DoubleXL: 'वजन आणि फिगर फक्त हीच माझी ओळख नाही'

    • Author, वंदना
    • Role, टीव्ही एडिटर, बीबीसी इंडिया

"तुम्ही प्लस साईजच्या असाल ना तर भारतात राहणं तितकंसं सोपं नसतं. म्हणजे मी जेव्हा 15 वर्षांचे होते तेव्हाच मला समजलं की मला पीसीओएस नावाचा एक आजार आहे. तेव्हापासून माझं वजन वाढतंय. तेव्हा मला जाडी, ड्रम...नको नको ते बोललं गेलं. मी चेष्टेचा विषय बनले होते. जर तुम्ही जाड असाल ना तर जगाच्या नजरेत तुम्ही कुरूप आणि बेढब असता. बॉडी शेमिंगमुळे मी स्वत:ला नेहमीच बेढब समजत आले..."

बंगळुरूमध्ये राहणारी चित्रा प्लस साईज आहे म्हणजेच तिचं वजन जास्त आहे. आणि याच्यामुळे तिच्या आयुष्यावर याचा खोल परिणाम झालाय.

चित्रा सांगते, "माझ्यासाठी एखादा जोडीदार शोधणं माझ्या आईवडिलांसाठी एक वाईट स्वप्नासारखं होतं. त्यांनी मला कधी सांगितलं नाही, पण मला त्यांच्याकडे बघून नेहमीच हे जाणवलंय. आता ही गोष्ट वेगळी आहे की, माझा पती खूपच चांगला आहे.

"माझ्या साखरपुड्याच्या दिवशी माझे नातेवाईक मला लेक्चर देत होते की वजन कमी कर नाहीतर तुझ्या नवऱ्याचा तुझ्यामधला रस निघून जाईल. हे ऐकून मी इतकी टेन्शन मध्ये गेले की काही दिवस तर मला काहीच समजत नव्हतं," चित्रा सांगते.

'माफ करा, पण थोड्या जास्तच हेल्दी दिसताय'

मागच्या काही दिवसांपूर्वी मोबाईल स्क्रोल करत असताना डबल एक्स एल नावाच्या चित्रपटाचा ट्रेलर पाहिला. यात सोनाक्षी सिन्हा आणि हुमा कुरेशी लीड हिरॉईन्स आहेत. चित्रपटात त्यांचं वजन खूप जास्त दाखवलंय.

या चित्रपटात हुमा कुरेशी एका ठिकाणी नोकरीसाठी विचारणा करताना म्हणते, "स्पोर्ट्स चॅनेलवर प्रेझेंटर व्हायचंय आम्हाला. हा व्हिडीओ आम्ही स्वतःच लिहून डायरेक्ट सुद्धा केलाय."

आणि समोरून उत्तर येतं - "सॉरी तुम्ही थोड्या जास्तच हेल्दी दिसताय." त्यांच्या लठ्ठपणाला उद्देशून हा टोमणा येतो.

म्हणजे तुम्हाला जर टीव्हीवर दिसायचं असेल तर त्यासाठी तुमचा एक बॉडी टाइप असावा लागतो. हा डायलॉग थोडा फिल्मी वाटत जरी असला तरी बॉडी शेमिंग हे अनेक लोकांच्या आयुष्यातील वास्तव आहे. याचा लोकांच्या शारीरिक आणि मानसिक आयुष्यावर खोलवर परिणाम होत असतो.

बॉडी शेमिंग ते प्लस साइज मॉडेल

नेहा परुळकर प्लस साइज मॉडेल आहे. तिला बॉडी शेमिंगमुळे बरेच टोमणे ऐकावे लागलेत. पण यापुढं जाऊन तिनं स्वतःचं अस्तित्व निर्माण केलंय. पण त्यामागे बॉडी शेमिंगची एक लांबलचक व्यथा आहे.

ती सांगते, "लहानपणी माझ्यात अजिबात कॉन्फिडन्स नव्हता. मी लठ्ठ होते त्यामुळे सारखं बॉडी शेमिंग व्हायचं. ए जाडे ! ए जाडे! जायंट (राक्षस) असं म्हणत मला चिडवायचे. वजन कमी करण्यासाठी आणि माझी बॉडी इमेज बनवण्यासाठी मी सतत उपाशी राहायचे. दिवसातून एक वेळ जेवायचे, जेणेकरून वजन कमी होईल. त्यावेळी मी कॉलेज जायचे, दिवसभर फक्त सॅलडवर असायचे. मी इतकी अशक्त झाले होते की माझ्याच्याने आता कॉलेजला जाणं ही शक्य होत नव्हतं."

बॉडी शेमिंगचा खूप मोठा परिणाम झाला..

पण नेहा एकटीच अशी नाहीये. आपल्या आजूबाजूला असे बरेच लोक आहेत जे लठ्ठपणाच्या कॅटेगरी मध्ये येतात. खुशी नावाच्या मुलीची गोष्ट सुद्धा अशीच आहे.

खुशी सांगते, "एक वेळ होती जेव्हा माझं वजन खूप वाढलं होतं. आणि ते कमी करण्यासाठी मी बरेच चुकीचे फंडे वापरू लागले होते, ज्याला इटिंग डिसऑर्डर म्हणतात. मला जेवण पचत नव्हतं, जेवण जेवायचं नव्हतं. मी जेवण फक्त टेस्ट करायचे, जेणेकरून शरीरात कॅलरीज जाणार नाहीत. माझ्या आईवडिलांना हे माहीत नव्हतं."

"एक दिवस घरात मी एकटीच होती आणि दारावरची बेल वाजली. दरवाजा उघडायला उठले तर डोळ्यांपुढे अंधारी आली आणि मी चक्कर येऊन पडले. जेव्हा मला शुद्ध आली तेव्हा डोक्यातून रक्तस्त्राव सुरू होता. या सगळ्याला मी घाबरले कारण मी असं काही करते आहे हे घरी कोणालाच माहीत नव्हतं. आणि जर चुकून मला काही झालंच तर..तेव्हा मी माझ्या मैत्रिणीला याविषयी सांगितलं."

बीबीसीच्या वर्कलाइफ इंडिया या कार्यक्रमात खुशी जैनने ही गोष्ट शेअर केली होती. हे सांगताना ती खूपचं भावूक झाली होती.

रिजेक्ट झाल्यावर असे बरेचसे प्रश्न सोनाक्षी सिन्हा तिच्या चित्रपटात विचारत असते. ती म्हणते, "या लोकांना आमच्या स्वप्नांची साईज दिसत नाही, फक्त आमची साईज दिसते. काही लोकांनी मिळून एक स्टँडर्ड बनवलाय आणि माहीत नाही तो स्टँडर्ड कधी नॉर्मल डिक्लेयर होणार आहे."

चित्रपटात नेहमीच साईज झिरो का असते?

जेव्हा चित्रपटाचा विषय येतो तेव्हा असे कित्येक पात्र सापडतील ज्यांची साईज झिरो नाहीये, तर या लोकांचं वजन आमच्यासारखं नॉर्मल आहे. आणि हा नियम बहुतकरून स्त्रियांवर लागू असतो.

म्हणजे जुन्या काळात शम्मी कपूर यांच्यासारखे हिरो, ज्याचं वजन ठीकठाक होतं. पण हेच हिरॉईन्सच्या बाबतीत मात्र घट्ट चुडीदार आणि कुर्ते घातलेली सडपातळ बांधा असलेली स्त्री असणं गरजेचं होतं.

त्याकाळी टुनटुन किंवा गुड्डी मारुतीला त्यांच्या वजनामुळे फक्त कॉमेडी सीनसाठी घेतलं जायचं. आणि त्या पडद्यावर येताच बॅकग्राऊंडला हत्तीसारखा आवाज ऐकू यायचा.

मागे 'दम लगाके हईशा' नावाचा चित्रपट आला होता. यात संध्या (भूमी पेडणेकर) नावाची लीड हिरॉईन असते, जिचं वजन जास्त असतं. पण चित्रपटाचा हिरो (आयुष्मान खुराना) तिला पत्नी म्हणून स्वीकारत नाही. उलट उघडपणे तिचा अपमान करत असतो.

मित्रांसमोर तो म्हणतो की, "कितनी सुंदर बहू है तेरी, एकदम टिंच और मेरे पापा ने इतनी मोटी सांड मेरे गले मढ़ दी. कुछ करना तो दूर की बात, छूने का मन न करे."

पण असे खूपच कमी चित्रपट आहेत, ज्यात एखाद्या स्त्रीचं लठ्ठ असणं खूपच सामान्य आहे. उदाहरण म्हणून घ्यायचं झालं तर 'तुम्हारी सुलू' मध्ये विद्या बालनने केलेला रोल.

पण जास्त वजनचं नाही तर झिरो फिगरवर पण बॉडी शेमिंग केलं जातं. आणि यावर बऱ्याच चर्चा झडत असतात.

जेव्हा विद्या बालनला वजन कमी करण्याविषयी विचारलं होतं..

विशेष म्हणजे ग्लॅमरस समजल्या या मॉडेल्सना, हिरॉईन्सना त्यांच्या वयामुळे, वजनामुळे वर्षानुवर्ष बॉडी शेमिंगला सामोरं जावं लागतंय.

एवढंच काय तर डबल एक्सएल मध्ये काम करणाऱ्या सोनाक्षीलाही तिच्या वजनामुळे ट्रोल व्हावं लागलंय. त्यामुळे तिने चित्रपटात येण्यासाठी जवळपास 80 ते 90 किलो वजन कमी केलं होतं.

सोनाक्षी बीबीसीशी बोलताना सांगते की, "आजही तिला अशा गोष्टींना सामोरं जावं लागतं. एखादा चित्रपट करायच्या आधी म्हटलं जातं की, अजून थोडं वजन कमी करा, चित्रपटाचं गाणं शूट करायचं आहे. लोकांसाठी ही सामान्य गोष्ट असते आणि ते बोलण्याआधी विचार सुद्धा करत नाहीत. त्यांनी आमचं काम बघून, टॅलेंट बघून नाही तर वेस्ट साईज बघून साइन केलेलं असतं."

"मी माझ्या कारकीर्दीतली सर्वांत हिट फिल्म माझं वजन जास्त असताना दिली होती. लोकांना चित्रपट बघताना काही इश्यू नव्हता तर मग तुम्हाला एवढं कसलं टेन्शन आहे. सर्वांत खराब गोष्ट तर ही आहे की हिरो कसाही असो, तो यांना चालतो. पण हिरॉईनची हाईट, वेट सर्वच बघितलं जातं."

दुसरीकडे हुमा कुरेशीचा अनुभवही अगदी असाच काहीसा आहे. ती म्हणते, "गँग्स ऑफ वासेपूरमध्ये माझ्या अपोझिट नवाजुद्दीन होता. तो अति बारीक असल्यानं लोक म्हणायचे की हुमाचं वजन जास्त आहे. चित्रपटाचा सीन सुरू असताना तो जेव्हा माझा हात पकडायचा तेव्हा मी माझ्या मनगटाकडे बघायचे. पण लोकांना आजही तो सीन आठवतो. त्यांनी आम्ही केलेल्या कामासाठी आमची आठवण ठेवलीय."

हुमा पुढे सांगते की, "बऱ्याचदा स्त्रियांना त्यांच्या लुक्सपर्यंत मर्यादित ठेवलं जातं. पण डबल एक्सएल मध्ये काम करणं तसं लिबरेटिंग होतं. मला असं वाटलं की हा अनुभव, ही भावना प्रत्येक मुलीला मिळायला हवी. कारण तुम्ही खास आहात."

मला आठवतंय की काही वर्षांपूर्वी विद्या बालनचा 'तुम्हारी सुलू' नावाचा चित्रपट आला होता. या चित्रपटाच्या प्रमोशन वेळी एका रिपोर्टरने विद्या बालनला विचारलं होतं की, "आम्ही तुमचे जेवढे पण चित्रपट पाहिलेत ते सगळे विमेन सेन्ट्रीक आहेत. पुढे पण तुम्ही अशाच विमेन सेन्ट्रीक फिल्म करणार आहात की, वजन कमी करायचा काही विचार आहे?"

हा प्रश्न ऐकून विद्या बालनला धक्काच बसला. पण ती उत्तरात म्हणाली की, ती जे सध्या काम करते आहे त्यात ती खुश आहे आणि तुम्ही तुमचा दृष्टीकोन बदललात तर खूप छान होईल.

भारती सिंग मात्र अपवाद ठरली

ग्रॅमी विजेती गायिका टेलर स्विफ्टचा फॅट शेमिंगचा नवा वाद समोर आलाय. मागच्या काही दिवसांपूर्वी तिचा नवीन म्युझिक व्हिडिओ रिलीज झाला होता. यात ती वजनकाट्यावर उभी आहे आणि त्यावर फॅट लिहिलेलं आहे.

त्यानंतर तिच्यावर फॅट शेमिंगचे आरोप करण्यात आले. शेवटी तिने तिचा हा व्हिडिओ एडिट करून पुन्हा पोस्ट केल्यावर अनेकांनी तिला पाठिंबा दिला.

काही वर्षांपूर्वी नेटफ्लिक्स डॉक्युमेंटरीमध्ये टेलर स्विफ्टने तिच्या इटिंग डिसऑर्डर बद्दल सांगितलं होतं. ती सांगते की, "हे सगळं माझ्यावर लिहिल्या गेलेल्या कमेंटनंतर सुरू झालं. जेव्हा मी 18 वर्षांची होते तेव्हा एका मॅगझीनच्या कव्हर पेजवर माझा फोटो छापून आला होता. माझं वजन बघून मी 18 वर्षात प्रेग्नेंट असल्याच्या बातम्या आल्या. तेव्हापासून मी खायला सुरुवात केली. पण आत्ता मी असं केलं नसतं."

भारतात टीव्हीवर, चित्रपटात दिसणाऱ्या कलाकारांमध्ये भारती सिंग मात्र अपवाद ठरली. तिने कॉमेडी क्वीन टायटल मिळवलं. आणि कदाचित एका ब्युटी ब्रॅण्डने आपल्या शो साठी एखादी प्लस साईज मॉडेल निवडावी असं पहिल्यांदाच झालं होतं.

भारती त्या जाहिरातीत प्रेक्षकांना उद्देशून म्हणते, "काय विचार केला होता...36-24-36? मोटी, हत्ती, लाडू या नावांनी मला लहानपणी चिडवलं जायचं. माझ्या याच नावांना मी माझी ओळख बनवली आणि कॉमेडी क्वीन बनले. लोकांनी नेहमीच बिनधास्त, स्मार्ट अशी स्तुती केली. पण एक कॉम्प्लिमेंट नेहमीच मिसिंग होती, ती म्हणजे ब्युटीफुल भारती. पण पर्वा कोणीतरी म्हटलं की, यु आर लुकिंग ब्युटीफुल. मी सुंदर तर आधीपासूनच होते, फक्त लोकांचा आता दृष्टिकोन बदललाय. नाहीतर बॉडी लोशनच्या अॅड मध्ये मला घेतलं नसतं का."

भारतीप्रमाणेच चित्रा आणि खुशीने देखील आपला आपला मार्ग शोधलाय.

डिफीटिंग डिसऑर्डर नावाची वेबसाईट चालवणारी खुशी म्हणते, "माझं आणि माझ्या बॉडी इमेजमध्ये असलेलं नातं आता पॉजिटीव्ह आहे. पण यासाठी मला इतरांचीही मदत घ्यावी लागली. मी बराच काळ थेरेपी घेतली. लठ्ठपणावर मार्ग काढण्यासाठी मी चुकीच्या पद्धतीने न जाता न्यूट्रिशनिस्टची मदत घेतली. आता मी माझ्या भुकेचा आदर करायला शिकले आहे."

भारतात लठ्ठपणाची समस्या वाढते आहे

पण यामागे वाद असा आहे की, जर तुम्ही एखाद्याला त्याच्या वाढत्या वजनावरून बोलत नसाल तर मग तुम्ही त्याच्या खराब आरोग्याला आणि चुकीच्या जीवनशैलीला प्रोत्साहन देताय का?

नॅशनल फॅमिली हेल्थ सर्व्हे (2019-21) नुसार, 23 टक्के पुरुष आणि 24 टक्के महिलांचा बॉडी मास इंडेक्स 25 किंवा त्याहून अधिक आहे. 2015-16 मध्ये यात चार टक्के वाढ झाली आहे. पाच वर्षांखालील 3.4% मुलं लठ्ठ आहेत. 2015-16 मध्ये हेच प्रमाण 2.1% इतकं होतं.

वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनच्या म्हणण्यानुसार, शरीरातील अतिरिक्त चरबीमुळे अनेक प्रकारचे कॅन्सर, टाइप-2 डायबिटीज, हृदय आणि फुफ्फुसाच्या आजारांचा धोका वाढतो. मागच्या वर्षी लठ्ठपणामुळे जगभरात 28 लाख लोकांचा मृत्यू झालाय.

बॉडी शेमिंग की चुकीच्या लाइफस्टाइलला प्रोत्साहन?

फॅट शेमिंग आणि हेल्दी लाइफस्टाइल मध्ये कुठं आणि कसा फरक करायचा?

शिंपी मथारू डाएटीशीयन आहेत आणि नॅचरल सायन्सचा वापर करून त्या लोकांवर उपचार करतात.

लठ्ठपणाच्या वेगवेगळ्या कारणांबद्दल शिंपी सांगतात, "एकतर काहीजणांमध्ये लठ्ठपणा अनुवांशिक असतो. जसं की, तुमच्या शरीरातील काही जीन्स असे आहेत की इतरांच्या तुलनेत तुमच्यात फॅट स्टोअर करण्याची क्षमता जास्त असते. त्यामुळेच ज्यांच्यामध्ये मेटाबॉलीजम मंद असतं त्यांच्यात खाल्लेल्या अन्नातून एनर्जी तयार होण्याऐवजी फॅट तयार होऊन ते स्टोअर केले जातात."

"पण तुमची खराब लाइफस्टाइल सुद्धा लठ्ठपणासाठी कारणीभूत असू शकते. जसं की, तुमचा आहार योग्य नसेल तर. माझ्या लठ्ठपणाचं कारण, माझा अयोग्य आहार होता. लहानपणी मला सगळे जाडी - जाडी म्हणून चिडवायचे. मला वाईट वाटायचं. जेव्हा तुम्ही तणावात असता तेव्हा शरीरातील स्ट्रेस हार्मोन वाढत राहतात. आणि कॉर्टिसॉल सारखे स्ट्रेस हार्मोन्स तुमच्या शरीरातील फॅट्स वाढवतात. काही लोकांमध्ये लठ्ठपणा अनुवांशिक असतो."

शिंपी सांगतात की, "बॉडी शेमिंग करणं आणि एखाद्याला चांगली जीवनशैली जगण्यासाठी प्रेरित करणं यात फरक आहे. त्यांच्या मते, "निगेटिव्ह मोटिव्हेशन कधी कधी खरंच काम करतं. आणि तुमचा मित्र किंवा कोणी जवळचा व्यक्ती लठ्ठपणाने त्रस्त असेल आणि खरंच तुम्हाला काळजी असेल तर त्याला या अडचणीतून पुढं येण्यासाठी मार्ग काढा."

"त्यांच्यासाठी योग्य असलेलं अन्न त्यांच्यासोबत खा. जर त्यांना जिमची आवश्यकता असेल तर त्यांच्याबरोबर जिम मध्ये जा. जर त्यांना डॉक्टर किंवा न्यूट्रिशनिस्टची गरज असेल तर त्यांना सोबत घेऊन जा. त्यांना एकटं पाडू नका. बॉडी शेमिंग केल्याने तणाव निर्माण होऊन त्यांचं वजन आणखीनच वाढू शकतं."

आव्हान तर खूप आहेत, पण चित्रा सांगते की, मी स्वतःचं स्वतःला समजून घेतलं. वजन कमी जास्त होऊ शकतं, ते नेहमी बदलू शकतं पण तुमची पर्सनॅलिटी बदलणार नसते, ती आहे तशीच राहणार असते."

तिचं म्हणणं संपवताना चित्रा सांगते की, " माझा आत्मविश्वास वाढवण्यासाठी मी बरंच काम केलंय. स्वतःच व्यक्तिमत्त्व सुधारण्यावर भर दिलाय. माझ्यातील असुरक्षितता दूर करण्याचा प्रयत्न केलाय. आणि मला हे जाणवलंय की, लोक कॉन्फिडन्ट लोकांना घाबरतात, कॉन्फिडन्ट स्त्रियांना घाबरतात. मग त्यांची साईज काहीही असो."

हे वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)