You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
लग्नाच्या महिन्याभरातच पतीची हत्या केल्याचा नववधूवर आरोप, या कारणामुळे होत आहे 'मेघालय मर्डर'शी तुलना
तेलंगानाच्या गडवालचा रहिवासी असणाऱ्या एका तरुणाचा मृतदेह आढळून आला आहे. त्याच्या लग्नाला अवघे काही महिनेच झाले होते.
कुर्नूल जिल्ह्यातील गलेरू-नागरी कालव्यात या तरुणाचा खून करून त्याचा मृतदेहफेकून देण्यात आल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे.
गंता तेजेश्वर असं या तरुणाचं नाव असून गडवाल पोलिसांनी तेजेश्वरची पत्नी ऐश्वर्या हीच या खुनाची मुख्य आरोपी असल्याचं सांगितलं आहे. मेघालयामध्ये काही दिवसांपूर्वी घडलेल्या 'हनिमून मर्डर' सारखाच हा प्रकार असल्याचं बोललं जातंय.
लग्नाच्या एका महिन्याभरातच पत्नीकडून हत्या झाल्याचा आरोप झाला आहे. तसेच पत्नीने पूर्व प्रियकराशी केलेल्या संगनमतातून हत्या झाल्यानंतर या प्रकरणाची तुलना मेघालयातील प्रकरणाशी केली जात आहे.
जोगुलांबा गडवाल जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक टी. श्रीनिवास यांनी बीबीसीला सांगितलं, "आम्ही या प्रकरणात ऐश्वर्यासह एकूण चार जणांना अटक केली आहे."
नेमकं काय घडलं?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तेलंगानाच्या गडवाल जिल्ह्यातील राजवेदीनगरमध्ये राहणाऱ्या गंता जयराम आणि शकुंतला यांचा धाकटा मुलगा म्हणजेच ज्याचा खून झाला तो गंता तेजेश्वर. जयराम हे निवृत्त कर्मचारी आहेत.
18 जून रोजी गडवाल पोलीस ठाण्यात एक तक्रार दाखल करण्यात आली. 17 जून रोजी घरातून गेलेला तेजेश्वर घरी परत आलाच नसल्याबाबत ही तक्रार दाखल करण्यात आली होती.
तेजेश्वरच्या भावाने गडवाल शहर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत असं म्हटलं होतं की, "17 जूनच्या दिवशी काही लोकांनी तेजेश्वरला एका जमिनीच्या सर्वेक्षणासाठी म्हणून त्यांच्या गाडीत बसवून नेलं."
पोलिसांनी सुरुवातीला भारतीय न्यायसंहितेच्या कलम 134/2025 नुसार तेजेश्वर बेपत्ता असल्याबाबतची तक्रार दाखल केली. आणि या प्रकरणाचा तपास सुरू केला.
तेजेश्वरच्या कुटुंबीयांनी दिलेली माहिती आणि त्याला ज्या गाडीत बसवून नेण्यात आलं त्या गाडीच्या आधारे पोलिसांनी तपास सुरू केला होता.
तेजेश्वरला घेऊन जाणारी कार आंध्र प्रदेशातील कुर्नूल जिल्ह्यातील ओरवाकल्लू मंडलमधील नन्नूर टोल प्लाझा ओलांडून कुर्नूलकडे परत जात असताना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली.
या सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांनी तेजेश्वरचा शोध घेण्यास सुरुवात केली. अखेर 21 जून रोजी पोलिसांना गलेरू-नागरी कालव्यात तेजेश्वरचा मृतदेह सापडला.
पोलीस अधीक्षक श्रीनिवास राव म्हणाले की, तेजेश्वरचा खून करून त्याला या कालव्यात फेकण्यात आलं होतं.
ते पुढे म्हणाले, "आम्ही सीसीटीव्ही आणि तंत्रज्ञानाच्या मदतीने बेपत्ता झालेल्या तेजेश्वरचा शोध घेतला. याच तपासादरम्यान कुर्नुल पोलिसांना एका अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळून आला."
तेजेश्वरच्या पत्नीला पोलिसांनी ताब्यात घेतलं
गडवाल जिल्ह्यातल्या बीचुपल्ली येथील अंजनेयस्वामी मंदिरात 18 मे रोजी तेजेश्वर आणि ऐश्वर्या उर्फ सहस्रा यांचा विवाह झाला होता. ऐश्वर्या कुर्नूल जिल्ह्यातील कल्लूर येथील रहिवासी आहे.
ऐश्वर्याची आई सुजाता या एका खाजगी बँकेत सफाई कर्मचारी म्हणून काम करतात.
गडवाल शहर पोलिसांनी सांगितलं की, "तेजेश्वर आणि ऐश्वर्या यांचं लग्न 13 फेब्रुवारी रोजीच होणं अपेक्षित होतं. त्यावेळी लग्नाच्या आधी ऐश्वर्या घर सोडून निघून गेली आणि नंतर परतली होती. त्यामुळेच त्यावेळी हे लग्न होऊ शकलं नाही असं नातेवाईकांनी आम्हाला सांगितलं."
'शेकडो वेळा कॉल कुणाला'
ऐश्वर्या म्हणाली होती की, तिला तेजेश्वर आवडत नाही म्हणून घर सोडून निघून गेली नव्हती तर लग्नामुळे आईला लग्नामुळे आर्थिक संकटाचा सामना करावा लागतोय म्हणून ती घर सोडून निघून गेली होती.
तेजेश्वरने तिच्यावर त्यावेळी विश्वास ठेवल्याचं तेजेश्वरच्या कुटुंबीयांनी पोलिसांना सांगितलं.
पोलिसांना आढळून आलं की ऐश्वर्याची लग्नाची इच्छा आणि तेजेश्वरच्या दबावामुळे अखेर कुटुंबीयांनी 18 मे रोजी तेजेश्वर आणि ऐश्वर्याचं लग्न लावून दिलं.
पोलीस अधीक्षक श्रीनिवास राव म्हणाले, "तपासात हे आढळून आलं आहे की, ऐश्वर्याचे अनैतिक संबंध होते आणि त्यांच्याशी संगनमत करूनच तिने हा खून घडवून आणला."
पोलिसांना असंही आढळून आलं की, ऐश्वर्याचे ज्याच्याशी अनैतिक संबंध होते त्याच्यासोबत शेकडो फोन कॉल्स देखील झालेले आहेत. त्यामुळे गडवाल पोलिसांनी ऐश्वर्याला अटक करून चौकशी केली आहे.
या प्रकरणात ऐश्वर्या आणि तिच्या आईसह इतर दोघांना ताब्यात घेण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.
श्रीनिवास राव म्हणाले, "या प्रकरणात संशय असलेल्या इतर काही लोकांविरुद्ध तपास सुरू आहे. प्रकरणाची संपूर्ण चौकशी पूर्ण झाल्यानंतर आम्ही सर्व तपशील सांगू शकू."
बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.