100 वर्षांपूर्वी कुटुंबापासून दुरावलेल्या 300 जणांचे नातेवाईक त्यांनी शोधून काढले

    • Author, स्वामीनाथन नटराजन
    • Role, बीबीसी वर्ल्ड सर्व्हिस

“मी हरवलेल्या कुटुंबीयांची भेट घालून देतो तो क्षण मला खूप भावनिक वाटतो. असा आनंद मला दुसऱ्या कोणत्याच गोष्टीत मिळत नाही. या जगात असण्याचा माझा उद्देश पूर्ण झाल्याची जाणीव मला यावेळी होत असते.”

दक्षिण अमेरिकेतील कॅरेबियन बेटसमुहांमधील एक बेट असलेलं त्रिनिदाद आणि टोबॅगो. या ठिकाणी राहणारे 76 वर्षीय शमशुद्दीन हे गेल्या 25 वर्षांपासून येथील भारतीयांना त्यांच्या कुटुंबीयांचा शोध घेण्यासाठी मदत करत आहेत.

आतापर्यंत सुमारे 300 हून अधिक जणांना त्यांच्या कुटुंबीयांचा शोध घेण्यासाठी मदत केल्याचं शमशुद्दीन सांगतात.

भारतात ब्रिटिशांचं राज्य असताना हे लोक 1800 ची अखेर आणि 1900 च्या सुरुवातीच्या काळात इथे स्थलांतरित झाले होते.

त्यावेळी ब्रिटिशांचे करारबद्ध मजूर म्हणून या लोकांना कॅरेबियन बेटांवर आणलं गेलं होतं. परंतु, कालांतराने या लोकांचा भारतातील कुटुंबीयांसोबतचा संपर्क तुटला.

ही परिस्थिती लक्षात घेऊन 25 वर्षांपूर्वी शमशुद्दीन यांनी कुटुंबीयांपासून ताटातूट झालेल्या या लोकांना पुन्हा त्यांची भेट घालून देण्याचा विडा उचलला.

सुरुवातीला भूगोलाचे शिक्षक म्हणून काम करणारे शमशुद्दीन नंतरच्या काळात वंशावळ तज्ज्ञ बनले. कॅरेबियन बेटांवरील भारतीय मजूरांच्या वंशजांना त्यांच्या कुटुंबीयांशी पुन्हा जोडण्याचं काम त्यांनी केलं.

या संपूर्ण प्रकरणाची मूळे सापडतात भारतातील स्वातंत्र्यपूर्व काळातील परिस्थितीमध्ये. भारतात ब्रिटिश राजवटीचा कालखंड सुरु असताना विसाव्या शतकाच्या सुरुवातीला जगभरात गुलामगिरी संपुष्टात येण्यास सुरुवात झाली होती.

यानंतर निर्माण झालेल्या कामगारांच्या तुटवड्याची भरपाई करण्यासाठी ब्रिटिश सरकारने ‘करारबद्ध मजूर’ नावाने मनुष्यबळ भारतातून जगभरात पाठवणं सुरू केलं. स्वस्त मजूर म्हणून यांचा वापर ब्रिटिश साम्राज्यातील विविध वसाहतींमध्ये करण्यात येऊ लागला.

1838 ते 1917 या काळात अनेक भारतीयांना भारतातून कॅरेबियन, दक्षिण आफ्रिका, मॉरिशस आणि फिजी यांसारख्या ब्रिटीश वसाहतींमध्ये साखर कारखान्यांत काम करण्यासाठी पाठवण्यात आलं.

1838 ते 1917 दरम्यान भारतातून स्थलांतरित झालेल्या मजुरांची संख्या

यापैकी काही मजूर स्वेच्छेने या कामासाठी गेले, तर काहींना जबरदस्तीनेही त्याठिकाणी नेण्यात आलं.

यामध्ये बहुतांश मजूर हे अशिक्षित होते. त्यांना पुढे आपल्याला कोणत्या परिस्थितीला सामोरं जावं लागू शकतं, याविषयी जाणीव नव्हती. पण त्यांच्या संबंधित करारांवर स्वाक्षऱ्या घेऊन मजूर म्हणून कामासाठी पाठवण्यात आलं.

मनुष्यबळाचा अशा प्रकारे पुरवठा करण्याच्या पद्धतीचं वर्णन काही इतिहासकारांनी ‘नवीन गुलाम व्यापार’ पद्धत म्हणून केलं आहे.

शमशुद्दीन यांचेही पूर्वज अशाच प्रकारे कॅरेबियन बेटांवर स्थलांतरित मजूर म्हणूनच आले होते. शमशुद्दीन यांच्या आजोबांचेही आजोबा असलेले मुनराद्दीन मजूर म्हणून इथे आले होते, हे त्यांना कळालं. त्यानंतर याचा आपल्या कुटुंबावर कसा परिणाम झाला, हे जाणून घ्यायची उत्सुकता शमशुद्दीन यांना होती.

शमशुद्दीन शाळेत असताना त्यांना माहिती मिळाली की ते ज्याठिकाणी राहायचे ती जमीन मुनराद्दीन यांनी खरेदी केलेली होती.

“पण, कुटुंबातील कुणीही व्यक्ती मुनराद्दीन यांच्याविषयी फार काही सांगू शकत नव्हता,” असं शमशुद्दीन सांगतात.

1972 मध्ये शमशुद्दीन हे त्रिनिदादमधील रेड हाऊसमध्ये गेले. पुढच्या काळात रेड हाऊस हे येथील कायदेविषयक घडामोडींच्या मंत्रालयाचं कार्यालय बनवण्यात आलं होतं.

या कार्यालयात शमशुद्दीन यांनी मुनराद्दीन यांच्याविषयी माहितीसाठी अनेक कागदपत्रे आणि फाईल चाळल्या.

अखेर, चार तास शोधाशोध केल्यानंतर वाळवीने कुरतडलेल्या एका जुन्या फाईलमध्ये शेवटच्या पानावर त्यांना मुनराद्दीन यांच्या नावाचा उल्लेख आढळला.

मुनराद्दीन यांनी 5 जानेवारी 1858 रोजी कलकत्ता (आताचे कोलकाता) सोडलं होतं. त्याच वर्षी 10 एप्रिल रोजी ते त्रिनिदादमध्ये दाखल झाले होते.

शमशुद्दीन सांगतात, “मुनराद्दीन हे सुशिक्षित होते. उत्तम इंग्रजी बोलायचे. सुरुवातीला त्रिनिदादमध्ये आल्यानंतर त्यांनी साखर कारखान्यात काही काळ काम केलं. यानंतर भाषांतराचं काम त्यांनी सुरू केलं. मजूर म्हणून करार संपल्यानंतर त्यांनी इथेच एके ठिकाणी शिक्षक म्हणून काम सुरू केलं. पुढे त्यांनी दोन दुकानेही उघडली.”

“मुनराद्दीन यांना दोन बायका आणि पाच मुले होती. त्यांनी एक घरही विकत घेतली. हेच घर पुढे त्यांच्या मुलांना वारसाहक्काने मिळालं. पुढे काही वर्षांनी हे घर आगीत नष्ट झालं होतं.”

यानंतर शमशुद्दीन यांनी आणखी शोध घेतला. पुढे त्यांना आईच्या वंशातील कुटुंबातील काही सदस्य सापडले. त्यांच्या कुटुंबातील कोणता व्यक्ती इथे सर्वप्रथम आला हेसुद्धा त्यांना सापडलं.

मुनराद्दीन यांच्याशी विवाह केलेल्या महिलेचं नाव होतं भोंगी. ती 1872 मध्ये वयाच्या सातव्या वर्षी आपले आई-वडील आणि तीन भावंडांसह त्रिनिदादला आली होती.

शमशुद्दीन सांगतात, 1949 साली भोंगी आजी मरण पावली. त्यावेळी मी 3 वर्षांचा होतो.

पुढे शमशुद्दीन हे शिक्षण पूर्ण करून भूगोलाचे शिक्षक बनले. पण हरवलेल्या नातेवाईकांना शोधण्याचे त्यांचे प्रयत्न आणि त्याला मिळणारं यश यांनी त्रिनिदादमधील भारतीय उच्चायुक्तांचं लक्ष वेधून घेतलं.

भारतीय उच्चायुक्तालयाने शमशुद्दीन यांना 10 हिंदू आणि 10 मुस्लीम कुटुंबांच्या नातेवाईकांचा शोध घेण्यासाठी काही निधी शिष्यवृत्ती स्वरुपात उपलब्ध करून दिला.

पुढे, हेच काम शमशुद्दीन यांचं करिअर बनलं. वंशावळ तज्ज्ञ म्हणून संशोधन करण्यासाठी त्यांना त्रिनिदाद आणि भारताकडून मोबदला देण्यात येऊ लागला.

यादरम्यानच्या काळात त्यांनी अनेकांच्या कुटुंबीयांची एकमेकांशी भेट घालून दिली. यामध्ये त्रिनिदाद आणि टोबॅगोचे दोन माजी पंतप्रधान बसदेव पांडे आणि कमला पर्साद बिसेसर यांचाही समावेश आहे, हे विशेष.

नातेवाईकांच्या शोधाचा रंजक प्रवास अधिक चांगल्या पद्धतीने समजून घेण्यासाठी आपण त्रिनिदादमधील 65 वर्षीय डेव्हिड लखन यांचं एक उदाहरण आपण पाहू.

डेव्हिड यांना त्यांच्या पणजोबांविषयी माहिती हवी होती. त्यांचे पणजोबा 22 वर्षांचे असताना 1888 साली भारतातून त्रिनिदादला गेले होते.

डेव्हिड बीबीसीला सांगतात, “मला सापडलेल्या एका कागदत्रामध्ये पणजोबांनी फक्त एकच नाव दिलेलं होतं – लखन. पण एवढ्या लांबचा प्रवास करण्याच्या त्यांच्या निर्णयामागची प्रेरणा नेमकी काय होती, ते मला शोधून काढायचं होतं.

वंशावळ अभ्यासक शमशुद्दीन यांनी लखन यांच्यासंदर्भातील काही कागदपत्रे नॅशनल आर्काइव्हजमधून शोधून काढली.

या कागदपत्रांमध्ये डेव्हिड यांच्या पणजोबांचे वडील, भाऊ यांच्यासह जात आणि मूळ गाव आदी उल्लेख त्यांना आढळून आला.

यानंतर डेव्हिड यांनी आपल्या नातेवाईकांचा शोध घेण्यासाठी त्यांच्या भारतातील परिचितांशी संपर्क साधला.

पुढे डेव्हिड यांच्या मित्रमंडळांनी त्यांच्या कुटुंबाचा शोध घेऊन 2020 मध्ये त्यांचं पुनर्मिलन घडवून आणलं.

याबाबत बोलताना डेव्हिड लखन यांची पत्नी गीता म्हणते, “आम्ही आमच्या मूळ गावी गेलो. त्यावेळी संपूर्ण गाव घराबाहेर येऊन आमचं स्वागत करेल, अशी आम्हाला अपेक्षा नव्हती. लोकांनी आम्हाला पुष्पहार घातला, ढोल वाजवले. हा अनुभव अविस्मरणीय असाच होता.”

तेव्हापासून डेव्हिड लखन यांचे कुटुंबीय आपल्या भारतातील नातेवाईकांच्या संपर्कात आहेत. संवादादरम्यान भाषिक अडथळे त्यांना जाणवतात. पण भाषांतर तंत्रज्ञानाच्या वापरातून ते त्यावर मात करतात.

गीता लखन सांगतात, “आमच्या नातेवाईकांना भेटल्यानंतर पूर्वजांनी आम्हाला सांगितलेल्या अनेक सांस्कृतिक गोष्टी आणि चालीरिती आम्हाला समजून घेता आल्या.

डेव्हिड आणि गीता आता त्यांच्या 7 वर्षीय नातवाला आपल्या भारत भेटीबाबत भरभरून सांगतात. त्याच्यामध्येही आपल्या कुटुंबीयांना भेटण्यात रस निर्माण व्हावा, अशी त्यांना अपेक्षा आहे.

शमशुद्दीन म्हणतात, “आजच्या काळात नातेवाईकांचा शोध घेणं पूर्वीपेक्षा सोपं बनलं आहे. आता डिजिटल मॅप, ऐतिहासिक नोंदी मिळवणं, आदी गोष्टी तुलनेने सोप्या आहेत. पण तरीही या कामात काही आव्हाने अजूनही कायम आहेत.”

शमशुद्दीन पुढे सांगतात, “मला आजपर्यंत माझ्या कामात 80 टक्के यश मिळालं. प्रत्येक व्यक्तीचे वंशज मला सापडू शकले नाहीत. कधी-कधी काही प्रकरणांमध्ये चुकीची माहिती नोंदवल्याचं दिसून आलं. त्यांचा शोध घेणं मला जमलं नाही.”

याशिवाय, काही मजूरांचं त्रिनिदादला प्रवास करतानाच निधन झालं. काही जण पोहोचल्यानंतर बिकट परिस्थितीत राहिले. त्यांच्याबाबत कोणतीही अधिकृत नोंद कागदपत्रांमध्ये सापडत नाही, त्यांचा शोध घेता येत नाही, असं ते सांगतात.

शमशुद्दीन हे आता आपल्या कामातून निवृत्त झाले आहेत. पण तरीही हे काम सोडावं, अशी त्यांची इच्छा नाही. निवृत्त झाल्यानंतरही ते सहा महिन्यांसाठी भारतात आले होते. या भेटीदरम्यान त्यांनी 14 जणांच्या कुटुंबीयांचा शोध घेतला.

ते म्हणतात, “हे काम मला अजूनही आनंद देतं. एक वेगळीच ऊर्जा मला या कामातून प्राप्त होते. माझ्या समोर येणारं प्रत्येक प्रकरण हे एक कोडं असतं. शिवाय, कोणतीही दोन प्रकरणे कधीच सारखी नसतात.

त्यांच्या मते, “या जगात प्रत्येक मानव हा स्थलांतरीत आहे. पण कुठेही गेलो तरी आपल्या भारतीय वंशाचा एक धागा आपल्यामध्ये सदैव खोलवर गुंफलेला असेल.”

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)