भारत-इंग्लंड मालिका : गिल-जैस्वालची शतकी खेळी, बेन स्टोक्सचं नेमकं काय चुकलं?

फोटो स्रोत, Getty Images
- Author, अनुपम प्रतिहारी
- Role, बीबीसी हिंदीसाठी
कसोटी क्रिकेट फॉरमॅटमध्ये प्रथमच नेतृत्त्व करत असलेल्या 25 वर्षीय शुभमन गिलने जोरदार सुरुवात केली आहे. तरुण खेळाडूंच्या या संघानं पहिल्या कसोटीच्या पहिल्याच दिवशी इंग्लंडविरुद्ध भारताचा झेडा रोवला.
शुभमन गिल आणि यशस्वी जैस्वाल यांच्या शतकांनी भारतीय संघाला भक्कम स्थितीत पोहोचवलं आहे. हेडिंग्लेच्या पिचवर भारताचा आत्मविश्वास आणि तंत्रज्ञान दोन्ही उजळून निघालं.
नाणेफेक गमावल्यानंतरही भारतीय संघानं हेडिंग्लेतील पहिल्या कसोटीतील पहिल्या दिवशी खेळावर वर्चस्व राखलं. दिवसअखेर भारताची धावसंख्या 3 बाद 379 धावा अशी होती.
पहिल्या दिवशी इंग्लंडच्या गोलंदाजांनी दोन नवीन चेंडूं वापरले. परंतु, 85 षटकांत ते फक्त तीनच बळी मिळवू शकले.
भारताकडून बाजूनं दोन शतकी भागीदाऱ्या आणि कदाचित सामन्याचं पारडं भारताकडं झुकवणारी 91 धावांची सलामीची भागीदारी पाहायला मिळाली.
सध्या इंग्लंडमध्ये उन्हाळा सुरु आहे आणि या ऋतूमध्ये सूर्यप्रकाशात कसोटी क्रिकेट पाहणं एक वेगळीच मजा असते. पण भारताच्या फलंदाजीनं हा अनुभव आणखी खास बनवला.
एका खऱ्या लीडरप्रमाणे गिलनं पुढाकार घेतला आणि अप्रतिम नाबाद 129 धावा नोंदवल्या. अजूनही तो खेळपट्टीवर टिकून आहे.
सामन्यापूर्वी पत्रकार परिषदेत गिलनं मनसुबे जाहीरपणे व्यक्त केले होते. ही मालिका मला 'सर्वोत्कृष्ट फलंदाज' म्हणून संपवायची असल्याचं त्यानं आत्मविश्वासानं म्हटलं होतं.
पहिल्या कसोटीच्या पहिल्याच डावात त्यानं आपली इच्छाशक्ती दाखवून दिली. कसोटी कर्णधार म्हणून पदार्पणात शतक ठोकणारा चौथा भारतीय कर्णधार होण्याचा मान गिलनं मिळवला आहे.
इंग्लंडची खराब गोलंदाजी
इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्सनं नाणेफेक जिंकून भारताला पहिल्यांदा फलंदाजी करण्यास बोलावलं होतं.
तरुण, अनुभवहीन आणि संक्रमणातून जाणाऱ्या या संघासाठी परिस्थिती वाईट ठरु शकली असती. कारण भारताचे तीन मोठे मॅचविनर– रविचंद्रन अश्विन, रोहित शर्मा आणि विराट कोहली हे निवृत्त झाले आहेत.
सूर्यप्रकाश असूनही चेंडूमध्ये हालचाल दिसत होती, चेंडू चांगला स्विंग होत होता, आणि हा सामनाही हेडिंग्लेच्या मागील सहा सामन्यांसारखाच असेल असं स्टोक्सला वाटलं होतं. कारण इथले मागील सहा सामने प्रथम गोलंदाजी करणाऱ्या संघानं जिंकले आहेत.
परंतु, भारताची सलामीची जोडी यशस्वी जैस्वाल (101) आणि केएल राहुल (42) यांनी अतिशय उत्तम खेळ केला. चौथ्या स्टंपच्या बाहेर जाणारे चेंडू त्यांनी सोडले आणि त्यांच्या टप्प्यात येणाऱ्या चेंडूंवर त्यांनी धावा कुटल्या.

फोटो स्रोत, Getty Images
सर्वात खास गोष्ट म्हणजे दोन्ही सलामीवीरांचा आत्मविश्वास. पहिल्या 15 षटकांत विकेट न गमावता त्यांनी 52 धावा केल्या.
इंग्लिश गोलंदाजीतील अनुभवाचा अभावही भारताच्या पथ्यावर पडला. ख्रिस वोक्स आणि ब्रायडन कार्स या दोन्ही सलामीच्या गोलंदाजांनी ऑफ स्टंपच्या रेषेवर गोलंदाजी करायला हवी होती, पण ते सातत्यानं चौथ्या किंवा पाचव्या स्टम्पवरच चेंडू टाकत होते.
हेडिंग्लेवर गोलंदाजीत लाइन आणि लेंथ सर्वात महत्त्वाची असते आणि ती इतर इंग्लंडमधील मैदानांच्या तुलनेत आणखी शिस्तबद्ध असावी लागते. पण बहुतेक वेळा तीही पाहायला मिळाली नाही.
जैस्वालचा दबदबा
23 वर्षीय यशस्वी जैस्वालनं खेळातील एकाग्रता दाखवून दिली. तर केएल राहुलचा खेळ म्हणजे अचूक तंत्राचं उत्तम उदाहरण होतं.
वोक्सच्या सलग दोन षटकांत राहुलनं पदलालित्य दाखवत दोन जबरदस्त कव्हर ड्राइव्ह मारले. नंतर 16व्या षटकामध्ये स्वतः कर्णधार स्टोक्स गोलंदाजीला आला, तेव्हाही राहुलनं तसाच आणखी एक अप्रतिम फटका मारला.
डावखुरा युवा फलंदाज जैस्वालनं जोश टंगला (त्याचा हा चौथा कसोटी सामना होता) टार्गेट केलं. त्याच्या पहिल्या षटकात स्ट्रेट ड्राइव्ह शॉट खेळत चौकार लगावला. पुढच्या षटकात पुन्हा जोरदार असा सरळ शॉट खेळून आणखी एक चौकार मारला.
भारताच्या या उत्कृष्ट सलामी भागीदारीचा अंत कार्सनं केला. त्यानं राहुलला 42 धावांवर बाद केलं.
त्यानं आधी एक बाउन्सर टाकला, नंतर सलग दोन बाहेर स्विंग केले. दुसरा चेंडू सहाव्या स्टम्पकडे फारच बाहेर होता, ज्यावर राहुलची बॅट वळली आणि चेंडू बॅटची कड घेऊन स्लिपमधील जो रूटच्या हातात गेला.

फोटो स्रोत, Getty Images
भारताचा पहिला बळी राहुलच्या रुपात गेला. त्यावेळी भारताची धावसंख्या ही 24.5 षटकांत 1 बाद 91 धावा अशी होती.
एक षटकानंतर, लंचच्या अगोदर भारताला आणखी एक धक्का बसला. पदार्पण करणारा साई सुदर्शन शून्यावर बाद झाला. स्टोक्सने लेग साइडवर दोन लेग स्लिप ठेवून जाळं रचलं होतं.
साईनं चेंडू लेग साइडला खेळला, पण विकेटकीपर जेमी स्मिथनं उजव्या बाजूला डाइव्ह मारून जबरदस्त झेल टिपला. भारताच्या फलंदाजीतील ही एकमेव चूक ठरली.
लंचच्या अगोदर 10 मिनिटांत दोन विकेट्स पडल्यामुळे सामना इंग्लंडच्या बाजूला वळू शकला असता. परंतु, तसं झालं नाही. भारताच्या दोन नव्या युगातील फलंदाजांच्या धैर्यानं संघाला सावरलं.
कर्णधार गिलनं शांतपणे खेळ करत एक-एक धाव घेत आपला डाव पुढे नेला. त्यानंतर 32 व्या षटकांत, त्यानं वोक्सच्या सलग दोन चेंडूंवर चौकार मारले, एक शक्तिशाली स्ट्रेट शॉट आणि दुसरा मिडविकेटच्या दिशेनं फ्लिक शॉट.
दुसऱ्या बाजूला, जैस्वाल निडरपणे खेळत होता. त्यानं ऑफ साईडकडे बॅकफूट आणि फ्रंटफूटवर खेळत चौकार मारले. 41व्या षटकामध्ये त्यांनं जोश टंगच्या चेंडूवर पॉइंटच्या वरून षटकार मारला. वोक्सच्या चेंडूवरही त्यानं सुंदर कव्हर ड्राइव्ह खेळून चौकार आपल्या खात्यात जमा केले.
हुकलं असतं गिलचं शतक
आठ षटकानंतर, जैस्वालनं कार्सच्या चेंडूंना चांगलंच चोपलं. त्यानं त्याला ऑफसाईडवर तीन चौकार मारले आणि नंतर गलीकडे खेळून एक धाव घेतली, त्यामुळं त्याचं पाचवं कसोटी शतक पूर्ण झालं.
एखाद्या कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्यातील हे त्याचं तिसरं शतक होतं. पहिलं वेस्ट इंडिजमध्ये, दुसरं ऑस्ट्रेलियामध्ये आणि आता तिसरं इंग्लंडमध्ये त्यानं पहिल्याच सामन्यात शतक ठोकलं आहे.
शेवटी तो 101 धावांवर बाद झाला. स्टोक्सच्या इनस्विंग चेंडूवर त्याचे स्टम्प उडाले. इंग्लंडविरुद्ध हे त्याचं तिसरं शतक होतं. कर्णधार गिलसोबत जयस्वालनं 129 धावांची महत्त्वाची भागीदारी केली आणि भारताला 3 बाद 221 अशा भक्कम स्थितीत नेऊन ठेवलं.
यानंतर ऋषभ पंत मैदानात आला. सुरुवातीला त्याचा खेळ त्याच्या नेहमीच्या शैलीपेक्षा वेगळा दिसला. त्यांनं कोणतीही घाई केली नाही आणि उंच फटके मारण्याचा मोह ही आवरला. ऑस्ट्रेलिया मालिकेतील अपयशाची पुनरावृत्ती टाळण्यासाठी त्यानं खूप संयम दाखवला.

फोटो स्रोत, Getty Images
दरम्यान, गिलनं 90 धावांचा टप्पा ओलांडला होता आणि त्याचा त्याच्यावरचा दबाव स्पष्ट दिसत होता. 92 धावांवर असताना त्यांनं शोएब बशीरच्या चेंडूवर स्वीप खेळण्याचा प्रयत्न केला, चेंडू त्याच्या पॅडला लागला, पण तो एलबीडब्ल्यू होण्यापासून वाचला.
त्यानंतर त्यानं टंगचा एक चेंडू थर्ड मॅनला फटकावत 97 धावा पूर्ण केल्या. काही वेळानं गिल धावबाद होता-होता थोडक्यात बचावला.
गिलने स्वतःला सावरलं आणि जोश टंगच्या चेंडूवर अप्रतिम कव्हर ड्राइव्ह मारून आपलं शतक पूर्ण केलं. ही एका खऱ्या कर्णधाराची प्रेरणादायी खेळी होती.
80व्या षटकानंतर इंग्लंडनं नवीन चेंडू घेतला. वोक्स आणि कार्सकडून विकेटची अपेक्षा होती, पण त्यांना यश मिळालं नाही.
दिवसाच्या शेवटच्या षटकात इंग्लंडची गोलंदाजी पूर्णपणे कोलमडली होती. पंतने वोक्सच्या चेंडूवर स्क्वेअर लेगच्या दिशेनं जबरदस्त षटकार ठोकला.
दिवसाचा खेळ संपेपर्यंत भारताची धावसंख्या 85 षटकांत 3 विकेट गमावून 359 धावा होती.
स्टोक्सला नक्कीच पश्चाताप झाला असेल की, त्यानं नाणेफेक जिंकून आधी गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, कारण हेडिंग्लेची खेळपट्टी आणि परिस्थितीनं अपेक्षेप्रमाणे त्यांची मदत करु शकली नाही.
बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.











