‘तुम्ही करा कितीही हल्ला, लय मजबूत भिमाचा किल्ला…’ भीमगीतांची जादू काय आहे?

    • Author, गणेश पोळ
    • Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी

'तुम्ही करा कितीबी हल्ला, लय मजबूत भिमाचा किल्ला...' आंबेडकरी विचारांच्या किल्ल्याची तटबंदी अशा भीमगीतांनी बनलीय, असं म्हटल्यास वावगं ठरू नये.

कारण शाळेचा उंबरठाही न ओलांडलेल्या शोषित-वंचितांपर्यंत आंबेडकरी विचार पोहोचवण्याची किमया याच भीमगीतांनी आजवर प्रभावीपणे केलीय.

दलितांच्या हक्कांसाठी डॉ. आंबेडकरांनी उभं आयुष्य वेचलं. अन्यायाविरुद्ध त्यांनी कायद्याचं आयुध वापरलं. हेच आयुध भीमगीतांनी सहज-सोप्या आणि लयबद्ध भीमगीतांच्या माध्यमातून गावकुसापर्यंत पोहोचवलं.

केवळ महाराष्ट्रातूनच नव्हे, तर संपूर्ण भारताच्या कानकोपऱ्यातून ही भीमगीतं तिथल्या स्थानिक भाषेतून ऐकायला मिळतात. बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाणानंतर त्यांचं व्यक्तिमत्व आणि त्यांचे विचार खऱ्या अर्थाने या भीमगीतातूनच तळागाळापर्यंत पोहोचले.

या भीमगीतांची सुरुवात कशी झाली? या गीतांमध्ये काय विचार असतात? दलितांवर या गाण्यांचा कसा प्रभाव पडत गेला? हे आपण या लेखातून जाणून घेऊया.

भीमगीतांची बीजे कधी रोवली?

महाराष्ट्रातील भीमगीतांना भक्तीचळवळीतील अभंग, छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावरील पोवाडे आणि सत्यशोधक चळवळीतील जलसाची पार्श्वभूमी असल्याचं जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील (JNU) प्राध्यापक हरीश वानखेडे सांगतात. प्रा वानखेडे हे दलित चळवळीचे अभ्यासक आहेत.

लोकगीते, अभंग, जलसा, जात्यावरच्या ओवी आणि पोवाड्यातून महाराष्ट्रात समाज प्रबोधन होत गेलं. सामान्य लोकांपर्यंत समता, बंधुता, सर्वधर्म समभाव, तर्कशुद्ध विचार करणं हे लोकगीतांद्वारे पोहोचवण्यात आलं.

पण भीमगीतांनी लोकगीतांपेक्षा आपलं वेगळं स्थान निर्माण केल्याचं प्रा. वानखेडे सांगतात.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर हयात असतानाही भीमगीते गायली जायची. बाबासाहेबांच्या भाषणाआधी भीमगीते सादर केली जात असत.

“बाबासाहेबांनी 1927 साली महाडमध्ये चवदार तळ्याचं आंदोलन करून जातीविरोधी चळवळीला सुरुवात केली. ही घटना आंबेडकरी जलसा, शाहिरी आणि भीमगीतांसाठी मैलाचा दगड ठरली आणि महाराष्ट्राच्या गावोगावी भीमगीतांचं वारं आणखी वेगानं वाहू लागलं,” असं

भीमगीताचा विशेष अभ्यास असणारे योगेश मैत्रय सांगतात.

मैत्रय बाबासाहेब आणि वामनदादा कर्डक यांच्याबद्दलचा किस्सा सांगतात, “एकदा वामनदादा कर्डक यांचा जलसा ऐकून स्वत: बाबासाहेब प्रभावित होऊन म्हणाले होते की, माझी 10 भाषणं ही वामनदादा आणि त्यांच्या साथीदारांच्या एका जलसासमान आहेत. त्यांच्या निधनानंतर वामनदादा कर्डक, प्रल्हाद शिंदे, विठ्ठल उमप यांच्या भीमगीतांनी वेगळा ठसा उमटवला.”

भीमगीतांमधील बंडखोरी

भीमगीतांमध्ये दलित-बहुजनांच्या रोजच्या जीवनातील समस्या आणि संघर्ष मांडला जातो. त्यांची सामाजिक, आर्थिक आणि राजकीय परिस्थिती सांगितली जाते. आंबेडकरांमुळे ती कशी बदलत गेली, हेही सांगितलं जातं.

उदाहरणादाखल सांगायचं तर –

‘काखेत लेकरू, हातात झाडनं, डोईवर शेणाची पाटी

कपडा न लत्ता, आरे खरकटं भत्ता फजिती होती माय मोठी

माया भीमानं, भीमानं माय सोन्यानं भरली ओटी.’

कडूबाई खरात यांनी गायलेलं हे गीत सोशल मीडियावर तुफान व्हायरल झालं होतं. हे गीत आंबेडकरांच्या लढ्यानंतर झालेल्या परिवर्तनाविषयी भाष्य करतं.

ज्येष्ठ विचारवंत गोपाळ गुरूही एकेठिकाणी लिहितात की, विद्रोही राजकारण आणि तत्वज्ञानाचा प्रभाव भीमगीतांवर दिसून येतो, हे अगदी खरं.

पण केवळ विद्रोह, बंडखोरी, संघर्ष इतकाच मर्यादित भीमगीतांचा आवाका नाहीये. बाबासाहेब आणि रमाबाईंच्या सहजीवनावरही गीतं गायली गेलीत.

उदाहरणार्थ –

‘माझ्या भीमाच्या नावाचं कुंकू लाविलं रमानं,

दीन-दलितांची माऊली नाव कमविलं श्रमानं

कुंकू लाविलं रमानं...’

भीमगीते, जलसा, शाहिरीमुळे परंपरांगत सांस्कृतिक वर्चस्वाला खिंडार पाडण्यात भीमगीतांनी मोठी भूमिका बजावल्याचं आजही अनेक जाणकार सांगतात. तसंच, दलित कलासंस्कृतीला समाजात आदराचं स्थान मिळत गेलं. 

भीमगीतांचा दलित-बहुजन समाजावरील प्रभाव

वक्ते, अभ्यासक, विचारवंत, साहित्यिकांनी आपापल्या पद्धतीने आंबेडकरी विचार लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला. पण विचारांचा प्रभाव हा जलसा, शाहिरी, भीमगीतांनी जास्त पाडल्याचं म्हटलं जातं. 

सार्वजनिक जीवनात समजातील सगळ्या घटकांनी सहभागी व्हावं, असं बाबासाहेब नेहमी सांगत असत. तसंच, स्वत:चं अस्तित्व आणि ओळख कुणासमोरही न झुकता सांगता आली पाहिजे, असं त्यांना वाटत असे. बाबासाहेबांचे हे विचार भीमगीतांच्या ओळी बनल्या.

महाराष्ट्रातील विद्रोहाचा बुलंद आवाज म्हणून शाहीर संभाजी भगत यांचं नाव आज घेतलं जातं. दलित-बहुजन आणि पुरोगामी चळवळींच्या व्यासपीठांवरून संविधानाचं महत्त्वं ते आपल्या शाहिरीतून थेट पोहोचवतात.

काही दिवसांपूर्वी ज्येष्ठ पत्रकार रवीश कुमार यांना संभाजी भगत यांनी मुलाखत दिली होती. त्यात ते म्हणतात, “आंबेडकरी विचारांची भीमगीते ही मानवमुक्तीचा मोकळा श्वास घ्यायला शिकवतात. तसंच, ती बाबासाहेबांच्याप्रती आभार व्यक्त करतात. या गाण्यांमध्ये माणुसकीची सर्व मूल्य सामावलेली आहेत. तुमच्या समता, स्वातंत्र्य, न्याय, बंधुता इथपासून स्वाभिमान, अभिमान, जाणीव, जागृती, विद्या, करुणा ही सर्व जीवन मूल्ये अंगीकारायला भीमगीतं शिकवतात.”

तसंच, आंबेडकरी कलावंत हे विद्रोही राजकारणाचा प्रभावीपणे वापर करतात, असंही संभाजी भगत सांगतात.

यात आणखी एक गोष्ट स्पष्टपणे दिसते. ती म्हणजे फक्त शिकलेल्या लोकांनी आंबेडकरी विचारांवर गाणी लिहिली नाहीयेत. तर कधीही शाळेत न गेलेल्या दलित महिलांनीही आंबेडकरी विचारांवर गाणी रचली.

अन् केवळ रचली नाहीत, तर ती त्यांनी गावोगावी जाऊन गायलीसुद्धा. यातून आंबेडकरांचा विचाराने दलित महिला किती प्रभावित झाल्या हे दिसून येते.

‘प्रस्थापित सांस्कृतिक वारसा मोडून काढला’

दलित चळवळ, कला-संस्कृती अशा विषयांवर सातत्यानं जाहीर व्यासपीठांवरून बोलणारे डॉक्युमेंट्री मेकर सोमनाथ वाघमारे यांच्याशीही आम्ही बातचित केली.

सोमनाथ वाघमारे सांगतात की, स्वत:चा सांस्कृतिक वारसा ठामपणे सांगणं, परंपरागत सांस्कृतिक वर्चस्व मोडीत काढण्यासाठी प्रवृत्त करणं हे भीमगीतांतून प्रकर्षाने दिसून येतं.

“भारतातील जातीविरोधी चळवळीच्या इतिहासाचा वारसा आंबेडकरी गाण्यांमध्ये दिसतो. मुख्य प्रवाहात दलितांच्या सांस्कृतिक अस्मितांना नगण्य मानलं गेलं. किंबहुना, त्याकडे सोयीस्करपणे दुर्लक्षच करण्यात आलं,” असं सोमनाथ वाघमारे सांगतात.

पण आता डिजिटल युगामुळे आंबेडकरी विचारांचा सांस्कृतिक वारसा बळकट करण्यात आणखी ऊर्जा मिळाली. स्वत: सोमनाथ वाघमारे सुद्धा या नव्या माध्यमाचा वापर करत भीमगीतं संवर्धन करून अनेकांपर्यंत पोहोचवू पाहतायेत.

डिजिटल प्लॅटफॉर्ममुळे मेनस्ट्रीम मीडियाच्या परिघाच्या बाहेर आता दलितांचा प्रश्नांवर किंवा विद्रोही राजकारणावर सिनेमा, नाटक, डॉक्युमेंट्री तयार करणं सोपं झालंय. त्यामुळे प्रस्थापित सांस्कृतिक वर्चस्व मोडून काढणंही शक्य झाल्याचं सोमनाथ वाघमारे सांगतात.

हे वाचलंत का?