दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणात एनआयएला मोठं यश; सुसाईड बॉम्बरच्या सहकाऱ्याला अटक

सोमवारी (10 नोव्हेंबर) लाल किल्ल्याजवळ झालेल्या स्फोटानंतर घटनास्थळी सामान्य लोकांसाठी वाहतूक बंद करण्यात आली आहे.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, सोमवारी (10 नोव्हेंबर) लाल किल्ल्याजवळ झालेल्या स्फोटानंतर घटनास्थळी सामान्य लोकांसाठी वाहतूक बंद करण्यात आली आहे.
    • Author, सय्यद मोझीज इमाम
    • Role, बीबीसी प्रतिनिधी
    • Author, माजिद जहांगीर
    • Role, बीबीसी प्रतिनिधी
    • Reporting from, श्रीनगर

राष्ट्रीय तपास संस्था अर्थात एनआयएला लाल किल्ला परिसरातील कार बॉम्बस्फोट प्रकरणात एक मोठं यश मिळालं आहे.

एनआयएनं एका काश्मिरी रहिवाशाला अटक केली आहे. याच आरोपीने आत्मघातकी बॉम्बरसोबत कट रचला होता, अशी माहिती एनआयएनं दिली आहे.

दिल्लीतील या बॉम्बस्फोटामध्ये 10 निष्पाप लोकांचा बळी गेला असून 32 जण जखमी झाले आहेत.

अमीर रशीद अली असं या आरोपीचं नाव आहे. हल्ल्यात सहभागी असलेली कार त्याच्याच नावावर नोंदवण्यात आली होती. त्याला एनआयएनं दिल्लीतून अटक केली आहे.

दिल्ली पोलिसांकडून एनआयएनं हे प्रकरण आपल्या ताब्यात घेतल्यानंतर या आरोपीचा मोठ्या प्रमाणात शोध मोहीम सुरू करण्यात आली होती.

सुसाईड बॉम्बरच्या सहकाऱ्याला अटक

एनआयएच्या तपासात असं दिसून आलं होतं की, जम्मू आणि काश्मीरमधील पंपोर येथील संबूरा येथील रहिवासी असलेल्या या आरोपीने कथित आत्मघाती बॉम्बर उमर उन नबीसोबत दहशतवादी हल्ला घडवून आणण्याचा कट रचला होता.

अमीर हा कार खरेदी करण्यासाठी दिल्लीला आला होता. हीच कार शेवटी हा स्फोट घडवून आणण्यासाठी म्हणून 'व्हेईकल बॉर्न इम्प्रोवाइज्ड एक्सप्लोसिव्ह डिव्हाइस (आयईडी)' म्हणून वापरली गेली.

एनआयएनं हे वाहन चालवणाऱ्या मृत चालकाची ओळख उमर उन नबी अशी केली आहे. हा मूळचा पुलवामा जिल्ह्यातील रहिवासी असून फरिदाबादमधील अल फलाह विद्यापीठात जनरल मेडिसीन विभागात सहाय्यक प्राध्यापक आहे.

सुसाईड बॉम्बरच्या सहकाऱ्याला अटक

फोटो स्रोत, X/NIA India

दहशतवादविरोधी यंत्रणेने नबीचे आणखी एक वाहनही जप्त केलं आहे. या प्रकरणात पुराव्यासाठी वाहनाची तपासणी केली जात आहे. या तपासणीमध्ये एनआयएनं आतापर्यंत 73 साक्षीदारांची तपासणी केली आहे, ज्यात 10 नोव्हेंबर रोजी दिल्लीत झालेल्या स्फोटात जखमी झालेल्यांचाही समावेश आहे.

या प्रकरणात दिल्ली पोलीस, जम्मू आणि काश्मीर पोलीस, हरियाणा पोलीस, उत्तर प्रदेश पोलीस आणि इतर विविध तपास संस्था जवळून समन्वय साधून काम करत असून एनआयए विविध राज्यांमध्ये तपास करत आहे, अशी माहिती एनआयएनं दिली आहे.

दिल्लीतील लाल किल्ला मेट्रो स्टेशनजवळ बॉम्बस्फोट

दिल्लीतील लाल किल्ला मेट्रो स्टेशनजवळ सोमवारी (10 नोव्हेंबर) सायंकाळी एका कारमध्ये स्फोट झाला. या स्फोटात किमान आठ जणांचा मृत्यू झाला, तर अनेक जण जखमी झाले.

या स्फोटापूर्वी जम्मू-काश्मीर पोलिसांनी हरियाणा आणि उत्तर प्रदेशमध्ये काही लोकांना अटक केली. तसेच, आणखी काहींना ताब्यातही घेण्यात आलं आहे.

अटक केलेल्यांपैकी तिघे व्यवसायाने डॉक्टर आहेत.

"15 दिवस चाललेल्या संयुक्त मोहिमेचं हे फलित आहे आणि ही मोहीम अजूनही सुरू आहे," असं फरिदाबादचे पोलीस आयुक्त सतेंद्र कुमार गुप्ता यांनी या कारवाईबाबत सांगितलं. परंतु, पोलिसांनी अटक केलेल्यांचा दिल्ली स्फोटाशी काही संबंध आहे का, याबाबत काही सांगितलेलं नाही.

दिल्ली स्फोटाचा तपास आता राष्ट्रीय तपास यंत्रणेकडे (NIA) सोपवण्यात आला आहे.

पोलिसांची कारवाई अजूनही सुरूच

जम्मू-काश्मीर पोलिसांची कारवाई मंगळवारीही (11 नोव्हेंबर) सुरू होती. पोलिसांच्या एका पथकाने दिल्लीजवळ असलेल्या फरिदाबादमध्ये अटक केलेल्या आरोपींच्या कामाच्या ठिकाणी जाऊन चौकशी केली.

दुसरीकडे, सहारनपूर आणि लखनऊमध्येही 'सर्च ऑपरेशन' सुरू आहे.

फरिदाबाद पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अल-फलाह विद्यापीठ आणि फरिदाबादमधील काही भागांमध्ये सुमारे 800 पोलीस कर्मचारी शोध मोहिमेत सहभागी आहेत.

मात्र, पोलिसांनी आतापर्यंत कोणालाही अटक किंवा ताब्यात घेतलेलं नाही. अल-फलाह आणि आजूबाजूच्या लोकांची चौकशी सुरू आहे.

लाल किल्ल्याजवळ ज्या ठिकाणी कारचा स्फोट झाला, तिथे एनएसजीचं तपास पथक पुरावे गोळा करत आहे.

फोटो स्रोत, ANI

फोटो कॅप्शन, लाल किल्ल्याजवळ ज्या ठिकाणी कारचा स्फोट झाला, तिथे एनएसजीचं तपास पथक पुरावे गोळा करत आहे.

दिल्लीतील स्फोटापूर्वी जम्मू-काश्मीर पोलिसांनी 10 नोव्हेंबर रोजी सात जणांना अटक केल्याचा दावा केला होता. पोलिसांचं म्हणणं आहे की, हे लोक बंदी घालण्यात आलेल्या कट्टरपंथी संघटना जैश-ए-मोहम्मद आणि अन्सार गझवत-उल-हिंद यांच्याशी संबंधित आहेत. मात्र या अटकेवर आरोपींचे कुटुंबीय प्रश्न उपस्थित करत आहेत.

दरम्यान, सुरक्षा यंत्रणा अटक केलेले डॉ. अदील, डॉ. मुझम्मिल शकील आणि शाहीन सईद यांच्यामध्ये काही नेटवर्क लिंक आहे का, हे शोधण्याचा प्रयत्न करत आहेत.

डॉक्टर उमर नबीवर संशय, कुटुंबाला धक्का

दक्षिण काश्मीरमधील पुलवामाचा रहिवासी असलेला डॉ. उमर नबी याला दिल्लीतील लाल किल्ला मेट्रो स्टेशनजवळ झालेल्या कार स्फोटाचा मुख्य संशयित मानलं जात आहे.

यावर त्यांच्या कुटुंबाने आश्चर्य व्यक्त केलं आहे. डॉ. उमर निर्दोष आहे आणि तो गेल्या अनेक महिन्यांपासून आपल्या कामात व्यस्त होता, असं त्यांनी सांगितलं.

तपास यंत्रणांनी दिलेल्या माहितीनुसार, 34 वर्षीय डॉ. नबी हाच पांढऱ्या रंगाची हुंडई आय-20 कार चालवत होता. याच कारमध्ये लाल किल्ला मेट्रो स्टेशनच्या पार्किंगजवळ स्फोट झाला होता.

बीबीसी या दाव्याला दुजोरा देत नाही.

तपास अधिकार्‍यांच्या म्हणण्यानुसार, स्फोटात वापरलेली कार आणि हरियाणातील फरिदाबादमध्ये पकडलेल्या दहशतवादी गटामध्ये काही संबंध असण्याची शक्यता दिसत आहे.

सोमवारी लाल किल्ल्याजवळ झालेल्या स्फोटानंतर, या ठिकाणी सार्वजनिक हालचालींवर बंदी घालण्यात आली होती.

फोटो स्रोत, ANI

फोटो कॅप्शन, सोमवारी लाल किल्ल्याजवळ झालेल्या स्फोटानंतर, या ठिकाणी सार्वजनिक हालचालींवर बंदी घालण्यात आली होती.

अलीकडेच फरिदाबाद पोलिसांनी मोठ्या प्रमाणात स्फोटक साहित्य जप्त केलं होतं, आणि आता त्या प्रकरणाचा तपास दिल्ली स्फोटाशी जोडून केला जात आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, प्राथमिक तपासात डॉ. उमर नबीचं नाव जैश-ए-मोहम्मद आणि अन्सार गझवत-उल-हिंद या कट्टरपंथी संघटनांशी संबंधित आंतरराज्य नेटवर्कशी जोडलं जात आहे. परंतु, पोलिसांनी अद्याप कोणत्याही अधिकृत अटकेला दुजोरा दिलेला नाही.

कुटुंबातील त्याच्या वहिनी मुजम्मिला यांनी शुक्रवारी डॉ. नबीशी बोलणं झाल्याचं सांगितलं.

पोलिसांनी त्यांचे पती, सासू आणि दीर यांना सोबत नेलं आहे. नंतर पोलिसांनी नबीच्या वडिलांनाही ताब्यात घेतल्याचं त्यांनी सांगितलं.

उत्तर प्रदेशातील सहारनपूरमधून अटक

जम्मू-काश्मीर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 7 नोव्हेंबर रोजी उत्तर प्रदेशामधील सहारनपूर येथून डॉ. अदील अहमद राथरला अटक करण्यात आली. त्याच्या आधार कार्डवर अनंतनागचा पत्ता आहे. ही अटक सहारनपूरच्या अंबाला रोडवरील फेमस हॉस्पिटलमधून करण्यात आली होती.

डॉ. अदीलवर कट्टरपंथी संघटना जैश-ए-मोहम्मदच्या समर्थनार्थ पोस्टर लावल्याचा आरोप आहे. तो जम्मू-काश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यातील रहिवासी आहे. पोलिसांचं म्हणणं आहे की, त्याने अनंतनागमध्ये जैश-ए-मोहम्मदच्या समर्थनार्थ पत्रकं लावली होती.

पोलिसांचं म्हणणं आहे की, तपासादरम्यान श्रीनगर पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासलं, ज्यात डॉ. अदील पोस्टर लावताना दिसला. याच फुटेजच्या आधारावर त्याला सहारनपूरहून अटक करण्यात आली.

ग्राफिक्स

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, डॉ.अदील सुमारे तीन वर्षांपासून सहारनपूरमध्ये राहत होता. तो मानकमऊ परिसरातील एका खासगी शाळेजवळच्या भाड्याच्या घरात राहात होता.

या काळात त्याने व्ही-ब्रॉस आणि फेमस मेडिकेअर हॉस्पिटलमध्ये नोकरी केली. त्याआधी तो अनंतनागमधील सरकारी मेडिकल कॉलेजमध्ये वरिष्ठ निवासी डॉक्टर म्हणून कार्यरत होता.

तो 24 ऑक्टोबर 2024 पर्यंत जीएमसी अनंतनागमध्ये कार्यरत होता. उत्तर प्रदेश पोलिसांनी सहारनपूरमधील हॉस्पिटलमध्ये जाऊन त्याच्या नोंदी तपासल्या आणि कर्मचाऱ्यांची चौकशी केली. अदीलचं अंबाला रोडवरील अॅक्सिस बँकेत खातं असल्याचं तपासादरम्यान पोलिसांना कळलं.

डॉ. अदीलचा विवाह 4 ऑक्टोबर 2025 रोजी जम्मू-काश्मीरमध्ये झाला होता. तो 26 सप्टेंबर रोजी सुट्टीवर गेला होता आणि काही कर्मचाऱ्यांना त्याने लग्नाची पत्रिकाही दिली होती. अदीलच्या अटकेनंतर हॉस्पिटल प्रशासनाने त्याच्या नावाची नेम प्लेट काढून टाकली आहे.

हॉस्पिटलचं काय म्हणणं आहे?

फेमस मेडिकेअर हॉस्पिटलचे व्यवस्थापक मनोज मिश्रा म्हणाले, "जानेवारी-फेब्रुवारी 2025 मध्ये रुग्णालयात फिजिशियनचं पद रिक्त होतं, त्यामुळे मार्च महिन्यात अदीलची नेमणूक करण्यात आली होती. अटकेनंतर हॉस्पिटलने त्याच्या सेवा समाप्त केल्या आहेत."

स्थानिक पोलीस तपास करत आहेत, पण यावर भाष्य करणं टाळत आहेत. सहारनपूरचे सिटी एसपी व्योम बिंदल यांनी माध्यमांना सांगितलं की, "हे प्रकरण जम्मू-काश्मीर पोलिसांचं आहे, आणि उत्तर प्रदेश पोलिसांनी केवळ सहकार्य केलं आहे."

पोलीस आता सहारनपूरमध्ये अदील कोणाच्या संपर्कात होता, हे शोधण्याचा प्रयत्न करत आहेत. यापूर्वी डॉ. अदील अहमद राथर सहारनपूरमधील व्ही ब्रॉस हॉस्पिटलमध्येही काम करत होता.

दिल्लीतील कार स्फोटानंतर राजधानीसह इतर अनेक राज्यांमध्येही सुरक्षा वाढवण्यात आली आहे.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, दिल्लीतील कार स्फोटानंतर राजधानीसह इतर अनेक राज्यांमध्येही सुरक्षा वाढवण्यात आली आहे.

"डॉ. अदील यांनी इथं सुमारे चार महिने सेवा दिली होती. ते मेडिसिन तज्ज्ञ म्हणून काम करत होते," अशी माहिती हॉस्पिटलच्या प्रशासक डॉ. ममता वर्मा यांनी दिली.

या हॉस्पिटलमधील नोकरी सोडून 28 फेब्रुवारीपासून त्यानं फेमस हॉस्पिटलमध्ये काम सुरू केलं होतं.

अदील अहमद राथरसोबत काम करणाऱ्या काही लोकांनी नाव प्रसिद्ध न करण्याच्या अटीवर सांगितलं की, अदीलने त्याचा साखरपुडा झाल्याचं सांगितलं होतं. त्याची भावी वधू पण डॉक्टर असून ती जम्मू-काश्मीरमधीलच असल्याचं त्यानं म्हटलं होतं.

त्याचबरोबर त्याच्या एका सहकारी डॉक्टरांनी सांगितलं की, अदीलला वैद्यकीय विषयाचं उत्तम ज्ञान होतं आणि यावर अनेकदा चर्चा व्हायची. मात्र, त्याचा वैयक्तिक संपर्क फार कमी होता.

डॉक्टर कुठे राहत होते, याबाबत फारशी माहिती उपलब्ध नाही. मात्र, त्याच्यासोबत काम करणाऱ्यांनी सांगितलं की, ते ऑटोतून हॉस्पिटलमध्ये यायचे आणि जेवण ऑनलाइन मागवत असत.

हरियाणातील फरिदाबादमधून अटक

हरियाणातील धौज येथील अल-फलाह विद्यापीठात शिकवणाऱ्या डॉ. मुझम्मिल शकीलला पोलिसांनी अटक केली आहे. या संयुक्त कारवाईदरम्यान पोलिसांनी डॉ. मुझम्मिल शकीलकडून आक्षेपार्ह साहित्य मिळाल्याचा दावा केला आहे.

डॉ. मुझम्मिलला 30 ऑक्टोबर रोजी अटक करण्यात आली होती. तपासादरम्यान त्याच्या भाड्याच्या घरात स्फोटक साहित्य लपवून ठेवल्याचे उघड झाल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे.

फरिदाबादचे पोलीस आयुक्त सतेंद्र गुप्ता म्हणाले, "मुझम्मिल अल-फलाह विद्यापीठात शिकवायचा. त्याच्याकडून एक किर्निकोव्ह रायफल, एक पिस्तूल आणि टायमर जप्त करण्यात आला आहे."

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एक कार शाहीन सईदच्या नावावर नोंदणीकृत असल्याची आढळून आली आहे. त्यानंतर शाहीनलाही ताब्यात घेण्यात आलं आहे.

"360 किलो ज्वलनशील पदार्थ जप्त करण्यात आले आहे. पण ते आरडीएक्स नाही," असं सतेंद्र गुप्ता यांनी सांगितलं.

दिल्ली येथील लाल किल्ल्याजवळ झालेल्या स्फोटानंतर जम्मू-काश्मीरमध्येही सुरक्षा वाढवण्यात आली आहे. पुलवामामध्ये वाहनांची तपासणी करत असताना सुरक्षा कर्मचारी.

फोटो स्रोत, ANI

फोटो कॅप्शन, दिल्ली येथील लाल किल्ल्याजवळ झालेल्या स्फोटानंतर जम्मू-काश्मीरमध्येही सुरक्षा वाढवण्यात आली आहे. पुलवामामध्ये वाहनांची तपासणी करत असताना सुरक्षा कर्मचारी.

दरम्यान, डॉक्टर मुझम्मिलची आई नसीमा यांनी पीटीआय वृत्तसंस्थेला सांगितलं की, "त्याला अटक झाल्याची माहिती आम्हाला इतरांकडून समजली. आम्ही त्याला भेटायचा प्रयत्न केला, पण पोलिसांनी भेटू दिलं नाही."

मुझम्मिलला अटक केल्यानंतर फरिदाबादमधून महिला डॉक्टर शाहीन सईदला ताब्यात घेण्यात आलं आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, मुझम्मिलच्या जवळ सापडलेली कार ही शाहीनची असल्याचं सांगितलं जात आहे.

मात्र, पीटीआयच्या वृत्तानुसार, पुलवामा येथे राहणारा डॉ. मुझम्मिलचा भाऊ आजाद शकीलनं त्याच्या भावावर खोटे आरोप लावले जात असल्याच सांगितलं. तो गेल्या तीन वर्षांपासून दिल्लीमध्ये डॉक्टर म्हणून काम करत आहे. तो म्हणाला, 'आम्हाला त्याला भेटू दिलं जात नाहीये. तो वर्षातून फक्त दोनदाच घरी यायचा'.

लखनऊ कनेक्शनचा तपास

मंगळवारी पोलिसांनी फरिदाबाद येथून ताब्यात घेतलेल्या शाहीन सईदच्या लखनऊ येथील घराची तपासणी केली.

लखनऊमध्ये डॉ. शाहीन सईदचे कुटुंबीय लालबाग येथील खंडारी बाजारात राहतात. शाहीनला दोन भाऊ आहेत. मोठा भाऊ शोएब सईद वडिलांसोबत राहतो, तर परवेज सईद आयआयएमच्या मडियांव भागाजवळ राहतो.

तिचे वडील सईद अहमद अन्सारी म्हणाले, "माझी तीन मुले आहेत. शाहीन सईद दुसऱ्या क्रमांकाची आहे. तिने एमबीबीएस आणि एमडी अलाहाबाद मेडिकल कॉलेजमधून पूर्ण केलं आहे."

दिल्लीतील लाजपत नगर मार्केटमध्ये पोलिसांनी सुरक्षा व्यवस्था वाढवली आहे.

फोटो स्रोत, ANI

फोटो कॅप्शन, दिल्लीतील लाजपत नगर मार्केटमध्ये पोलिसांनी सुरक्षा व्यवस्था वाढवली आहे.

सईद अहमद अन्सारी म्हणाले, "तुम्ही जे मला सांगत आहात (बेकायदा काम) त्यावर माझा विश्वास बसत नाही... पोलिसांनी अद्यापपर्यंत माझ्याशी संपर्क केलेला नाही."

शाहीन सईदचा भाऊ परवेझ अन्सारीच्या घराचीही पोलिसांनी सहारनपूर आणि लखनऊमध्ये तपासणी केली आहे. मंगळवारी (11 नोव्हेंबर) यूपी एटीएस आणि जम्मू-काश्मीर पोलिसांनी शाहीन सईदच्या वडिलांच्या घराचीही झडती घेतली.

सईद अन्सारी यांनी सांगितलं की, ते परवेझशी दर आठवड्याला बोलत असतात. परवेझ इंटीग्रल युनिव्हर्सिटीमध्ये शिकवतो. तर एक महिन्यापूर्वी त्यांचं शाहीनशी बोलणं झालं होतं आणि दीड वर्षांपूर्वी ते तिला भेटले होते.

"शाहीन सईद अनेक वर्षांपासून इथं राहत नाहीत. तिचं येणं जाणं क्वचितच असतं," असं तिच्या शेजारी राहणाऱ्या एकानं नाव न प्रसिद्ध करण्याच्या अटीवर सांगितलं.

अटक आधी, नंतर स्फोट; अनेक प्रश्न उपस्थित

जम्मू-काश्मीर पोलिसांनी दावा केला आहे की, ते एका नेटवर्कवर काम करत होते. ही संयुक्त कारवाई उत्तर प्रदेश आणि हरियाणातील पोलिसांच्या सहकार्याने करण्यात आली.

जम्मू-काश्मीर पोलिसांच्या माहितीनुसार, "ही कारवाई दीर्घकाळ चाललेल्या देखरेख आणि गुप्त माहितीच्या आधारे करण्यात आली."

हा गट जम्मू-काश्मीरच्या बाहेर सक्रिय होता आणि दहशतवादाच्या समर्थनार्थ प्रचार करणं, तरुणांना भडकावणं आणि दहशतवादी कारवायांसाठी साहित्य गोळा करणं यावर काम करत होता, असं तपासात समोर आल्याचा पोलिसांनी दावा केला आहे.

काश्मीर पोलिसांचा दावा आहे की, छाप्यांदरम्यान अनेक डिजिटल उपकरणं, पोस्टर्स आणि इलेक्ट्रॉनिक रेकॉर्ड जप्त करण्यात आले आहेत. संशयित आरोपी बंदी घालण्यात आलेल्या संघटनांची विचारधारा पसरवत होते, हे यावरून स्पष्ट होतं.

दिल्लीत स्फोट झालेल्या ठिकाणचं दृश्य

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, दिल्लीत स्फोट झालेल्या ठिकाणचं दृश्य ()

या प्रकरणात बेकायदेशीर क्रियाकलाप (प्रतिबंध) कायदा (यूएपीए) अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

'या स्फोटाचा कट रचणाऱ्यांना सोडलं जाणार नाही, सर्व जबाबदार व्यक्तींना कडक शिक्षा होईल,' असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. भूतानच्या दौऱ्यावर असताना त्यांनी हे भाष्य केलं.

दरम्यान, या घटनेवरून विरोधकांनी केंद्र सरकारला धारेवर धरलं आहे. काँग्रेसच्या प्रवक्त्या सुप्रिया श्रीनेत यांनी एक्सवर लिहिलं की, "देशाची राजधानी दिल्लीत झालेल्या स्फोटात 13 जणांचा मृत्यू झाला. कालच फरिदाबादमध्ये 360 किलो स्फोटकं जप्त करण्यात आली. ते इथंपर्यंत कसं आलं, किती मोठा अनर्थ होऊ शकला असता."

त्यांनी म्हटलं की, "अवघ्या 7 महिन्यांपूर्वी पहलगाममध्ये भयंकर दहशतवादी हल्ला झाला होता. आता दिल्लीमध्ये हे घडलं, याची जबाबदारी कोणाची? कुठं आहेत गृहमंत्री? पंतप्रधान कुठे आहेत?"

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)