दोघांचं प्रेम, पतीची भीती, मग महिला भासवून 60 वर्षांच्या पुरुषाला जिवंत जाळलं आणि...

    • Author, रॉक्सी गागडेकर चारा
    • Role, बीबीसी प्रतिनिधी

सूचना : या बातमीतील काही मजकूर तुम्हाला विचलित करू शकतो

गुजरातमधील पाटण जिल्ह्यातून एक खूपच धक्कादायक घटना समोर आली आहे. एका युवक आणि युवतीने विवाहबाह्य संबंध लपवण्यासाठी एका अज्ञात व्यक्तीची हत्या केली आणि त्याच्या मृतदेहाला जाळलं.

'दृश्यम' या हिंदी चित्रपटापासून प्रेरणा घेऊन युवक-युवतीने ही हत्या केल्याचे सांगितले जात आहे.

पाटण जिल्ह्यातील जाखोतारा गावात विवाहबाह्य संबंधात अडकलेल्या एका तरुण आणि तरुणीवर एका मध्यमवयीन व्यक्तीचा खून केल्याचा आरोप आहे.

हत्या करण्यात आलेल्या या मध्यमवयीन पुरुषाच्या मृतदेहाला तरुणीचे कपडे घालून, त्याला जाळून त्या तरुणीचा मृतदेह म्हणून दाखवण्याचा अयशस्वी प्रयत्न करण्यात आला. त्यानंतर पोलिसांनी आरोपी तरुणी आणि तरुणाला अटक केली.

पोलिसांनी याप्रकरणी 22 वर्षीय गीताबेन अहिर आणि 24 वर्षांचा भरत अहिर या दोघांना अटक केली.

जेव्हा या गुन्ह्याबाबत तथ्यं समोर आली, तेव्हा पोलीस अधिकाऱ्यांनाही धक्का बसला. कारण हत्या करण्यामागचा हेतू फक्त एका मृतदेहाला गीताबेनचा मृतदेह असल्याचे भासवणे हाच होता.

ज्याची हत्या करण्यात आली, त्या व्यक्तीला या विवाहबाह्य संबंधांबद्दल काहीच माहिती नव्हती. तो या दोघांना ओळखतही नव्हता. मात्र, त्याचा यात नाहक बळी गेला.

पोलिसांना जेव्हा हा मृतदेह सापडला, तेव्हा त्यांनी आजूबाजूच्या गावांमध्ये त्याचे फोटो पाठवले. त्यानंतर त्यांना समजलं की, मृत व्यक्तीचं नाव हिरजीभाई सोलंकी आहे.

तो भटकंती करत आपला उदरनिर्वाह करत होता. मृत हिरजीभाई सोलंकी हा दलित समाजातील असल्याचं सांगितलं जातं.

काय आहे नेमकं प्रकरण?

आत्तापर्यंतच्या पोलीस तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, काही वर्षांपूर्वी गीताबेनचं लग्न सुरेश अहिर नावाच्या व्यक्तीशी झालं होतं. गीता ज्या ठिकाणी कामाला जात होती, तिथे भरत अहिर नावाचा एक युवकही काम करत होता.

दोघांमध्ये गेल्या काही काळापासून प्रेमसंबंध निर्माण झाले होते. याची माहिती सुरेश किंवा त्याच्या कुटुंबीयांना नव्हती.

'भरत आणि गीताने पळून जाण्याचा प्लॅन केला होता. परंतु, गीताला शंका होती की, ते पळून गेले तरी नंतर सुरेशचे कुटुंबीय त्यांचा शोध घेऊन, तिला पुन्हा सुरेशच्या घरी पाठवतील.

म्हणूनच, त्या दोघांनी ठरवलं की, जर सुरेशच्या कुटुंबीयांना गीताच्या मृत्यूबाबत माहिती मिळाली, तर ते त्यांचा शोध घेणार नाहीत.'

म्हणून, भरत आणि गीताने एक योजना आखली.

यासाठी दोघांनी ठरवलं की, एखादी अशी व्यक्ती शोधायची ज्याची हत्या करता येऊ शकते आणि त्याला गीताचे कपडे घालून, त्याचं शरीर जाळून टाकायचं, ज्यामुळे सुरेशचे कुटुंबीय ते शरीर गीताचं समजून पुन्हा तिचा शोध घेणार नाहीत.

पोलीस तपासामध्ये असं दिसून आलं की, "यासाठी भरत एका पुरुष किंवा महिलेच्या शोधात होता. सोमवारी (26 मे) दुपारी सुमारे 3 वाजता भरत पाटणच्या आजुबाजूच्या गरामडी, सांताल्डी, वौवा अशा गावांमध्ये अशा व्यक्तीच्या शोधात निघाला होता, ज्याला मारून त्याचं शरीर गीताचा मृतदेह म्हणून दाखवता येईल."

वौवा गावातून जात असताना, 60 वर्षे वय असलेल्या हिरजीभाई सोलंकी नावाच्या व्यक्तीनं त्याला पुढच्या शेतात सोडण्याची विनंती केली.

पाटण एलसीबीचे पोलीस निरीक्षक राकेश उनगर यांनी बीबीसी गुजरातला सांगितलं, "त्या शेतात भरतने हिरजीभाई सोलंकीचा गळा दाबला. यामुळं हिरजीभाई बेशुद्ध होऊन पडले."

"त्यानंतर भरतनं हिरजीभाई यांना एका दोरखंडानं दुचाकीला बांधलं. भरतने तो मृतदेह गीता आणि सुरेशच्या घराजवळ आणून ठेवला. रात्री सुमारे 1 वाजता गीता आपल्या कपड्यांसह, झांझर (पैंजणचा प्रकार) आणि एक लिटर पेट्रोल घेऊन आली.

दोघांनीही हिरजीभाईस ते कपडे आणि झांझर घालून त्यांच्यावर पेट्रोल ओतलं आणि जाळून हत्या केली."

मात्र, पेट्रोल कमी पडल्यानं मृतदेह पूर्णपणे जळाला नाही.

पाटणचे पोलीस अधीक्षक व्ही.ए. नायी पत्रकारांशी बोलताना म्हणाले, "खरं तर, भरतला जास्त पेट्रोल आणायचं होतं, पण हत्या करण्यासाठी त्याला व्यक्ती लवकर सापडली नाही, त्यामुळं तो पेट्रोल आणू शकला नाही."

या घटनेची माहिती कशी मिळाली?

पोलीस तपासानुसार, हिरजीभाई सोलंकी यांचा मृतदेह गीता आणि सुरेशच्या घराच्या मागे जाळण्यात आला होता. त्यामुळं कुटुंबाला गीताने आत्महत्या केली असं वाटलं.

मंगळवारी (27 मे) सकाळी सुरेशला घराच्या मागे अर्धवट जळालेला मृतदेह मिळाल्यानंतर त्यानं पोलिसांना कळवलं. मृतदेहावर गीताचे कपडे आणि झांझर सापडल्यानं पोलिसांनी गीताबद्दल तपास सुरू केला तेव्हा त्यांना ती गायब असल्याचं समजलं.

अधिक तपास केल्यानंतर पोलिसांना समजलं की, शेजारी राहणारा भरतही गायब आहे. पोलीस म्हणाले, "आम्हाला माहिती मिळाली की, हे दोघंही एकमेकांवर प्रेम करत होते आणि कदाचित दोघंही पळून गेले असतील."

तपासादरम्यान पोलिसांना भरतची बाईक राधनपूरमध्ये सापडली. पोलिसांनी विविध पथकं तयार केली आणि अखेर या दोघांना पालनपूर बस स्थानकावर पकडण्यात आलं. हे दोघे जोधपूरला जाण्याच्या तयारीत होते.

पोलिसांनी दोघांनाही अटक केली आणि तपासादरम्यान संपूर्ण कट उघडकीस आला.

दरम्यान, या घटनेचे संपूर्ण सत्य बाहेर येण्यापूर्वीच, काँग्रेस आमदार जिग्नेश मेवाणी यांनी एका व्हीडिओद्वारे गुजरातमधील सर्व दलित कार्यकर्त्यांना सोलंकीच्या कुटुंबाला मदत करण्यासाठी पोहोचण्याचे आवाहन केले होते.

राज्यात सध्या दलित समाजावर अत्याचार वाढत असल्याचा आरोप त्यांनी केला होता. दुसरीकडे पोलिसांनी तपासादरम्यान अशी कोणतीही माहिती समोर आली नसल्याचं म्हटलं.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)