You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
डेटिंग ॲप्सना लोक कंटाळले? नवी पिढी व्हीडिओ गेममधून कशी 'प्रेम' शोधतेय? वाचा
- Author, फिओना मॅकडोनाल्ड
- Role, बीबीसी न्यूज
रिलेशनशिपला एक वर्ष पूर्ण झाल्यानंतर अखेर जेस आणि नेट यांचा साखरपुडा झाला.
"समुद्राला लागून असलेल्या एका नितांतसुंदर आणि निर्मनुष्य अशा सोनेरी किनाऱ्यावर आम्ही एकमेकांना आयुष्यभर साथ देण्याचं वचन दिलं.
तिथे आम्ही दोघं सोडून कोणीच नव्हतं. हा आमच्यासाठी फार खास क्षण होता," 26 वर्षीय जेस सांगत होती.
वरचं सगळं वर्णन जरी खरं असलं तरी हे सगळं प्रत्यक्षात घडलं नव्हतं. साखरपुड्याचा हा सोहळा पार पडला तेव्हा जेस आणि नेट एकमेकांपासून शेकडो किलोमीटर लांब होते. दोघेही 'वर्ल्ड ऑफ वॉरक्राफ्ट' या ऑनलाईन व्हीडिओ गेममध्ये ही सगळी भूमिका (रोल प्लेयिंग) वठवत होते.
साखरपुड्याच्या या सोहळ्याला त्यांनी या ऑनलाईन गेममधून रोल प्लेयिंग करत हजेरी लावत, तो साजरा केला होता. तसं बघायला गेल्यास यातलं काहीच खरं नव्हतं. पण म्हटलं तर सगळं तितकंच खरं देखील होतं.
तेव्हा 29 वर्षीय नेट हा लंडनजवळील एका गावात राहत होता तर जेस वेल्समध्ये राहत होती. 2023 च्या मार्च महिन्यात जर्मनीत भरलेल्या एका इस्पोर्ट्स इव्हेंटमध्ये त्यांची पहिल्यांदा भेट झाली आणि तिथूनच दोघांमध्ये सूत जुळलं.
ऑनलाईन गेम्स खेळणाऱ्या खेळाडूंसाठी इस्पोर्ट्स प्लेअर अशी संज्ञा वापरली जाते. अशा खेळाडूंच्या स्पर्धाही भरवल्या जातात. जिथे हे खेळाडू प्रत्यक्षात एके ठिकाणी जमून एकमेकांचा सामना करतात.
जर्मनीत अशाच एका स्पर्धेत झालेल्या भेटीनं नेट आणि जेस यांच्या नात्याला सुरुवात झाली. सुरुवातीला ते दोघेही एकमेकांपासून लांब राहायला होते.
नेट लंडनमध्ये तर जेस वेल्समध्ये होती. पण वर्ल्ड ऑफ वारक्राफ्ट या गेमच्या माध्यमातून ते सतत एकमेकांच्या संपर्कात असायचे. "सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आम्ही सोबत गेम खेळत असायचो," असं नेट सांगतो.
आजही रोज हे जोडपं हा गेम सोबत खेळतं. पण आता प्रत्यक्षात देखील एकाच घरात राहून. 2024 च्या मार्च महिन्यापासून ते मँचेस्टरमध्ये एकत्र राहत आहेत. व्हीडिओ गेम्सच्या माध्यमातून आयुष्याचा जोडीदार मिळालेले फक्त हे दोघंच नाहीत. व्हीडिओ गेम्स मधून जुळलेल्या अनेक जोड्या आणि जोडपे आहेत.
यातले काही तर नेट आणि जेसचे मित्रच आहेत. व्हीडिओ गेम्स हे सूत जुळण्याचं नवीन माध्यम बनून उदयाला येत आहे. "कोणाला भेटण्याची ही नवी पद्धत विकसित होत आहे. आणि अशा पद्धतीने झालेली भेट ही अधिक नैसर्गिक आणि उबदार वाटते. कारण तुम्ही दोघंही एकच समान गोष्ट (इथे ठराविक व्हीडिओ गेम) आवडतो म्हणून संपर्कात आलेले असता.
जेव्हा असा समान धागा दोघांमध्ये आधीच तयार झालेला असतो तेव्हा त्या दोन व्यक्ती एकमेकांजवळ येणं आणि एकमेकांच्या प्रेमात पडणं अधिक सहज होऊन जातं," ऑनलाईन गेमिंग विश्वाचा हा नवा पैलू जेसनं आमच्याशी बोलताना उलगडून सांगितला.
नेटनं सुद्धा जेससोबत सहमती दर्शवली. "गेमिंगदरम्यान लोकांची होणारी जवळीक आणि निर्माण होणारं नातं हे अधिक घट्ट असतं. याउलट डेटिंग ॲपवरून जोडीदार अथवा नातं शोधण्याची प्रक्रिया मला फार कृत्रिम आणि कोरडी वाटते. डेटिंग ॲपवरून मला असा जोडीदार मिळणं शक्यच झालं नसतं," नेट सांगत होता.
नेट आणि जेस हे व्हीडिओ गेममधून फुललेल्या प्रेमाचं एकमेव उदाहरण नाहीत. नव्या पिढीचे तरूण आणि तरूणी आयुष्यात जोडीदार अथवा प्रेम शोधण्यासाठी डेटिंग ॲप्स ऐवजी प्रेमासाठी प्रायोजित नसलेल्या इतर ऑनलाईन माध्यमांना प्राधान्य देत असल्याचं निरीक्षण अनेक तज्ञांनी नोंदवलं.
पारंपारिक डेटिंग ॲप्सवरून जोडीदार शोधणं तरुण पिढीसाठी तणावपूर्ण बनत चाललं असून त्यामुळे जोडीदार शोधण्यासाठी इतर मार्गांचा अवलंब ते करताना दिसत आहेत.
अनोळखी व्यक्तीकडून एका दृष्टिक्षेपात 'राईट स्वाईप' मिळवण्यासाठी स्वतःला सिद्ध करून दाखवण्याची धडपड जेन झी (Gen Z) ला नकोशी झालेली असून त्याऐवजी समान आवड असलेल्या लोकांशी गप्पा मारत प्रेमाची शक्यता आजमावणं अधिक सहज आणि सुकर असल्याचं या तरूण पिढीचं म्हणणं आहे.
एकाच आवडीच्या समान धाग्यावरून गप्पा सुरू करणं आणि त्या फुलवत नेणं हे अधिक नैसर्गिक आणि कमी तणावाचं असल्यामुळे जेन झी पिढीनं स्वाईपच्या कटकटीला रामराम ठोकल्याचं आढळून येतंय.
तिशीतलं इंटरनेट डेटिंग - आयुष्याचा जोडीदार मिळवण्याची संधी
30 वर्षांपूर्वी मॅच.कॉम ही पहिली डेटिंग वेबसाईट इंटरनेटवर सुरू झाली आणि ऑनलाईन डेटिंगचा जन्म झाला. ऑनलाईन डेटिंगच्या उदयानं आपल्या नात्याची परिभाषाच एका अर्थाने बदलली.
मागच्या 30 वर्षात इंटरनेटवरून प्रेम आणि जोडीदार मिळवण्याचा कल वरचेवर चढताच राहिलेला आहे. इतका की आजघडीला 10 टक्के विषमलैंगिक व 24 समलैंगिक लोकांना त्यांचे आयुष्याचे जोडीदार हे या ऑनलाईन डेटिंग ॲप्सवरून मिळालेले आहेत, असं प्यू रिसर्च सेंटरचा एक अहवाल सांगतो.
पण आता तरुण पिढी या डेटिंग ॲप्सला कंटाळली असल्याचं दिसून येत आहे. 2024 च्या नोव्हेंबर महिन्यात प्रकाशित झालेल्या ऑफकॉमच्या अहवालानुसार ब्रिटनमधील आघाडीच्या 10 डेटिंग ॲप्सच्या वापरकर्त्यांची संख्या 16 टक्क्यांनी घटल्याचं आढळून आलं.
या अहवालानुसार टिंडरने आपले 5,94,000, हिंजचे 1,31,000, बम्बलचे 3,68,000 तर ग्राईंडर या डेटिंग ॲपने आपले 1,31,000 यूजर्स मागच्या काही काळात गमावले आहेत.
दुसऱ्या बाजूला ग्राईंडर या ॲपच्या प्रवक्त्यांनी या अहवालाच्या सत्यतेवर प्रश्नचिन्ह उभा करत, ही आकडेवारी खरी नसल्याचं सांगितलं. उलट मागच्या काही काळात आमच्या यूजर्सची संख्या सातत्याने वाढत असल्याचाही दावा केला.
ब्रिटनप्रमाणे अमेरिकेतही हीच परिस्थिती आढळून येते. अमेरिकेतील महाविद्यालयीन तरूण व इतर जेन झी पिढीतील 79 टक्के लोकांनी डेटिंग ॲपचा नियमित वापर करणं आम्ही थांबवलं असल्याची माहिती 2023 साली झालेल्या ऑक्सिओसच्या सर्वेक्षणात दिली.
विशी आणि तिशीतील तरूणांसाठी या डेटिंग ॲप्स मध्ये काही नावीन्य उरलं नसल्यामुळे त्यांना डेटिंग ॲप्सचा कंटाळा आला असल्याचं निरीक्षण ऑफकॉमच्या 2024 च्या ऑनलाईन नेशन रिपोर्टमध्ये नोंदवण्यात आलं.
2024 च्या जानेवारी महिन्यात मॅच ग्रूप आयएनसी उद्योगसमूहाच्या प्रमुखाने सुद्धा आपल्या भागदारांसोबत पार पडलेल्या बैठकीत तरूण पिढी पारंपरिक डेटिंग ॲप्सपेक्षा कमी तणावपूर्ण आणि अधिक नैसर्गिक व सहज भासणाऱ्या इतर पर्यायांना प्राधान्य देत असल्याचं मान्य केलं.
टिंडर आणि हिंज या दोन्ही आघाडीच्या डेटिंग ॲप्सचे मालकीहक्क मॅच ग्रूप आयएनसी उद्योगसमूहाकडे आहेत.
कॅरोलीना बॅन्डीनेली या वारविक विद्यापीठात सहाय्यक प्राध्यापक आहेत. प्रणय आणि प्रेमाची डिजीटल साधनं हाच त्यांच्या अभ्यासाचा विषय असून त्यांनीसुद्धा नव्या पिढीमधील डेटिंग ॲप्सच्या घटत्या लोकप्रियतेवर शिक्कामोर्तब केलं. यामागचं कारण सांगताना त्या म्हणतात की, "एकच आवड असलेली दोन माणसं हा समान धागा पकडून प्रेमात पडणं अथवा नवीन नात्यात येणं ही तशी नवी गोष्ट नाही.
डेटिंग ॲप्सच्या आधी लोक अशीच एकमेकांना भेटत असत. जेन झी नं आता पुन्हा ही पद्धत अवलंबली असून ही प्रेमाची किंवा सामाजिक देवाणघेवाणीची जुनी पद्धत त्यांच्या नवीन परिभाषेत आणली आहे.
समान आवड, छंद अथवा विचारसरणी असलेल्या व्यक्तीसोबत संवाद साधून नातं पुढे नेण्याच्या या जुन्या प्रथेचं पुनरुज्जीवन नवीन पिढी आपल्या पद्धतीनं करताना दिसत आहे."
लंडनमध्ये मार्केटिंग ॲसिस्टंट म्हणून काम करणाऱ्या 26 वर्षीय डेनेट टेसफे यांनीसुद्धा या बदलत्या ट्रेंडला दुजोरा दिला. "तरूण लोक पारंपरिक डेटिंग ॲप्सपासून दूर जात आहेत. इंटरनेटवर विविध खेळ किंवा छंद जोपासणारे समूह बनताना दिसत आहेत.
या समूहाचा भाग असलेले लोक समान आवडीमुळे एकमेकांच्या संपर्कात येतात. तिथून त्यांचा संवाद सुरू होतो. समान आवड असल्याने दोघांचे विचारही बऱ्यापैकी जुळलेले असतात. त्यामुळे तिथून हे नातं फुलायला सुरूवात होते.
खास डेटिंगसाठी नसलेल्या आणि फक्त एका खेळ किंवा छंदासाठी बनलेल्या या ऑनलाईन समुहावरून अनेक जोड्या बनताना दिसत आहेत," अशी माहिती बीबीसीशी बोलताना त्याने दिली.
प्रेम आणि लग्नासंबंधींच्या या बातम्या आणि लेखही वाचा:
- 'लग्न का नाही करत? काही प्रॉब्लेम आहे का?', अशा प्रश्नांचा मनावर काय परिणाम होतो? वाचा
- या भागात घटस्फोट घेण्यासाठी महिलांना द्यावे लागतात पैसे, नेमकी काय आहे ही प्रथा?
- शिक्षणापेक्षा लग्नांवर दुप्पट खर्च! अंबानींपासून-कर्जबाजारी बापापर्यंत, लग्नांवर एवढा खर्च का करतात भारतीय?
- हिंदू लग्न सप्तपदी, कन्यादान, मंगळसूत्र नसेल तर वैध ठरत नाही का? कायदा काय सांगतो?
एका बाजूला डेटिंग ॲप्सच्या यूजर्सची संख्या घटत असताना समान आवडीवरून समूहाचा भाग होणाऱ्या अशा ऑनलाईन माध्यमांची सदस्यसंख्या तितक्याच वेगाने वाढते आहे.
उदाहरणार्थ स्ट्राव्हा हा फिटनेसची आवड असणाऱ्या लोकांसाठी असलेला सामाजिक प्लॅटफॉर्म असून धावणे, सायकल चालवणे, गिर्यारोहण करणे अशा फिटनेस संबंधी गोष्टींची आवड असणारे लोक या ॲपचं सदस्यत्व घेतात.
मागच्या काही दिवसांपासून या ॲपच्या यूजर्सची संख्या अतिशय वेगाने वाढत आहे. आकडेवारीत बोलायचं झाल्यास मागच्या वर्षभरात स्ट्राव्हावरील यूजर्सची संख्या दरमहा 20 टक्क्यांनी वाढत आहे.
स्ट्राव्हाच्या यूजर्सच्या संख्येनं आता तब्बल 13 कोटींचा आकडा पार केला असून ही संख्या अजून वाढतेच आहे. तुमच्या छंद किंवा आवडीनुसार ठराविक सोशल वेबसाईट्सचं प्रस्थ वरचेवर वाढत चाललं आहे.
लेटरबॉक्सड नावाची अशीच एक वेबसाईट आहे जिथे चित्रपट रसिक एकमेकांशी जोडले जातात. आपल्या आवडीच्या चित्रपटांची चर्चा करतात. सारखे चित्रपट आवडणाऱ्या लोकांसोबत जोडले जातात. मागच्या एका वर्षात आमच्या यूजर्सची संख्या तब्बल 50 टक्क्यांनी वाढल्याचं या कंपनीनं बीबीसीला सांगितलं.
छंद माझा वेगळा
इंटरनेटचा उदय होण्यापूर्वी लोक स्पोर्ट्स क्लब, चित्रपट गृह व तत्सम सार्वजनिक ठिकाणीच आवडीच्या गोष्टी करायला गेल्यावर एकमेकांना भेटायचे. तिथेच जोड्या बनत असत. म्हणजेच समान छंद किंवा आवड असणारे समविचारी लोक तो छंद किंवा आवड जोपासणाऱ्या सामाजिक वर्तुळाचा भाग असायचे. त्यानिमित्ताने अनावधाने झालेल्या भेटीतून ओळख, मैत्री व प्रेम फुलत जायचं आणि लोकांना अपघातानेच आपला जोडीदार मिळायचा .
आता जेन झी सुद्धा हाच अनुभव घेत आहे. फरक इतकाच की हे सगळं ते ऑनलाईन करत आहे. समान छंद किंवा आवड असणारे हे तरूण - तरूणी एकमेकांना ऑनलाईन भेटत आहेत.
"एकसमान आवडीवरूनच लोक एकमेकांच्या जवळ येत आहेत. पण याचं माध्यम फक्त डिजीटल झालेलं आहे. अशी समान आवड असणाऱ्या लोकांच्या ऑनलाईन कम्युनिटीजचा उदय झाल्यानं इंटरनेटवरून समविचारी लोकांशी मैत्री व प्रेम केलं जात आहे. त्यामुळे डेटिंग ॲप आणि इतर सोशल ॲप्समध्ये फरक करणं आता कठीण झालं आहे.
आवडता खेळ किंवा छंद जोपासण्यासाठी उघडण्यात आलेल्या या ॲप्सचा वापर लोक डेटिंगसाठी करत आहेत," असं निरीक्षण लीड्स विद्यापीठातील सेंटर फॉर लव्ह, सेक्स ॲन्ड रिलेशनशिप्स (CLSR) विभागाचे सहसंचालक ल्यूक ब्रुनिंग यांनी व्यक्त केलं.
आता लोकांचा हा बदलता कल लक्षात घेता विविध हॉबी ॲप्सनी देखील सोशल मीडियाच्या सोई आपल्या ॲपमधून द्यायला सुरुवात केली आहे.
2023 मध्ये स्ट्राव्हानं आपल्या ॲपमधून मेसेज पाठवण्याची सुविधा सुरू केली. यातून तुम्ही स्ट्राव्हा वापरणाऱ्या दुसऱ्या यूजरला थेट खासगी संदेश पाठवू शकता. स्ट्राव्हा हे खरं तर फिटनेस ॲप आहे. इथे लोक आपण आज कुठला व्यायाम केला, कसा केला याची माहिती टाकत असतात. इंटरनेटवर अशा ऑनलाईन फिटनेस क्लब्सचा मोठ्या प्रमाणात उदय होत असून अशा ॲप्सवरून आता लोक फ्लर्टिंग करत आहेत.
एखाद्याने आपण केलेल्या व्यायाम प्रकाराची अपडेट स्ट्राव्हावर टाकली की त्यावर लाईक करण्यापासून या फ्लर्टिंगची सुरूवात होते. मग फिटनेसची आवड असणारे हे लोक एकमेकांशी बोलू लागतात. तिथून त्यांचं नातं तयार होतं. आमच्या ॲपवरील सरासरी पाच पैकी एका जेन झी यूजरने याच प्लॅटफॉर्मवरुन आपल्या जोडीदाराची भेट घेतली असल्याचं स्ट्राव्हानं सांगितलं.
"अशा ऑनलाईन फिटनेस कम्युनिटीज जोडीदार मिळवण्याचं माध्यम बनत चालल्या आहेत. माझ्या एका मैत्रिणीला याच माध्यमातून तिचा जोडीदार गवसला होता आणि आता ते दोघे सोबत राहत आहेत," अशी माहिती निची हॉजसन यांनी दिली. त्या स्वतः पत्रकार व लेखिका असून डेटिंगच्या इतिहासावर त्यांनी द क्यूरियस हिस्टरी ऑफ डेटिंग हे पुस्तक देखील लिहिलेलं आहे.
लेटरबॉक्स्ड या चित्रपट रसिकांसाठी बनवण्यात आलेल्या ॲपबाबतही हेच घडताना दिसत आहे. जगभरातील चित्रपट रसिकांना आपल्या आवडत्या व नावडत्या चित्रपटांबद्दल बोलण्याची आणि आपल्यासारखीच चित्रपटांची आवड असलेल्या रसिकांशी एकरूप होण्याची संधी हा प्लॅटफॉर्म देऊ करतो.
चॅपेल रोन व चार्ली एक्स सी एक्स या प्रसिद्ध अमेरिकन गायिका देखील लेटरबॉक्स्डच्या यूजर्स आहेत. हे ॲप विशेषतः तरूणांमध्ये लोकप्रिय असून या ॲपचे यूजर्स असलेल्या 5000 लोकांच्या केलेल्या सर्वेक्षणातून त्यातील दोन तृतीयांश यूजर्स हे 34 किंवा त्याहून कमी वयाचे असल्याचं आढळून आलं होतं.
एखादा चित्रपट दोघांच्या आवडीचा आहे आणि त्यावर गप्पा मारायला सुरुवात होऊन नंतर ती दोघं एकमेकांच्या प्रेमात पडल्याच्या अनेक घटना लेटरबॉक्स्डवर घडल्या आहेत. डेव्हिड फिंचर या दिग्दर्शकाचा एरवी फार न चाललेला दुर्लक्षित असा 2020 सालचा मॅंक हा चित्रपट आवडल्या वरून एक तरूण आणि तरूणी लेटरबॉक्स्डवर एकमेकांशी बोलायला लागले आणि आज ते दोघं एकमेकांसोबत आहेत.
"एखाद्याला कोणते चित्रपट आवडतात त्यावरून त्या व्यक्तीचं व्यक्तिमत्व आणि विचार देखील समोर येतात. त्यामुळे लोक एकमेकांच्या जवळ येण्यामागे चित्रपटांचा देखील मोठा वाटा आहे," असं लेटरबॉक्स्डचे सहसंस्थापक मॅथ्यू बुचनेन म्हणतात.
हा बदल कशामुळे झाला?
हा बदल घडण्यामागचं नेमकं कारण काय? डेटिंग ॲप्सपासून लोक दूर का जात आहेत? सुरुवातीला तरी जोडीदार मिळवण्यासाठी डेटिंग ॲप्स जणूकाही वरदान आहेत, असं वाटत होतं. कारण घरात बसल्या बसल्या मोबाईलवर तुमच्यासमोर जोडीदाराचे हजारो पर्याय समोर असायचे. त्यातला हवा तो निवडण्याचं तुम्हाला स्वातंत्र्य होतं.
पण हे पर्याय अथवा निवडीचं स्वातंत्र्य निव्वळ एक भ्रम असल्याचं हळूहळू लोकांच्या लक्षात येऊ लागलं. प्यू रिसर्च सेंटरनं केलेल्या एका सर्वेक्षणातून डेटिंग ॲप्सच्या 46 यूजर्सनी डेटिंग ॲपवरून जोडीदार मिळवण्याचा अनुभव अतिशय कटू आणि निराशादायक असल्याचं सांगितलं.
डेटिंग ॲप्सवरील स्वाईपची सोय देखील डेटिंग ॲप्सच्या घटत्या लोकप्रियतेमागील एक प्रमुख कारण असू शकतं. पहिल्यांदा 2013 साली टिंडरनं हे स्वाईपचं फीचर आणलं होतं. नंतर बहुतांशी डेटिंग ॲप्सनी या फीचरचा वापर सुरू केला.
एका बोटावर फक्त स्वाईप करून जोडीदाराला होकार अथवा नकार देण्याची ही सोय निवडीचं स्वातंत्र्य आहे, असं आधी लोकांना वाटायचं. पण आता याच स्वाईपच्या सोईला लोक वैतागलेले दिसतात.
टिंडरवरील या स्वाईपच्या फीचरचा शोध जोनाथन बडीन यांनी लावला. 1940 दशकात वर्तवणुकीतील बदलांवर आधारित बी एफ स्किनर या मानसशास्त्राज्ञाने प्राण्यांवर केलेल्या प्रयोगातून प्रेरणा घेत आपण स्वाईपचा शोध लावल्याचं जोनाथन सांगतात.
या प्रयोगात स्किनर याने कबुतराकडून आपल्याला हवं ते कृत्य करून घेण्यासाठी त्याला बक्षीस व शिक्षा द्यायला सुरुवात केली. या पद्धतीनं जर व्यवस्थित प्रशिक्षण दिलं तर कबुतर आपल्याला हवं त्या प्रमाणेच वागायला लागेल आणि आपण दुसऱ्याच्या आज्ञेनुसार वागतोय, हे सुद्धा त्याला जाणवणार नाही. आपल्याला मिळत असलेली शिक्षा अथवा बक्षिस हे आपल्याच वागणुकीनुसार आहे, असा त्याचा भ्रम होईल.
कबुतराला पडद्यावरील एक हलत्या चिन्हावर चोच मारायला स्किनरनं प्रवृत्त केलं. बरोबर त्या चिन्हावर कबुतर चोच मारेल तेव्हाच त्याच्या पुढ्यात खायला अन्न पडेल, अशी व्यवस्था केली. मग कबुतर स्किनर यांना हवं तसं वागू लागला. पण आपण चोच मारल्यावरच अन्न येतं. त्याशिवाय नाही. म्हणजेच मी चोच मारल्यानेच अन्न तयार होत असल्याच्या आविर्भावात कबुतर असायचा.
या कबुतराला सूचना देऊन आपल्या मनाप्रमाणे वागायला भाग पाडायचा हा प्रयोग युद्धात शत्रूच्या विमानावर हल्ला करण्यासाठी वापरण्याचा स्किनरचा मानस होता. कारण त्याकाळी शत्रूच्या विमानाचं तंतोतंत स्थान शोधून त्यावर हल्ला करण्याचं रडारचं तंत्रज्ञान अजून विकसित झालेलं नव्हतं.
बी एफ स्किनरनं प्राण्यांवर केलेले हे प्रयोग आजच्या वर्तवणुकीच्या मानसशास्त्राचा (Behavioral Psychology) पाया समजले जातात. या प्रयोगातून प्रेरणा घेत जोनाथन बडीननं स्वाईपचं तंत्रज्ञान विकसित केलं.
दहा वर्षांपूर्वी हे स्वाईपचं तंत्रज्ञान नाविन्यपूर्ण होतं. लोकांमध्ये हे नवं तंत्रज्ञान वापरण्यासाठी प्रचंड उत्साह होता. हाताच्या बोटावर कोणाला होकार अथवा नकार देण्याची सोय लोकांना झाली होती. त्यामुळे सगळे डेटिंग ॲपचा सर्रास उघड वापर करत होते. आता याच स्वाईपमुळे लोक डेटिंग ॲपला रामराम ठोकत आहेत.
विशेषत: तरूण पिढी तर टिंडरकडे ढुंकूनही बघत नाही, अशी परिस्थिती आहे. लेफ्ट किंवा राईट स्वाईप करून जोडीदार मिळवणं किंवा नाकारणं, हे नव्या पिढीला पटणारं नाही. त्यामुळे डेटिंग ॲप्सची लोकप्रियता वरचेवर घटत असल्याचं मत हॉजसन यांनी व्यक्त केलं.
डेटिंग ॲप्सची रचना एखाद्या गेम प्रमाणे करण्यात आलेली आहे. स्वाईप करून जोडीदार शोधणं किंवा प्रेम करणं हे अतिशय सोपं आणि सुकर केलेलं असलं तरी ही मानवी भावना अतिशय गुंतागुंतीची आहे. तिला अनेक पदर आहेत. त्यामुळे थोड्या कालावधीसाठी डेटिंग ॲप वापरताना कोणाला चागलं वाटतही असेल.
पण काही काळानंतर ते निसर, अमानवी आणि कृत्रिम वाटू लागतात. हे सुरुवातीचं काही वर्षांचं नावीन्य संपल्यामुळेच आता लोक हा डेटिंग ॲप्सना कंटाळले आहेत. म्हणूनच त्यांना उतरती कळा लागली आहे.
या बदलामागे कोव्हीड महामारी आणि तेव्हा लागलेल्या टाळेबंदीचाही प्रभाव असू शकतो, असा एक अंदाज मॅंचेस्टर विद्यापीठातील प्राध्यापक ब्रायन हेफी व्यक्त करतात. "टाळेबंदी दरम्यान लोक डेटिंग ॲपचा वापर सोशल मीडियाप्रमाणे करत होते.
टाळेबंदीतील निर्बंधांमुळे प्रत्यक्षात भेट होत नसल्यामुळे लोक डेटिंग ॲपचा वापर वेगवेगळ्या गोष्टींसाठी करत होते.
कोव्हीड ओसरल्यानंतर एका स्वाईपवर व्यक्तीलाचा नाकारण्याची डेटिंग ॲपची नकारात्मक प्रवृत्ती लोकांच्या प्रकर्षाने लक्षात आली. त्यामुळे डेटिंग ॲप्सना नाकारत सकारात्मक आणि सर्वसमावेशक अशा दुसऱ्या पर्यायी माध्यमांकडे लोकांचा ओढा वाढला," असं हेफी सांगतात.
या पार्श्वभूमीवर पारंपरिकरित्या खास डेटिंगसाठी नसलेल्या माध्यमांवरून लोक डेटिंग करायला लागले. व्हिडिओ गेम, चित्रपट, खेळ, व्यायाम अशी ठराविक आवड असणारे लोक स्ट्राव्हा, लेटरबॉक्सड सारख्या माध्यमांना पसंती देऊ लागले.
डेटिंग ॲप्सच्या तुलनेत इथे इतरांशी बोलणं अथवा नातं तयार करणं हे लोकांसाठी अधिक सहज आणि कमी तणावाचं होतं. कारण फक्त एक फोटो अथवा जुजबी माहितीवरून नव्हे तर समान छंद किंवा आवडी वरून सुरू झालेलं संभाषण हे अधिक सकारात्मक आणि नैसर्गिक ठरतं.
इथल्या संवादाला एक खोली आणि ओलावा असतो. शिवाय इथे प्रेम अथवा जोडीदार मिळवण्याची प्रक्रिया पूर्णपणे व्यावसायिक स्वरुपाची नसते. या संवादाचा पाया तुमची समान आवड आणि त्यातून सहज उलगडत जाणाऱ्या गप्पा असल्यामुळे नातंही अगदी नैसर्गिकरीत्या फुलत जातं. म्हणूनच डेटिंग ॲप्स ऐवजी नेटकरी अशा ॲप्सना प्राधान्य देत आहेत.
जोडीदार मिळावा अशी कुठलीच अपेक्षा न ठेवता हा संवाद सुरू होत असल्यानं यूजर्सवर देखील कुठला दबाव नसतो. वोचि आणि पर्पल पिक्सेल हे दोघे वर्ल्ड ऑफ वारक्राफ्टच्या विश्वात एकमेकांना भेटले तेव्हा प्रेमात पडण्याचा त्यांचा कोणताही इरादा नव्हता. ते दोघे फक्त या गेमची आवड असल्याने संपर्कात आले. सोबत गेम खेळताना आपोआप एकमेकांचा सहवास आणि विचार पटल्यामुळे प्रेमात पडले व अनावधानानेच एकमेकांचे खऱ्या आयुष्यातील जोडीदार बनले.
सुरुवातीला या गेममध्ये तर ते एकमेकांच्या विरोधी संघात होते. तिथून या गेममधील पात्रांचा संवाद सुरू झाला. गेम खेळतानाच दिवसभर त्यांच्या गप्पा व्हायच्या. "त्यातून एकमेकांचा स्वभाव व खेळण्याची शैली पटल्यानं मी माझा संघ (ज्याला वर्ल्ड ऑफ वॉरक्राफ्टच्या संज्ञेत गिल्ड असं म्हणतात) सोडून वोचिच्या संघात आले," असं पर्पल पिक्सेल सांगते.
व्हर्च्युअल गेममधील ओळख आणि स्नेह इतका वाढला की तीन वर्षांनी वोचिनं आपली नोकरी सोडत पिक्सेलसोबत राहण्यासाठी ब्रिटनमध्ये स्थलांतर केलं.
हॉजसन सांगतात की, "डेटिंग ॲप्सवर बऱ्याचदा लोकांना आलेले अनुभव अतिशय कटू असतात. कारण तिथे एका स्वाईपवर अगदी एक झलक बघून नकारही मिळतो. मात्र ही दुसरी ऑनलाईन माध्यमं अगदी उलट आहेत. इथे लोकांचा एकमेकांप्रती व्यवहार अतिशय प्रेमळ आणि आपुलकीचा असतो. कारण समान आवड किंवा छंदावरून इथलं संभाषण आकाराला येतं."
डेटिंग ॲप्सनी त्यांच्या या मूलभूत रचनेत बदल केला नाही आणि लोकांच्या गरजेनुसार सोई सुविधा दिल्या नाहीत तर त्यांची लोकप्रियता आणि वापर आणखी कमी कमी होत जात ते नामशेष देखील होऊ शकतील, अशा इशारासुद्धा हॉजसन यांनी दिला.
नवीन प्रकारच्या डेटिंग ॲप्सचा उदय
या वाढत्या नाराजी नंतरही डेटिंग ॲप्स मात्र अजूनही हार मानायला तयार नाहीत. लोकप्रियता कमी होत असली तरी डेटिंग ॲप्स वापरणाऱ्या लोकांची संख्या अजूनही लक्षणीय म्हणावी इतकी आहे.
हिंज या डेटिंग ॲपच्या प्रवक्त्यांनी केलेल्या दाव्यानुसार हिंजवरून आजही दर दोन सेकंदाला जगात एक जोडी भेटायची योजना आखते. टिंडरवरून तर दर तीन सेकंदाला एक नवीन नात्याची सुरुवात होते. विशेष म्हणजे टिंडरचे 60 टक्के यूजर्स हे 18 - 30 या वयोगटातील आहेत.
लोक समान आवड अथवा छंदावरून संवाद सुरू करणाऱ्या नवीन माध्यमांना पसंती देत असल्याचं लक्षात आल्यानंतर या डेटिंग ॲप्सनीसुद्धा फिटनेस, व्हिगनिझम, कुत्रे पाळणे आणि सौंदर्य जपणे अशा आवडींवरून संवाद सुरू करण्याची सोय आपल्या वापरकर्त्यांना उपलब्ध करून दिली आहे.
याशिवाय एकमेकांशी संवाद साधण्याच्या नवनव्या पद्धतीचा अवलंब या डेटिंग ॲपवरून केला जात आहे. त्यादृष्टीने नवनवे फीचर्स आणले जात आहे. ब्रीझ हे डेटिंग ॲप दोघांनी भेटायची वेळ आणि ठिकाण ठरवून प्रत्यक्षात एकदा भेटल्याशिवाय एकमेकांना वैयक्तिक संदेश पाठवण्याची परवानगी देत नाही.
जिगसॉ डेटिंग ॲपवर ठराविक प्रमाणात संवाद साधत गेल्यानंतरच समोरच्या व्यक्तीचा चेहरा हळूहळू दिसू लागतो. म्हणजेच चेहरा पाहून किंवा एक नजर टाकून लगेच होकार अथवा नकार देण्याच्या पूर्वग्रहदूषित वृत्तीवर रोख लावण्याचा प्रयत्न हे डेटिंग ॲप करत आहेत. जेणेकरून मानवी पातळीवर खोलात जाऊन एकमेकांशी लोकांना जोडता येऊ शकेल.
"डेटिंग ॲप्स स्वतःमध्ये करत असलेले हे बदल स्वागतार्ह आहेत. काही प्रमुख मोठ्या डेटिंग ॲप्सच्या यूजर्सची संख्या कमी झालेली असली तरी मागच्या काही काळात नवनव्या डेटिंग ॲप्सचा उदय झालेला आहे. हे नवे डेटिंग ॲप्स लोकांच्या गरजा लक्षात घेऊन नवनवे फीचर्स यूजर्ससाठी उपलब्ध करून देत आहेत.
त्यामुळे तीन - चार प्रमुख मोठ्या डेटिंग ॲप्सची सदस्यता घटलेली असली तरी या नवीन बाकीच्या डेटिंग ॲप्सचा उदय लक्षात घेता डेटिंग ॲपचा वापर करणाऱ्या एकूण लोकांची संख्या जवळपास तेवढीच आहे.
त्यामुळे डेटिंग ॲप्सची संकल्पना आता कालबाह्य होत चालली आहे, असा दावा करणं घाईचं ठरेल. डेटिंग ॲप्स हे अजूनही मोठ्या प्रमाणात चलनात आहेत," असं प्राध्यापक हेफी यांनी सांगितलं.
भविष्यातील ऑनलाईन डेटिंग कसं असेल?
सगळं जगच आता वरचेवर ऑनलाईन होत जात असल्यामुळे नात्यांमध्ये सुधारणा आणायची असेल तर ऑफलाईन व्हा आणि पूर्वीसारखं प्रत्यक्षात माणसांना भेटून संवाद साधा, असा सल्ला दिला जातो. पण या आजच्या ऑनलाईन जगात ऑफलाईन होण्याचा हा सल्ला कितपत व्यवहार्य आहे, हा प्रश्नच आहे.
यावर तोडगा म्हणून हे वेगवेगळे ॲप ऑनलाईन संवाद हा खऱ्या आयुष्यातील ऑफलाईन संवादासारखा कसा होईल, या दृष्टीने सुधारणा आणत आहेत. जेणेकरून घरबसल्या लांबून कोणाशी बोलता तर येईलच पण ऑनलाईन संवादात जाणवणारा कोरडेपणा अथवा अंतरही त्यात जाणवणार नाही.
आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या आगमनानं डेटिंग ॲप्समध्येही क्रांती घडू शकते, असा अंदाज ब्रुनिंग व्यक्त करतात. आधी फक्त जोडीदार शोधण्यासाठी डेटिंग ॲप्स वापरले जायचे. पण आता लोकांकडून आपल्या आवडी निवडी आणि कामासंदर्भात बोलण्यासाठी देखील या ॲपचा वापर केला जातो.
या इतर गोष्टी बोलताना जर नैसर्गिकरित्या एकमेकांची आवड - निवड आणि स्वभाव पटून जवळीक निर्माण झालीच तर अशा पद्धतीनं तयार झालेलं नातं अधिक सहज आणि कमी तणावाचं असेल. म्हणूनच चीनसह इतर अनेक देशांमध्ये अशा सगळ्याच प्रकारच्या संभाषणांना उद्युक्त करणाऱ्या नव्या डेटिंग ॲप्सचा उदय होताना दिसतो आहे.
थेट ठरवून डेटिंग करण्यापेक्षा डेटिंगचा कुठलाही उद्देश न ठेवता वर्ल्ड ऑफ वारक्राफ्टसारखा गेम खेळताना जर दोघांना एकमेकांचा लळा लागत असेल आणि तिथून नातं तयार होत असेल तर ते स्वाईपच्या कृत्रिमतेपेक्षा कधीही चांगलंच आहे.
जेन आणि नेट यांनी गेम खेळताना साधलेला संवाद भलेही ऑनलाईन असेल पण यातून त्यांनी साधलेली जवळीकता आणि निर्माण झालेले नातं तितकंच खरं होतं. हे ऑनलाईन नातं आता लवकरच ऑफलाईन जात अधिकृत होणार आहे.
"काही सोपस्कार पार पाडायचे आणखी बाकी राहीले आहेत. ते पार पाडले की आम्ही लवकरच लग्न करणार आहोत," अशी खूशखबर नेटने जाता जाता आम्हाला दिली. अर्थात लग्नानंतरही ऑनलाईन गेम्स हा या दोघांच्या आयुष्याचा तितकाच महत्त्वाचा भाग राहणार आहे, हे सांगायला तो विसरला नाही.
"आमचं लग्न कसं असेल याच्या बऱ्याच कल्पना आम्ही रंगवल्या आहेत. प्रत्यक्षात तर आम्ही लग्न करणारच आहोत. पण अजून एक लग्न आम्ही वर्ल्ड ऑफ वॉरक्राफ्टच्या जगात शिरून देखील करणार आहोत. गेम मधील आमची पात्रं तिथल्याच चर्चमध्ये लग्नबंधनात अडकतील.
गेममधलेच आमचे इतर मित्र गेममधील आपआपल्या पात्रांचं रुप धारण करून या ऑनलाईन सोहळ्याला हजेरी लावतील. खऱ्या ऑफलाईन लग्नसोहळ्याबरोबरच वर्ल्ड ऑफ वारक्राफ्टमधील हा व्हर्च्युअल लग्नसोहळादेखील रोल प्लेयिंग करत तितक्याच वाजत गाजत साजरा करण्याचा आमचा इरादा आहे," लग्नाची आपण केलेली सगळी तयारी सांगताना जेसला आपल्या चेहऱ्यावरील आनंद लपवता आला नाही.
अधिकचं वृत्तांकन : फ्लोरेन्स फ्रीमन
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)