मेघालय हनिमून मर्डर प्रकरणात मोठं वळण, आतापर्यंत काय माहिती समोर आलीय? 

मेघालयात बेपत्ता झालेल्या राजा आणि सोनम या नवरा-बायकोच्या प्रकरणानं मोठं वळण घेतलंय.

राजा रघुवंशी आणि सोनम रघुवंशी हे दाम्पत्य हनिमूनसाठी मेघालयात गेले होते. तिथं दीडशे फूट दरीत राजा रघुवंशीचा मृतदेह सापडला, तेव्हापासून पत्नी सोनम रघुवंशी बेपत्ता होती.

सोनमनेच सुपारी देऊन राजाची हत्या केल्याचा आरोप पोलिसांनी केला आहे.

एका आठवड्यानंतर, राजाचा कुजलेला मृतदेह एका दरीत सापडला. तेव्हा त्याचा गळा कापलेला होता. त्याचे पाकीट, सोन्याची अंगठी आणि साखळी गायब होती.

सोनम रघुवंशीनं अखेरीस पोलिसांसमोर आत्मसमर्पण केलंय. तिच्या आत्मसर्पणानंतर या संपूर्ण प्रकरणाला नवं आणि मोठं वळण मिळालं आहे.

मेघालय पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राजा सोनमसहित एकूण चार जणांना अटक करण्यात आली आहे.

सोनम रघुवंशीने उत्तर प्रदेशमधील गाझीपूर येथे आत्मसमर्पण केल्याची माहिती मेघालय पोलिसांनी दिली.

सोनम आणि राजा यांचं 11 मे रोजी लग्न झालं होतं. त्यानंतर 20 मे रोजी ते हनिमूनसाठी निसर्गाने नटलेल्या मेघालय राज्यात गेले. पण 23 मे रोजी म्हणजेच केवळ 13 दिवसांतच या दोघांच्या संसाराचा अंत झाला.

दरम्यान, सोनम रघुवंशींचे वडील देवी सिंह यांनी मेघालय पोलिसांवर दिशाभूल केल्याचा आरोप करत आपल्या मुलीला निष्पाप असल्याचे सांगितले आहे.

तर आज (9 जून) सकाळी या प्रकरणाशी संबंधित माहिती मेघालयचे मुख्यमंत्री कॉनराड संगमा यांनी एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट करत दिली.

मेघालयचे मुख्यमंत्री कॉनराड संगमा यांनी म्हटलं की, "केवळ 7 दिवसांत मेघालय पोलिसांना या खून प्रकरणात मोठं यश मिळालं आहे."

"याप्रकरणी मध्य प्रदेशातील तिघांना अटक करण्यात आली आहे. याशिवाय एका महिलेनं आत्मसमर्पण केलं आहे. आणखी एक आरोपी अजूनही फरार असून त्याला पकडण्यासाठी पोलीस कारवाई सुरू आहे."

दुसरीकडे, मेघालयचे पोलीस महासंचालक इदाशीशा नोंग्रांग यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, पत्नी सोनम रघुवंशीला उत्तर प्रदेशातील गाझीपूर येथे अटक करण्यात आली आहे. तिनं पोलिसांसमोर आत्मसमर्पण केलं.

रात्रभर चाललेल्या छापेमारीदरम्यान पोलिसांनी आणखी तीन आरोपींना अटक केली आहे.

मेघालयच्या डीजीपींनी दिलेल्या माहितीनुसार, "एका व्यक्तीला उत्तर प्रदेशातून पकडण्यात आले, तर इतर दोन आरोपींना एसआयटीनं इंदूरमधून अटक केली. सोनमने नंदगंज पोलीस ठाण्यात आत्मसमर्पण केले आणि त्यानंतर तिला अटक करण्यात आली."

सोनमच्या अटकेनंतर तिचे वडील काय म्हणाले?

सोनम रघुवंशीचे वडील देवी सिंह यांनी पत्रकारांशी बोलताना म्हटले आहे की, "माझी मुलगी सोनम रघुवंशी निष्पाप आहे आणि मला तिच्यावर पूर्ण विश्वास आहे की ती अशा प्रकारची कोणतीही कृती करू शकत नाही."

देवी सिंह म्हणाले, "दोन्ही कुटुंबांच्या आणि दोन्ही मुलांच्या संमतीने लग्न झाले होते. पहिल्या दिवसापासून मेघालय सरकार खोटं बोलत आहे. तिथल्या सरकारने स्पष्ट सांगावं की कोण-कोणाला अटक केली आहे. गाझीपूरमध्ये जाऊन मुलीने स्वतः ढाब्यावरून फोन केला. पोलीस तिथे पोहोचले आणि तिला तिथून घेऊन गेले. माझं सोनमशी अजून बोलणं झालेलं नाही."

"मुलगी हत्या का करेल? जर असं काही असतं, तर ती फिरायला का गेली असती? मी अमित शहा साहेबांना विनंती करतो की, याची सीबीआय चौकशी व्हावी. मेघालय पोलिसांनी एक बनावटीची गोष्ट तयार केली आहे," असंही देवी सिंह म्हणाले.

नेमकं प्रकरण काय?

इंदूरमधील साकार नगरचे रहिवासी 29 वर्षीय राजा रघुवंशी आणि 27 वर्षांची सोनम हे दाम्पत्य हनिमूनसाठी मेघालयला गेले होते. त्यानंतर ते 23 मे रोजी तेथून बेपत्ता झाले.

अखेर 11 दिवसांनी, 2 जून रोजी ईस्ट खासी हिल्समधील वेइसाडोंग धबधब्याजवळ सुमारे 150 फूट खोल दरीत राजा यांचा मृतदेह आढळून आला. मात्र पत्नी सोन बेपत्ता होती.

राजा रघुवंशी यांचा मृतदेह बुधवारी 4 जूनच्या संध्याकाळी मेघालयहून त्यांच्या घरी आणला गेला. मृतदेह पाहून राजा यांचे वडील स्वतःला सावरू शकले नाहीत. आई उमा या तर एका कोपऱ्यात बसून सतत रडत होत्या.

बुधवारी सायंकाळीच नातेवाईक आणि आजूबाजूच्या लोकांच्या उपस्थितीत इंदूरच्या रिजनल पार्क मुक्तिधाममध्ये मृतदेहावर अंतिम संस्कार करण्यात आले.

23 मे रोजी बेपत्ता होण्याच्या एक दिवस आधी हे जोडपे मेघालयातील नोंग्रियाट येथे पोहोचले होते आणि ते शेवटचं शिपारा होमस्टेमधून चेक आउट करताना दिसले होते.

पोलिसांनी काय सांगितलं होतं?

ईस्ट खासी हिल्स जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक (एसपी) विवेक स्येंम यांनी बीबीसी हिंदीला सांगितलं की, "ही हत्या होती, यात काहीही शंका नाही. आम्हाला या घटनेत वापरलेला एक 'दाओ' (एक मोठा धारदार चाकू) ही सापडला आहे. परंतु, अधिक माहितीसाठी आम्ही सध्या शवविच्छेदन अहवालाची (पोस्टमॉर्टम रिपोर्ट) वाट पाहत आहोत."

पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. तत्पूर्वी, राजा रघुवंशी यांची धारदार शस्त्रानं हत्या करण्यात आल्याचं पोलिसांनी मंगळवारी सांगितलं होतं.

कुटुंबीयांच्या म्हणण्यानुसार, 11 मे रोजी लग्नानंतर राजा आणि त्यांची पत्नी सोनम हे 20 मे रोजी हनीमूनसाठी इंदूरहून निघाले होते.

23 मे रोजी दोघेही शिलाँगला पोहोचले, मात्र त्याच दिवसापासून त्यांचा कुटुंबीयांशी संपर्क तुटला.

सोनम आणि त्यांच्या सासू उमा यांच्यात झालेल्या शेवटच्या फोन कॉलमध्ये सोनम यांनी जंगलात फिरायला जाण्याची माहिती दिली होती. त्याचबरोबर उपवासात योग्य आहार मिळालं नसल्याचंही सांगितलं होतं.

राजा यांच्या आईनं सोनम यांना उपवासाचं काहीतरी खाऊन घेण्याचा सल्ला दिला होता आणि फोन आल्यानं बरं वाटलं असं म्हणून त्यांच्यातील संवाद संपला होता.

या संभाषणानंतर राजा आणि सोनम यांच्याशी संपर्क तुटल्याचे राजा यांच्या नातेवाईकांनी सांगितलं होतं.

नातेवाईकांकडून सीबीआय तपासाची मागणी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राजा आणि सोनम यांनी भाड्याने घेतलेल्या स्कूटरच्या जीपीएस रेकॉर्डवरून ते 23 मे रोजी मावक्मा गावात काही काळ थांबले होते. ज्या ठिकाणी राजा यांचा मृतदेह सापडला ते ठिकाण त्या गावापासून 20 किलोमीटर दूर आहे.

इंदूरमध्ये राजा यांच्या कुटुंबीयांनी पोलिसांवर कामात हलगर्जीपणाचा आरोप केला. राजा यांचे पाकिट, दागिने आणि इतर सामान गायब, असल्याचं त्यांनी सांगितलं.

मृत राजा यांचे मोठे भाऊ सचिन रघुवंशी यांनी अपहरण आणि हत्या झाल्याची शक्‍यता व्यक्त करत या प्रकरणाची सीबीआय तपासाची मागणी केली आहे.

'ड्रोनच्या मदतीनं राजा यांचा मृतदेह सापडला'

दाम्पत्य बेपत्ता झाल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांना सर्वांत आधी त्यांनी वापरलेली स्कूटर सापडली होती, अशी माहिती ईस्ट खासी हिल्स जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक विवेक स्येंम यांनी दिली होती.

त्यांनी पुढं सांगितलं की, "आम्ही दोघांना शोधायला सुरुवात केली तेव्हा सर्वप्रथम आम्हाला एक स्कूटर सापडली. बेपत्ता झाल्यानंतर एक दिवसानं त्यांनी भाड्यानं घेतलेली स्कूटर सोहरारिम येथे बेवारस अवस्थेत आढळली."

"त्यानंतर शोध सुरू असताना स्कूटर सापडलेल्या ठिकाणापासून सुमारे 15 किलोमीटर दूर एका खोल दरीत राजा यांचा मृतदेह सापडला."

एसपी विवेक म्हणाले, "हा संपूर्ण परिसर जंगलांनी आणि खोल दऱ्यांनी भरलेला आहे. तपासाचे क्षेत्र सुमारे 150 चौरस किलोमीटर असून हा सर्व परिसर जंगल आणि दऱ्यांमध्ये व्यापला गेलेला आहे."

सुरुवातीचे प्रयत्न अयशस्वी झाल्यानंतर पोलिसांनी ड्रोनची मदत घेतली.

पोलिसांनी सांगितलं की, "राजा यांचा मृतदेह ड्रोनच्या मदतीने शोधता आला. घनदाट जंगल आणि पावसामुळे पोलीस दल आणि बचाव पथकाला अनेक समस्यांचा सामना करावा लागला. त्यामुळेच ड्रोनचा वापर करण्यात आला."

मेघालय पोलिसांना सोनमच्या शोधादरम्यान राजा यांच्या मृतदेहाजवळ रक्तानं माखलेला एक रेनकोट मिळाला होता.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)