You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
निदर्शनं, अश्रुधूर आणि पोलिसांकडून बळाचा वापर; सध्या अमेरिकेत नेमकं काय चालू आहे?
ट्रम्प सरकारच्या स्थलांतरित आणि सीमा शुल्कासंदर्भातील आक्रमक धोरणाच्या अंमलबजावणीविरोधात लॉस एंजेलिसमध्ये सुरू असलेल्या तीव्र निदर्शांच्या पार्श्वभूमीवर आता रात्रीच्या वेळेस कर्फ्यू लागू करण्यात आला आहे.
लॉस एंजेलिसमधील प्रशासनानं फोनवरून लोकांना अलर्ट पाठवले आहेत.
त्यात म्हटलं आहे की, "लॉस एंजेलिस शहरात रात्री 8 ते पहाटे 6 वाजेपर्यंत कर्फ्यू लागू करण्यात आला आहे. कामावर जाणं आणि घरी परतणं, आपत्कालीन सेवा देणं किंवा घेणं आणि आपत्कालीन परिस्थितीत मदत करणाऱ्यांना यात सूट देण्यात आली आहे."
लॉस एंजेलिसच्या महापौर केरेन बास यांनी कर्फ्यू जाहीर करताना सांगितले की याचा लॉस एंजेलिसमधील फक्त 1 चौरस मैलाच्या परिसरात परिणाम होईल.
लॉस एंजेलिसमध्ये स्थानिक वेळेनुसार रात्री 8 वाजता कर्फ्यू लागू झाल्यानंतर देखील अनेकजण कारमध्ये दिसून आले. आता बाहेर पडणं बेकायदेशीर आहे, हे लक्षात आल्यानंतर त्यांना धक्का बसला.
अनेकजण शहरात अडकले आहेत. यातील काही चुकून अडकले आहेत कर काहीजणांनी कर्फ्यू मोडला आहे. शहरात मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
रात्री उशिरा शहरात झालेली लूटमार आणि हिंसाचाराला आळा घालण्यासाठी कर्फ्यू लागू करण्यात आला होता.
कर्फ्यू लागू झालेला असूनदेखील शहरात मोठ्या संख्येनं निदर्शक दिसत असून ते आणि पोलीस आमनेसामने येत आहेत.
या प्रकारे निदर्शनं करणं बेकायदेशीर आहे आणि जर त्यांनी तो परिसर सोडला नाही तर त्यांना अटक करण्यात येईल असं प्रशासनाकडून जाहीर केलं जात आहे.
लॉस एंजेलिस पोलीस दलानं म्हटलं आहे की कर्फ्यू लागू असलेल्या शहराच्या भागातून लोकांना "मोठ्या प्रमाणात अटक केली जाते आहे." पोलिसांनी एक्स या सोशल मीडियावर लिहिलं आहे, फर्स्ट स्टीटवर अनेक गट अजूनही गोळा होत आहेत.
"या गटांना सूचना दिल्या जात आहेत आणि मोठ्या प्रमाणात अटकेला सुरूवात केली जात आहे. कर्फ्यू लागू करण्यात आला आहे."
लॉस एंजेलिसमध्ये मोठ्या प्रमाणात पोलीस दल आणि इतर पथकं तैनात करण्यात आली आहेत. कर्फ्यूचं उल्लंघन केल्याबद्दल डझनभर लोकांना अटक करण्यात आली आहे.
शहराच्या दक्षिणेस 30 मैल (50 किमी) अंतरावर सील बीच परिसरात शेकडो मरीन्स तैनातीची वाट पाहत आहेत, अशी माहिती एका अमेरिकन अधिकाऱ्यानं रॉयटर्स या वृत्तसंस्थेला दिली.
अमेरिकन अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे की लॉस एंजेलिसमध्ये मंगळवारी (10 जून) 2,100 नॅशनल गार्ड होते. मरीन्स आणि नॅशनल गार्डला अटक करण्याचा अधिकार नाही.
लॉस एंजेलिसमध्ये निदर्शक नॉर्थ मेन आणि टेम्पल स्ट्रीटभोवती जमलेले निदर्शक जवळपास 50 मीटर मागे हटले आहेत. त्यामुळे या रस्त्याचं एक टोक रोखून धरणाऱ्या पोलिसांमध्ये आणि निदर्शकांमध्ये थोडं अंतर निर्माण झालं आहे.
लॉस एंजेलिसमध्ये निदर्शकांवर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलीस घोड्याचा वापर करत आहे. घोड्यावर स्वार झालेल्या पोलिसांची एक रांग आणि 100 हून अधिक पायी पोलीस अधिकारी निदर्शकांविरोधात सज्ज आहेत. घोड्यावर बसलेले पोलीस निदर्शकांना पांगवण्यासाठी पुढे सरसावताना दिसले.
पोलीस शहराच्या मध्यभागी असलेल्या रस्त्यांवरून एक-एक करत पुढे सरकताना दिसत होते. पोलीस पुढे जाण्यासाठी आणि निदर्शकांना पांगवण्यासाठी रबरी गोळ्यांचा वापर करत आहेत.
महापौर आणि पोलीस प्रमुखांनी स्पष्ट केलं आहे की कर्फ्यू लागू असलेल्या भागात प्रसारमाध्यमं काम करू शकतात. मात्र तरीदेखील एक अधिकारी बीबीसीच्या प्रतिनिधीला म्हणाला की, "तुम्ही कोणीही असलात तरी आम्ही तुम्हाला अटक करू शकतो."
सॅन पेड्रो रस्त्यावर पोलिसांच्या कारवाईमुळे गर्दी बरीच कमी झाली आहे. दोन-तीनच्या संख्येनं निदर्शकांचे काही छोटे गट अजूनही शहराच्या मध्यभागी पोलिसांना चकवत निदर्शनं करण्याचा प्रयत्न करत आहेत.
इमिग्रेशन छाप्यांविरोधात लॉस एंजेलिसनंतर, न्यूयॉर्कपासून ते टेक्सासमधील अनेक शहरांमध्ये निदर्शनं होत आहेत. यात लॉस एंजेलिस, न्यूयॉर्क, अटलांटा, शिकागो, फिलाडेल्फिया, डल्लास, ऑस्टिन आणि सॅन फ्रान्सिस्को या शहरांचा समावेश आहे.
स्थलांतरित आणि सीमा शुल्कासंदर्भातील धोरणाविरोधात अमेरिकेच्या इतर शहरांमध्ये निदर्शनं वाढत असताना, टेक्सासमध्ये लॉस एंजेलिसमधील परिस्थितीच्या उलटं दिसून येतं आहे.
प्रतिगामींची बहुसंख्या असलेल्या टेक्सासचे गव्हर्नर ग्रेग अबॉट यांनी सॅन अँटोनियोमध्ये होणार असलेल्या निदर्शनांच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या राज्याच्या नॅशनल गार्डला आधीच तैनात करण्याचे आदेश दिले आहेत.
टेक्सासचे गव्हर्नर ग्रेग अबॉट यांनी एक्स या सोशल मीडियावर म्हटलं आहे की, "राज्यात विविध ठिकाणी कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी टेक्सास नॅशनल गार्ड तैनात केले जातील."
त्यांनी पुढे म्हटलं आहे, "शांततामय मार्गानं निदर्शनं करणं कायदेशीर आहे. मात्र एखाद्या व्यक्तीला किंवा मालमत्तेला अपाय करणं बेकायदेशीर आहे आणि त्यामुळे अटक करण्यात येईल. कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी टेक्सास गार्ड सर्वप्रकारची रणनीती आणि साधनं वापरतील."
स्थलांतरिताविरोधातील कारवाईच्या विरोधात न्यूयॉर्कमध्ये रात्री (11 जून) निदर्शनं झाली. त्यावेळेस अनेकांना अटक करण्यात आल्याचं वृत्त आहे.
मोठ्या प्रमाणात निदर्शनं शांततेत पार पडली. यावेळेस काही हजार निदर्शकांनी लोअर मॅनहॅटनमध्ये शिरकाव केला होता.
पोलिसांनी एका निवेदनात म्हटलं आहे की "अधिकाऱ्यांनी पाहिलं की रस्त्यावर अनेकजण बसले आहेत आणि त्यांनी वाहतूक रोखली आहे. निदर्शकांना पोलिसांनी रस्ता रिकामा करण्याच्या तोंडी सूचना अनेकदा दिल्या. मात्र ते तिथून हटले नाहीत. परिणामी अनेक निदर्शकांना ताब्यात घेण्यात आलं."
न्यूयॉर्कचे महापौर एरिक अॅडम्स यापूर्वी म्हणाले होते की "लॉस एंजेलिसमध्ये ज्याप्रमाणे निदर्शनं होत आहेत ती अस्वीकार्य आहेत. आमच्या शहरात याप्रकारची निदर्शनं सहन केली जाणार नाहीत."
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)