जानकी अम्म्मल : उसावर मोठं संशोधन करणाऱ्या आदिवासी शास्त्रज्ञाची गोष्ट

    • Author, झोया मतीन आणि अनाबरासन एथिराजनस
    • Role, बीबीसी प्रतिनिधी, दिल्ली आणि लंडन

मार्च महिन्यात विस्ले इथे मॅगनोलियास बहरू लागतं.

पुढच्या काही आठवड्यात गुलाबी फुलांची पखरण संपूर्ण परिसराला भारून टाकेल. येणाऱ्याजाणाऱ्यांना त्यांची दखल घेणं भाग पडेल.

या फुलांच्या मुळाशी भारताचं कनेक्शन आहे. 19व्या शतकातील शास्त्रज्ञ इके जानकी अम्मल यांनी या झाडाची रुजवात केली होती.

60 वर्षांच्या प्रदीर्घ कारकीर्दीत जानकी यांनी फुलांच्या विविध प्रजातींचा सखोल अभ्यास केला.

त्यांनी फुलांच्या प्रजातींचं शास्त्रोक्त वर्गीकरण केलं. जानकी केवळ फुलांच्या अभ्यास करणाऱ्या शास्त्रज्ञ नव्हत्या. प्रत्यक्षात फिल्डवर जाऊन काम करणाऱ्या होत्या, असं जानकी यांच्या कारकीर्दीचा अभ्यास करणाऱ्या इतिहासकार डॉ. सावित्री प्रीथा नायर यांनी सांगितलं.

संशोधनात विविध ज्ञानशाखांचा मिलाफ जसा जानकी यांनी घडवून आणला तसं काम त्या कालखंडातल्या पुरुष शास्त्रज्ञांनी देखील केला नसेल.

1930 मध्येच जानकी यांनी जैवविविधतेबद्दल भाष्य केलं होतं.

जानकी प्रेरणादायी आयुष्य जगल्या. पण अनेक वर्षं त्यांच्याविषयी फार कुणालाच काही माहिती नव्हतं. त्यांनी विज्ञानाला दिलेल्या योगदानाचीही दखल घेण्यात आली नाही.

यंदाचं वर्ष जानकी यांचं जन्मशताब्दी वर्ष आहे. जानकी यांच्या कामाबद्दल, योगदानाबद्दल सविस्तर माहिती देणाऱ्या चरित्राद्वारे हे चित्र बदलेल असं डॉ. नायर यांना वाटतं.

क्रोमोसोम वूमन: नोमॅड सायंटिस्ट: इ.के.जानकी अम्मल, अ लाईफ (1897-1984) हे पुस्तक नोव्हेंबर महिन्यात प्रकाशित झालं.

तीन खंडांमध्ये पसरलेल्या 16 वर्षांच्या कारकीर्दीची फलश्रुती म्हणजे हे पुस्तक आहे.

विज्ञान क्षेत्रात कार्यरत महिला शास्त्रज्ञांच्या योगदानाचा आढावा घेणाऱ्या मोठ्या प्रकल्पाचा हे पुस्तक भाग आहे.

आतापर्यंत महिला शास्त्रज्ञांबद्दल प्रसिद्ध साहित्य हे प्रामुख्याने युरोप आणि उत्तर अमेरिकेतील महिलांच्या योगदानाचा आढावा घेतं.

आशिया आणि जगातल्या अन्य भागांमध्ये कार्यरत महिला शास्त्रज्ञांबद्दल अतिशय तुटपुंजी अशी माहिती आहे किंवा तेवढीही नाही.

शास्त्रज्ञ म्हणून जानकी यांचं योगदान उल्लेखनीय आहेच पण त्या ज्या पद्धतीने जगल्या ते अतिशय प्रेरणादायी होतं, असं त्यांच्या घरचे सांगतात.

त्या समरसून जगायच्या. त्या अतिशय स्वतंत्र विचारसरणीच्या होत्या. त्यांना प्रत्येक गोष्टीबद्दल उत्सुकता होती असं त्यांची खापरपणती गीता डॉक्टर यांनी सांगितलं.

गीता स्वत: लेखिका आहेत. जानकी यांचा जन्म केरळमधल्या तेलिचेरी इथे 1897 मध्ये झाला. त्यांचे वडील इके. कृष्णन हे ब्रिटिशांच्या अधिपत्याखालील भारतातल्या मद्रास प्रेसेडिन्सीमधल्या उच्च न्यायालयात न्यायाधीश होते.

इडम नावाच्या घरात एकत्र कुटुंबात जानकी लहानाच्या मोठ्या झाल्या. हे घर आणि घरचे जानकी यांचं आयुष्य होतं.

दोन खणी घरात पियानो होता. अतिशय सुसज्ज ग्रंथालय होतं, प्रशस्त दिवाणखाना, हवा खेळती ठेवणाऱ्या आणि बाहेरचं हिरवंगार दृश्य दाखवणाऱ्या खिडक्या होत्या.

जानकी या केरळमधल्या थिय्या समाजाच्या होत्या. हिंदू जातीव्यवस्थेनुसार सामाजिकदृष्ट्या मागास वर्ग म्हणून या समाजाची ओळख आहे.

एडम हाऊस या सुरेख घरातलं जानकी यांचं आयुष्य सुबत्तापूर्ण आणि चिंतामुक्त होतं. याचा अर्थ आयुष्यात त्यांनी जातीभेदाचा सामना केलाच नाही असं नाही. समजा कोणी भेदभावाची वागणूक दिली तर त्या त्याकडे दुर्लक्ष करून पुढे वाटचाल करत.

वागणुकीत गोडवा 

शालेय शिक्षण संपल्यानंतर जानकी पुढच्या शिक्षणासाठी मद्रास इथे गेल्या. 1924 मध्ये अमेरिकेतल्या मिशीगन विद्यापीठातून प्रतिष्ठेची शिष्यवृत्ती मिळाल्यानंतर जानकी महिलांच्या विद्यापीठात ज्ञानदानाचं काम करू लागल्या.

आठ वर्षांनंतर बोटॅनिकल सायन्स विषयात डॉक्टरेट मिळवणाऱ्या त्या पहिल्या भारतीय महिला शास्त्रज्ञ आहेत.

त्यानंतर त्या मायदेशी परतल्या. त्यांनी बॉटनी विषय शिकवायला सुरुवात केली. यानंतर कोयंबतूर इथल्या शुगरकेन ब्रीडिंग स्टेशनमध्ये त्या काम करू लागल्या.

जानकी यांनी उसाच्या संकरित प्रजननावर आणि इतर वनस्पतींच्या माध्यमातून भरघोस उत्पादन देऊ शकणाऱ्या पीकावर त्यांनी काम केलं.

उस आणि मका यांचं संकर करण्यात त्या यशस्वी झाल्या होत्या. उसाचं मूळ आणि जडणघडण समजून घेण्यात हे संशोधन मोलाचं ठरलं.

त्यांनी तयार केलेलं संकरित पिकाने अनेकांना व्यावसायिक यश मिळवून दिलं. पण याचं श्रेय त्यांना मिळालं नाही.

1940 मध्ये दुसरं महायुद्ध सुरू झाल्यानंतर त्या लंडनला रवाना झाल्या आणि त्यांनी जॉन इन्स हॉर्टिकल्चर इन्स्टिट्यूट इथे त्यांनी संशोधनाचं काम सुरू केलं.

पुढची काही वर्ष त्यांच्या कारकीर्दीतली अतिशय संस्मरणीय वर्ष ठरली. पाच वर्षात त्या विस्ले इथल्या रॉयल हॉर्टिकल्चर सोसायटी गार्डन इथे रुजू झाल्या.

तिथे कामाची संधी मिळणाऱ्या त्या पहिल्या महिला शास्त्रज्ञ होत्या. तो काळ खडतर आणि आणि कष्टप्रद होता. कारण ब्रिटनला युद्धाचे चटके बसले होते.

अन्नपुरवठ्यावरही परिणाम झाला. पण जानकी यांच्या कामावर त्याचा परिणाम झाला नाही. बॉम्बगोळ्यांचा वर्षाव होत असे, त्या टेबलखाली जात किंवा बेडखाली झोपून जात. हा दृष्टिकोन वैयक्तिक आयुष्यातही पाहायला मिळाला.

त्यांच्या मुलांना समान वागणूक मिळत असे आणि त्यांच्यावर कठोर शिस्तीचे संस्कार झाले. पण त्यांच्या व्यक्तिमत्वाला गोडवाही होता.

त्यांची आत्या छान छान पुस्तकं देत असे आणि सहलीलाही घेऊन जात असल्याची आठवण गीता यांनी सांगितली.

त्यांच्याकडे सांगायला खूप गोष्टी असत. कापोक नावाची खार त्यांनी बाळगली होती. साडीमध्ये लपवून त्यांनी तिला आणलं होतं. तिमोथी नावाची बाहुलीही होती. एडममझल्या प्रत्येकाला त्या बाहुलीचं कौतुक होतं.

डॉ. गीता यांना नेमक्या तारखा आठवत नाहीत, हा सगळा भूतकाळच होता. पण जानकी यांचं करारी व्यक्तिमत्व आठवतं. त्यांच्या उपस्थितीचा धाक असे. त्या पिवळ्या रंगाची साडी नेसत. त्यांचं व्यक्तिमत्व ऊर्जादायी होतं.

त्यांनी आयुष्यातल्या छोट्या छोट्या आनंदाचा आस्वाद घेतला, पण त्यांच्या वागण्याला शास्त्रोक्त किनार असे.

त्यांच्या कामातही हे झळकत असे. त्यांनी अनेक लहानमोठ्या शोधांची मालिकाच सादर केली. मानवाच्या उत्क्रांतीच्या इतिहासात त्यांचं योगदान मोलाचं होतं.

झाडं आणि मानवजातीबद्दल त्या अतिशय मूलभूत स्वरुपाचे प्रश्न विचारत. 

नेहरूंच्या विनंंतीनंतर मायदेशी

1951मध्ये भारताचे पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी जानकी यांना मायदेशी परतण्याची विनंती केली. बोटॅनिकल सर्व्हे ऑफ इंडिया संस्थेच्या कामकाजाची पुनर्रचना करण्यासाठी त्यांनी जानकी यांना सांगितलं.

महात्मा गांधींच्या शिकवणीचा गाढ प्रभाव असणाऱ्या जानकी नेहरू यांच्या विनंतीला मान देत मायदेशी परतल्या.

पण महिला प्रमुखाकडून आदेश स्वीकारून काम करणं पुरुष सहकाऱ्यांना जमत नसे. बोटॅनिकल सर्व्हे ऑफ इंडिया संस्थेची रचना बदलण्याचा त्यांनी प्रयत्न केला पण त्याला विरोध झाला. जानकी यांना संस्थेने सर्वार्थाने स्वीकारलंच नाही, असं डॉ. नायर सांगतात.

याचा जानकी यांना आत्यंतिक त्रास झाला. ही सल त्यांच्या मनातून कधीच भरली नाही. नव्या झाडापानांच्या शोधात त्यांनी देश पिंजून काढायचं ठरवलं.

1948 मध्ये जानकी झाडांच्या शोधात नेपाळला पोहोचल्या. बॉटनी विषयाच्या दृष्टीने आशियातला नेपाळ हा भाग अतिशय समृद्ध असल्याचं त्या सांगत. 

80व्या वर्षी जानकी यांना पद्मश्री पुरस्काराने गौरवण्यात आलं. 1984 मध्ये त्यांचं निधन झालं. 

जानकी यांच्या कार्याची, योगदानाची म्हणावी तशी दखल घेण्यात आली नाही पण यामुळे त्या नाऊमेद झाल्या नाहीत.

माझं काम चिरस्थायी राहील असं त्या म्हणत आणि तसंच झालं. डॉ. नायर यांना जानकी जे म्हणाल्या ते पटतं.

जानकी यांचं आयुष्य म्हणजे समृद्ध अशी बौद्धिक परंपरा आहे.

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)