शाहरुख खान पहिल्यांदाच अब्जाधीशांच्या क्लबमध्ये झाला सामील; भारतीयांपैकी आणखी कोण आहे यादीत?

    • Author, शर्लिन मोलन
    • Role, बीबीसी प्रतिनिधी

एका नवीन यादीनुसार, बॉलीवूड सुपरस्टार शाहरुख खान पहिल्यांदाच अब्जाधीशांच्या क्लबमध्ये सामील झाला आहे आणि आता तो जगातील सर्वात श्रीमंत अभिनेत्यांपैकी एक बनला आहे.

भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्तींची वार्षिक क्रमवारी असलेल्या हुरुन इंडिया रिच लिस्ट 2025 नुसार, 59 वर्षीय शाहरुख खानची एकूण संपत्ती 1.4 अब्ज डॉलर्स इतकी आहे.

यामुळे त्याला आता अर्नोल्ड श्वार्झनेगर, पॉप स्टार रिहाना, गोल्फर टायगर वुड्स आणि गायिका टेलर स्विफ्ट सारख्या जागतिक सेलिब्रिटींच्या पंक्तीत स्थान मिळालं आहे, ज्यांची एकूण संपत्ती फोर्ब्स मासिकाने 1.6 अब्ज डॉलर्स म्हणजे (14,000 कोटी रुपये ) इतकी सांगितली आहे.

या यादीत बॉलिवूडमधील अभिनेत्री जुही चावला, अभिनेता हृतिक रोशन आणि अमिताभ बच्चन आणि चित्रपट दिग्दर्शक करण जोहर यांचा देखील समावेश आहे.

शाहरूख खानचे उत्पन्नाचे स्रोत

बॉलिवूडचा रोमान्सचा बादशाह म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शाहरूख खानने हिंदी चित्रपटसृष्टीत तीन दशकांहून अधिक काळ काम केलं आहे आणि अभिनेता होण्यापासून ते एक मोठं प्रॉडक्शन हाऊस चालवण्यापर्यंत आणि क्रिकेट संघाचा मालक होण्यापर्यंत त्यानं स्वतःला सिद्ध केलं आहे.

"शाहरूख खानच्या रेड चिलीज एंटरटेनमेंट (निर्मिती करणारी कंपनी) आणि नाईट रायडर स्पोर्ट्स (आयपीएल क्रिकेट क्लब) मधील असलेल्या गुंतवणुकीमुळे अब्जाधीश हा दर्जा मिळवणं त्याला शक्य झालं आहे," असं हुरुन इंडियाचे संस्थापक आणि मुख्य संशोधक अनस रहमान जुनैद यांनी बीबीसीला सांगितलं.

त्याच्या उत्पन्नाचे इतर स्रोत म्हणजे चित्रपटातून मिळणारं उत्पन्न, जाहिराती तसेच जगभरातील रिअल इस्टेटमधील गुंतवणूक यांचा समावेश आहे.

जुनैद यांच्या मते, अब्जाधीशांच्या यादीत शाहरूखचा समावेश होणं हे भारताच्या आर्थिक विकासाच्या बदलत्या स्वरूपाचं प्रतिबिंब आहे.

"भारतीय अर्थव्यवस्था परिपक्व होत असताना आणि संपत्ती निर्मितीच्या पुढील टप्प्यावर जात असताना मॅनिफॅक्चरिंग, आयटी आणि बँकिंग यासारख्या पारंपारिक क्षेत्रांच्या पलीकडे आता संपत्तीची कमवण्याची नवीन केंद्रं उदयास येत असल्याचं आपल्याला दिसून येत आहे," असंही जुनैद म्हणाले.

क्रीडा, मनोरंजन आणि आयपी-चालित व्यवसाय हे आता "भारतात संपत्ती निर्मितीचे महत्त्वपूर्ण इंजिन" आहेत, असंही त्यांनी सांगितलं.

जुनैद यांच्या मते, हे अमेरिकेत घडलेल्या उत्क्रांतीसारखंच आहे, जिथं एकेकाळी उद्योगपती आणि बँकर्सचे वर्चस्व असलेल्या श्रीमंतांच्या यादीत आता मायकेल जॉर्डन आणि लेब्रॉन जेम्सपासून ओप्रा विन्फ्रे आणि बियॉन्से पर्यंत क्रीडा-संघ मालक, मीडिया मोगल(ज्यांच्याकडे भरपूर संपत्ती असते असे) आणि सेलिब्रिटींचे ब्रँड आहेत.

या यादीतल्या इतर बॉलीवूड सेलिब्रिटींची संपत्ती किती?

परंतु फोर्ब्सच्या मते, अनेक सेलिब्रिटी अविश्वसनीयपणे श्रीमंत असले तरी, "त्यांची एकूण संपत्ती दहा अंकांपर्यंत पोहोचणं दुर्मिळ आहे".

जगभरातील दोन डझनपेक्षा कमी लोकांनी ही कामगिरी केली आहे. यावर्षी हुरुनच्या यादीत इतर चार बॉलीवूड सेलिब्रिटी आणि त्यांच्या कुटुंबीयांचा समावेश असला तरी, शाहरूख खानची संपत्ती लक्षणीयरीत्या जास्त असल्याचा अंदाज आहे.

अनेक चित्रपटांमध्ये शाहरूख खानची सहकलाकार असलेली जुही चावला आणि तिचं कुटुंबीय भारतीय सेलिब्रिटीजमध्ये दुसऱ्या क्रमांकावर आहेत, जुही आणि कुटुंबीयांची संपत्ती एकूण संपत्ती 880 दशलक्ष डॉलर्स आहे.

त्यानंतर भारतीय सेलिब्रिटीजमध्ये हृतिक रोशनचाही आहे. त्याची संपत्ती 260 दशलक्ष डॉलर्सच्या आसपास आहे, त्यानंतर दिग्दर्शक करण जोहर सुमारे 200 दशलक्ष डॉलर्स आणि अभिनेता अमिताभ बच्चन आणि त्यांच्या कुटुंबाची संपत्ती सुमारे183 दशलक्ष डॉलर्सच्या आसपास आहे.

2024 मध्ये, जोहरने त्याच्या धर्मा प्रॉडक्शन्समधील 50% हिस्सा भारतातील अव्वल लस उत्पादक असलेले अब्जाधीश अदार पूनावाला यांना 119 दशलक्ष डॉलर्समध्ये विकला तेव्हा त्याची चर्चा झाली होती.

या वर्षी भारतातील एकूण अब्जाधीशांची संख्या 350 च्या वर गेली आहे, हुरुन इंडियाच्या मते, अब्जाधीश मुकेश अंबानी आणि गौतम अदानी यांनी त्यांची अव्वल दोन स्थानं कायम ठेवली आहेत.

बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.