एकट्या भाजीवाल्याचे 13 कोटी अडकले, मुंबईतल्या 'टोरेस'नं गुंतवणूकदारांना 200 कोटींना फसवल्याचा आरोप

फोटो स्रोत, Getty Images
- Author, अल्पेश करकरे
- Role, बीबीसी मराठीसाठी
काहीच दिवसांत आकर्षक परतावा मिळवून देण्याचे आमिष दाखवून शेकडो लोकांची फसवणूक झाल्याचा आरोप आहे. लोकांनी आयुष्यभर पै-पै जोडून जमा केलेले पैसे काही क्षणांतच उडून गेल्यामुळे गुंतवणूकदारांवर मनस्तापाची वेळ आली आहे, गुंतणवूकदारांनी केलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी संबंधित कंपनीवर गुन्हा नोंदवला आहे.
गुंतवणूकादारांना भरघोस परतावा देण्याचं आमिष देऊन शेकडो लोकांची कोट्यवधी रुपयांची लूट करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार मुंबईत उघडकीस आला आहे. या प्रकरणी दादर शिवाजी पार्क पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झाला आहे.
सोमवारी मुंबई, नवी मुंबई आणि भाईंदरमधील 'टोरेस कंपनी'बाहेर अनेक सर्वसामान्य लोकांची गर्दी पाहायला मिळाली. हे सर्व लोक या कंपनीचे गुंतवणूकदार होते आणि आपली फसवणूक झाली असल्याचं त्यांचं म्हणणं आहे.
अधिक परतावा मिळेल, या आशेने कुणी हजारो, कुणी लाखो तर कुणी कोट्यवधी रुपये गुंतवले आहेत. काहींनी फक्त स्वत:चीच नाही तर मित्रमंडळींची आणि नातेवाईकांनी केलेली बचत देखील या कंपनीत गुंतवली आहे.
कंपनीची वेबसाइट डाऊन असल्यामुळे तसेच गुंतवलेल्या पैशांचा परतावा या महिन्यात का आला नाही, अशी विचारणा करण्यासाठी तसेच बरेचसे गुंतवणूकदार कंपनीच्या ऑफिसमध्ये पोहोचले होते.
मात्र, त्यांना कंपनीचे अनेक ऑफिसेस बंद असल्याचं दिसून आलं. याउलट, काही ऑफिसमध्ये उपस्थित असलेल्या कर्मचाऱ्यांनी कंपनीचे सर्व प्रमुखच संपर्कात नसल्याचं गुंतवणूकदारांना सांगितलं. त्यामुळे उपस्थित सर्व गुंतवणूकदारांमध्ये प्रचंड खळबळ उडाली.
थोडक्यात, या सर्व गुंतवणुकीच्या व्यवहारांनी आपली फसवणूक झाली असल्याचं त्यांच्या लक्षात आलं. त्यानंतर या कंपनीच्या ऑफिसबाहेर गोळा झालेले बरेचसे गुंतवणूकदार आक्रमक झाले.
सानपाडामधील ऑफिसवर तर अज्ञातांनी दगडफेकदेखील केली; तर दादरमधील कार्यालयाबाहेर गुंतवणूकदारांनी गोंधळ घालायला सुरुवात केली होती.
पोलिसांनी सर्वच ऑफिसबाहेर सुरक्षेच्या कारणास्तव पोलीस बंदोबस्त वाढवून परिस्थिती नियंत्रणात आणली आहे.

फोटो स्रोत, Getty Images
सध्या पोलीस गुंतवणूकदारांची अधिक चौकशी करत असून त्यांनी गुंतवणूकदारांच्या तक्रारीवरून गुन्हा नोंदवून घेतला आहे.
दादरमधील ऑफिसमध्ये 'टोरेस ब्रँड' चालवणाऱ्या 'प्लॅटिनम हर्न कंपनी'सह त्यांचे संचालक सर्वेश अशोक सुर्वे यांच्यासह पाच जणांविरुद्ध 13 कोटी रुपयांच्या अपहाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
भाजी विक्रेते प्रदीपकुमार मामराज वैश्य (31) यांच्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला. तो आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात येणार असल्याचं सध्या समजतंय. तर अनेक गुंतवणूकदारांच्या तक्रारी घेऊन पोलीस पुढील तपास करत असल्याचं देखील पोलिसांनी सांगितलं आहे.


टोरेस कंपनी काय आहे? त्यांची इन्व्हेस्टमेंट पॉलिसी काय होती?
'प्लॅटिनम हर्न प्रायव्हेट लिमिटेड' नामक कंपनी एप्रिल 2024 रोजी स्थापन झालेली आहे. सर्वेश अशोक सुर्वे आणि व्हिक्टोरिया कोवलेंको या दोन व्यक्तींची नावे आणि माहिती कंपनीच्या वेबसाइटवर पाहायला मिळतात.
सहकारी तोफिक रियाज कार्टर, तानिया कसतोवा आणि व्हॅलेंटीना कुमार यांच्या सहकार्याने या कंपनीत एक वर्ष नऊ महिन्यांमध्ये अनेक उपक्रम राबवत कंपनीच्या फायद्यासाठी कंपनी पॉलिसीत बदल करण्यात आले.
त्यातच प्लॅटिनम हर्न प्रायव्हेट लिमिटेड कंपनीने सोने, चांदी, हिरे यांचे व्यवहार आणि गुंतवणुकीच्या दृष्टीने 3 फेब्रुवारी 2024 रोजी टोरेस नावाच्या कंपनीची मुंबईत स्थापना केली. दादरमध्ये कंपनीचं पहिलं ऑफिस सुरू केलं. यानंतर ग्रँट रोड, मिरा रोड, सानपाडा आणि कल्याण येथे त्यांच्या शाखा सुरू करण्यात आल्या.

फोटो स्रोत, Instagram/torres.officiial
सहा टक्क्यावरून अकरा टक्क्यापर्यंत परताव्याचं प्रलोभन
या टोरेस कंपनीने सुरुवातीपासून गुंतवणूकदारांना भरघोस परताव्याच्या वेगवेगळ्या ऑफर्स द्यायला सुरूवात केली होती. एक लाख रुपये गुंतवणूक केली तर मोईसॅनाईट स्टोनच्या पेंडटवर 10 हजार रुपयांची सूट दिली जायची.
तसेच ज्वेलरीच्या गुंतवणुकीवर देखील 6 टक्क्यांचा परतावा देऊ, असं आश्वासनही या कंपनीकडून दिलं जायचं. त्यानुसार, गेले दहा महिने काही गुंतवणूकदारांना परतावा देखील देण्यात आला. पुढे हा परतावा सहा टक्क्यावरून अकरा टक्क्यावर देखील पोहोचला.
त्यामुळे अधिक पैशांच्या लोभाने अनेक गुंतवणूकदारांनी आपली मित्रमंडळी तसेच नातेवाईकांना देखील या कंपनीत गुंतवणुकीसाठी आवाहन केलं. यानंतर मुंबईत टोरेस कंपनीच्या ऑफिसेसची चेन तयार झाली होती.
थोडक्यात, कंपनी गुंतवणूकदारांना त्यांच्याकडे असलेले खडे, ज्वेलरी डिस्काउंटमध्ये द्यायची. गुंतवणूक केलेल्या या ज्वेलरीच्या रकमेवर आठवड्याला परतावा मिळायचा. ही ज्वेलरी, खडे परदेशी आहेत, असं कंपनी सांगायची. मात्र, प्रत्यक्षात ते खोटे होते, असं निष्पन्न झालं आहे.

फोटो स्रोत, Getty Images
1 लाख 25 हजारपेक्षा अधिक गुंतवणूकदारांनी केली गुंतवणूक
या कंपनीत गुंतवलेल्या रकमेवर आठवड्याभरातच 6 टक्क्यांपासून 11 टक्क्यांपर्यंत व्याज दर दिला जात होता. फक्त सहा ते सात दिवसांमध्ये गुंतवणुकीवर झटपट परतावा मिळेल, म्हणून आतापर्यंत सव्वा लाखापेक्षा अधिक गुंतवणूकदारांनी या कंपनीत गुंतवणूक केली आहे, असं पोलीस तपासात आणि तक्रारीत समोर आलं आहे.
टोरेस कंपनीत गुंतवणूक करणाऱ्यांना अवघ्या 4000 रुपयांपासून गुंतवणूक करता येत होती. ही कंपनी रविवारी पैसे गुंतवल्यास सोमवार ते शुक्रवारदरम्यान त्याचा परतावा देत असे. सहा दिवसांसाठी सहा लाखांपर्यंतच्या गुंतवणुकीवर ही कंपनी 6 टक्के व्याज देत होती.
तर सहा लाखांपेक्षा जास्त गुंतवणूक केल्यास गुंतवणूकदारांना 11 टक्के व्याज मिळत होते. सुरुवातीच्या काळात टोरेस कंपनीने उच्चभ्रू इमारतीत घरे, गाड्या आणि दागिने असा आकर्षक परतावा दिला होता. त्यामुळे गुंतवणुकदारांचा विश्वास बसला. यानंतर अनेकांनी डोळे झाकून लाखो रुपये टोरेस कंपनीत गुंतवले.
गुंतवणूकदार चिंतेत, 200 कोटींपेक्षा अधिक गुंतवणूक
याच कंपनीच्या अशा आकर्षक परताव्याला भुलून खार पश्चिम येथे राहणाऱ्या प्रदीपकुमार मामराज वैश्य या 31 वर्षीय भाजीविक्रेत्याने तब्बल 13 कोटी 48 लाख 15,092 रुपये या कंपनीत गुंतवले आहेत.
वैश्य यांनी सुरुवातीला स्वतःचे काही पैसे नंतर मित्रमंडळी आणि नातेवाईक अशा एकूण 38 लोकांचे पैसे या कंपनीमध्ये गुंतवले आहेत. 21 जून 2024 पासून वैश्य यांनी या कंपनीत पैसे गुंतवत काही परतावादेखील मिळवला आहे.
मात्र, डिसेंबर 2024 महिन्याचा परतावा न मिळाल्याने त्यांनी कंपनीशी संपर्क केला. तेव्हा कंपनीतील कर्मचाऱ्यांनी त्यांना कार्यालयात येण्यास सांगितलं. कार्यालयात आल्यावर कंपनीचं वास्तव पाहताच आपली फसवणूक झाली असल्याचं त्यांच्या निदर्शनास आलं. यानंतर त्यांनी दादर शिवाजी पार्क पोलीस ठाण्यामध्ये या संदर्भात गुन्हा नोंदवला आहे.
या गुंतवणुकीसंदर्भात बीबीसी मराठीशी बोलताना प्रदीप कुमार वैश्य म्हणाले की, "मला आकर्षक परतावा मिळत होता. त्यामुळे, मी माझी आयुष्याची जमापुंजी तसेच नातेवाईक आणि मित्रमंडळींची जमापुंजी अशा एकूण 37 लोकांचे पैसे या कंपनीत गुंतवले आहेत. जून महिन्यापासून काही परतावा मिळाला तोदेखील मी परत गुंतवला आहे. मात्र, कंपनीकडून मिळालेली ज्वेलरी खोटी असून ती माझ्या गुंतवलेल्या पैशांपेक्षाही कमी किमतीची आहे, असं मला समजतंय.
"अधिक पैसे मिळतात या प्रलोभनामुळे मी माझ्या परिचयातल्या एका व्यक्तीच्या सांगण्यावरुन यामध्ये पैसे गुंतवले होते. मागच्या महिन्यात परतावा मिळाला नाही म्हणून मी चौकशी केली तर उडवा-उडवीची उत्तरं मला मिळाली. काल पाहिलं तर माझ्यासारख्याच अनेकांची फसवणूक झाल्याचं मला कळलं. त्यामुळे, मी लगेचच पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार दिलेली आहे. आमचे पैसे आम्हाला परत मिळायला हवेत," वैश्य सांगतात.

फोटो स्रोत, Getty Images
या टोरेस कंपनीमध्ये एक लाख 25 हजार पेक्षा अधिक गुंतवणूकदारांनी आपले लाखो-कोटी रुपये गुंतवलेले आहेत. साधारण 200 कोटींपेक्षा अधिक रुपयांचा हा व्यवहार झाल्याचं आतापर्यंत गुंतवणूकदारांच्या माहितीतून समोर आलं आहे. गुंतवणुकीचा हा आकडा यापेक्षा अधिक असू शकतो, असं गुंतवणूकदार सांगतात.
मुंबईत मशीद बंदर परिसरात राहणारे मुर्तुजा जवरा यांनी या कंपनीत एक लाख रुपये गुंतवणूक केली होती. मुर्तुजा यांनी कुणाकडून तरी उसणे पैसे घेऊन ऑगस्ट महिन्यात ही गुंतवणूक केली होती.
"मागील महिन्याचा परतावा न मिळाल्याने काल कंपनीत आलो तर माझ्यासारखे अनेक लोक कंपनीत आल्याचं कळलं आणि आपली फसवणूक झाल्याचं समजलं. कंपनीतील कर्मचारी संचालक पदावरील लोक संपर्कात नसल्याचं सांगत आहेत. त्यामुळे, मी देखील पोलिसात तक्रार देत आहे," असं बीबीसी मराठीशी बोलताना सांगितलं.
तर मुंबईत राहणारे प्रदीप देवलिया यांनी साडेआठ लाख रुपयांची गुंतवणूक या कंपनीत केली होती. गुंतवणूक करून त्यांना दोन महिने झाले होते. त्यांना एका महिन्याचा परतावा मिळाला; तर दुसरा महिन्याचा परतावा येण्यापूर्वीच हा प्रकार घडल्याचं ते सांगतात.
या प्रकारामुळे आमच्यावर मोठं संकट ओढवलं असल्याचं ते सांगतात. पोलिसांनी कृपया या प्रकरणाची चौकशी करून आम्हाला आमचे पैसे मिळवून द्यावे, अशी विनंतीही ते करत आहेत.
पोलिसांनी घेतली गंभीर दखल
टोरेस या कंपनीवर असलेल्या फसवणुकीच्या आरोपाची गंभीर दखल मुंबई पोलिसांनी घेतलेली आहे. आतापर्यंत या कंपनीतील गुंतवणूकदार देत असलेल्या तक्रारीनुसार पोलिसांनी गुन्हे नोंदवायला सुरुवात केली आहे. दादरमध्ये या संदर्भात पहिला गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या कंपनीशी संबंधित अधिकाऱ्यांचा आणि कर्मचाऱ्यांचा तपास सध्या पोलीस करत आहेत.
दादर येथील गुंतवणूकदाराच्या तक्रारीनुसार आरोपींची नावे पुढीलप्रमाणे आहेत.
1) सर्वेश अशोक सुर्वे, 2) व्हिक्टोरिया कोवलेंको 3) तोफिक रियाज कार्टर, 4) तानिया कसतोवा, 5) व्हॅलेंटीना कुमार यांच्यावर कलम 318(4), 316 (5), 61, बी.एन.एस सह एम.पी.आय.डी.ॲक्ट कलम 3, 4 अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. याप्रकरणी अधिक तपास पोलीस करत असल्याचं दादर शिवाजी पार्क पोलिसांनी सांगितलं आहे.
हे प्रकरण मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखाकडे वर्ग करण्यात आले आहे. पोलिसांची विविध पथकं या प्रकरणाची चौकशी करणार आहेत.
कंपनीने सीईओला धरलं जबाबदार
टोरेस ज्वेलरीच्या मुंबईत अनेक ठिकाणी शाखा होत्या. ग्रँट रोड, नवी मुंबई, कल्याण, मीरा रोड अशा मोक्याच्या ठिकाणी या कंपनीने आपल्या शाखा उघडल्या होत्या.
मात्र, हा घोटाळा समोर आल्यानंतर पोलिसांनी कंपनीतील उच्चपदस्थ अधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
तर दुसरीकडे या कंपनीने सोशल मीडियाच्या माध्यमातून या कथित घोटाळ्याला कंपनीचे सीईओ तौसीफ रेयाज यांना जबाबदार धरलं आहे. 'तौसीफ रेयाज तसेच त्यांच्या सहकाऱ्यांनी मिळून अनेक फसव्या योजना राबल्याचे आमच्या याआधीही निदर्शनास आलं होतं. यासह गेल्या अनेक महिन्यांपासून ते कंपनीचे पैसे लुबाडत असल्याचेही आम्हाला समजलं आहे,' असे या कंपनीने सोशल मीडियाच्या माध्यमातून म्हटलं आहे.
मात्र, गुंतवणूकदारांच्या असलेल्या आरोपांबाबत अद्याप कंपनीने कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. तसेच या कंपनीशी बीबीसी मराठीने संपर्क साधला असता काहीही संपर्क झालेला नाही.
फसव्या योजना ओळखाव्या कशा?
यापूर्वीही अशा योजना येऊ गेलेल्या आहेत. अशा योजनांपासून कसे सुरक्षित राहावे यावर बीबीसी मराठीने याआधी एक सविस्तर लेख लिहिला होता. त्याचा संदर्भ या ठिकाणी देत आहोत.
या सगळ्यांची मोडस ऑपरेंडी म्हणजे काम करायची पद्धत साधारण सारखीच असते. मग अशा बोगस योजनांना किंवा कंपन्यांना बळी पडू नये, म्हणून काय करायला हवं?
अतिशय जास्त दराने परतावा देण्याचं आमिष दाखवणाऱ्या अशा योजनांना म्हटलं जातं पाँझी स्किम्स.
1920 च्या दशकात अमेरिकेत चार्ल्स पाँझी नावाच्या एका माणसाने अतिशय चढ्या दराने गुंतवणूक परतावा देणारी योजना आणली आणि लोक यात फसत गेले. त्यावरून अशा प्रकारच्या सगळ्या योजनांना पाँझी स्किम्स म्हटलं जाऊ लागलं.
अशा प्रकारच्या सगळ्या गुंतवणूक योजनांमध्ये आजवर आढळलेली समान गोष्ट म्हणजे - कमी काळात प्रचंड मोठ्या दराने परतावा.
कमी काळात जास्त पैसे कमावायच्या लालसेने गुंतवणूकदार या योजनांकडे आकर्षित होतात आणि तिथेच गणित फसतं.
1. जास्त दराने पराताव्याचे आमिष दाखवले जाते
2. इतरांना सहभागी करण्याचा आग्रह केला जातो.
3. गुंतवणूक परताव्याची अवाजवी हमी दिली जाते.
4. योजना वा व्यक्तीची विश्वासार्हता खूप असल्याचे वारंवार ठसवण्याचा प्रयत्न केला जातो.
5. फसवणूक झाल्यानंतर अपमानामुळे लोक तक्रार करणार नाहीत हे गृहीतक या मागे असतं.
या सर्व गोष्टींची खबरदारी घेऊन तुम्ही स्वतःला सुरक्षित ठेवू शकता.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)











