'स्फोटाचा आवाज ऐकून मी तीन वेळा पडलो आणि सावरलो'; लाल किल्ला मेट्रो स्टेशन स्फोटातील प्रत्यक्षदर्शीनं काय सांगितलं?

प्रत्यक्षदर्शींनी काय पाहिले?

फोटो स्रोत, ANI

फोटो कॅप्शन, वली उर रहमान

सोमवारी (10 नोव्हेंबर ) दिल्लीतील लाल किल्ला मेट्रो स्टेशनजवळ झालेल्या स्फोटात 8 जणांचा मृत्यू झाला. त्यानंतर सरकारने दिल्लीत हाय अलर्ट जारी केला आहे.

हा स्फोट इतका मोठा होता की त्यानंतर आपण सुन्न झालो असे प्रत्यक्षदर्शींनी म्हटले आहे.

एका ज्येष्ठ नागरिकाने म्हटले की 'हा स्फोट इतका मोठा होता की घराच्या खिडक्या देखील हादरल्या.'

त्याच वेळी घटनास्थळापासून काही अंतरावर दुकान चालवत असलेल्या दुकानदाराने म्हटले की 'हा स्फोट इतका भयंकर होता की तो ऐकल्यानंतर मी तीन वेळा पडलो आणि पुन्हा सावरलो.'

घटनास्थळावर उपस्थित असलेल्या एका व्यक्तीने सांगितले की त्याने गाड्यांमधून काही जणांना बाहेर काढले.

प्रत्यक्षदर्शींनी काय सांगितलं?

बीबीसी हिंदीचे प्रतिनिधी दिलनवाज पाशा हे या घटनेचे प्रत्यक्षदर्शी वीरू सिंधी यांच्याशी बोलले. सिंधी यांनी सांगितले की या घटनेनंतर त्यांनी अनेक जणांना जखमी अवस्थेत पाहिले.

दिल्ली स्फोट

फोटो स्रोत, Getty Images

त्यांनी सांगितले की, ट्राफिक सिग्नलवर वाहने थांबलेली होती त्याच वेळी मोठा स्फोट झाला. त्यानंतर सहा सात वाहनांना आग लागली. काही जण आपल्या वाहनांतून उतरले आणि पळू लागले. मी दिल्ली पोलिसांसोबत मिळून जखमींना वाहनातून बाहेर काढले.

वीरू सिंधी यांनी सांगितले की या स्फोटामुळे जवळच असलेल्या पोलीस चौकीचे देखील नुकसान झाले आहे.

'स्फोट ऐकून मी तीन वेळा पडलो'

राजधर पांडे नावाच्या एका स्थानिक व्यक्तीने ANI ला सांगितले की "मी घराच्या गच्चीवरुन आगीच्या ज्वाळा पाहिल्या. त्यानंतर काय झालं हे पाहण्यासाठी मी खाली आलो. जोरात आवाज आला. माझ्या बिल्डिंगची खिडकी हलली. माझं घर गुरुद्वाऱ्याजवळ आहे."

राजधर पांडे

फोटो स्रोत, ANI

फोटो कॅप्शन, राजधर पांडे

स्थानिक दुकानदार वली उर रहमान यांनी ANI ला सांगितलं की ज्या वेळी स्फोट झाला त्यावेळी ते दुकानावर बसलेले होते. ते म्हणाले, स्फोट इतका मोठा होता की असा आवाज मी आजवर ऐकला नव्हता. स्फोटानंतर मी तीन वेळा पडलो आणि नंतर सावरलो. त्यानंतर आजूबाजूच्या लोकांना पळापळ सुरू केली. त्यानंतर मी देखील माझं दुकान सोडून पळून गेलो.

अँब्युलन्स ड्रायव्हर मोहम्मद असद यांनी सांगितलं की स्फोटानंतर ते जेव्हा घटनास्थळी पोहचले तेव्हा अनेक जण जखमी होते. अनेक वाहनांना आग लागली होती.

जीशान नावाच्या एका ऑटो ड्रायव्हरने सांगितलं की त्यांच्या समोरच काही फुटांच्या अंतरावर एक कार होती, तिचा मोठा स्फोट झाला.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)