थायरॉईड असेल तर प्रेग्नन्सी राहण्यात अडचणी येऊ शकतात का?

थायरॉईड असेल तर गर्भधारणेत अडचणी येऊ शकतात का?

फोटो स्रोत, Getty Images

    • Author, डॉ. शिल्पा चिटणीस-जोशी
    • Role, स्त्रीरोग व वंध्यत्वतज्ज्ञ, बीबीसी मराठीसाठी

23-24 वर्षांच्या, इंजिनिअर होऊन चांगल्या पगाराची नोकरी करणाऱ्या स्मार्ट चुणचुणीत मुलीला घेऊन तिची आई आली होती. काय प्रॉब्लेम आहे असं विचारल्या विचारल्या आईने स्फुंदून स्फुंदून रडायला सुरवात केली.

त्यांना शांत केल्यावर त्या म्हणाल्या, "अहो,हिचं लग्न ठरलंय. एकदम चांगलं स्थळ आहे. नेमकी आताच पाळी अनियमित झाली म्हणून हिच्या तपासण्या केल्या आणि 'थायरॉईड' निघालं. आता काय करू? काय सांगू सासरच्यांना? कसं होणार हिचं?”

आईने परत डोळ्याला पदर लावला..

मी थक्क!

"अहो, थायरॉईड हा मुळात एवढा मोठा आजारच नाहीये. ती फक्त हार्मोनची कमतरता आहे. एक गोळी सुरू करू तिला. नियमित गोळी घेतली तर कसलाच प्रॉब्लेम येणार नाही. अगदी प्रेग्नन्सी,डिलिव्हरीमध्ये सुद्धा त्रास येणार नाही. आणि एवढी हुशार,स्मार्ट सून मिळतेय त्यांना. शिकलेली समंजस माणसं असतील सासरची तर प्रॉब्लेम नसणारच त्यांना. सोन्यासारखी मुलगी आहे तुमची. उगाच तिला नर्व्हस करू नका."

मी मुलीच्या होणाऱ्या नवऱ्याला बोलावून घेऊन समजावून सांगितलं आणि तोही खरोखरच समंजस निघाला. त्यानेच मग सासूला आणि बायकोला समजावलं. आता 3 वर्षं झाली. एक गोड मुलगी आहे आणि सुखाचा संसार चालला आहे.

हा अनुभव सांगण्याचा उद्देश असा की, थायरॉईडच्या समस्येचा नको तेवढा बागुलबुवा केला जातो आपल्याकडे. एका साध्या गोळीने सुटणारी ही समस्या आहे. घाबरून जाण्यासारखे काही नाहीये त्यात.

लाल रेष

28 वर्षाची तरुणी. 3 वर्षांपूर्वी लग्न झालेली. ती पाच वर्षांपूर्वी माझ्याकडे आली होती...पाळी अनियमित येत असल्याची तक्रार घेऊन. तेव्हा तिला थायरॉईडचं निदान झालं होतं.

मी तिला गोळ्या सुरू करून त्या नियमित घे असं बजावून सांगितलं होतं, तसंच दोन ते तीन महिन्यांनी तपासणी करून रिपोर्ट्स दाखव असंही सांगितलं होतं. पण ही पेशंट जी गायब झाली ती आताच उगवली होती.

तिला बघून मला धक्काच बसला. कमीतकमी 15 किलोने वजन वाढलं होतं. पूर्ण शरीरावर सूज होती. पाळीचं चक्रही पूर्णपणे अनियमित झालेलं. वर्षभरापूर्वीच एक गर्भपात झालेला आणि आता प्रेग्नन्सी राहत नाही म्हणून ती आली होती.

थायरॉईडच्या गोळ्या तिने लग्नानंतर मनानेच बंद करून टाकल्या. त्याचा परिणाम व्हायचा तोच झाला. कोणीतरी अतिशहाण्या नातेवाईकांनी ‘या गोळ्या घेऊ नको, एकदा घेतल्या की आयुष्यभर घ्याव्या लागतात’ असा सल्ला तिला दिला आणि शिकल्यासवरल्या या मुलीनेही तो मानला.

आता परत गोळ्या सुरू करून महिन्याभरात तिच्या थायरॉईड लेव्हल्स सुधारतीलही, पण थायरॉईडच्या कमतरतेमुळे वाढलेलं प्रचंड वजन कमी करणं हे अग्निदिव्य तिच्या आणि माझ्यासमोर उभं आहे.

लाल रेष

हे दोन प्रातिनिधिक प्रसंग

भारतातील दर 10 व्यक्तींपैकी एका व्यक्तीला थायरॉईडची समस्या आहे. 2021 च्या आकडेवारीनुसार भारतात थायरॉइडचे 4.2 कोटी रुग्ण आहेत.

गरोदर महिलांमध्ये आणि प्रसूतीनंतर पहिल्या 3 महिन्यांच्या कालावधीत थायरॉइडची समस्या 44.3% महिलांमध्ये आढळते.

पण अनेक जणींना आजकाल तिशीच्या आतच थायरॉईडची समस्या निर्माण होताना दिसते. पाळी येण्यातली अनियमितता हे थायरॉईडचं प्रमुख लक्षण.

पाळीमधल्या अनियमिततेमुळे अनेक मुलींच्या मनात थायरॉईडचा धसकाच बसतो, कारण मग पुढे प्रेगनन्सीचा विचार करताना कसं होणार हा प्रश्न त्यांना भेडसवायला लागतो.

त्यामुळेच आज हा विषय घेऊन थायरॉईडच्या समस्येमुळे आरोग्यावर काय आणि कसा परिणाम होतो, थायरॉईडचं निदान झाल्यावर घाबरून जाण्यापेक्षा आपल्या जीवनशैलीत काय बदल करणं गरजेचं आहे, हे सांगूया असा विचार केला.

थायरॉईड म्हणजे काय?

थायरॉईड

फोटो स्रोत, Getty Images

थायरॉइड ही शरीरातील गळ्याच्या भागात फुलपाखरासारख्या आकाराची एक ग्रंथी असते.

या ग्रंथीमधून काही संप्रेरके स्त्रवतात. मेंदू, हृदय, स्नायू व इतर अवयवांचे कार्य नीट सुरू राहावे यासाठी ही संप्रेरके आवश्यक असतात.

थायरॉईड ग्रंथीतून स्त्रवणारी T3 आणि T4 ही संप्रेरके चयापचय, शरीराचे तापमान, हृदयाचे ठोके नियंत्रित करण्यासाठी आवश्यक असतात.

आपल्या अन्नाच्या पचनापासून ते मेंदूच्या कामापर्यंत,नखे,त्वचा यांचे आरोग्य अशा सगळ्या गोष्टींचा या हार्मोनशी संबंध आहे.

या थायरॉईड ग्रंथीच्या कामकाजात बिघाड झाला तर हे संतुलन बिघडू शकतं.

थायरॉइड ग्रंथी शरीरासाठी आवश्यक असलेल्या संप्रेरकांची निर्मिती करू शकली नाही तर त्याला ‘हायपोथायरॉइडिझम’ असे म्हणतात. पण थायरॉइड ग्रंथी अति-क्रियाशील असली तर हायपर थायरॉइडिझम होतो.

अति प्रमाणात कॅफिनचे सेवन केले तर व्यक्तीची जी परिस्थिती होईल, तशीच परिस्थिती हायपर थायरॉइडिझमच्या रुग्णांची होते.

थायरॉईडची समस्या

हायपोथायरॉईडीझम मध्ये थायरॉईड हॉर्मोनची कमतरता असते. त्यामुळे TSH या हॉर्मोन चे प्रमाण जास्त असते. या पेशंटना थायरॉईड हार्मोन गोळीच्या स्वरूपात नियमित दिले जाते.

दुसरा प्रकार हायपरथायरॉईडिझम म्हणजे थायरॉईड हॉर्मोन चे प्रमाण जास्त होते आणि TSH कमी होते. हा प्रकार जरा जास्त गुंतागुंतीचा असतो.

बऱ्याच वेळा यामध्ये शरीराची प्रतिकारशक्ती शरीराविरुद्ध काम करत असते.

या समस्येसाठी जास्त वेगवेगळ्या तपासण्या आणि उपचार लागू शकतात. या पेशंटनी एन्डोक्रिनोलॉजिस्ट म्हणजे हार्मोन्सच्या तज्ज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक असते.

थायरॉईड

फोटो स्रोत, Getty Images

मी पेशंट ना हे नेहमी सांगते की थायरॉईड ची समस्या हा रोग नाही,ती फक्त एक कमतरता आहे.

मधुमेह आणि ब्लड प्रेशर हे रोग खूप वर्षं असल्यास शरीरातील अवयवांवर परिणाम करतात तसे थायरॉईड चे नाही.

थायरॉईड

फक्त एक गोळीने तुम्ही पूर्ण निरोगी राहू शकता मग ही गोळी न घेण्याचा एवढा दुराग्रह का?

एखादी गोळी अगदी आयुष्यभर घ्यावी लागली पण त्याने तुमची तब्येत उत्तम राहणार असली तर काय हरकत आहे? असा तर्कशुद्ध विचार पेशंट का करत नाहीत हे कोडं मला नेहेमीच पडतं.

थायरॉईडची समस्या असताना प्रेगनन्सी प्लॅन करताना...

प्रेग्नन्सी

फोटो स्रोत, Getty Images

Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

तरुण मुलींना प्रेग्नन्सी प्लॅन करायची असेल तर, त्यांच्यासाठी थायरॉईड हॉर्मोनचे प्रमाण योग्य असणे अत्यंत महत्त्वाचे आहे. तसं नसेल तर प्रेग्नन्सी राहण्यात समस्या निर्माण होऊ शकतात.

प्रेग्नन्सी राहिली तरी गर्भपाताचा धोका वाढतो तसेच गरोदरपणात गंभीर गुंतागुंत होण्याची शक्यता वाढते.

गर्भार स्त्रीमध्ये थायरॉईड हॉर्मोन्सची कमतरता असल्यास गर्भाच्या बौद्धिक क्षमतेवरही प्रतिकूल परिणाम होऊ शकतो असे आढळून आले आहे. त्यामुळे बऱ्याच वेळा प्रेग्नन्सीमध्ये फक्त बाळाच्या योग्य वाढीसाठी थायरॉईडच्या गोळीचा छोटा डोस सुरू केला जातो आणि डिलिव्हरी नंतर तो बंद केला जातो.

स्त्रियांमध्ये चाळिशीनंतर या समस्येचे प्रमाण जास्त आहे, पण वर दिलेल्या उदाहरणांप्रमाणे कमी वयातही ही समस्या बऱ्याच वेळा दिसून येत आहे. यामध्ये आनुवंशिकता हा महत्वाचा घटक आहे. आई, मुलगी, मावशी, मावसबहीणी यांमध्ये थायरॉईडची समस्या असू शकते.

त्यामुळे आईला ही समस्या असेल तर मुलीची तपासणी करून घेणे योग्य आहे. चाळिशीनंतर प्रत्येक स्त्रीने दरवर्षी एकदा ही तपासणी करून घ्यायला हरकत नाही. फक्त TSH ची तपासणी केली तरी पुरते आणि ही अजिबात महागाची टेस्ट नाही.

शिवाय जन्मतः प्रत्येक बाळाची थायरॉईडची टेस्ट केली जाते.ती अत्यंत महत्त्वाची असते. जन्मतः थायरॉईडची समस्या असल्याचे निदान वेळेवर झाले नाही तर बाळाच्या शारीरिक आणि बौद्धिक वाढीवर अतिशय गंभीर परिणाम दिसून येतात.

थायरॉईडची समस्या असेल तर काय काळजी घ्यावी?

थायरॉईडसाठी डॉक्टर सहसा एक गोळी देतात. या गोळ्या सुरू केल्यावर डोस अॅडजस्ट होईपर्यंत दर सहा आठवड्याला आणि एकदा डोस सेट झाला की निदान दर तीन महिन्याला TSH ची तपासणी करायला हवी.

बऱ्याच वेळा पेशंट वर्षानुवर्षे तपासणी न करता एकच डोस घेत रहातात. हे चुकीचे आहे. तसंच थायरॉईडची गोळी सकाळी उपाशीपोटी घेऊन अर्धा तास तरी दुसरे काहीही घेऊ नये. चहा सुद्धा अर्ध्या तासाने घ्यावा. गोळीचा योग्य परिणाम होण्यासाठी हे गरजेचे आहे. स्वतःच मनाने डोस वाढवणे आणि कमी करणे हे प्रकार टाळावेत.

थायरॉईड

फोटो स्रोत, Getty Images

कोणतेही वेगळे उपचार घेताना थायरॉईडची गोळी बंद करणे धोकादायक ठरू शकते. आम्ही रोजच अशा केसेस बघतो.

थायरॉईडच्या गोळ्यांची बाटली थंड आणि कोरड्या जागी ठेवावी. खिडकीत, उन्हात, ओल लागेल अशा ठिकाणी ठेवू नये.

थायरॉईडमुळे केस खूप प्रमाणात गळू शकतात. वजन वाढणे, त्वचा कोरडी होणे हे परिणामही दिसतात. बऱ्याच वेळा वजन वाढलेल्या पेशंट थायरॉईड आहे म्हणून वजन जास्त आहे अशी स्वतःची आणि इतरांची समजूत करून घेतात. वेळेवर व्यवस्थित गोळ्या घेतल्या, आहार आणि व्यायाम चालू ठेवला तर वजन आटोक्यात रहायला काहीच प्रॉब्लेम नसतो.

थायरॉईड

वेळेत थायरॉईडचं निदान झालं तर केसांची आणि त्वचेची समस्या गंभीर रूप धारण करण्याआधीच उपचार सुरू करता येतात. त्यामुळे थायरॉईडची टेस्ट करण्याबद्दल डॉक्टरांनी सुचवलं तर लगेच करून घेतलेली उत्तम!

थायरॉईडची समस्या असलेल्या पेशंट्समध्ये कॅलशियमची कमतरता आढळण्याचे प्रमाण जास्त आहे. तसेच थायरॉईड नियंत्रणात नसेल तर कोलेस्टेरॉलचे प्रमाणही वाढू शकते. त्यामुळे या गोष्टींकडेही लक्ष द्यायला हवं.

आयोडीनच्या कमतरतेमुळेही थायरॉईडची समस्या उद्भवू शकते. आपल्याकडे मिठामध्ये आयोडीन असणे बंधनकारक आहे. त्यामुळे हा धोका कमी होतो. काही जण आयोडीनयुक्त मीठ न खाता वेगळे मीठ खातात, त्यांनी हा धोका लक्षात घ्यायला हवा.

थायरॉईडची समस्या ही कोणत्याही प्रकारच्या व्यायामाने कमी होत नाही हे वैद्यकीय सत्य आहे. वजन कमी झाल्यास थायरॉईडचा डोस कमी होऊ शकतो. व्यायाम जरूर करा, पण वेडेवाकडे मानेचे व्यायाम केल्याने थायरॉईडची समस्या दूर होणार तर नाहीच पण मानेचे दुखणे सुरू होऊ शकेल.

या सगळ्या बाबींचा विचार करून जर आपल्या जीवनशैलीत बदल केले, तर थायरॉईडचा बागुलबुवा समोर उभा राहणार नाही.

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही. YouTube मजुकरात जाहिरातींचा समावेश असू शकतो.

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTubeFacebookInstagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)