थायरॉइड कॅन्सर का वाढतोय? नेमकी कारणं कोणती? महत्त्वाची माहिती

फोटो स्रोत, Getty Images
- Author, जस्मीन फॉक्स-स्केली
- Role, बीबीसी फ्यूचर
जगभरात अनेक देशांमध्ये थायरॉइड कॅन्सरचे प्रमाण वाढत आहे. ही वाढ इतर कोणत्याही प्रकारच्या कॅन्सरच्या तुलनेत अधिक वेगाने होत आहे.
अमेरिकेत तर थायरॉइड कॅन्सरच्या वाढीचा वेग इतर कोणत्याही कॅन्सरपेक्षा जास्त आहे.
पण यामागचे कारण काय?
थायरॉइड ग्रंथी ही गळ्याच्या खालच्या भागात, नेमकं सांगायचं तर गळ्याच्या घाटीच्या थोडीशी खाली असते. तिचं काम म्हणजे हृदयाची गती, रक्तदाब, शरीराचे तापमान आणि वजन नियंत्रित करणारे हार्मोन्स तयार करणे.
जेव्हा थायरॉइड ग्रंथीतील पेशी अनियंत्रितपणे वाढत विभाजित होऊ लागतात तेव्हा थायरॉइड कॅन्सर होतो. या पेशी वाढून एक गाठ म्हणजे ट्यूमर तयार होतो. हा ट्यूमर आजूबाजूच्या पेशींच्या समूहांचंही नुकसान करतो आणि शरीराच्या इतर भागापर्यंतही पसरू शकतो.
बहुतांशवेळा थायरॉइड कॅन्सर उपचाराने बरा होतो. पण ज्या वेगाने हा आजार वाढत आहे, ते आरोग्य क्षेत्रातील तज्ज्ञांसाठी चिंताजनक आहे.
बहुतांश प्रकरणे उपचाराने बरी होतात, पण आरोग्यतज्ज्ञांना चिंता आहे की, हा आजार खूप वेगाने वाढत आहे.
अमेरिकेतील सर्व्हेलन्स, एपिडेमिओलॉजी अॅण्ड एंड रिझल्ट्स डेटाबेसच्या (SEER) आकडेवारी नुसार, 1980 ते 2016 दरम्यान अमेरिकेत थायरॉइड कॅन्सरचं प्रमाण तिपटीने वाढलं आहे.
पुरुषांमध्ये हे प्रमाण एक लाख पुरुषांमागे 2.39 वरून 7.54 पर्यंत पोहोचले आहे. महिलांमध्ये हे प्रमाण अधिक आहे. एक लाख महिलांमागे 6.15 वरून 21.28 अशी वाढ झाली आहे.
कॅलिफोर्निया युनिव्हर्सिटी, सॅन फ्रान्सिस्को (UCSF) येथील एंडोक्राइन सर्जन सान्झियाना रोमान सांगतात की, "वैद्यकीय शास्त्रात इतकी प्रगती होऊनही थायरॉइड कॅन्सर हा असा आजार आहे, ज्याचे प्रमाण सातत्याने वाढतच आहे."
थायरॉइड कॅन्सर वाढण्याचे कारण काय?
लहानपणी जास्त प्रमाणात आयनायझिंग रेडिएशनचा संपर्क आल्यास मोठेपणी थायरॉइड कॅन्सर होऊ शकतो, हे कारण अनेक वर्षांपासून माहीत आहे.
चेर्नोबिल अणुभट्टीतील गळतीनंतर (1986) बेलारूस, युक्रेन आणि रशियातील मुलांमध्ये या आजाराचे प्रमाण झपाट्याने वाढले होते.

फोटो स्रोत, Getty Images
जपानमध्ये 1958 नंतर आढळलेल्या थायरॉइड कॅन्सरच्या प्रकरणांपैकी 36% प्रकरणेही अणुबाँबमधून वाचलेल्या लोकांमधली, लहानपणीच्या रेडिएशनशी संबंधित असू शकतात. एका अभ्यासातून ही बाब समोर आली.
परंतु 80 किंवा 90 च्या दशकात अमेरिकेत किंवा इतर अनेक देशांमध्ये असे काही घडले नाही, ज्याचा संबंध आज दिसणाऱ्या वाढीशी जोडता येईल.
त्यामुळे असाही विचार केला गेला की, अधिक तपशीलवार आणि आधुनिकतेने आजाराचं निदान करण्याच्या पद्धतींमुळे या आजारांची माहिती मिळत आहे का?
वैद्यकीय चाचण्यांमधली प्रगती-एक मोठे कारण?
1980 च्या दशकात डॉक्टरांनी पहिल्यांदाच थायरॉइड अल्ट्रासोनोग्राफीचा वापर करायला सुरुवात केली. हे इमेजिंग तंत्रज्ञान आहे, ज्यामध्ये ध्वनी लहरींचा वापर करून थायरॉइड ग्रंथींचं चित्र तयार केलं जातं. यामुळे अतिशय लहान अशा थायरॉइडच्या गाठीही दिसू शकतात. आधी त्या दिसत नव्हत्या.
1990 च्या दशकात डॉक्टरांनी त्या गाठींमधल्या कोशिकांची तपासणी सुरू केली, ज्या कॅन्सरच्या असल्याची शंका होती. या तंत्रज्ञानाला फाईन नीडल एस्पिरेशन बायोप्सी (FNAB) म्हटलं जातं.
अमेरिकेच्या मेरीलँड येथील नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूटमधील तज्ज्ञ कॅरी किताहारा सांगतात की, "पूर्वी डॉक्टर हाताने थायरॉइड ग्रंथीला स्पर्श करून गाठी शोधत असत. पण अल्ट्रासाउंडमुळे अतिशय छोट्या गाठीही ओळखता येऊ लागल्या."
यामुळे लहान आकाराच्या पॅपिलरी थायरॉइड कॅन्सरचं निदान व्हायलाही मदत होऊ लागली.
दक्षिण कोरियामध्ये नॅशनल थायरॉइड कॅन्सर स्क्रीनिंग कार्यक्रम सुरू झाल्यानंतर थायरॉइड कॅन्सरच्या आकडेवारीत वाढ झाली. या उपक्रमाची व्याप्ती कमी झाल्यानंतर थायरॉइड कॅन्सरची आकडेवारीही कमी झाली.
केवळ निदानाचे प्रमाण वाढणं हे थायरॉइड कॅन्सरच्या वाढत्या प्रमाणाचं कारण नसल्याचंही तज्ज्ञ सांगतात.

फोटो स्रोत, Getty Images
इटलीच्या युनिव्हर्सिटी ऑफ कटानियातील एंडोक्रोनोलॉजीचे निवृत्त प्राध्यापक रिकार्डो विनेरी सांगतात की, केवळ निदानामुळे थायरॉइड कॅन्सरची आकडेवारी वाढली असेल तर श्रीमंत देशांमध्ये (जिथे निदानासाठी सर्वोत्तम तंत्रज्ञान आहे) तिथे या आजारात सर्वाधिक वाढ दिसायला हवी होती. पण तसं नाहीये—मध्यम उत्पन्नाच्या देशांतही थायरॉईड कॅन्सरच्या प्रमाणात वाढ दिसते.
सान्झियाना रोमान म्हणतात, "जिथे तपासणीच्या फार सोयी नाहीत, अशा देशांमध्येही थायरॉइड कॅन्सर वाढताना दिसत आहे."
मोठ्या आणि अधिक गुंतागुंतीच्या ट्युमरचं प्रमाण जास्त दिसत असल्याचंही त्या सांगतात.
अगदी सुरुवातीच्या टप्प्यांत निदान झाल्यानंतर आणि उपचारांमध्ये प्रगती होत असली तरीही अनेक देशांत थायरॉईड कॅन्सरने होणाऱ्या मृत्यूचे आकडे कमी झाले नाहीयेत. काही ठिकाणी तर ते वाढले असल्याचंही विनेरी यांचं म्हणणं आहे.
कॅलिफोर्नियामध्ये थायरॉइड कॅन्सर झालेल्या 69 हजार रुग्णांचा अभ्यास करण्यात आला. या रुग्णांमध्ये 2000–2017 या कालावधीत कॅन्सरचे निदान झाले होते.
संशोधकांना आढळून आलं की या कालावधीत रुग्णांची संख्या आणि मृत्यूदर दोन्ही वाढले होते. या वाढीचा ट्यूमरचा आकार आणि कॅन्सरच्या स्टेजशी थेट संबंध नव्हता. त्यावरून लक्षात आलं की, ट्यूमरच्या निदानाव्यतिरिक्त इतरही काही गोष्टीही महत्त्वाच्या आहेत.
2017 मध्ये किताहारा आणि त्यांच्या टीमने 1974-2013 च्या दरम्यान निदान केलेल्या 77 हजारहून थायरॉइड कॅन्सरच्या रुग्णांचे मेडिकल रेकॉर्ड तपासले.
त्यांच्या लक्षात आलं की, थायरॉइड ग्रंथीमधल्या छोट्या पॅपिलरी ट्यूमरच्या रुग्णांमध्ये वाढ झाली होती. त्याचबरोबर मेटास्टेटिक पॅपिरी कॅन्सरमध्येही वाढ झाली होती, जो शरीराच्या अन्य भागांतही पसरला होता.
थायरॉइड कॅन्सरमुळे होणारे मृत्यू हे खूप कमी आहेत. पण अभ्यासातून समोर आलं की, हा मृत्यूदर प्रतिवर्षी 1.1 टक्का दराने वाढत आहे.
किताहारा सांगतात की, या अधिक आक्रमक ट्यूमरच्या वाढीमागे अजून दुसरं कारणही असू शकतं.
लठ्ठपणा हेही एक महत्त्वाचे कारण
थायरॉइडच्या कारणांपैकी एक कारण लठ्ठपणा असू शकतं, जो 1980 च्या दशकापासून, अमेरिका आणि इतर विकसित देशांमध्ये वाढत आहे.
काही संशोधनातून लठ्ठपणा आणि थायरॉइड कॅन्सरच्या जोखमीचा संबंध दिसून आला आहे. उच्च बीएमआय असलेल्या लोकांमध्ये सामान्य बीएमआय असलेल्या लोकांच्या तुलनेत थायरॉइड कॅन्सर होण्याची शक्यता 50 टक्क्यांनी जास्त असते.
उच्च बीएमआयचा संबंध मोठ्या आकाराच्या ट्यूमरशी आणि ज्यामुळे कॅन्सर शरीरात सहजपणे पसरू शकतो अशा ट्यूमरशीही असतो.

फोटो स्रोत, Getty Images
किताहारा म्हणतात, "आमच्या संशोधनात हेही आढळले की बीएमआय उच्च असेल तर थायरॉइड कॅन्सरने होणाऱ्या मृत्यूची जोखीमही अधिक असते."
मात्र, लठ्ठपणा थायरॉइड कॅन्सरचे कारण कसे ठरतो हे अजून स्पष्ट झालं नाही. एक गोष्ट मात्र स्पष्ट आहे—लठ्ठपणा असलेल्या लोकांमध्ये थायरॉइड ग्रंथीचं काम योग्य प्रकारे न होण्याची शक्यता जास्त असते.
उदाहरणार्थ, ज्यांच्यामध्ये थायरॉइड स्टिम्युलेटिंग हार्मोनचे (टीएसएच) प्रमाण अधिक असते, त्यांचा बीएमआयही अधिक असतो. टीएसएच हा पिट्यूटरी ग्रंथीत तयार होणारे हार्मोन आहे. तो थायरॉइड ग्रंथीचे कार्य नियंत्रित करतो.
किताहारा सांगतात, "लठ्ठपणाचे शरीरावर अनेक परिणाम होतात. त्यामुळे सूज (इन्फ्लमेशन), इन्सुलिन रेझिस्टन्स आणि थायरॉइड ग्रंथीच्या कार्यातील बदल- या सर्वांमुळे थायरॉइड कॅन्सर बळावू शकतो.
काही केमिकलही ठरतात कारणीभूत
घरामध्ये सर्वसाधारणपणे वापरल्या जाणाऱ्या अनेक वस्तूंमध्ये आणि सेंद्रिय कीटकनाशकांमध्ये आढळणारे 'एंडोक्राइन डिसरप्टिंग केमिकल्स' (EDC) यासाठी कारणीभूत असू शकतात अशी शंकाही अनेक वैज्ञानिकांना आहे.
ही रसायनं शरीरातील हार्मोन्सची नक्कल करतात, त्यांच्या मार्गात अडथळे आणतात किंवा त्यांच्या कार्यप्रक्रियेत हस्तक्षेप करतात. याची उदाहरणे म्हणजे परफ्लुओरोॲक्टेनॉइक ॲसिड आणि परफ्लुओरोऑक्टेनसल्फॉनिक ॲसिड, जे भांडी, फूड पॅकेजिंगचे पेपर, पर्सनल केअर प्रॉडक्ट्स आणि फायरफायटिंग फोम यांसारख्या अनेक वस्तूंमध्ये आढळतात. मात्र, अशा रसायनांचा संबंध थायरॉइड कॅन्सरशी जोडणारे पुरावे संमिश्र आहेत. काही या गोष्टीचं समर्थन करतात, तर काही करत नाहीत.

फोटो स्रोत, Getty Images
काही संशोधकांचं म्हणणं आहे की, सूक्ष्म घटकही (trace elements) यात भूमिका बजावू शकतात. जीवांना अतिशय कमी प्रमाणात गरज असलेल्या रासायनिक घटकांना सूक्ष्म घटक म्हणतात. ते थायरॉइडच्या कार्यासाठी महत्त्वाचे असतात.
किताहारा सांगतात, "बेटांच्या प्रदेशात थायरॉइड कॅन्सरचा दर खरंच खूप जास्त आहे."
"ज्वालामुखीच्या उद्रेकांशी संबंधित सूक्ष्म घटकांबद्दल अनेक अंदाज लावण्यात आले आहेत. अशा वातावरणात झिंक, कॅडमियम आणि व्हॅनेडियम यांसारखी काही रसायने अशा वातावरणात आढळली आहेत आणि त्याचबरोबर थायरॉइड कॅन्सरचे प्रमाणही जास्त आहे. परंतु या दोन्हींचा थेट संबंध सिद्ध करण्यासाठी योग्य प्रकारे केलेल्या अभ्यासाची कमतरता आहे."
रेडिएशन किंवा किरणोत्साराशी संबंध
मात्र, किताहारा यांच्या मते याचं दुसरंही एक स्पष्टीकरण असू शकतं- ते म्हणजे डायग्नोस्टिक मेडिकल स्कॅनमधून मिळणारे आयोनायझिंग रेडिएशन. 80 च्या दशकानंतर, विशेषतः अमेरिकेत, सीटी आणि एक्स-रे स्कॅन मोठ्या प्रमाणात वाढले आहेत आणि यामध्ये मुलांवरील सीटी स्कॅनचाही समावेश आहे. हे सीटी स्कॅन थायरॉइड ग्रंथीवर मोठ्या प्रमाणात रेडिएशन सोडतात.
जपानमधील अणुबॉम्बमधून वाचलेल्या लोकांवर झालेले संशोधन आणि अशाच प्रकारच्या इतर प्रकारच्या संशोधनातून रेडिएशन आणि थायरॉइड कॅन्समधल्या संबंधांबद्दल जी माहिती मिळाली आहे त्याचा आधार घेऊन आपण अशा रेडिएशन किंवा किरणोत्साराचे संभाव्य परिणाम समजून घेऊ शकतो.
उदाहरणार्थ- अलीकडील एका संशोधनात अंदाज व्यक्त करण्यात आला आहे की, भविष्यात अमेरिकेत दरवर्षी थायरॉइड कॅन्सरचे 3500 रुग्ण हे केवळ सीटी स्कॅनच्या वाढत्या वापरामुळे होऊ शकतात.

फोटो स्रोत, Getty Images
किताहारा सांगतात, "मुलांची थायरॉइड ग्रंथी मोठ्या लोकांच्या थायरॉइड ग्रंथीच्या तुलनेत रेडिएशन किंवा किरणोत्साराच्या परिणामांना प्रभावांना जास्त संवेदनशील असते."
"म्हणूनच सीटी स्कॅनचा वाढता वापर अमेरिकेसह इतर ठिकाणीही थायरॉइड कॅन्सरच्या वाढत्या प्रमाणाचं एक कारण असण्याची शक्यता वर्तवली जात आहे."
हे सर्व घटक एकत्रितपणे परिणाम करत असल्याचीही शक्यता आहे.
रोमन म्हणतात, "कदाचित आपण अनेक घटकांचा एकत्रित परिणाम पाहात आहोत, ज्यामध्ये पर्यावरणीय, चयापचयाशी- आहाराशी संबंधित आणि हार्मोनल घटकांच्या परिणामांचाही समावेश आहे. हे घटक कदाचित आनुवंशिक संवेदनशीलतेवरही परिणाम करत असतील."
बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.











