You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
छगन भुजबळ राष्ट्रवादी काँग्रेस सोडणार? नवीन पक्ष काढणार? भुजबळांची एक्स्क्लुझिव्ह मुलाखत
- Author, दीपाली जगताप
- Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी
राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि मंत्री छगन भुजबळ हे पक्षात नाराज असल्याच्या चर्चांना गेल्या काही दिवसांपासून कमालीचा जोर आलाय.
छगन भुजबळ यांच्या उपस्थितीत नुकतीच समता परिषदेची राज्यस्तरीय बैठक मुंबईत पार पडली. यावेळी कार्यकर्त्यांनी भुजबळांकडे ‘वेगळा विचार करण्याचा’ आग्रह केल्याचंही वृत्त समोर आलं आणि तर्क-वितर्कांना आणखीच उधाण आलं.
छगन भुजबळ यांना नाशिक लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी हवी होती, परंतु ती जागा महायुतीत राष्ट्रवादी काँग्रेसला मिळाली नाही. शिवाय, त्यानंतर राज्यसभेसाठी भुजबळ इच्छुक होते, परंतु तिथंही त्यांच्याऐवजी अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांना उमेदवारी देण्यात आली.
यामुळे छगन भुजबळ यांच्या नाराजीत भर पडल्याचं बोललं गेलं आणि आता तर ते राष्ट्रवादी काँग्रेसमधून बाहेर पडत शिवसेना ठाकरे गटात प्रवेश करण्याच्या तयारीत आहेत, अशा चर्चा सुरू झाल्यात. मात्र, खरंच असं आहे का? छगन भुजबळ नाराज आहेत का आणि ते पक्षांतर करतील का?
भुजबळांशी संबंधित सर्व प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्यासाठी बीबीसी मराठीनं त्यांनाच गाठलं. छगन भुजबळ यांनी बीबीसी मराठीला एक्स्क्लुझिव्ह मुलाखत दिली आणि सर्व प्रश्नांची उत्तरं दिलं.
प्रश्न - तुम्ही राजीनामा देणार किंवा राष्ट्रवादी काँग्रेसमधून बाहेर पडणार, या चर्चेत किती तथ्य आहे?
छगन भुजबळ - यात शून्य टक्के तथ्य आहे. असं काहीच झालेलं नाही.
समता परिषदेचे लोक नेहमीच भेटत असतात. कुठे काय निकाल लागले, काय अडचणीच्या गोष्टी झाल्या, काय फायद्याच्या-तोट्याच्या झाल्या, लोकांमध्ये कुठल्या गोष्टींबद्दल विरोध दिसला, या सगळ्याची साधक-बाधक चर्चा आम्ही केली.
पंकजाताई का पडल्या, काय कारण होतं, विदर्भात महायुतीच्या जागा का कमी झाल्या, अशी चर्चा झाली.
पण आता असं आहे की कोणीही मला भेटलं की भुजबळ नाराज आहेत, असं होतं. यापुढे पक्षाचं काम करणार आणि जास्तीत जास्त आमदार निवडून आणणार.
प्रश्न - लोकसभा दिली नाही, राज्यसभाही नाही, दोनदा डावललं गेलं, काय मत आहे तुमचं?
छगन भुजबळ - मी त्यांना सांगितलं होतं की, मी सीनियर आहे. मला 40 वर्षे इथं झालेली आहेत. संसदेत जाण्याची माजी इच्छा आहे. लोकसभा दिली असती तर लोकसभेतून गेलो असतो. राज्यसभा तर राज्यसभेतून जाण्याची इच्छा आहे. पण सगळ्या मंत्र्यांनी ठरवलं की, तुम्ही आता थोडं थांबायला पाहिजे. विधानसभेची निवडणूक आहे, तुमची इकडे आवश्यकता आहे.
प्रश्न – समता परिषदेच्या कार्यकर्त्यांनी तुमच्याकडे आग्रह धरलाय का, पक्षातून बाहेर पडायचा?
छगन भुजबळ – कार्यकर्त्यांनी म्हटलं की, तुमचं लोकसभेचं झालं असतं, तर त्याचा परिणाम आणखी काही ठिकाणी झाला असता. तुम्ही जिंकल्यास तुमच्याबरोबर इतर काही दोन-चार-पाच जागा आल्या असत्या. तिथे थोडं चुकलेलं दिसतंय. या नाराजीची थोडीफार भरपाई राज्यसभेचं झालं असतं तरी बरं झालं असतं. पण राजकारणात या गोष्टी चालूच असतात. कधी ऐकावं लागतं तर कधी आपलं म्हणणं ठासून सांगावं लागतं. ते म्हणाले, लोकांमध्ये थोडा संभ्रम आहे, काही लोकांना थोडं वाईट वाटतंय. म्हणून तुम्हाला विचारतोय की काय चाललंय. मी म्हटलं राजकारणात अशा गोष्टी होत असतात.
राजकारणात कोणीच माणूस कधीच सुखी नसतो. काही ना काही अडचण असतेच. ती अडचण नाराजी जास्त वेळ मनात ठेवून काम करू शकत नाही. त्यादिवशीच ते विसरून जातो आणि कामाला लागतो.
प्रश्न - तुम्ही स्वगृही परतण्याच्या तयारीत आहात का, म्हणजे शिवसेना ठाकरे गटात प्रवेश कराल किंवा शरद पवार यांच्याही संपर्कात आहात, अशाही बातम्या प्रसिद्ध झाल्या आहेत. हे खरं आहे का?
छगन भुजबळ - या चर्चा तुम्ही घडवता. आम्ही घडवत नाही. कोण म्हणतं इकडे जाणार, कोण म्हणतं तिकडे जाणार. तुम्हाला दुसरा विषय मिळाला की या चर्चा बंद होतील.
प्रश्न - तुमचं हे जे म्हणणं आहे, त्याबाबत तुम्ही अजित पवार यांच्याशी चर्चा केली होती का?
छगन भुजबळ - राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार, प्रफुल्ल पटेल, प्रांताध्यक्ष सुनील तटकरे यांच्याशीही चर्चा झाली होती. त्यांना माहिती आहे.
प्रश्न - राष्ट्रवादीच्या वर्धापन दिनाला तुमच्यासह इतर नेत्यांनी मान्य केलं की, तुमचा पारंपारिक मतदार सोबत राहिला नाही. काय बदल करणार पक्षात?
छगन भुजबळ – ‘400 पार’चा नारा लागला, त्यातही संविधान बदलेल असं वाटलं लोकांना. आदिवासी, दलित, मुस्लीम हे मोठे घटक आहेत. हे सगळे विरोधात गेले. यात मतांची गोळाबेरीज करणं कठीण आहे. मी सुरुवातीपासून हे सांगत होतो.
मी माझं मत सांगितलं, ते सगळे बसलेले आहेत शीर्ष नेते ते ठरवतील. त्यांना बदल करायचा तर करतील नाहीतर नाही करणार.
प्रश्न - लक्ष्मण हाके यांचं ओबीसीसाठी आरक्षण सुरू आहे. दुसरीकडे मनोज जरांगे-पाटील यांचंही आंदोलन कायम आहे.
छगन भुजबळ – मी त्यांच्या संपर्कात आहे. त्यांचं उपोषण सुरू आहे. त्यांनी तब्येतीची काळजी घ्यायला हवी. माझे लोक विचारपूस करत आहेत.
मराठा समाजाला वेगळं आरक्षण दिलेलं आहे. ओबीसीतूनच हवं असेल तर त्याला आमचा विरोध आहे. ते आंदोलन करू शकतात, तर आम्हीही करू शकतो. आमचे नेतेही करू शकतात.
प्रश्न – जरांगे-पाटील यांनी इशारा दिल्याप्रमाणे तुम्हीही विधानसभेला ओबीसी उमेदवार उभे करणार का किंवा तशी काही तयारी?
छगन भुजबळ - तशी चर्चा सुरू आहे नाही असं नाही. कार्यकर्ते असं म्हणत असतात की ओबीसी उमेदवार उभे करायला हवेत. तुम्ही पक्ष काढा असंही म्हणतात. मी त्यांना म्हणालो की नवीन पक्ष सुरू करणं एवढंही सोपं नाही.
मी जरांगे-पाटील यांना आव्हान देतो की, त्यांनी 288 जागांवर उमेदवार उभे करून दाखवावे.