ICC महिला विश्वचषक : दीप्तीच्या अष्टपैलू खेळाने भारताची श्रीलंकेविरोधात विजयी सलामी

भारताने महिला विश्वचषकाच्या गुवाहाटीतील सलामीच्या सामन्यात श्रीलंकेविरुद्ध 59 धावांनी विजय मिळवला,

भारताने 11 चेंडूंमध्ये केवळ 4 धावांत 4 विकेट्स गमावल्या, त्यातही इनोका रणवीराच्या 26व्या ओव्हरमध्ये तीन विकेटस पडल्या आणि भारताची अवस्था 124-6 अशी झाली.

मात्र अमनजोत कौर आणि दीप्ती शर्मा यांनी सातव्या गड्यासाठी 103 रन्सची विजयी भागीदारी करत श्रीलंकेच्या सुरुवातीच्या शिस्तबद्ध क्षेत्ररक्षणाला खीळ घातली. अमनजोतने 57 रन्स केल्या.

स्नेह राणाने 15 चेंडूंमध्ये 28 रन्स करत शेवटच्या टप्प्यात गती दिली, तर दीप्ती शर्मा शेवटच्या चेंडूवर 53 धावा करत बाद झाली. भारताने 47 ओव्हर्समध्ये (पावसामुळे 3 ओव्हर्स कमी) 269-8 अशी आव्हानात्मक धावसंख्या उभी केली.

त्यामुळे श्रीलंकेचे लक्ष्य 47 षटकांत 271 झाले. त्यांनी 82-1 अशी चांगली सुरुवात केली होती, पण कर्णधार चमारी अटापट्टू 43 वर बाद झाल्यावर त्यांच्या खेळात खंड पडला.

अटापट्टू आणि हर्षिता समरविक्रमा यांच्यात दुसऱ्या विकेटसाठी 52 रन्सची भागीदारी झाली, पण 140-6 अशी अवस्था झाल्यावर ते सावरू शकले नाहीत आणि अखेर 46व्या ओव्हरमध्ये 211 धावांवर बाद झाले.

दीप्ती शर्माने अर्धशतकासह 3-54 अशी कामगिरी केली, तर स्नेह राणा आणि श्री चऱणी यांनी अनुक्रमे 2-32 आणि 2-37 अशी कामगिरी केली. 22,843 प्रेक्षकांनी सामना पाहिला, ही महिला विश्वचषकातील गट सामन्यांसाठी विक्रमी उपस्थिती ठरली आहे.

या स्पर्धेतील पुढील सामना बुधवारी इंदोरमध्ये ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड यांच्यात होईल.

महिला विश्वचषकाच्या इतिहासात, ऑस्ट्रेलियाने सर्वाधिक वेळा म्हणजे सात वेळा विजेतेपद जिंकले आहे, इंग्लंडने चार वेळा आणि न्यूझीलंडने एकदा.

भारतीय महिला संघ अद्याप विश्वविजेता बनलेला नाही. दोनदा उपविजेतेपद आणि तीनवेळा उपांत्य फेरी भारतीय संघानं गाठली आहे.

आयसीसी महिला विश्वचषकात आजवर विजयाच्या असं जवळ येऊनही भारताला विजेतेपदाचा आनंद साजरा करता आलेला नाही. पण हाच इतिहास बदलण्याची चांगली संधी आता भारताकडे आहे.

सर्वाधिक वेळा कुणी जिंकली आहे स्पर्धा

एरवी महिला क्रिकेटमध्ये ऑस्ट्रेलियाचं वर्चस्व पाहायला मिळतं. वन डे विश्वचषकाचाही त्याला अपवाद नाही.

दर चार वर्षांनी होणारी ही स्पर्धा पहिल्यांदा 1973 साली खेळवण्यात आली होती, तेव्हा इंग्लंडनं त्यात विजय मिळवला होता. पण त्यानंतर ऑस्ट्रेलियानं सात वेळा ही स्पर्धा जिंकली आणि ऑस्ट्रेलियाचत विद्यमान विजेता आहे.

इंग्लंडनं एकूण चार वेळा तर न्यूझीलंडनं एकदा विश्वचषक जिंकला होता.

स्पर्धेसाठी घसघशीत बक्षीस

यावेळी महिला विश्वचषक जिंकणाऱ्या टीमला घसघशीत रोख बक्षीसही मिळणार असल्याची घोषणा आयसीसीनं केली आहे. 2022 च्या तुलनेत बक्षीसाच्या रकमेत 239 टक्क्यांची वाढ करण्यात आली आहे.

यात चौदा पंच आणि चार सामनाधिकाऱ्यांचा समावेश आहे. त्यात मुंबईतील वृंदा राठी यांचाही समावेश आहे.

हा विश्वचषक जिंकणाऱ्या टीमला 44.8 लाख अमेरिकन डॉलर्सचं बक्षीस मिळेल. भारतीय चलनात ही रक्कम होते, सुमारे 39 कोटी 75 लाख 52 हजार रुपये.

तसंच 2023 साली पुरुषांचा वन डे विश्वचषक जिंकणाऱ्या ऑस्ट्रेलियाला मिळालेल्या रकमेपेक्षाहीह ही रक्कम जास्त आहे. त्यावेळी ऑस्ट्रेलियाला सुमारे 35 कोटी 31 लाख 35 हजार रुपये बक्षीस मिळालं होतं.

या स्पर्धेतील एकूण प्राईझ मनी म्हणजे सर्व बक्षीसांची एकूण रक्कम सुमारे 1.23 अब्ज रुपये एवढी निश्चित करण्यात आली आहे.

महिला आणि पुरुषांच्या क्रिकेटमध्ये अधिक समानता यावी यासाठी हे पाऊल उचलण्यात आलं आहे.

तसंच यावेळच्या महिला विश्वचषकात पहिल्यांदाच आयसीसीनं सामनाधिकारी आणि पंच म्हणून पूर्णतः महिलांचं पॅनेल नियुक्त केलं आहे.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)