इम्रान खान यांच्या बहीण अलीमा सध्या पाकिस्तानात एवढ्या चर्चेत का आहेत?

फोटो स्रोत, FAROOQ NAEEM/AFP via Getty Images
- Author, फरहत जावेद
- Role, बीबीसी प्रतिनिधी
अलीमा खान इस्लामाबादपासून सुमारे एक तासाच्या अंतरावर असलेल्या आदियाला तुरुंगात दर मंगळवारी जातात. याच कडक सुरक्षा असलेल्या तुरुंगात अलीमा यांचा भाऊ आणि पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान शिक्षा भोगत आहेत.
त्यांची गाडी तिथं पोहोचण्यापूर्वीच पोलीस रस्ता अडवतात. तुरुंगाच्या प्रवेशद्वारासमोर अनेक किलोमीटरपर्यंत चेकपोस्ट लावलेल्या असतात.
गणवेशधारी आणि साध्या वेशातील अधिकारी वाहनं थांबवतात आणि कुणाला पुढे जाऊ द्यायचं आणि कुणाला थांबवायचं, हे ठरवतात.
वातावरण तापलेलं आणि तणावपूर्ण आहे, तरीही प्रत्येक वेळी प्रचंड गर्दी जमा होते. गडद निळ्या रंगाची सलवार-कमीज आणि काळे जाकीट घातलेला एक माणूस कॅमेऱ्यासमोर अगदी तशाच पवित्र्यात उभा राहतो, जसे इम्रान खान कॅमेरासमोर उभे रहायचे.
जवळच कराचीहून आलेली एक वृद्ध महिलादेखील उभी असते. ती सांगते की, ती दर आठवड्याला आपलं कुटुंब सोडून ती फक्त या तुरुंगाच्या भिंतीबाहेर उभी रहायला येते.
गर्दीतील प्रत्येकजण इम्रान खान यांच्या बहीण असलेल्या अलीमा यांची वाट पाहत असतं. पाकिस्तान तहरीक-ए-इंसाफमध्ये त्या कोणत्याही अधिकृत पदावर नाहीत.
पण आता त्याच इम्रान खान आणि बाहेरील उर्वरित जगामधील सर्वात महत्वाचा दुवा बनलेल्या आहेत. अलीमा त्यांच्या भावाचे शब्द, त्यांच्या चिंता आणि त्यांचा संघर्ष लोकांसमोर मांडतात.
जेव्हा त्या गाडीतून उतरतात, तेव्हा लोक त्यांच्या दिशेने धावत येतात. पत्रकार आणि व्लॉगर्सना त्या सांगतात की, "माझा भाऊ सर्वात मोठ्या पक्षाचा अध्यक्ष आहे, लवकरच त्याला पूर्णपणे वेगळं पाडलं जाईल."
त्या आदियाला तुरुंगाबाहेर आल्या की, अनेकदा वातावरणाला राजकीय नाट्यमयता प्राप्त होते. पत्रकार, सोशल मीडिया इन्फ्लूएन्सर्स, युट्यूबर्स आणि पक्षाचे कार्यकर्ते असे अनेक जण अलीमा यांना इम्रान खान यांना भेटण्यासाठीची परवानगी मिळते की नाही, हे पाहण्यासाठी गर्दी करतात. बहुतेक वेळा त्यांना परवानगी मिळत नाही.
इम्रान खान यांची सत्ता ते तुरुंगवासाची कहाणी
भ्रष्टाचाराविरुद्ध लढण्याचं आणि कमकुवत झालेली अर्थव्यवस्था सुधारण्याचं आश्वासन देऊन इम्रान खान जुलै 2018 मध्ये पाकिस्तानचे पंतप्रधान बनले होते.
परंतु त्यांचे टीकाकार आणि प्रतिस्पर्धी त्यांना देशातील शक्तिशाली अशा लष्कराच्या हातातील बाहुलं म्हणूनच पाहत राहिले. या विरोधकांनी इम्रान खान यांच्यावर असा आरोप केला की, लष्करानेच निवडणूक प्रक्रियेत हस्तक्षेप करून त्यांना सत्तेपर्यंत पोहोचवलं.
विश्लेषकांचं असं म्हणणं आहे की, इम्रान खान यांनी त्यांच्या कार्यकाळातील बहुतेक काळ लष्करासोबत जवळून काम केलं आहे.
असं मानलं जातं की ते तत्कालीन लष्करप्रमुख जनरल कमर जावेद बाजवा आणि त्यांचे उत्तराधिकारी जनरल फैज हमीद यांच्यावर खूप अवलंबून होते. फैज हमीद त्यावेळी गुप्तचर प्रमुख म्हणून काम करत होते. इम्रान खान या दोन्ही अधिकाऱ्यांना आपले जवळचे सहकारी मानत असत.
इम्रान खान यांना सत्तेत आल्यानंतर चार वर्षेदेखील पूर्ण झाली नव्हती तेव्हाच त्यांच्या राजकीय विरोधकांनी त्यांच्याविरोधात संसदेत अविश्वास प्रस्ताव मंजूर केला आणि त्यांना सत्तेवरून हाकलून लावलं.
अशा प्रकारे इम्रान खान हे पाकिस्तानच्या इतिहासात पंतप्रधान पदावरून काढून टाकण्यात आलेले पहिले पंतप्रधान बनले.
वृत्तांमध्ये असाही दावा करण्यात आला आहे की, त्यांचे लष्करातील वरिष्ठ अधिकाऱ्यांशी असलेले संबंध बिघडले होते. अण्वस्त्रधारी असलेल्या पाकिस्तानमध्ये पडद्यामागील खरी सत्ता ही लष्कराचीच असते, असा एक सर्वसामान्य असा समज आहे.
जेव्हा अलीमा यांना विचारलं जातं की, त्यांच्या भावाने त्याच्या कारकिर्दीत संसद मजबूत का केली नाही आणि लष्कराचा प्रभाव कमी करण्यासाठी प्रयत्न का केले नाहीत, तेव्हा त्या या प्रश्नांवर चिडून म्हणतात की, "ते फक्त तीन-चार वर्षांत व्यवस्था कशी सुधारू शकणार होते? शिवाय, त्यांच्या कारकिर्दीचा बहुतांश काळ हा कोविड-19 चा सामना करण्यात गेला. ते त्यांच्या क्षमतेनुसार परिस्थिती सुधारण्याचा प्रयत्न करत होते."
आज, इम्रान खान यांच्याविरोधात भ्रष्टाचारापासून ते दहशतवादापर्यंत दोनशेहून अधिक खटले चालू आहेत. यातील अनेक खटले हे त्यांच्या अटकेनंतर झालेल्या हिंसक निदर्शनांशी संबंधित आहेत.
त्यांची बहीण अलीमा खान यांच्यावरही दहशतवादाच्या आरोपांसह अनेक आरोप असलेले खटले दाखल आहेत.

फोटो स्रोत, AAMIR QURESHI/AFP via Getty Images
अलीमा सांगतात की, "गेल्या दोन वर्षांपासून आम्ही तुरुंग आणि न्यायालयाच्याच चकरा मारत आहोत, म्हणूनच मी इम्रान खान यांचा संदेश लोकांपर्यंत पोहोचवत आहे. मला असं वाटतं की, त्यांचे संदेशच या सरकारसाठी एक मोठी समस्या बनलेले आहेत."
त्या हे सगळं बोलत असतानाच, एक पोलीस अधिकारी त्यांना कोर्टाचं समन्स बजावतो. त्या पोलीस अधिकाऱ्याला विचारतात, "मी काय केलं?" त्यांना या प्रश्नावर काहीच उत्तर मिळत नाही.
एकीकडे, जेव्हा महागाई आणि राजकीय अस्थिरतेमुळे इम्रान खान त्यांची लोकप्रियता गमावत होते, तेव्हा सत्तेतून बाहेर पडावं लागल्यानेच त्यांना एका वेगळ्या प्रकारची लोकप्रियता मिळत गेली.
ज्या दिवशी इम्रान खान यांना सत्तेवरून काढून टाकण्यात आलं, त्या दिवशी हजारो लोक रस्त्यावर उतरले होते. मे 2023 मध्ये त्यांच्या अटकेनंतर संपूर्ण पाकिस्तानात हिंसक निदर्शने सुरू झाली होती. 9 मे रोजी आदोलकांनी लष्कराचे तळ तसेच लष्कराच्या महत्त्वाच्या ठिकाणांची तोडफोड केली.
इम्रान खान आणि त्यांच्या बहिणीने हे आरोप म्हणजे त्यांना सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी रचलेलं षड्यंत्र असल्याचं म्हटलं आहे. तर दुसऱ्या बाजूला, सरकारचं असं म्हणणं आहे की, ही प्रक्रिया उत्तरदायित्व निश्चित करण्यासाठी आहे.
पाकिस्तानचे गृहमंत्री तलाल चौधरी म्हणतात की, "9 मे रोजीची घटना तुमच्या कॅमेऱ्यांसमोर घडली. ती कुणी केली? पीटीआयने ती केली. तो कट कुणी रचला? त्यांनी तो रचली. त्याचं नेतृत्व कुणी केलं? त्यांनीच केलं. आणि आता ते हे सगळं नाकारतात."
चौधरी पुढे म्हणतात की, "त्यांना त्यांच्या चुकीची शिक्षा मिळेल. आम्ही चर्चेसाठी तयार आहोत, पण आम्ही लोकांच्या समस्यांवर चर्चा करू, त्यांच्या (इम्रानच्या) समस्यांवर नाही."
इम्रान खान यांच्या समर्थकांवर वाढता दबाव
अलीमा खान आदियाला तुरुंगाबाहेर त्यांच्या भावासाठी राजकीय लढाई लढत आहेत, तर इम्रान खान यांच्या पक्षातील इतर सदस्य आपापली लढाई शांतपणे लढत आहेत.
पंजाबमधील गुजरांवाला शहरातील नजमा उन निसा या त्यांच्या 36 वर्षीय मुलाच्या म्हणजेच कासिमच्या निधनामुळे शोकग्रस्त आहेत.
कासिम हे इम्रान खान यांचे कट्टर समर्थक होते. 9 मे रोजी झालेल्या आंदोलनानंतर त्यांना अटक करण्यात आली. तेव्हा, अडीच वर्षांनी तुरुंगातच हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचं निधन झालं.
त्या म्हणतात, "तो एकमेव असा होता, जो कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी काबाडकष्ट करायचा. आता आम्ही त्याच्याशिवाय काय करायचं?"

फोटो स्रोत, ASIF HASSAN/AFP via Getty Images
मुलगा गमावल्यानंतरही इम्रान खान यांच्यावरील त्यांचा विश्वास कमी झालेला नाही.
पुढे त्या सांगतात, "माझा मुलगा म्हणायचा की, तो खान यांच्यासाठी आपला जीव देईल. त्याने आपला जीव दिला. तो नेहमी म्हणायचा की त्याची सुटका झाल्यानंतर तो बानी गाला (खान यांचं निवासस्थान) येथे जाईल."
नजमा म्हणतात की, तुरुंगात असलेल्या लोकांना 'राजकीय कैदी' मानलं पाहिजे.
आपल्या मुलाचा फोटो असलेल्या एका पोस्टरकडे पाहून त्या म्हणतात, "माझ्यासारखं इतर कोणत्याही आईला तिच्या मुलाची वाट पाहावी लागू नये."
राजकीय विश्लेषक आमीर झिया यांचं असं मत आहे की, इम्रान खान यांच्या समर्थकांना आता या सगळ्याची किंमत मोजावी लागत आहे.
ते पुढे सांगतात, "त्यांच्यासाठी सगळ्याच गोष्टी आता पूर्वीपेक्षा अधिक कठीण झालेल्या आहेत. आता त्यांच्यावर अधिक नियंत्रण आलेलं आहे. जर त्यांनी इम्रान खान यांच्या समर्थनार्थ रॅली काढली किंवा ते काहीही बोलले तर त्यांनाही त्याचे परिणाम भोगावे लागतील."
ते सांगतात, "जर कुणी उघडपणे इम्रान खान यांना पाठिंबा दिला तर त्याच्यावरही प्रचंड दबाव येतो."
पाकिस्तानात सध्या इम्रान खान किती प्रभावी?
अनेक राजकीय निरीक्षकांना असं वाटतं की, इम्रान खान यांचा पक्ष आता कमकुवत झाला आहे. त्यांच्या अनेक सहकाऱ्यांना एकतर शांत करण्यात आलं आहे किंवा त्यांना बाजूला करण्यात आलं आहे.
अलीकडेच, अलीमा खान आणि खैबर पख्तूनख्वा प्रांताचे मुख्यमंत्री यांच्यात मतभेद निर्माण झाले आहेत. हा तोच प्रांत आहे, जो अजूनही पीटीआय पक्षाच्या नियंत्रणाखाली आहे. या मतभेदानंतर, मुख्यमंत्र्यांना पदावरून काढून टाकण्यात आलं आहे.
ज्येष्ठ पत्रकार आणि राजकीय विश्लेषक फहाद हुसेन म्हणतात की, "या घटनेवरून असं दिसून येतं की, पक्षात अलीमा खान यांचा प्रभाव वाढतो आहे. एकेकाळी घराणेशाहीच्या राजकारणाला नकार दिला म्हणून हा पक्ष अभिमान बाळगत असे."
यादरम्यान, मे महिन्यात झालेल्या भारत-पाकिस्तान संघर्षानंतर आणि अमेरिकेसारख्या देशांशी संबंध सुधारल्यामुळे पाकिस्तानच्या लष्करी आणि युती सरकारने पुन्हा एकदा आपले पाय घट्टपणे रोवले आहेत.
राजकीय विश्लेषक आमीर झिया यांचं मत असं आहे की, इम्रान खान यांच्यासमोरील सर्वात मोठं आव्हान म्हणजे त्यांचा पक्ष सामान्य लोकांच्या सहानुभूतीचं रूपांतर राजकीय सत्तेत करू शकलेला नाही.
पुढे ते सांगतात की, "दुकानदार किंवा टॅक्सी चालक यांसारखा सामान्य पाकिस्तानी असं मानतो की व्यवस्था इम्रान खान यांच्यावर अन्याय करत आहे."
इम्रान खान यांच्यावरील आरोपांची यादी लांबलचक असूनही, झिया म्हणतात की, "यापैकी कोणताही आरोप लोकांना विश्वासार्ह वाटत नाही. जनता या आरोपांना खरं मानत नाही."
झिया म्हणतात की, भारतासोबतच्या अलीकडच्या तणावानंतर लष्करानं काही प्रमाणात जनतेचा विश्वास परत मिळवला असला तरी, "याचा अर्थ असा नाहीये की इम्रान खान यांनी त्यांचा विश्वास गमावला आहे.
जेव्हा जेव्हा बाह्य धोका निर्माण होतो तेव्हा लोक सैन्यासोबत उभे राहतात. परंतु अंतर्गत राजकारणात कोणताही बदल झालेला नाही. इम्रान खान अजूनही जनतेमध्ये सर्वात लोकप्रिय नेते आहेत.
मात्र, गृहमंत्री तलाल चौधरी या मताशी असहमत आहेत.
ते म्हणतात की, सरकारने चांगली कामगिरी केलेली आहे आणि अर्थव्यवस्थेलाही चांगल्या पद्धतीनं सांभाळलेलं आहे. म्हणूनच, इम्रान खान यांचा पाठिंबा कमी झाला आहे."
पुढे ते म्हणतात, "लोकांना बदल हवे आहेत आणि आम्ही त्यांचं आयुष्य सुधारलं आहे. आता इम्रान खान यांच्यासाठी लोकांच्या मनात कोणतीही जागा नाही."

फोटो स्रोत, Hussain Ali/Anadolu via Getty Images
इम्रान खान म्हणतात की, ते चर्चेसाठी तयार आहेत, पण युती सरकारशी नव्हे, तर पाकिस्तानमध्ये असलेल्या खऱ्या सत्ताकेंद्रांशी.
त्यांच्या बहीण अलीमा खान यांचा दावा आहे की, खऱ्या सत्ताधाऱ्यांनी इम्रान खान यांना देश सोडून जाण्याची किंवा शांतपणे राजकारणातून माघार घेण्याची ऑफर दिली होती, परंतु त्यांनी ती नाकारली.
अलीमा पुढे म्हणतात, "ते इम्रान खान आहेत. ते ना गप्प राहू शकतात, ना ते राजकारणापासून दूर राहू शकतात. ते अशा प्रकारचे व्यक्ती नाहीत.
पाकिस्तानी लष्कर आपण कोणत्याही प्रकारची भूमिका घेतली आहे, या गोष्टीला नकार देते.
बीबीसीला दिलेल्या मुलाखतीत, पाकिस्तानी लष्कराचे प्रवक्ते लेफ्टनंट जनरल अहमद शरीफ चौधरी यांनी गुप्त चर्चेच्या सर्व प्रकारच्या बातम्या फेटाळून लावल्या.
ते म्हणाले की, "आमची भूमिका नेहमीच स्पष्ट राहिलेली आहे. आपापसात चर्चा करणं हे राजकारण्यांचं काम आहे. पाकिस्तानच्या सैन्याला या राजकारणात ओढलं जाऊ नये."
इम्रान खान आणि लष्कर यांच्यातील संघर्ष त्यांच्या कार्यकाळात सुरू झाला. सर्वांत पहिला तेव्हा, जेव्हा त्यांनी आयएसआय प्रमुख जनरल असीम मुनीर यांना काढून टाकलं आणि नंतर तेव्हा, जेव्हा त्यांनी त्याच एजन्सीमधील दुसऱ्या अधिकाऱ्याची म्हणजेच जनरल फैज हमीद यांची बदली करण्यास नकार दिला होता.
आता परिस्थिती बदललेली आहे. इम्रान खान यांनी ज्यांना काढून टाकलं होतं, तेच जनरल असीम मुनीर आता लष्करप्रमुख झालेले आहेत आणि भारत-पाकिस्तान संघर्षानंतर त्यांना फील्ड मार्शल पदावर बढती देण्यात आली आहे. लष्करामध्ये त्यांचा प्रभाव वाढत गेला तसतसे इम्रान खान यांचं राजकीय स्थान कमकुवत झालं आहे.
आदियाला तुरुंगाबाहेर, अलीमा खान यांना पुन्हा एकदा त्यांचा भाऊ असलेल्या इम्रान खान यांना भेटण्यास नकार देण्यात आला आहे. त्या आता राजधानीत परतल्या आहेत, ज्या राजधानीवर एकेकाळी त्यांचा भाऊ राज्य करत होता. परंतु, तिथे पोहोचण्याचा त्यांचा प्रवास दिवसेंदिवस लांबत चालला आहे.
इम्रान खान यांचं कुटुंब आणि अलीमा खान यांची भूमिका
इम्रान खान यांच्या चार बहिणींपैकी, अलीमा खान या सर्वात सक्रिय आणि सार्वजनिक जीवनात दिसणाऱ्या सदस्य आहेत.
त्या एक व्यावसायिकही आहेत. तसंच त्या एका यशस्वी कापड निर्यात कंपनीच्या सह-संस्थापक आहेत. अलीमा शौकत या खानम हॉस्पिटल आणि नमल विद्यापीठाच्या संचालक मंडळावर देखील काम करतात. या दोन्हीही संस्था इम्रान खान यांनी स्थापन केलेल्या ना-नफा संस्था आहेत.
शौकत खानम हॉस्पिटलमध्ये कॅन्सरच्या रुग्णांना मोफत किंवा अत्यंत कमी खर्चात उपचार दिले जातात, तर नमल विद्यापीठ ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाच्या संधी प्रदान करते.
रुग्णालयाच्या सुरुवातीच्या काळात निधी संकलन करण्यात आणि त्याचं संचालन करण्यात अलीमा यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे.
त्यांनी शौकत खानम मेमोरियल ट्रस्टवर मार्केटिंग डायरेक्टर म्हणूनही काम केलं आहे.
अलीमा यांचा विवाह निवृत्त हवाई दल अधिकारी सुहेल आमिर खान यांच्याशी झाला आहे आणि त्यांना दोन मुलं आहेत. त्यांची मुलं आता त्यांना व्यवसायात मदत करतात.
अलीमा स्पष्टवक्तेपणा आणि ठाम मतांसाठी ओळखल्या जातात. अलीमा बरेचदा पीटीआयच्या निषेध सभा, रॅली आणि सामाजिक मोहिमांमध्ये आघाडीवर दिसतात.
त्यांच्या भावाच्या राजकीय आणि सामाजिक कार्यात त्यांचा सक्रिय सहभाग असल्यामुळे त्यांचं कौतुक आणि त्यांच्यावर टीका असं दोन्हीही झालेली आहे. दुबईतील अघोषित मालमत्तेबद्दल त्यांना चौकशीचा सामना करावा लागला आहे.

फोटो स्रोत, Getty Images
इम्रान खान यांच्या पत्नींसोबतचे अलीमा खान यांचे संबंध अनेकदा चर्चेत राहिलेले आहेत. जेमिमा गोल्डस्मिथशी इम्रान यांच्या लग्नादरम्यान, अलीमा यांनी आदरयुक्त अंतर राखलेलं दिसून आलं, परंतु, रेहम खानवर मात्र त्यांनी उघडपणे टीका केली होती.
रेहम खान यांनी दावा केला होता की, अलीमा यांनी त्यांना रागात अनेक मेसेज पाठवले होते. दरम्यान, इम्रान खान यांचे त्यांच्या तिसऱ्या आणि सध्याच्या पत्नी बुशरा बीबीसोबतचे संबंध सामान्य आणि सौहार्दपूर्ण आहेत, असं मानलं जात आहे.
असं असूनही, अलीमा यांचा त्यांच्या भावाच्या वैयक्तिक आणि राजकीय जीवनावर असलेल्या प्रभावाबद्दल नेहमीच चर्चा होत राहिल्या आहेत. इम्रान खान यांच्या इतर बहिणी रुबिना, डॉ. उज्मा आणि नौरीन या सार्वजनिक जीवनापासून दूर राहतात.
त्यांची सर्वांत मोठी बहीण रुबिना यांनी लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये शिक्षण घेतलं आहे. त्यांनी संयुक्त राष्ट्रांमध्ये काम केल्यानंतर आता त्या पाकिस्तानमध्ये राहतात. डॉ. उज्मा व्यवसायाने डॉक्टर आहेत आणि त्या राजकारणापासून दूर राहतात.
इम्रान यांचा चुलत भाऊ हाफिजुल्लाह नियाझी यांच्याशी नौरीन यांचं लग्न झालेलं आहे. त्या लाहोरमधील जमान पार्क येथील कुटुंबाच्या घराची देखभाल खूप काळापासून करत आहे.
इम्रान आणि त्यांच्या बहिणी एका पश्तून कुटुंबात वाढल्या आहेत. त्यांचे वडील, अभियंता इकरामुल्ला खान नियाझी हे मियांवलीच्या नियाझी कुळातील होते, तर त्यांची आई, शौकत खानुम या जालंधरच्या बुर्की कुळातील होत्या. याच बुर्की कुटुंबात क्रिकेटपटू माजिद खान आणि जावेद बुर्की यांचा समावेश आहे.
लाहोरमधील जमान पार्कमधील या मोठ्या घरातच इम्रान खान यांनी क्रिकेट कसं खेळायचं, हे शिकून घेतलं आणि स्वतंत्र विचारसरणी विकसित केली. त्यामुळेच, ते नंतर नावाजलेले क्रिकेटपटू होऊ शकले.
पडद्यामागून सक्रिय राहिल्या अलीमा
अलीमा खान या नेहमीच इम्रान खान यांच्या क्रिकेट आणि राजकीय जीवनात सक्रिय राहिलेल्या असल्या, तरी इम्रान यांनी नेहमीच सार्वजनिक ठिकाणी त्यांच्यापासून अंतर राखलेलं आहे.
पंतप्रधान पदाच्या शपथविधी सोहळ्यात आणि नंतर बुशरा बीबी यांच्यासोबत लग्न करताना इम्रान खान यांनी आपल्या बहिणींना सहभागी करून घेतलेलं नव्हतं. हे त्यांचा प्रभाव कमी झाल्याचे लक्षण मानलं जात होतं.

फोटो स्रोत, Namal Knowledge City
2018 ते 2022 दरम्यान, इम्रान खान पंतप्रधान असताना, अलीमा यांना कोणतीही अधिकृत जबाबदारी देण्यात आली नव्हती, परंतु त्या पडद्यामागे सक्रिय राहिल्या.
त्यांनी शौकत खानम हॉस्पिटल ट्रस्टसाठी निधी संकलन आणि बोर्डाचं काम सुरू ठेवलं. त्या पार्टीचे कार्यक्रम, चॅरिटी डिनर आणि आंदोलनांमध्ये सक्रिय सहभाग घेताना दिसून आल्या.
पाकिस्तानच्या सध्याच्या विखंडीत झालेल्या राजकारणामध्ये अलीमा खान किती लक्ष वेधून घेतात, हे अलीकडेच झालेल्या एका घटनेवरून दिसून आलं.
आदियाला तुरुंगाबाहेर पत्रकार परिषदेदरम्यान त्यांच्यावर अंडी फेकल्याचा व्हीडिओ व्हायरल झाला.
नंतर, अलीमा म्हणाल्या की, "आम्हाला अशा हल्ल्यांची भीती वाटत नाही. आम्हाला कल्पना होती की असं काहीतरी घडू शकतं."
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)











