी खजिना लुटला.
इंग्रजांचा ससेमिरा कायम असतानाही हा खजिना पोलिसांना गुंगारा देत मोठ्या शिताफीनं सांगलीला आणला.

फोटो स्रोत, www.nagnathanna.com
पोलीस चौकीतून बंदुका पळवल्या. पुन्हा हत्यारे मिळवण्यासाठी गोव्याला स्वारी केली. बेसावध असताना अटकही झाली. तर, त्यांनी सातारचा तुरुंग फोडून पोबारा केला.
एके ठिकाणी नागनाथअण्णा येणार असल्याची बातमी लागताच गिल्बर्ट मूरने तिथे छापा टाकला; परंतु त्याच्या हातावर तुरी देण्यात नागनाथअण्णा यशस्वी झाले.
त्यानंतर, आपल्या भागात सशस्त्र चळवळ मजबूत व्हावी, यासाठी त्यांनी 'आझाद हिंद फौजी सेने'ची स्थापना केली.
सोनवडेत याच फौजेचं प्रशिक्षण सुरू असताना, इंग्रज पोलिसांनी छावणीवर हल्ला केला. बराच काळ चकमक सुरू राहिली. त्यामध्ये नागनाथअण्णांच्या दोन सहकाऱ्यांना हौतात्म्य प्राप्त झालं.
खरं तर, यातला एकेक प्रसंग म्हणजे अक्षरश: अंगावर काटे आणणारा रोमांचक अनुभव आहे, असं लेखक आणि सामाजिक कार्यकर्ते भारत पाटणकर सांगतात.
'महाराष्ट्राचे शिल्पकार : क्रांतिवीर नागनाथअण्णा नायकवडी' हे पुस्तक त्यांनी लिहिलं आहे. नागनाथअण्णांचे सहकारी आणि हौतात्म्य पत्करलेले बाबूजी पाटणकर हे त्यांचे वडील.
धुळ्याचा खजिना लुटणं, सातारचा तुरुंग फोडून पोबारा करणं आणि फौजी सेनेच्या प्रशिक्षणासाठी झटणं हे त्यांच्या क्रांतिकार्यातील अपरिमित धैर्य दाखवून देणारे प्रसंग असल्याचं ते सांगतात.
प्रतिसरकारमधला 'शेर'
इंग्रजी सत्तेचा जुलूम, गावगुंड-दरोडेखोरांचा उच्छाद, सावकारशाही, स्त्रियांच्यावरचे बलात्कार अशा कितीतरी अन्यायाखाली हैराण झालेल्या जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी सातारा-सांगली भागात 'प्रतिसरकार' स्थापन करण्यात आलं.
"लोकांच्या कल्याणासाठी लोकच सरकार चालवतील, अशी ही कल्पना. क्रांतिसिंह नाना पाटील यांना प्रतिसरकारचं प्रमुख पद देऊन वेगवेगळ्या गावी 18 गट स्थापन करण्यात आले. नागनाथअण्णा नायकवडी हे या 'प्रतिसरकार'मधील वाळव्याचे शिलेदार होते", असं पत्रकार संपत मोरे सांगतात.
रचनात्मक आणि प्रबोधनात्मक विधायक कामे म्हणून राष्ट्र सेवा दलाच्या शाखा चालवणं, वाचनालये काढणं आणि तरुणांची बौद्धिक जडणघडण करणं अशी कामं प्रतिसरकारकडून केली जायची.

त्यासोबतच, इंग्रजांच्या खबऱ्यांना शिक्षा देणं, व्यवस्थित काम न करता लोकांना त्रास देणाऱ्या पाटील, तलाठ्यांना शिक्षा देणं, सरकारधार्जिण्या मंडळींच्यावर वचक बसवणं ही कामंदेखील प्रतिसरकारमधील भूमिगतांकडून केली जायची.
हे करत असताना त्यांना मारझोडही करावी लागायची. भूमिगतांनी गुन्हेगारांना मारण्यासाठी एक नवीन पद्धत सर्वत्र अवंलबवली होती.
गुन्हेगाराचे पाय बांधून, पायांध्ये काठी अडकून त्याला उलटा टांगून तळपायावर काठ्यानी झोडपणं, याला 'पत्र्या लावणं' म्हटलं जायचं. या पत्र्या लावण्यावरुनच प्रतिसरकारला लोक 'पत्री सरकार' म्हणू लागले होते.
कृष्णा आणि वाळवा खोरं या परिसरात अण्णांचा दबदबा निर्माण झाला होता. बरीचशी तरुण पोरं या कामामध्ये सहभागी होऊ इच्छित होती.

फोटो स्रोत, www.nagnathanna.com
आता शस्त्रास्त्रं होती पण देशकार्यासाठी झोकून देणाऱ्या तरुणांना प्रशिक्षित करणारं कुणी नव्हतं.
अशावेळी, नागनाथअण्णांनी दिल्लीहून दोन पंजाबी शीख 'फौजी सेने'च्या प्रशिक्षणासाठी वाळव्याला आणले होते.
हे दोन तरुण पूर्वी आझाद हिंद फौजेचा बंदोबस्त करण्यासाठी ब्रह्मदेशात पाठवलेल्या शीख रेजिमेंटमध्ये होते. परंतु ती रेजिमेंट आझाद हिंद फौजेस मिळाली होती.
त्यातील नानकसिंग व मन्सासिंग हे दोघे फौजी होते. नागनाथअण्णांनी त्यांना आपल्या संघटनेत सामील करून घेऊन शिराळा तालुक्यातील थाबडे येथील जंगलात क्रांतिकारकांना प्रशिक्षण देण्याचं काम सुरू केलं.
सोनवडेमधल्या फौजी प्रशिक्षण छावणीवर इंग्रज पोलिसांनी 25 फेब्रुवारी 1946 रोजी हल्ला केला. त्यामध्ये नागनाथअण्णांचे दोन सहकारी किसनराव अहिर आणि नानकसिंग यांना हौतात्म्य प्राप्त झालं होतं.
स्वातंत्र्य मिळेपर्यंतच्या क्रांतिकार्यात अण्णांनी एकूण चार सहकारी गमावले होते.
स्वातंत्र्य मिळालं पण 'लढाई अजून संपलेली नाही...'
स्वातंत्र्य मिळालं खरं, पण कष्टकऱ्यांवरचा अन्याय अद्याप संपुष्टात आलेला नाही, या जाणीवेनं अण्णा स्वातंत्र्योत्तर काळातही कार्यरत राहिले. उलट, ते अधिक जोमाने व्यवस्थेला भिडू लागले.
अण्णांचं पहिल्या चाळीस वर्षातलं आयुष्य स्वातंत्र्यासाठी लढण्यात गेलं तर नंतरची चाळीस वर्षे ही सुराज्य म्हणजेच गोरगरीबांच्या हक्कासाठी लढण्यात गेले, असं पत्रकार संपत मोरे सांगतात.
बीबीसी मराठीशी बोलताना त्यांनी सांगितलं की, "वयाच्या पस्तीशीपर्यंत त्यांनी स्वातंत्र्य चळवळ आणि सत्यशोधकी चळवळीत काम केलं.
स्वराज्य आणण्यासाठी त्यांनी शस्त्रं हातात घेतली आणि क्रांतीकार्य केलं. मात्र, ज्यावेळी स्वातंत्र्य मिळालं, तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की, ज्या शेतकऱ्यांसाठी-कष्टकऱ्यांसाठी आपण जीवावर उदार होऊन लढलो, त्या लोकांसाठी या स्वातंत्र्यामध्ये काही स्थान नाही.
बदललेल्या सत्तेमध्ये खरं स्वातंत्र्यच दिसत नसल्याचं जेव्हा त्यांच्या लक्षात आलं, तेव्हा त्यांनी शेतकऱ्यांच्या चळवळी उभ्या केल्या."

फोटो स्रोत, www.nagnathanna.com
अर्थातच, आता लोक आपलेच होते पण व्यवस्था बदलणं आणि ती तळागाळातल्यांसाठी न्याय्य बनवणं, हा त्यांच्या कामाचा एक महत्त्वाचा भाग बनला होता.
भारत पाटणकर बीबीसीशी बोलताना म्हणाले की, "स्वातंत्र्यानंतर जर त्यांनी काँग्रेसमध्ये जाणं पसंत केलं असतं तर महाराष्ट्राचं पहिलं सरकार याच लोकांचं बनलेलं दिसलं असतं, इतकी ही देशप्रेमानं भारलेली सक्रिय मंडळी होती."
नागनाथ अण्णांवर समाजवादी विचारसरणीचा पगडा होता.
त्यांनी वाळवा विधानसभेच्या 1952, 1957 व 1985 सालच्या निवडणुका लढवल्या. त्यांपैकी 1957 आणि 1985 साली ते विजयी झाले. 1952 साली ते शेकापकडून लढले तर 1985 साली अपक्ष लढले.
1957 साली त्यांनी 'किसान कामगार पक्ष' या स्वत:च काढलेल्या पक्षातून निवडणूक लढवली आणि ते जिंकले.
या निवडणुकीचा एक किस्साही मोठा रंजक आहे. त्यांना निवडणुकीत 'सिंह' चिन्ह मिळालं होतं आणि तेव्हा वनखात्याचे नियम तेवढे कडक नव्हते.
तेव्हा त्यांच्या उत्साही कार्यकर्त्यांनी प्रचारासाठी खराखुरा सिंह पिंजऱ्यातून दहा-बारा दिवस वाळवा तालुक्यात फिरवला होता, असं संपत मोरे सांगतात.

फोटो स्रोत, www.nagnathanna.com
पुढे त्यांच्या राजकीय कारकिर्दीविषयी बोलताना संपत मोरे म्हणाले की, "अण्णांनी कधीच सत्तेशी संगनमत केलं नाही. गोरगरीब-वंचित आणि शेतकरी-कष्टकऱ्यांसाठी लढणं हेच अण्णांचं कायमचं ध्येय राहिलं.
म्हणून त्यांनी शेतकऱ्यांची ताकद उभी करणं, त्यातून मग सरकारवर दबाव तयार करणं, लोकांना लढण्यासाठी प्रवृत्त करणं, या कामामध्ये स्वत:ला झोकून दिलं."
"यातूनच सहकारातून साखर कारखाना उभा केला, दूधसंस्था उभी केली. सातारा, सांगली, सोलापूरातील दुष्काळी तेरा तालुक्यांना पिण्याच्या पाण्यासोबतच शेतीचं पाणी मिळावं, यासाठी त्यांनी 1991 साली पाणी परिषदेची स्थापना केली.
त्यातून दबाव गट तयार केला. त्याचाच परिणाम म्हणून आज आपण आटपाडी, सांगोला, माण, मंगळवेढा यांसारख्या दुष्काळी जिल्ह्यात पाणी आलेलं पाहतोय. त्यामागचं श्रेय केवळ अण्णांनी स्थापन केलेल्या पाणी परिषदेला जातं."
त्यांनी 1981 साली हुतात्मा किसन अहिर सहकारी साखर कारखान्याची नोंद करून कारखाना सुरू केला. 1993 साली कोल्हापुरातील किणी वाठार येथे शेतमजूर कष्टकरी शेतकरी परिषद घेतली.
1999 साली वारणा आणि कोयना धरणग्रस्तांच्या चळवळी उभ्या केल्या. 1999 साली धरणग्रस्तांचा मुंबईत मोर्चा काढून सरकारचं या समस्येकडं लक्ष वेधलं.
दुष्काळप्रवण भागातील जनतेच्या न्याय्य हक्कांसाठी 1993 सालापासून ते शेवटपर्यंत त्यांनी दुष्काळी भागातील 13 तालुक्यांत पाण्याची चळवळ उभा करून लढा दिला. त्यासाठी त्यांनी माणदेशातील आटपाडीमध्ये पाणी परिषदांचे आयोजन केलं.
साखर कामगार, ऊस उत्पादक शेतकरी यांच्या परिषदा घेऊन त्यांनी त्या घटकांना संघटित केलं.
2000 साली सरकारने महाराष्ट्रातील साखर कारखान्यांवर आयकर लादला होता, त्या विरोधात त्यांनी न्याय्य मागणीसाठी लढा दिला.
समताधिष्ठीत समाजनिर्मितीचं स्वप्न
भारत पाटणकर त्यांच्या वैचारिक भूमिकेविषयी बोलताना म्हणाले की, "नव्या पिढीसोबत जुळवून घेणं हे त्यांचं खास वैशिष्ट्य होतं. म्हणूनच, ते अखेरपर्यंत पुरोगामी आणि वंचित-शोषितांच्या लढ्याचं नेतृत्व करू शकले.
वाढती धर्मांधता आणि जातीयवाद यांच्याबद्दल त्यांना प्रचंड चीड होती. स्वातंत्र्यलढ्यात नसलेल्या आणि फुटीरतावादी राजकारण करणाऱ्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपला त्यांनी नेहमी विरोध केला.
इतका की, भाजप आमदार असलेला कोणताही स्टेज ते शेअर करत नसत. खासकरुन 1990 सालानंतर बाबरीचा पाडाव आणि दंगलींच्या पार्श्वभूमीवर उजव्या शक्ती अधिक मजबूत झाल्या; पण अखेरपर्यंत या सगळ्याविरोधात दोन हात करत राहिले."
नागनाथअण्णा अशा गोष्टींनाही प्रतिकात्मक कृतीतून उत्तर द्यायचे, असं संपत मोरे सांगतात. "त्यांनी बाबरी मशीद पाडल्यानंतर एका मुसलमान कार्यकर्त्यास कारखान्याचा चेअरमन केलं होतं. तुम्ही ज्या समाजाच्या विरोधात द्वेष पसरवत आहात, त्यांच्यासोबत आम्ही उभे आहोत, हे दाखवून देणारी ती कृती होती."

फोटो स्रोत, www.nagnathanna.com
बाबरी पाडावानंतर त्यांनी शेतकरी, कष्टकरी, पूरग्रस्त, धरणग्रस्त यांना एकत्र बोलवत वाळवा ते उरण अशी 60 किलोमीटरची एक मानवी साखळी त्यांनी तयार करुन 'आम्ही भारतीय सगळे एक आहोत' असा संदेश दिला होता.
त्यांनी आपल्या कारखान्याचा चेअरमनपदी लीलावती माळी नावाच्या एका महिलेची निवड केली होती. एखाद्या साखर कारखान्याच्या चेअरमन पदी बसणारी ही पहिलीच महिला होती.
साखरशाळेची संकल्पना असो, वा कारखान्यावर उसतोड कामगारांसाठी एक रुपयांत जेवण असो, अशा अनेक अनोख्या आणि नव्या गोष्टी अण्णांनी राबवल्याचं संपत मोरे सांगतात.
भारत सरकारनं नागनाथअण्णा नायकवडींना 2009 साली पद्मभूषण देऊन सन्मानित केलं.
22 मार्च 2012 साली त्यांचं निधन झालं. पण अखेरपर्यंत ते लढत राहिले. अगदी उतरत्या वयातही सरकारविरोधातील अनेक निदर्शनात ते पोलिसांसमोर निधड्या छातीनं उभे राहिले.
"हे खरं स्वातंत्र्य नव्हेच. आपल्याला शेतकरी-वंचितांचं आणि समताधिष्ठित समाजाचं राज्य आणावं लागेल, आणि त्यासाठी सतत लढत रहावं लागेल, ही त्यांची भावना शेवटपर्यंत होती," असं भारत पाटणकर सांगतात.
संदर्भ:
- क्रांतिवीर नागनाथअण्णा - जयवंत अहिर - पद्मभूषण क्रांतिवीर डॉ. नागनाथअण्णा नायकवडी गौरव समिती वाळवे
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)











