लक्ष्मण-द्रविडने 2001 साली जे कोलकात्यात करुन दाखवलं, ते किवींनी करुन दाखवलं

न्यूझीलंड, इंग्लंड, वेलिंग्टन टेस्ट, फॉलोऑन

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, नील वॅगनर

टेस्ट क्रिकेट म्हणजे रटाळ. टेस्ट क्रिकेट कोणी पाहत नाही. 5 दिवस 8 तास कोण बघणार अशा चर्चा सुरु असतानाच न्यूझीलंड आणि इंग्लंड यांच्यातील वेलिंग्टन टेस्टने जगभरातील चाहत्यांना अव्वल दर्जाच्या क्रिकेटसह अद्भुत आनंद दिला.

पाचव्या दिवशी शेवटच्या सत्रापर्यंत गेलेल्या या टेस्टमध्ये न्यूझीलंडने इंग्लंडवर अवघ्या एका धावेने विजय मिळवला. या विजयासह न्यूझीलंडने दोन सामन्यांच्या मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली.

एका धावेने टेस्ट जिंकण्याची ही केवळ दुसरीच वेळ आहे. 30 वर्षांपूर्वी वेस्ट इंडिजने अडलेड इथे झालेल्या टेस्टमध्ये ऑस्ट्रेलियावर एका धावेने सनसनाटी विजय मिळवला होता.

दरम्यान फॉलोऑनची नामुष्की ओढवल्यानंतर टेस्ट जिंकण्याची किमया होण्याची टेस्ट क्रिकेटमधली ही केवळ चौथी वेळ आहे.

योगायोग म्हणजे याआधी असा पराक्रम भारतीय संघानेच केला होता. व्हीव्हीएस लक्ष्मण आणि राहुल द्रविड यांच्या विक्रमी खेळींच्या बळावर भारताने फॉलोऑन नंतरही ऑस्ट्रेलियावर खळबळजनक विजय मिळवला होता. त्यानंतर 22 वर्षानंतर न्यूझीलंडने हे करुन दाखवलं आहे.

न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. पण जो रुट (153) आणि हॅरी ब्रूक (186) या दोघांच्या शतकी खेळींच्या बळावर इंग्लंडने 435 धावांवर डाव घोषित केला. न्यूझीलंडतर्फे मॉट हेन्रीने 4 विकेट्स घेतल्या.

प्रत्युत्तरादाखल खेळताना न्यूझीलंडच्या फलंदाजांनी शरणागतीच पत्करली आणि त्यांचा पहिला डाव 209 धावांतच आटोपला. कर्णधार टीम साऊदीने नवव्या क्रमांकावर फलंदाजीला येत 73 धावांची खेळी केली. इंग्लंडतर्फे स्टुअर्ट ब्रॉडने 4 तर जेम्स अँडरसन आणि जॅक लिच यांनी प्रत्येकी 3 विकेट्स घेतल्या. इंग्लंडला 226 धावांची मोठी आघाडी मिळाली.

गोलंदाजांना विश्रांती देण्याच्या दृष्टीने तसंच चौथ्या डावात खेळण्याची वेळ येत असल्याने सर्वसाधारणपणे संघ फॉलोऑन देत नाहीत पण इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्सने न्यूझीलंडला फॉलोऑन देण्याचा निर्णय घेतला.

न्यूझीलंड, इंग्लंड, वेलिंग्टन टेस्ट, फॉलोऑन

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, केन विल्यमसन
Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

न्यूझीलंडच्या फलंदाजांनी दुसऱ्या डावात निर्धाराने खेळ करत इंग्लंडच्या गोलंदाजांना नामोहरम दिलं. टॉम लॅथमने 83 तर डेव्हॉन कॉनवे 61 धावांची खेळी केली. माजी कर्णधार केन विल्यसमनने 132 धावांची मॅरेथॉन खेळी केली.

या खेळीदरम्यान केन न्यूझीलंडसाठी टेस्टमध्ये सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला. टॉम ब्लंडेलने 90 धावांची खेळी केली. केन-टॉम जोडीने सहाव्या विकेटसाठी 158 धावांची महत्त्वपूर्ण भागादारी केली. या भागीदारीमुळे इंग्लंडला पुन्हा खेळावं लागणार हे स्पष्ट झालं. न्यूझीलंडने 483 धावांचा डोंगर उभारला.

डॅरेल मिचेलने 54 धावा केल्या. इंग्लंडतर्फे फिरकीपटू जॅक लिचने 5 विकेट्स पटकावल्या.

इंग्लंडला विजयासाठी 258 धावांचं लक्ष्य मिळालं. चौथ्या दिवसअखेर इंग्लंडने 48/1 अशी मजल मारली होती.

पाचव्या दिवशी पहिल्या सत्रात इंग्लंडची घसरगुंडी उडाली. आघाडीचे फलंदाज माघारी परतल्यानंतर जो रुट आणि बेन स्टोक्स या जोडीने सहाव्या विकेटसाठी 121 धावांची भागीदारी करत विजयासाठी पायाभरणी केली. हे दोघे खेळत असताना इंग्लंडचा विजय अगदी सहज वाटत होता.

पण न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज नील वॅगनरने स्टोक्सला उसळत्या चेंडूवर बाद केलं. दुखापतीसह खेळणाऱ्या स्टोक्सने वॅगनरना षटकार मारण्याचा प्रयत्न टॉम लॅथमच्या हातात जाऊन विसावला. रुट मैदानात असल्याने इंग्लंडला चिंता नव्हती. पण वॅगनरच्या उसळत्या चेंडूवर चौकार खेचण्याचा रुटचा प्रयत्न फसला आणि मायकेल ब्रेसवेलने झेल टिपला. रुटने 95 धावांची खेळी केली.

न्यूझीलंड, इंग्लंड, वेलिंग्टन टेस्ट, फॉलोऑन

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, जो रुट

रुट तंबूत परतल्यानंतर विकेटकीपर फलंदाज बेन फोक्सने सूत्रं हाती घेतली. फोक्सने तळाच्या फलंदाजांना हाताशी घेत धावफलक हलता ठेवला. स्टुअर्ट ब्रॉडने 11 धावांचं योगदान दिलं. खेळपट्टीवर स्थिरावलेला फोक्स इंग्लंडला विजय मिळवून देणार असं चित्र असताना साऊदीच्या गोलंदाजीवर तो उसळत्या चेंडूवरच बाद झाला. फोक्सने 35 धावा केल्या.

जॅक लिच आणि जेम्स अँडरसन यांनीही अर्धा तास चिवटपणे खेळ करत न्यूझीलंडला तंगवलं. अँडरसनने चौकार मारत इंग्लंडचा विजय दृष्टिक्षेपात आणला. पण वॅगनरच्या लेगस्टंपच्या बाहेरचा चेंडू अँडरसनच्या बॅटची कड घेऊन विकेटकीपर टॉम ब्लंडेलच्या ग्लोव्ह्जमध्ये जाऊन विसावला. ब्लंडेलने झेल पूर्ण करताच न्यूझीलंडच्या संघाने एकच जल्लोष केला.

शतकी खेळी साकारत न्यूझीलंडला मोठी धावसंख्या उभारून देणाऱ्या केन विल्यमसनला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आलं. दोन सामन्यांच्या मालिकेत 329 धावा करणाऱ्या हॅरी ब्रूकला मालिकावीर पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं.

फॉलोऑनंतरही विजयी

1894 मध्ये सिडनी इथे झालेल्या लढतीत इंग्लंडने ऑस्ट्रेलियावर विजय मिळवला होता. 1981 मध्ये लीड्स इथे इंग्लंडने ऑस्ट्रेलियाला नमवलं होतं. यानंतर प्रदीर्घ काळानंतर म्हणजे 2001 मध्ये भारताने फॉलोऑन मिळाल्यानंतरही ऑस्ट्रेलियावर धक्कादायक विजय मिळवला होता.

22 वर्षानंतर न्यूझीलंडने फॉलोऑनने खचून न जाता संस्मरणीय विजय मिळवला.

लक्ष्मण-द्रविडची खेळी

न्यूझीलंड, इंग्लंड, वेलिंग्टन टेस्ट, फॉलोऑन

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, व्हीव्हीएस लक्ष्मण

इडन गार्डन्स, कोलकाता इथे झालेल्या टेस्टमध्ये ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करताना 445 धावांची मजल मारली. कर्णधार स्टीव वॉने 110 धावांची खेळी केली. मॅथ्यू हेडनने 97 धावा केल्या. जस्टीन लँगरने 58 धावा केल्या. हरभजन सिंगने 7 विकेट्स घेतल्या.

भारताचा पहिला डाव 171 धावांतच गडगडला. व्हीव्हीएस लक्ष्मणने सर्वाधिक 59 धावांची खेळी केली. ऑस्ट्रेलियातर्फे ग्लेन मॅकग्राने 4 विकेट्स घेतल्या. सलग 16 टेस्ट जिंकणाऱ्या ऑस्ट्रेलियाने भारताला फॉलोऑन देण्याचा निर्णय घेतला.

न्यूझीलंड, इंग्लंड, वेलिंग्टन टेस्ट, फॉलोऑन

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, राहुल द्रविड

दुसऱ्या डावातही भारताची स्थिती 232/4 अशी स्थिती होती. इथून लक्ष्मण-द्रविड जोडीने पाचव्या विकेटसाठी 376 धावांची भागीदारी केली. लक्ष्मणने उकाड्याचा सामना करत 44 चौकारांसह 281 धावांची दिमाखदार खेळी केली. द्रविडने तापाशी झुंजत 20 चौकारांसह 180 धावांची खेळी केली.

भारताने दुसरा डाव 657/7 धावांवर दुसरा डाव घोषित केला. ऑस्ट्रेलियाला विजयासाठी 384 धावांचं लक्ष्य मिळालं. हरभजन सिंगच्या फिरकीसमोर ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांनी नांगी टाकली. ऑस्ट्रेलियाचा डाव 212 धावांत आटोपला. मॅथ्यू हेडनने 67 धावांची खेळी केली. हरभजनने 6 विकेट्स घेतल्या. सचिन तेंडुलकरने 3 विकेट्स घेत त्याला चांगली साथ दिली.

59 आणि 281 अशा खेळी करणाऱ्या लक्ष्मणला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आलं.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही. YouTube मजुकरात जाहिरातींचा समावेश असू शकतो.

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTubeFacebookInstagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)