सर्व्हायकल कॅन्सर : HPV लशीमुळे असं होतं रक्षण

फोटो स्रोत, Getty Images
- Author, जेम्स गॅलाघर
- Role, आरोग्य आणि विज्ञान प्रतिनिधी
गर्भाशय मुखाचा कर्करोग म्हणजे Cervical Cancer. जगभरात स्त्रियांमध्ये सामान्यत: हा कॅन्सर चौथ्या क्रमांकावर आढळून येतो.
नुकत्याच हाती आलेल्या आकडेवारीनुसार HPV वॅक्सिनमुळे जगभरातील गर्भाशय मुखाच्या कॅन्सरचे रुग्ण 90% कमी होत आहेत.
इंग्लंडच्या कॅन्सर संशोधन संस्थेने ही आकडेवारी अभूतपूर्व असल्याचं सांगितलं आहे. ही लस लोकांचा जीव वाचवत असल्याचंही या संशोधनातून स्पष्ट झालं आहे.
गर्भशयाच्या मुखाच्या कॅन्सरची बहुतांश प्रकरणं ही याच HPV विषाणूमुळे होत असतात आणि आता त्यावरच लस आल्यामुळे लवकरच गर्भाशय मुखाच्या कॅन्सर रुग्णांची संख्या कमी होण्याचा अंदाज आहे.
दरवर्षी सर्व्हायकल कॅन्सर म्हणजेच गर्भशय मुखाच्या कॅन्सरमुळे जगभरात तब्बल 3 लाख महिलांचा दरवर्षी मृत्यू होतो. या लशीमुळे लाखो महिलांचे प्राण वाचतील.
तर ही लस नेमकी काय आहे? ती कुणाकुणाला दिली जाऊ शकते? आणि भारतात ही लस मिळते का? याचाच हा आढावा.
HPV लस म्हणजे नेमकं काय?
HPV म्हणजेच ह्युमन पॅपिलोमाव्हायरस. या एचपीव्ही विषाणूचे 100 पेक्षा जास्त प्रकार आहेत. या व्हायरसचं संक्रमण झाल्यास सहसा कोणतीही लक्षणं दिसत नाहीत.
काही HPV मुळे तुमच्या हातावर, पायावर, गुप्तांगांवर किंवा तोंडाच्या आत फोड येऊ शकतात.

फोटो स्रोत, Getty Images
पण अनेक लोकांना याची लागण झाल्याचं कळत नाही आणि बऱ्याचवेळा कोणत्याही उपचारांशिवाय या व्हायरसचा प्रादुर्भाव कमी होऊ शकतो.
काही HPVच्या संसर्गामुळे गर्भाशयाच्या मुखाशी असलेल्या पेशींमध्ये अचानक वाढ होऊन कॅन्सर होऊ शकतो.
इंग्लंडमध्ये झालेल्या एका अभ्यासात 80 टक्के लोकांना लैंगिक संक्रमणातून या विषाणूची बाधा झाली असल्याची माहिती मिळाली होती.
HPV लस कॅन्सरपासून कसं वाचवू शकते?
एचपीव्ही लस ही 9 प्रकारच्या एचपीव्ही विषाणूंपासून संरक्षण करते. यामध्ये गर्भाशयाच्या, मानेच्या, डोक्याच्या आणि जननेंद्रियांच्या कॅन्सरसाठी कारणीभूत असणाऱ्या काही व्हायरसच्या प्रकारांपासून ही लस तुम्हाला सुरक्षित करते.
या रिसर्चमधून हेही स्पष्ट झालं आहे की एकदा का तुम्ही HPVची लस घेतली की त्यानंतर किमान 10 वर्षं तुम्हाला गर्भाशयाच्या मुखाच्या कॅन्सरपासून संरक्षण मिळू शकतं.
काही तज्ज्ञांना हा प्रभाव आणखीन जास्त काळ टिकू शकतो अशी अपेक्षा आहे.

फोटो स्रोत, Getty Images
HPV लस कुणाकुणाला देता येऊ शकते?
लैंगिक दृष्ट्या सक्रिय होण्याआधी, पौगंडावस्थेतल्या मुलामुलींना ही लस दिली तर प्रभावी ठरते. कारण HPV संक्रमण हे लैंगिक संबंधांदरम्यान होतं आणि ही लस केवळ संसर्ग टाळू शकते, संसर्ग झाल्यानंतर ती काम करत नाही.
जागतिक आरोग्य संघटनेने दिलेल्या माहितीनुसार या लशीचे एक किंवा दोन डोस दिले जाऊ शकतात.
रोगप्रतिकारक शक्ती कमी असलेल्या लोकांना दोन किंवा तीन डोस देण्याची सूचनाही WHOने दिली आहे.
HPV व्हायरसची बाधा होण्याचा धोका कुणाला जास्त आहे?
HPV चा संसर्ग होणं खूपच सोपं आहे. या विषाणूची बाधा झालेल्या व्यक्तीच्या शरीराला जवळून स्पर्श झाला तरीही HPV चा संसर्ग होऊ शकतो.
80% लोक 25 वर्षांचे होण्याआधीच एचपीव्हीच्या संपर्कात येतात. बहुतेक प्रकरणांमध्ये 18 महिने ते दोन वर्षांपर्यंत HPV व्हायरसचं संक्रमण शरीरात राहू शकतं.
लैंगिक संबंधांमधून पसरणाऱ्या इतर आजारांसारखा - STD सारखा हा रोग नाही. पण स्पर्श केल्याने हा विषाणू पसरतो त्यामुळे लैंगिक संबंधांमध्येही याचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता जास्त असते.

फोटो स्रोत, Getty Images
कोणकोणत्या देशांमध्ये ही लस दिली जात आहे?
डब्ल्यूएचओने दिलेल्या माहितीनुसार गर्भाशयाच्या मुखाच्या कॅन्सरमुळे होणाऱ्या एकूण मृत्यूंपैकी 90% मृत्यू हे कमी आणि मध्यम उत्पन्न असलेल्या देशांमध्ये होतात.
याला सगळ्यांत महत्वाचं कारण म्हणजे या कॅन्सरची लागण झाली की त्याचा मोठा प्रसार होईपर्यंत चाचणीच केली जात नाही.
जागतिक आरोग्य संघटनेने 2030 पर्यंत 90% लोकांना HPV लस देऊन पुढच्या शतकापर्यंत या रोगापासून मुक्त होण्याचं ध्येय ठरवलं आहे. त्यानुसार आता 140 देशांनी आता HPV लसीकरण सुरू केल्याची माहिती आहे.
भारत सरकारही आता सर्व्हायकल कॅन्सर रोखण्यासाठीचं HPV लसीकरण सुरू करणार असल्याचं इंडियन एक्स्प्रेसने म्हटलंय.
2024च्या उत्तरार्धात हे लसीकरण सुरू होईल आणि पुढची तीन वर्षं 3 टप्प्यांत राबवलं जाईल. यादरम्यान 9 ते 14 वयोगटातल्या मुलींना लस दिली जाईल.
पण महिलाही वयाच्या 45व्या वर्षापर्यंत ही लस घेऊ शकतात. खासगी हॉस्पिटल्समध्ये ही लस उपलब्ध आहे.
हेही नक्की वाचा
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








