भारताने जिंकला पहिला अंडर-19 वूमन्स टी-ट्वेंटी वर्ल्डकप, इंग्लंडला 7 विकेट्सने हरवलं

दक्षिण आफ्रिकेत पार पडलेल्या पहिल्या वहिल्या अंडर-19 वूमन्स टी-20 वर्ल्डकप स्पर्धेवर भारताने आपलं नाव कोरलं आहे.

भारतीय संघाने प्रतिस्पर्धी इंग्लंड संघाला केवळ 68 धावांवर रोखून निर्धारित लक्ष्य 3 विकेट्सच्या मोबदल्यात केवळ 14 षटकांत गाठलं.

पहिल्याच अंडर-19 वर्ल्डकपमध्ये भारतीय संघाने केलेल्या या कामगिरीचं सोशल मीडियावर जोरदार कौतुक होताना दिसत आहे.

लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी मैदाना उतरलेल्या भारतीय संघाचे दोन्ही सलामी फलंदाज स्वस्तातच माघारी परतले होते. मात्र सौम्या तिवारी (नाबाद 24) आणि गोंगदी त्रिशा (24 धावा) यांनी संघाला अडचणीत येण्यापासून वाचवलं.

भारताकडून कर्णधार शफाली वर्माने 15 तर श्वेता सहरावतने पाच धावा बनवल्या. भारताच्या पहिल्या दोन विकेट गेल्या तेव्हा स्कोअर 20 धावा होता. पण त्यानंतर त्रिशा आणि सौम्या यांनी 46 धावांची भागिदारी केली.

तत्पूर्वी, वेगवान गोलंदाजांच्या दणकेबाज कामगिरीच्या बळावर सुरुवातीलाच भारतीय संघाने पकड मिळवली होती.

नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतल्यानंतर भारतीय संघाने सुरुवातीपासूनच इंग्लंडच्या फलंदाजांची दाणादाण उडवली.

तितास साधू, अर्चना देवी आणि पार्श्वी चोप्रा यांच्यासह इतर गोलंदाजांच्या तिखट माऱ्यासमोर इंग्लंड संघ पुरता ढेपाळल्याने 17.1 षटकांत त्यांचा डाव केवळ 68 धावांवर आटोपला.

दक्षिण आफ्रिकेच्या पोशेफस्ट्रूमच्या सिवन्स पार्क स्टेडियमवर अंडर-19 वूमन्स टी-ट्वेंटी स्पर्धेचा हा अंतिम सामना सुरू आहे.

भारताची कर्णधार शफाली वर्मा हिने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. तिचा हा निर्णय भारतीय गोलंदाजांनी सार्थ ठरवून इंग्लंडला सुरुवातीपासूनच जोरदार धक्के दिले.

पहिल्याच षटकाच्या चौथ्या चेंडूवर वेगवान गोलंदाज तितास संधूने इंग्लंडची सलामीवर लिबर्टी हिप हिला माघारी धाडलं. त्यानंतर ठराविक अंतराने इंग्लंडचे फलंदाज बाद होत गेले.

इंग्लंडचा संघ निर्धारित 20 षटकेही पूर्णपणे खेळून काढू शकला नाही. अखेरीस त्यांना 17.1 षटकांत केवळ 68 धावांपर्यंतच मजल मारता आली.

इंग्लंडकडून केवळ चार फलंदाजांना दुहेरी धावसंख्या नोंदवता आली. त्यामध्ये मधल्या फळीतील फलंदाज रियाना मॅकडोनाल्ड हिने 24 चेंडूंत सर्वाधिक 19 धावा केल्या. तिला पार्श्वी चोप्राने बाद केलं.

भारताकडून तितास संधू, अर्चना देवी आणि पार्श्वी चोप्रा या गोलंदाजांनी प्रत्येकी दोन विकेट घेतले. तर मन्नत कश्यप, शफाली वर्मा आणि सोनम यादव यांना प्रत्येकी 1 विकेट मिळाले.

बक्षीसाची घोषणा

भारतीय संघाने न्यूझीलंड तर इंग्लंड संघाने ऑस्ट्रेलियाला हरवून अंतिम फेरीत प्रवेश केला होता.

भारतीय संघाने विश्वविजय प्राप्त केल्यानंतर संघावर कौतुकाचा वर्षाव सुरू झाला.

बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी ट्विट करून भारतीय संघाचं अभिनंदन केलं.

तसंच त्यांनी संपूर्ण टीम आणि सपोर्ट स्टाफला 5 कोटी रुपयांचं बक्षीस जाहीर केलं आहे.

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)