चामखीळ का तयार होते आणि त्यावर उपचार काय आहेत?

फोटो स्रोत, Getty Images
अनेकांना चामखिळीची समस्या असते. कधी हातावर, कधी पायावर, कधी तोंडावर चामखीळ तयार होते.
या चामखिळीपासून मुक्ती मिळवण्यासाठी काही लोक काहीही करायला तयार असतात. पण चामखीळ ही एका विषाणूमुळे (व्हायरस) तयार होते हे बहुतेकांना माहिती नसतं.
चामखिळीला इंग्रजीत वॉर्ट्स (Warts) असं म्हणतात. जगभरातील दहा टक्के लोकांवर या रोगाचा परिणाम होतो. चामखीळ शरीरावर कुठेही तयार होऊ शकते.
त्वचेवर चामखीळ तयार होते. याला एपिडर्मिस असं म्हणतात. एका विशिष्ट विषाणूंमुळे त्वचेवरचा पेशींची वाढ हौल चामखीळ तयार होते.
बहुतेक चामखिळी त्वचेच्या वर येतात आणि त्या खडबडीत असतात. पण काही चामखिळी चेहऱ्यावर तयार होतात त्या सपाट आणि मऊ असू शकतात.
चामखीळ का तयार होते?
ह्युमन पॅपिलोमाव्हायरस किंवा एचपीव्हीमुळे चामखीळ तयार होते. या विषाणूचे शंभराहून अधिक प्रकार किंवा स्ट्रेन्स असतात.
पण केवळ काही प्रकारच्या एचपीव्हीमुळेच चामखीळ किंवा मस्सा होऊ शकतो. अनेकदा शाळकरी मुलांमध्ये हा त्रास दिसून येतो.

फोटो स्रोत, Getty Images
कमकुवत रोगप्रतिकारशक्ती असणाऱ्यांना सुद्धा हा त्रास होऊ शकतो.
चामखिळीचा प्रसार कसा होतो?
एखाद्या व्यक्तीला चामखीळ झाली असेल आणि त्याच्याशी तुमच्या शरीराचा प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष संबंध आला तर चामखीळ होऊ शकते. कार्यालये, स्विमिंग पूल, जिम, पार्लर अशा सार्वजनिक ठिकाणांवर संक्रमित व्यक्तीने वापरलेल्या गोष्टी तुम्ही वापरल्या तर तुम्हाला चामखीळ होऊ शकते.
लैंगिक संबंधांमधून देखील याचा प्रसार होऊ शकतो. एचपीव्हीचा संसर्ग झालेला भाग खाजवल्यानंतर देखील त्याचा प्रसार होऊ शकतो. यामुळे इन्फेक्शनचा धोका वाढतो.

फोटो स्रोत, Getty Images
यावर काही उपचार आहेत का?
काही चामखिळी कुठल्याही उपचारांशिवाय एक किंवा दोन वर्षात निघून जातात. काही चामखिळी अनेक वर्षं राहतात. त्यांच्यावर उपचार करण्याची गरज असते.
दिल्लीच्या बीएलके मॅक्स हॉस्पिटलमधल्या त्वचारोगतज्ज्ञ डॉ. इंदू बलानी म्हणाल्या, "चामखिळीवर उपचार करून त्या काढणं गरजेचं असतं. लेझर किंवा आरएफ मशीनचा वापर करून आम्ही उपचार करतो. थोडक्यात काय तर आम्ही त्या जाळतो किंवा काही वेळा तीव्र अॅसिड देखील वापरतो. काहींसाठी आम्ही काही क्रीम देखील देतो. काही प्रकारच्या लोशनमुळे चामखीळ आपोआप गळून पडते. पण विषाणूंच्या प्रादुर्भावामुळे चामखीळ पुन्हा होऊ शकते. त्यामुळे आम्ही रोगप्रतिकारकशक्ती वाढविण्यावर भर देत."

फोटो स्रोत, Getty Images
चामखीळ होऊ नये म्हणून काय करावं?
चामखीळ रोखण्याचा एक खात्रीशीर असा उपाय नाहीये. पण याबाबत तुम्ही काही खबरदारी बाळगू शकता. सार्वजनिक ठिकाणी जाताना स्वच्छता पाळणे हा एक चांगला उपाय असू शकतो.
टॉवेल, रेझरसारख्या दुसऱ्यांच्या वैयक्तिक वस्तू वापरणे टाळावे. चामखीळ झाल्यास तिला पुन्हा पुन्हा स्पर्श करू नये. दुसऱ्या व्यक्तीला झालेल्या चामखिळीला देखील स्पर्श करू नये. तुमची त्वचा सतत तजेलदार ठेवावी. त्वचेवर काही ओरखडे नाहीयेत ना याची खात्री करावी.

फोटो स्रोत, Getty Images
कारण फाटलेल्या त्वचेतून एचपीव्हीचा विषाणू सहज पसरू शकतो. एचपीव्हीची लस घेताना डॉक्टरांचा सल्ला घेणं गरजेचं आहे. शरीराच्या एका भागातून दुसऱ्या भागात होणारा प्रसार टाळण्यासाठी बँडेज (पट्टी) वापरू शकता.
चामखीळ धोकादायक आहे का?
एकाच वेळी अनेक चामखिळी तयार झाल्या तर ती चिंतेची बाब असू शकते. काहीवेळा चामखीळ दुखू शकते, त्यातून रक्त येऊ शकतं, खाज सुटू शकते असं काहीही होत असेल तर डॉक्टरांचा सल्ला घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे.
बहुतांश चामखिळींमुळे कॅन्सरचा धोका नसतो पण काळजी घेणं गरजेचं आहे.
(ही बातमी फक्त जागरूकतेची आहे, आरोग्याची काहीही समस्या उद्भवल्यास डॉक्टरांना भेटावे)
बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.











