संजय राऊतांना ‘चमचा’ निशाणी द्या – शिंदे गटातील खासदार

फोटो स्रोत, Getty Images
आज सकाळी वृत्तपत्रं आणि वेबसाइट्सवर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी 5 मोठ्या बातम्या थोडक्यात पाहूया...
1) संजय राऊतांना ‘चमचा’ निशाणी द्या – शिंदे गटातील खासदार
महाराष्ट्र-कर्नाटक वादावर बोलताना शिवसेनेचे खासदार संजय राऊतांनी शिंदे-फडणवीस सरकारवर जोरदार टीका केली होती.
कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई वारंवर आक्रमक भूमिका घेत असताना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठोस भूमिका घेत नसल्याची टीका राऊतांनी केली होती.
तसंच, मुख्यमंत्री शिंदे काहीच बोलत नसल्यानं त्यांना ‘कुलूप’ निशाणी द्यायला हवी, असा टोलाही राऊतांनी लगावला होता.
यावर आता शिंदे गटातूनही उत्तर देण्यात आलंय. शिंदे गटातील खासदार प्रतापराव जाधव यांनी म्हटलं की, संजय राऊतांसारख्या लोकांना भविष्यात ‘चमचा’ निशाणी मिळाली पाहिजे. लोकसत्तानं ही बातमी दिलीय.
“संजय राऊत आणि ती 'उबाठा सेना' काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचं समर्थन करण्यामध्ये वेळ घालवत आहेत. ते काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची चमचेगिरी करण्यात वेळ घालवत आहेत. त्यामुळे संजय राऊतांसारख्या लोकांना भविष्यात ‘चमचा’ ही निशाणी मिळाली पाहिजे, अशी मागणी आम्ही निश्चितपणे निवडणूक आयोगाकडे करणार आहोत,” असं प्रतापराव जाधव म्हणाले.
2) सीमावादाला राष्ट्रवादीचे नेतृत्व जबाबदार – गोपीचंद पडळकर
“महाराष्ट्रात सुरू असलेल्या सीमावादाने निर्माण झालेल्या प्रश्नांची सर्वस्वी जबाबदारी राष्ट्रवादीच्या नेतृत्वाकडे जाते. कारण सीमाभागातील लगतच्या तालुक्यामध्ये विकास करण्याच्या बाबतीत महाविकास आघाडी सरकार कमी पडले,” अशी टीका भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी केलीय. एबीपी माझानं ही बातमी दिलीय.
मविआ सरकारमध्ये सांगली जिल्ह्यातील नेतृत्वाकडे महत्वाचे पद असतानाही जत तालुक्यातील पाण्याचा प्रश्न गंभीर होतो, असे म्हणत पडळकर यांनी जयंत पाटील यांच्यांवर टीकास्त्र सोडले.

“आज सीमाभागात वादळ उठलेलं आहे ते वादळ परत कधी उठणार नाही याची जबाबदारी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली आम्ही घेणार आहोत. अडीच वर्षांपूर्वी विश्वासघाताने महाविकास आघाडी सरकार आल्यानंतर आणि जिल्ह्यातील नेतृत्वकडे राज्याच्या कॅबिनेटमध्ये महत्वाच्या पदावर असताना सुद्धा जत तालुक्यातील पाण्याचा प्रश्न गंभीर होतो,” याकडे देखील पडळकर यांनी लक्ष वेधले.
3) शाई कुठं वापरायची याचं भान ठेवलं पाहिजे – सुषमा अंधारे
“चंद्रकांत पाटील यांचं वक्तव्य प्रचंड दुर्दैवी आहे. उच्च व तंत्रशिक्षण मंत्रालयाच्या अखित्यारीत असणारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर चरित्रसाधन प्रकाशन समितीच्या सदस्यपदाचा काल राजीनामा दिला. राजीनामा परत घ्यावा, असं चंद्रकांत पाटील मला बोलत होते,” असं शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारे म्हणाल्या. टीव्ही 9 मराठीनं ही बातमी दिलीय.
“निषेध संसदीय मार्गानं व्यक्त केला आहे. शाई कुठं वापरायची याचं भान मला आलं पाहिजे. ती शाई किती जास्त बोटांना लागते याचा विचार करेन. भाजपची विचारधारा हरविण्यासाठी बॅलेट बॉक्समधून ती शाई कशी वापरता येईल. यासाठी प्रयत्न करेन,” असं सुषमा अंधारे यांनी सांगितलं.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त, 1
“भाजपच्या वेगवेगळ्या नेत्यांकडून महापुरुषांचा अपमान केला जातो. यावर उपमुख्यमंत्री चकार शब्दानं बोलत नाहीत. निंदाजनक प्रस्ताव सभागृहात मांडायला हवं होतं,” असंही सुषमा अंधारे म्हणाल्या.
4) योगा आणि आयुर्वेद मानवतेसाठी नवी आशा – नरेंद्र मोदी
“पूर्वी दुर्लक्षित समजले जाणारे योग आणि आयुर्वेद आज संपूर्ण मानवतेसाठी नवी आशा बनले आहेत. संपूर्ण जग आता आरोग्य आणि निरोगीपणाचा जागतिक सण म्हणून आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करत आहे,” असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी सांगितले. गोव्यातील धारगल येथे अखिल भारतीय आयुर्वेद संस्थेच्या उद्घाटनप्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी बोलत होते. लोकमतनं ही बातमी दिलीय.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गोव्यातून व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे गाझियाबादमधील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ युनानी मेडिसिन आणि नवी दिल्लीतील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ होमिओपॅथीचे उद्घाटनही केले.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त, 2
यावेळी नरेंद्र मोदी म्हणाले, “मला खात्री आहे की या तीन संस्था आयुष आरोग्य सेवा प्रणालीला नवीन चालना देतील. आयुर्वेद हे असे ज्ञान आहे, ज्याचे उद्दिष्ट सर्वे भवन्तु सुखिन: सर्वे संतु निरामय: आहे. याचा अर्थ सर्वांचे सुख आणि सर्वांचे आरोग्य.”
“आयुर्वेद उपचारांच्या पलीकडे जाऊन कल्याणबद्दल बोलतो आणि कल्याणाला प्रोत्साहन देतो. जग देखील आता सर्व बदल आणि ट्रेंडमधून बाहेर पडत आहे आणि जीवनाच्या या प्राचीन तत्त्वज्ञानाकडे परत येत आहे. यासाठी भारतात काम सुरू झाल्याचा मला आनंद आहे. आयुर्वेद परिषदेत 50 हून अधिक देशांचे प्रतिनिधी सहभागी झाले होते,” असे नरेंद्र मोदी म्हणाले.
5) हिमाचलमध्ये जुनी पेन्शन योजना पुन्हा लागू करू – सुखू
हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री म्हणून काँग्रेस नेते सुखविंदर सिंग सुखू यांनी शपथ घेतली. चारवेळा आमदार म्हणून निवडून आलेले सुखू हे हिमाचलचे 15 वे मुख्यमंत्री झाले आहेत.
मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर बोलताना सुखूंनी सांगितलं की, मंत्रिमंडळाच्या पहिल्याच बैठकीत जुनी पेन्शन योजना लागू करण्याचा निर्णय घेतला जाईल.
टाईम्स ऑफ इंडियानं ही बातमी दिलीय.
आम्ही दहा आश्वासनं दिलीत, ती सर्व पूर्ण करणार असल्याचंही सुखू म्हणाले.
राज्यपाल राजेंद्र अर्लेकरांनी सुखविंदर सिंग सुखू यांना मुख्यमंत्रिपदाची शपथ दिली.
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








