मराठवाड्यात रडार असतं, तर हवामानाचा आणखी अचूक अंदाज लावता आला असता का?

महाराष्ट्रातील पुरस्थिती

फोटो स्रोत, ANI

    • Author, जान्हवी मुळे
    • Role, बीबीसी प्रतिनिधी

मान्सूनच्या परतीच्या प्रवासाला सुरुवात झाल्यावर महाराष्ट्रातल्या मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये मोठा पूर आला आहे. त्यानंतर इथल्या जिल्ह्यांसाठीचा हवामानाचा अंदाज आणि डॉपलर रडारचा मुद्दा पुन्हा समोर आला आहे.

एरवी कमी पाऊस आणि दुष्काळासाठी ओळखल्या जाणाऱ्या या विभागात यंदा एकूण सरासरीपेक्षा 129 टक्क्यांहून जास्त पाऊस झाला आहे. यातला बहुतांश पाऊस सप्टेंबरच्या काही दिवसांतच पडला आहे.

त्यात धरणांतून सोडलेल्या पाण्याची भर पडली. त्यामुळे धाराशीव, लातूर, बीड, नांदेड इथे मोठा फटका बसला आहे. विशेषतः शेती, पशुधन यांचं सर्वाधिक नुकसान झालं आहे.

खरंतर हवामान विभागानं मराठवाड्यात सप्टेंबरमध्ये सरासरीपेक्षा जास्त पावसाचा अंदाज वर्तवला होता. नेमका कुठे आणि किती जास्त पाऊस होईल, कुठल्या तालुक्यांना फटका बसेल, तसंच तीव्र पाऊस; (कमी वेळात जास्त पाऊस) याचं अचूक भाकीत अनेक दिवस आधी करता येणं कठीण असल्याचं तज्ज्ञ सांगतात.

पण काही तास आधी हे भाकित करता येणं शक्य आहे. असा अंदाज लावण्यासाठी डॉपलर रडारची मदत होते. सध्या फक्त मराठवाड्यासाठी काम करणारं एकही डॉपलर रडार उपलब्ध नाही तर सोलापूरच्या रडारकडून माहिती मिळत नसल्याचं समोर आलं आहे.

मुंबईजवळ ढगांची दाटी दाखवणारं रडार

फोटो स्रोत, RMC Mumbai/ANI

फोटो कॅप्शन, मुंबईजवळ ढगांची दाटी दाखवणारं रडार, संग्रहित फोटो

मराठवाड्यात वेदर रडार कार्यरत असतं आणि मराठवाड्यासाठी हवामानाचा अंदाज देणारी यंत्रणा मजबूत केली असती, तर काही प्रमाणात नुकसान टाळता आलं असतं, असं अभ्यासकांना वाटतं.

डॉपलर रडार काय असतं?

आकाशात एखादी फिरती वस्तू कुठे आहे, कुठल्या दिशेनं प्रवास करतेय, ती किती मोठी आहे हे रडारवर पाहता येतं.

रडार म्हणजे Radio Detection And Ranging. अर्थात रेडियो लहरींच्या मदतीनं एखाद्या वस्तूचा मागोवा घेणं. रडारची अँटेना रेडियो लहरी प्रसारीत करते.

त्या लहरी वातावरणात पसरतात आणि एखाद्या वस्तूवर आदळल्या तर परत रडारकडे परावर्तीत होतात. त्यातून त्या वस्तूच्या स्थितीची माहिती मिळते.

डॉपलर वेदर रडार हे ढगांचा मागोवा घेतं आणि म्हणूनच एखाद्या ठिकाणी नजीकच्या काळातला हवामानाचा अंदाज बांधण्यासाठी महत्त्वाचं मानलं जातं.

मुंबईत जोगेश्वरी इथलं रडार

फोटो स्रोत, RMC Mumbai

फोटो कॅप्शन, मुंबईत जोगेश्वरी इथलं रडार

"एखादा ढग किती उंचीचा आहे, त्या ढगामध्ये किती पाणी आहे तो ढग कोणत्या दिशेनं कोणत्या दिशेकडे चालला आहे याची माहिती मिळते, त्यातून किती पाऊस पडू शकतो, ही माहिती रडारकडून मिळते. त्यातून काही तास आधी एखाद्या वादळाचा अंदाज लावता येतो," अशी माहिती पुण्यातले हवामान विभागाचे शास्त्रज्ञ सखा सानप देतात.

"रडारमुळे आपल्याला नाऊकास्ट म्हणजे पुढच्या दोन तीन तासांतील पावसाचा अचूक अंदाज सांगता येतो. तसंच रडारनं वर्षानुवर्ष गोळा केलेली माहिती हवामानाचा अंदाज वर्तवणारी मॉडेल्स तयार करण्यासाठी आणि संशोधनासाठीही महत्त्वाची ठरते."

पाऊस

रडारच्या तुम्ही जितके जवळ असाल तितका अचूक अंदाज लावता येतो. प्रत्येक रडारची रेंज वेगळी असते म्हणजे पल्ला किंवा रडारवर दिसू शकणारा प्रदेश, वेगवेगळा असतो.

त्यानुसार एस-बँड (थोडा लांबचा पल्ला), सी-बँड (मध्यम पल्ला), एक्स-बँड (नजीकचा पल्ला) असे रडारचे वेगवेगळे प्रकार असतात. काही रडार तीनशे किलोमीटरपर्यंतचे ढग पाहू शकतात तर काही जवळच्या अंतरावरचे पण अधिक स्पष्ट फोटो काढू शकतात.

रडार पुढच्या काही तासांतल्या पावसाचं भाकीत करू शकत असल्यानं वादळ आणि कमी काळात अतीवृष्टीच्या घटनांचा अचूक अंदाज लावण्यासाठी ती मदतीची ठरतात.

जिथे रडार नाहीत, तिथे सॅटेलाईट डेटाच्या मदतीनं हा अंदाज लावला जातो.

महाराष्ट्रात किती रडार आहेत?

"हवामानाचा अंदाज वर्तवण्याच्या आपल्या पद्धतींमध्ये अलीकडच्या काळात नक्कीच सुधारणा झाली आहे. पण हा अंदाज आणखी सुधारायचा असेल तर रडारची संख्या वाढवणं नक्कीच गरजेचं आहे," असं सखा सानप यांनी नमूद केलं आहे.

अलीकडच्या काळात भारतात डॉपलर वेदर रडारच्या संख्येत वाढ झाली आहे. 2019 मध्ये देशभरात जवळपास 27 वेदर रडार होती. ती संख्या वाढून आता 39 झाली आहे.

भारतात कुठे कुठे डॉपलर वेदर रडार आहेत

फोटो स्रोत, IMD

फोटो कॅप्शन, भारतात कुठे कुठे डॉपलर वेदर रडार आहेत, हे दर्शवणारा हवामान विभागाचा नकाशा

केंद्र सरकारच्या 'मिशन मौसम' अंतर्गत अजून तीस रडार्स प्रस्तावित आहेत.

सध्या भारताच्या पूर्व किनाऱ्यावर तुलनेनं जास्त रडार आहेत, कारण तिथे चक्रीवादळांचा धोका मोठा आहे.

महाराष्ट्रात सध्या चार ठिकाणी वेदर रडार आहेत, ज्यांचा वापर हवामान खातं करतं. मुंबईत दोन (कुलाबा आणि जोगेश्वरी-वेरवली), नागपूरमध्ये एक आणि सोलापूरमध्ये एक.

मुंबई आणि नागपूरमधले रडार हे हवामान विभागाच्या आख्यत्यारीत येतात. गोव्यातील रडारची मदत तळ कोकणातल्या हवामानाचा अंदाज मांडताना होते.

तर सोलापूरचं रडार हे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ट्रॉपिकल मेट्रॉलॉजी या संस्थेच्या अखत्यारीत येतं.

weather
Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

हवामान विभागाच्या वेबसाईटवर मुंबई आणि नागपूरच्या रडारची ताजी माहिती सतत अपडेट होत राहते, पण सोलापूरच्या रडारची माहिती मिळणं सध्या बंद आहे. हे रडार प्रयोगांसाठी वापरलं जात असल्यानं ते सतत कार्यरत नसतं.

मुंबईत गेल्या वर्षी चार एक्स-बँड रडारचं अनावरण झालं आहे, ज्यांची चाचणी सुरू असून ती स्थानिक अंदाजासाठी मदत करतील.

मात्र प्रत्यक्षात ही रडार बसवेपर्यंत आणि ती कार्यरत होईपर्यंत काही काळ जावा लागू शकतो.

या रडार कधीपर्यंत येऊ शकतील आणि त्याच्या पुढील कामाची दिशा काय असेल हे जाणून घेण्यासाठी बीबीसी मराठीने भू-विज्ञान मंत्रालयाशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला. त्यांच्याकडून प्रतिक्रिया आल्यानंतर या ठिकाणी अपडेट करण्यात येईल.

"नुसतं रडार बसवलं, म्हणजे झालं असं नाही. तर रडारनं दिलेल्या माहितीचं लगेच विश्लेषण करणं, त्यावर दिसणाऱ्या गोष्टींचा अर्थ सोप्या पद्धतीनं सांगणं आणि लोकांपर्यंत ही माहिती वेळेत पोहोचणं हे अतिशय महत्त्वाचं ठरतं," असं 'भवताल'चे हवामान अभ्यासक अभिजीत घोरपडे सांगतात.

मराठवाड्याच्या हवामानासाठी काय करायला हवं?

राज्यात सध्या मुंबई आणि नागपूर इथे भारतीय हवामान विभागाची प्रादेशिक केंद्र आहेत. तर पुण्यातही संशोधन करणारं केंद्र आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याचा अंदाज मुंबईतील प्रादेशिक केंद्राद्वारा वर्तवला जातो. पण फक्त मराठवाड्याचा हवामानाचा अंदाज वर्तवणारं स्थानिक केंद्र नाही.

मराठवाडा हा पर्जन्यछायेचा प्रदेश असला तरी इथे मान्सून आधी आणि मान्सूननंतर थंडरस्टॉर्म्स म्हणजे वादळी पाऊस पडतो, ज्यामुळे शेतीचं नुकसान होतं अशा पावसाचं भाकीत स्थानिक पातळीवर होणं अभ्यासकांना गरजेचं वाटतं.

"हवामानाचा अंदाज वर्तवणारी यंत्रणा किंवा शास्त्रज्ञ एखाद्या विभागाच्या जितके जवळ असतील, तितकी जास्त तत्परता ते दाखवू शकतात. त्यामुळेच मराठवाड्यासाठी अशी काहीतरी स्वतंत्र व्यवस्था तयार करणं गरजेचं आहे.

मुंबई, नागपूर किंवा पुण्यातील केंद्रांकडून माहिती पुरवली जाते, पण स्थानिक पातळीवर हवामान अंदाज वर्तवण्यासाठी ज्या ज्या गोष्टी करता येतील त्या करायला हव्या," असं मत 'सतर्क' संस्थेचे हवामान अभ्यासक मयुरेश प्रभुणे मांडतात.

बीडच्या आष्टीमधल्या बचावकार्यादरम्यानचा फोटो

फोटो स्रोत, Mustan Mirza/BBC

फोटो कॅप्शन, बीडच्या आष्टीमधल्या बचावकार्यादरम्यानचा फोटो

त्यांच्या मते अशी यंत्रणांचा अभाव असल्यामुळेच आणि ज्या यंत्रणा आहेत, त्यांची माहिती सोप्या भाषेत लोकांपर्यंत पोहोचत नसल्यामुळेच या प्रदेशात प्रशिक्षण नसलेले लोकही हवामानाचं भाकीत करू लागले आहेत, ज्यातून चुकीची माहितीही प्रसारीत होते.

"हवामानाच्या बाबतीत विकेंद्रीकरण गरजेचं आहे. जिल्हा पातळीवर नाही, पण निदान विभाग पातळीवर अशी यंत्रणा असायला हवी. हवं तर हवामान हा विषय संशोधन म्हणून केंद्राकडे ठेवावा पण सुविधा म्हणून तो राज्यांकडे द्यायला हवा.

"तसंच राज्य सरकारनंही राज्य पातळीवर अशी माहिती पुरवणारी यंत्रणा उभारायला हवी, जसं ओडिसानं केलं आहे. तिथे शेतकऱ्यांच्याही मोबाईलवर हवामानाचे सगळे अपडेट्स थेट मिळू शकतात. ओडिसामध्ये अनेक चक्रीवादळं येतात, त्यामुळे राज्य सरकारनं पुढाकार घेऊन हे केलं आहे, ज्याचा फायदा होताना दिसतो आहे," असंही मयुरेश नमूद करतात.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)