या व्यक्तीमुळे मिळाला राजकुमार राव, पंकज त्रिपाठीला ब्रेक, 'गँग्ज ऑफ वासेपूर'साठी केलं होतं 384 जणांचं कास्टिंग

फोटो स्रोत, Mukesh Chhabra
- Author, सुप्रिया सोगळे
- Role, बीबीसी हिंदीसाठी
- Reporting from, मुंबई
प्रत्येक दशकात चित्रपटसृष्टीत बदल होतात. असाच एक बदल गेल्या दशकातही आला. त्यामुळे चित्रपटसृष्टीला अनेक प्रतिभावंत कलाकार मिळाले.
या कलाकारांमध्ये पंकज त्रिपाठी, नवाजुद्दीन सिद्दीकी, राजकुमार राव, विकी कौशल, रिचा चड्ढा, हुमा कुरैशी, फतिमा साना शेख, झायरा वसीम, सान्या मल्होत्रा, जयदीप अहलावत ,विनीत कुमार सिंह, श्रेया धन्वंतरी यांच्यासारख्या नावांचा समावेश आहे.
या कलाकारांना कोणी शोधलं आणि कोणी संधी दिली हे तुम्हाला माहिती आहे? मुकेश छाब्रा असं त्यांचं नाव आहे. ते कास्टिंग डायरेक्टर आहेत, बीबीसीला दिलेल्या मुलाखतीत त्याने आपला प्रवास कथन केला.
कास्टिंग म्हणजे काय?
एक चित्रपटात अनेक भूमिका करायच्या असतात. त्यासाठी दिग्दर्शकाला चित्रपटाच्या पटकथेनुसार कलाकारांची निवड करायची असते आणि त्यांना योग्य ठिकाणी घालायचं असतं. त्यासाठी दिग्दर्शकाला कलाकारांची गरज असते.
कोणत्या भूमिकेसाठी कोण योग्य आहे हे निश्चित करणं यालाच कास्टिंग असं म्हणतात. हे काम करणाऱ्याला कास्टिंग डायरेक्टर म्हटलं जातं. कोणत्याही चित्रपटाच्या निर्मितीत त्यांचा भाग अतिशय महत्त्वाचा असतो.
मुकेश छाब्रा कोण आहेत?

फोटो स्रोत, Mukesh Chhabra
दिल्लीच्या एका मध्यमवर्गीय घरात जन्माला आलेल्या मुकेश यांच्या आईवडिलांना चित्रपट आणि एकूणच संगीताची अतिशय आवड होती. प्रत्येक वीकेंडला ते मुकेश यांना चित्रपट दाखवायला घेऊन जात.
ते 11 वर्षांचे असताना त्यांच्या वडिलांनी नॅशनल स्कूल ऑफ ड्रामाच्या थिएटर वर्कशॉप मध्ये पाठवलं होतं.
लहानपणापासून मुकेश छाब्रा यांना चित्रपटांची आवड होती. त्यांनी सलमान खानचा बागी आणि पत्थर के फुल पाहिला तेव्हा या चित्रपटाचा त्यांच्यावर मोठा प्रभाव पडला.
NSD मध्ये ते TIE म्हणजे थिएटर इन एज्युकेशन या कंपनीशी निगडीत आहे. त्यादरम्यान त्यांनी NSD शी निगडीत कलाकारांसकट शाहरुख खान आणि इरफान खान यांच्या कथा ऐकल्या.
जेव्हा 15 वर्षांचे झाले तेव्हा ‘दिल से’ चित्रपट आला. त्या चित्रपटाचाही त्यांच्यावर खूप प्रभाव पडला. तेव्हाच या क्षेत्रात येण्याचा त्यांनी निर्णय घेतला. त्यानंतर ते दिल्लीत कास्टिंगसाठी मदत करू लागले.
करिअरची सुरुवात
मुकेश छाब्रा जेव्हा दिल्लीत NSD-TIE मध्ये होते तेव्हा विशाल भारद्वाज आणि राकेश ओमप्रकाश मेहरा जाहिरातीत कलाकार शोधण्यासाठी मुकेश छाब्रा यांची मदत घेत असत.
असं करता करता तेव्हा चित्रपटांमध्ये असिस्टंट झाले. तिथे ते अभिनेते शोधायचं. या कामाला आधी अनौपचारिक स्वरूप होतं. 2005 मध्ये त्यांनी या कामाला औपचारिक स्वरुप दिलं.
मुकेश छाब्रा 2005 मझ्ये मुंबईत आले तेव्हा चित्रपटांचा काळ अतिशय वेगळा होता. त्यावेळी अभिनेत्यांची संख्या कमी होती. एखाद्या अभिनेत्याने एखादी भूमिका केली तर त्याला तीच भूमिका मिळायची. नवीन कलाकारांना कमी काम मिळत होतं.
शेखर कपूर च्या ‘बँडिट क्वीन’ आणि रामगोपाल वर्माचा ‘सत्या’ मध्ये अनेक प्रतिभावान कलाकारांना संधी मिळाली. मात्र असं कमी चित्रपटांमध्ये झालं. त्या चित्रपटांमध्ये अंतरही जास्त होतं.
आतापर्यंत 300 चित्रपटांमध्ये त्यांनी कास्टिंग केलं. त्यांच्या मते गँग्स ऑफ वासेपूरमुळे त्यांना भरपूर प्रसिद्धी मिळाली. कास्टिंगच्या कामामुळे त्यांना चित्रपट क्षेत्रात प्रस्थापित झाले.
गँग्स ऑफ वासेपूर नंतर लोकांना अंदाज आला की चित्रपटांना नवीन कलाकारांची गरज आहे.

फोटो स्रोत, Getty Images
गँग्स ऑफ वासेपूर मध्ये नवाजुद्दीन सिद्दिकी, पंकज त्रिपाठी, रिचा चड्ढा, हुमा कुरेशी, जयदीप अहलावत, राजकुमार राव, विनीत सिंह, जिशान कादरी, जमील खान सारख्या कलाकारांना संधी आणि प्रेम दोन्ही मिळालं.
गँग्स ऑफ वासेपूर चं कास्टिंग त्यांच्यासाठी सोपं नव्हतं. 384 लोक शोधता शोधता एक वर्षांचा काळ गेला. त्यांच्या टीम ने नवीन कलाकारांचा शोध दिल्ली, लखनौ, पटना, वाराणसी या शहरातल्या थिएटर ग्रुपची भेट घेतली.
त्यावेळी स्मार्टफोन नव्हते त्यामुळे अभिनेत्यांचे ऑडिशन टेपच्या माध्यमातून व्हायचं. योग्य अभिनेत्याची निवड एक जटील प्रक्रिया होती, मुकेश छाब्रा यांन गँग्स ऑफ वासेपूरच्या वेळचे काही किस्से शेअर केले.
कालीन भैया या नावाने प्रसिद्ध झालेले पंकज त्रिपाठी यांची गणना सर्वात महागड्या कलाकारांमध्ये होते. त्याकाळी ते कामासाठी बरेच झगडत होते. सुल्तान कुरेशीच्या भूमिकेसाठी त्रिपाठी यांना घेण्यासाठी अनुराग कश्यप तयार नव्हते अशी आठवण छाब्रा यांनी सांगितली.
अनुराग कश्यप म्हणाले की जेव्हा त्यांनी पंकज त्रिपाठीचा अभिनय पाहिला तेव्हा ते म्हणाले की त्यांनी निवड केलेले अभिनेता आणि त्रिपाठी दोघांची ऑडिशन घेऊ या. त्यापैकी जो योग्य असेल त्याला घेऊ.
ऑडिशन मध्ये त्यांनी पंकज त्रिपाठींचा अभिनय पाहिला तेव्हा ते आश्चर्यचकित झाले आणि म्हणाले की हे चांगले अभिनेते आहेत आणि अशा प्रकारे ते त्या चित्रपटाचा भाग झाले.
पंकज त्रिपाठी यांनी मुकेश छाब्राच्या ऑफिसच्या भिंतीवर लिहिलं, ‘गँग्स ऑफ वासेपूर के लिए शुक्रिया’ या चित्रपटाने त्यांना ओळख दिली.
अनुराग कश्यपचा असिस्टंट मुरारी कुमार ने गुड्डूचा अभिनय केला. तो फैजल खान (नवाजुद्दीन सिद्दिकी) चा खास माणूस असल्याचं दाखवलं आहे.
राजकुमार राव आणि विकी कौशलचं बदललं आयुष्य
राजकुमार राव चित्रपटसृष्टीतील एक आघाडीचे अभिनेते आहेत. 2013 मध्ये आलेल्या शहीद चित्रपटासाठी त्यांना राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे. मात्र हंसल मेहता यांना राजकुमार राव यांच्याबरोबर काम करायचं नव्हतं.
राजकुमार राव यांना मुकेश छाब्रा श्रीराम सेंटर ऑफ परफॉर्मिंग आर्टसच्या दिवसांपासून ओळखत होते. ते त्यांचे ज्युनिअर होते. मुकेश ला माहिती होतं की ते अतिशय चांगले अभिनेते आहेत.
शाहीद चित्रपटासाठी हंसल मेहता जरा कचरत होते, कारण राजकुमार राव नवोदित अभिनेते होते. त्यांना कोणी फारसं ओळखत नव्हतं. त्यामुळे अशा चेहऱ्याला कोणी ओळखत नाही, तर चित्रपट कसा तयार होईल?
मुकेश यांच्या आग्रहाखातर हंसल मेहता राजकुमार राव यांना भेटल. त्याने इतिहास रचला. शाहीद चित्रपटाशिया दोघांनी सिटी लाईट्स, ओमर्टा, अलीगढ, बोस या सीरिज मध्ये त्यांनी एकत्र काम केलं.
विकी कौशलने उरी, संजू, राजी सारख्या चित्रपटातून अभिनयाची छाप सोडली आहे. त्याच्या मसान या चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. त्याच्या अभिनयाचं फार कौतुक झालं. मात्र विकी कौशल मसान चित्रपटासाठी पहिलं प्राधान्य नव्हता.
अभिनयाची समज वाढण्यासाठी त्याने अनुराग कश्यपला असिस्ट केलं. मसानसाठी ज्या अभिनेत्याची निवड झाली तो काही कारणाने ती भूमिका करू शकला नाही.
त्यानंतर शूटिंग सुरू झाल्यावर त्यांचं ऑडिशन अनुराग कश्यपला पाठवलं. अशा प्रकारे त्याची निवड झाली. विकी ने त्याधी ‘लव शव ते चिकन खुराना’ आणि ‘बॉम्बे वेल्वेट’ सारख्या चित्रपटात भूमिका निभावली होती.

फोटो स्रोत, Mukesh Chhabra
दंगलच्या छोरी

फोटो स्रोत, Disney
अमिर खानच्या दंगल चित्रपटाने बॉलिवूडला फातिमा साना शेख, सान्या मल्होत्रा आणि झायरा वसीम सारख्या उत्तम अभिनेत्री दिल्या. छाब्रा यांच्या मते हे कास्टिंग अजिबात सोपं नव्हतं.
अमिर खान आणि मुकेश छाब्रा यांनी रंग दे बसंती मध्ये एकत्र काम केलं होतं. दिग्दर्शक नितेश तिवारीबरोबर त्यांनी चिल्लर पार्टी आणि भूतनाथ सारख्या चित्रपटात एकत्र काम केलं होतं.
चार मुली शोधायची जबाबदारी मुकेशच्या खांद्यावर होती. त्यासाठी त्यांना दीड वर्षं लागलं. संपूर्ण देशातून त्यांन 14 हजार मुलींचं ऑडिशन केलं. त्यातून 1000 मुली निवडल्या, मग 200,80,40,20 आणि सरतेशेवटी चार मुली निवडल्या.
मुकेश छाब्रिया यांनी गँग्स ऑफ वासेपूर साठी जे कास्टिंग केलं त्यामुळे त्यांच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोनच बदलला. त्यानंतर असं म्हटलं जाऊ लागलं की चित्रपटासाठी स्टार नव्हे तर अक्टर हवे आहेत.
आता कलाकारांच्या निवडीच्या वेळी कोणताही दबाव नसतो. आता असं बोललं जातं की अभिनेत्याच्या जागी भूमिकेसाठी योग्य कलाकार हवाय.
छोट्या शहरातील टॅलेंट
140 कोटी लोकसंख्या असलेल्या भारत देशात प्रतिभेची वानवा नाही. भारतात कलाकार बहुसंख्येने आहेत. सध्या अनेक उत्तम कलाकार छोट्या शहरात आहेत.
स्मार्टफोनच्या जगात मुकेश छाब्रा फक्त मुंबईच नाही तर छोट्या शहरातील कलाकारांना संधी देण्याचा प्रयत्न करत आहेत.
ते सांगतात की, “प्रत्येक व्यक्ती मुंबईला येऊ शकत नाही. कधी पैशाची अडचण असते तर कधी इतर अडचणी त्यांना मुंबईला येऊ देत नाहीत.”
हल्ली ज्या ठिकाणी चित्रपटाची कथा आकार घेते तिथलेच लोक शोधले जातात. त्यामुळे चित्रपटात नाविन्य आणि ताजेपणा येतो. नव्या लोकांना संधी मिळते आणि कथेला एक स्थानिक लहेजा मिळतो.
मुकेश छाब्रा च्या मते , “आपल्या देशात हजारो नवाजुद्दीन सिद्दीकी आणि राजकुमार राव संधीच्या शोधात असतात.” अशा कलाकारांना संधी देण्याचा त्यांचा प्रयत्न आहे.
सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आणि कास्टिंग

फोटो स्रोत, Mukesh Chhabra
आजच्या काळात सोशल मीडियावर अधिकाधिक फॉलोअर्स मिळवण्याची स्पर्धा लागलेली असते. मात्र छाब्रा यांच्या मते इन्फ्लुएन्सर लोकांचा अभिनयाशी फारसं घेणं देणं नसतं.
आपल्या देशात जे चांगले अभिनेते आहेत त्यांना सोशल मीडियावर फॉलोअर्स कमी आहेत आणि ज्यांना अभिनय अजिबात येत नाही त्यांचे फॉलोअर्स जास्त आहेत. म्हणून कास्टिंग करताना ते सोशल मीडियाचं स्टारडम अजिबात लक्ष घालत नाही.
करमणुकीच्या क्षेत्रात कास्टिंग काऊचबद्दलही दबक्या आवाजात बोललं जातं.
त्यावर छाब्रा म्हणतात, “मी पण हे ऐकलं आहे. पण त्या सगळ्या सांगोवांगी कथा आहेत. पण मी ज्या लोकांबरोबर काम केलं आहे, तिथे असं झालं नाही. मी दुसऱ्या लोकांवर टिप्पणी करत नाही. आम्ही संपूर्ण निष्ठेने काम करतो. हे खूप कठीण काम आहे. त्यात वेळ जातो. आम्हाला दुसऱ्या गोष्टींचा विचार करायला वेळ मिळत नाही.”
पुढचा स्टार कोण?
एका दशकाच्या करिअरध्ये त्यांनी अनेक कलाकारांना समोर आणलं. आज ते कलाकार स्टार झाले आहेत. मात्र हे कलाकार स्टार होण्याचं कोणतंच श्रेय ते घेत नाहीत.
त्यांच्या मते त्यांना कलाकार शोधण्याचं काम मिळालं आणि अर्थातच पैसेही मिळाले. आता त्यांचं नशीब कुठे घेऊन जातं हे त्या अभिनेत्यावर अवलंबून आहे. त्यांच्या मते टॅलेंट आणि देवाच्या कृपेने लोक स्टार होतात.
त्यांनी आगामी 30-40 फिल्म आणि शो चं कास्टिंग केलं आ. त्यात राजकुमार हिरानी चा डंकी, नितेश तिवारी, अभिषेक कपूर, अनुभव सिन्हा, हंसल मेहता यांच्या चित्रपटासह राज आणि डीके यांच्या नव्या शो चा समावेश आहे.
छाब्रा यांनी दावा केला आहे की स्कॅम-2 मध्ये त्यांनी एक नवीन अभिनेता शोधला आहे. त्याचं काम प्रेक्षकांना नक्कीच चकित करेल.
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








