राज्यात पावसाचे थैमान : इतक्या तीव्रतेनी पाऊस पडण्याचं नेमके कारण काय ?

- Author, प्राची कुलकर्णी
- Role, बीबीसी मराठीसाठी
सध्या परतीच्या पावसाने राज्यातील काही जिल्ह्यांत अक्षरश: धुमाकूळ घातलाय. मागील तीन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे मराठवाड्यातील बीड, धाराशिव आणि लातूर जिल्ह्यांतील अनेक भागात पुराची परिस्थिती निर्माण झाली आहे.
या पावसामुळे अनेकांच्या घरात आणि शेतात पाणी शिरले असून शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. गोठ्यात पाणी शिरल्याने गुरा-ढोरांचे जीव गेले आहे.
नद्यांना पूर आल्यामुळे नदीकाठच्या गावातील नागरिक अडकले असून सकाळपासून त्यांना सुरक्षित ठिकाणी हलविण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.
लातूर जिल्ह्यातील निलंगा आणि औसा तालुक्यातील गावांना, तर धाराशिव जिल्ह्यातील परंडा, भूम आणि कळंब तालुक्यातील काही गावांना पावसाचा मोठा फटका बसला आहे. बीड जिल्ह्यातील काही गावांमध्येही अशीच परिस्थिती निर्माण झाली आहे. सोलापूर, पुणे जिल्ह्यातही पाऊस सुरू असून अनेक ठिकाणी बचावकार्य सुरू आहे.
दरम्यान, गेल्या काही काळात पर्यावरणीय बदलांचा प्रभाव झपाट्याने जाणवू लागला आहे.
अचानक इतक्या मोठ्या प्रमाणात पाऊस येण्यामागचं कारण काय? अतिवृष्टी, पूर, दृष्काळ, वादळांचा जणूकाही क्रमच लागल्याचं दिसून येतं. या मागचं कारण सांगणारा एक अहवाल प्रसिद्ध करण्यात आला होता, ज्यावर बीबीसीने बातमी केली होती. ती पुन्हा प्रसिद्ध करत आहोत.

फोटो स्रोत, Getty Images
"दर 3 वर्षांनी दुष्काळ पडतो. दुष्काळात माणूस कसं पण जगतो. अतिवृष्टीत काही करता येत नाही," टोकाच्या हवामानाचा फटका बसलेल्या बीड जिल्ह्यातील पाटोद्याच्या कोथन गावचे लक्ष्मण गावडे सांगतात.
यंदा बीडमध्ये पावसाने हाहाकार माजवला आहे. गावडेंच्या पावणेपाच एकरवरील सगळं पीक अक्षरशः पाण्यात गेलं. त्यांनी या पावणेपाच एकरापैकी 4 एकरावर सोयाबीन, तर उरलेल्या जमिनीवर बाजरी आणि कांदा लावला होता.
गावडे सांगतात, "महिनाभरात कांदा निघाला असता. त्यावर 20–25 हजारांचा खर्च झाला होता. बाजरीही गेली. आता खायला धान्य मिळणार नाही. आम्हालाच धान्य विकत घ्यावं लागेल. मुलांची शाळा आहे. 50 वर्षांत असा पाऊस कधीच आला नाही. तळं कधीच भरत नाही. आत्ता 3–4 तळी भरतील इतका पाऊस झाला. शेतात पाणी साठलेलं आहे आणि शेतात जाताही येत नाही."
2025 च्या सप्टेंबर महिन्यात मान्सून परतीच्या मार्गावर असताना झालेल्या या पावसाने बीडसह राज्यातील अनेक भागात प्रचंड नुकसान केलं. बीडमध्ये तर लष्कराला पाचारण करून लोकांना सुरक्षितस्थळी हलवावं लागलं.

महाराष्ट्रासह उत्तराखंड, पंजाब आणि हिमाचल या राज्यांनीही यंदा अशीच टोकाची पूरस्थिती अनुभवली. सप्टेंबर 2025 मध्ये देहराडूनमध्ये 13 जणांचा मृत्यू झाला, तर 500 लोकांना रेस्क्यू करावं लागलं. सप्टेंबरच्या सुरुवातीला पंजाबमध्ये आलेल्या पूरात 30 लोकांचा मृत्यू झाला आणि 3 लाख 54 हजार लोकांचं नुकसान झालं. याच पूरात पाकिस्तानमध्ये 20 लाखाहून अधिक लोकांना सुरक्षित स्थळी हलवावं लागलं.
सेंटर फॉर सायन्स अँड एन्व्हायरनमेंटच्या अहवालानुसार, गेल्या वर्षी म्हणजे 2024 मध्ये भारतात जानेवारी ते सप्टेंबर दरम्यान 274 पैकी 255 दिवस टोकाच्या हवामानाची परिस्थिती दिसली. यात उष्ण दिवस, थंडीच्या लहरी, चक्रीवादळं आणि पूर यांचा समावेश आहे. यामध्ये 3 हजार 228 जणांना आपला जीव गमवावा लागला, 32 लाख हेक्टरवरील पिकांचं नुकसान झालं आणि 2 लाख 55 हजार 862 घरांचं नुकसान झाल्याचं अहवालात नमूद आहे.
गेल्या 2 वर्षांतील ही आकडेवारी पाहिली, तर परिस्थिती किती बिघडत चालली आहे याचा अंदाज येतो. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ट्रॉपिकल मेट्रोलॉजीतील शास्त्रज्ञांच्या अभ्यासानुसार, गेल्या 75 वर्षांमध्ये अतिवृष्टीच्या घटनांमध्ये तीनपटीने वाढ झाली आहे. याला कारणीभूत ठरत आहे हवामान बदल.
आकडेवारी काय सांगते?
या संशोधनातील आकडेवारीनुसार, जगभरात पूरामुळे गेल्या दशकात 30 अब्ज डॉलरपेक्षाही जास्त नुकसान झालं आहे. यापैकी सर्वाधिक नुकसान आशिया खंडात झालं आहे. फक्त भारताची आकडेवारी पाहिली, तर वर्षाकाठी 3 अब्ज डॉलरचं नुकसान होत असून ते जगाच्या एकूण नुकसानाच्या प्रमाणात 10 टक्के आहे.
आकडेवारी दर्शवते की, भारतात गेल्या 75 वर्षांत, म्हणजे 1950 पासून 2024 पर्यंत असे 325 पूर आले आहेत ज्यामुळे एकूण 92 कोटी 30 लाख प्रभावित झाले, 1 कोटी 90 लाख लोक बेघर झाले, तर 81 हजार लोक मृत्युमुखी पडले.
हे नेमकं का होतंय?
हे संशोधन दर्शवतं की, अतिवृष्टीच्या घटना त्या भागात वाढत आहेत जिथे एकूण पावसाचं प्रमाण कमी आहे. घटत्या मान्सूनच्या पार्श्वभूमीवर वाढणारी पावसाची तीव्रता अधिक नुकसान करणारी ठरते. याला हवामान बदल कारणीभूत असल्याचं संशोधन सांगतं.
पण हवामान बदलाचा नेमका परिणाम कसा होतो आहे? संशोधनातील आकडेवारी सांगते की, यापूर्वी साधारण बंगालच्या उपसागरातून 2 ते 4 चक्रीवादळं निर्माण होत असत. आता मात्र अरबी समुद्रात चक्रीवादळ निर्माण होण्याचं प्रमाण 50 टक्क्यांनी वाढलं आहे. म्हणजे अरबी समुद्रात आधी 2 वर्षांत एक चक्रीवादळ निर्माण होत होतं, ते आता दरवर्षी एकदा दिसतं.

फोटो स्रोत, Getty Images
या वाढीला बाष्प वाढणं कारणीभूत असल्याचं संशोधन सांगते. अभ्यासानुसार, अतिवृष्टीच्या घटनांसाठी बाष्प कुठून आलं याचा शोध घेतला असता, त्यापैकी 36 टक्के बाष्प अरबी समुद्रातून, 26 टक्के बंगालच्या उपसागरातून आणि 9 टक्के मध्य हिंद महासागरातून आल्याचं आढळलं. याचा अर्थ अरबी समुद्र अतिवृष्टीसाठी बंगालच्या उपसागर आणि हिंद महासागरापेक्षा जास्त बाष्प पुरवत आहे.
अभ्यासातून हेही दिसून आलं की, उत्तर अरबी समुद्रावर वाहणाऱ्या मान्सून वाऱ्यांमध्ये (पश्चिमेकडून येणारे वाऱ्यामध्ये) वाढलेली अस्थिरता (मोठ्या चढउतारांसह) जाणवत आहे. यामुळे बाष्पाचा पुरवठा मोठ्या प्रमाणात वाढतो. परिणामी मुसळधार पावसाच्या घटनांना चालना मिळते.
अशी अतिवृष्टी गुजरात, महाराष्ट्र, मध्य प्रदेश, छत्तीसगड, तेलंगाणा, ओडिशा, झारखंड, आसाम, मेघालय आणि पश्चिम घाटाच्या विविध भागांत – गोवा, कर्नाटक आणि केरळच्या काही भागांत – पूर आणि अतिवृष्टीचं प्रमाण वाढल्याचं दिसतं.
याला कारणीभूत ठरत आहे ते अरबी समुद्रातील वाढलेलं तापमान.
मानवी हस्तक्षेप, प्रदूषण आणि कार्बन डायऑक्साइड उत्सर्जन वाढवणाऱ्या कृतींमुळे उत्तर अरबी समुद्राचं तापमान वाढत आहे. त्यामुळे या प्रदेशातील हवामान आणि पर्यावरणावर गंभीर परिणाम होत आहेत.
नेमकं काय होतंय हे स्पष्ट करताना आयआयटीएमचे शास्त्रज्ञ डॉ. रॉक्सी कोल सांगतात, "हवामान बदलामुळे झालेल्या तापमान वाढीमुळे बाष्प धरून ठेवण्याची हवेची क्षमता वाढते. एकूण बाष्पीभवनाचं प्रमाणही वाढतं."
"हवा जास्त वेळ आर्द्रता धारण करते. त्यामुळे खूप वेळ पाऊस होण्याऐवजी कमी वेळात जास्त पाऊस होऊन हे सगळं बाष्प पावसाच्या रुपाने कोसळतं. त्यात आपण उष्णकटिबंधीय क्षेत्रात राहतो. त्यामुळे इथे अशा हवामान प्रणाली वेगाने निर्माण होऊ शकतात. हवामान बदलामुळे हे आणखी वेगाने होत आहे. त्यामुळे त्याचा अंदाज वर्तवणं कठीण होतं आणि त्यामुळे जास्त नुकसान सोसावं लागतं", असं डॉ. कोल यांनी सांगितलं.
पुढे काय होऊ शकतं?
डॉ. कोल मांडतात की, भविष्यात अशा घटनांमध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. आकडेवारी दर्शवते की, तापमान जेव्हा एका अंशाने वाढते तेव्हा एकूण पावसाळ्यात पावसाच्या प्रमाणात 7 ते 8 टक्क्यांनी वाढ होते. मात्र, यात कमी वेळात जास्त पाऊस पडण्याच्या घटनाच वाढण्याची शक्यता आहे. आत्तापर्यंत अभ्यासलेली आकडेवारी आणि हवामान अभ्यासाच्या आधारे अतिवृष्टीच्या घटनांचा अंदाज 2 ते 3 आठवडे आधी वर्तवता येऊ शकतो, असंही संशोधन सांगतं.

फोटो स्रोत, Getty Images
ते पुढे सांगतात, "आपल्याकडे अतिवृष्टी किंवा कोणत्याही नैसर्गिक संकटाच्या वेळी त्यानंतरच कार्यवाही होते. त्यामुळे नुकसान अधिक होतं. जीवितहानीसोबतच मालमत्तेचं नुकसानही वाढतं. या घटनांमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे धोरण ठरवताना या बाबींचा विचार करणं गरजेचं आहे."
"आपल्याकडे आकडेवारी उपलब्ध आहे. त्यामुळे त्या शहर, गाव किंवा परिसराचा अभ्यास करून नेमके कुठे 'हॉटस्पॉट' तयार होत आहेत याचा अभ्यास करावा. तसेच त्यानुसार धोरण ठरवले पाहिजे. पिकं घेताना पूर किंवा दुष्काळामुळे नुकसान होणार नाही, अशी पिकं त्या भागात घेतली गेली पाहिजेत."
"तसेच उष्णतेच्या लहरीच्या वेळी त्याचा अंदाज लक्षात घेऊन कामाच्या वेळांमध्ये बदल केला पाहिजे. ही तयारी असेल, तर जीवितहानी आणि नुकसान टाळता येईल", असंही त्यांनी नमूद केलं.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)











