You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
हरियाणात एकाच कुटुंबातल्या 7 जणांचे मृतदेह कारमध्ये सापडले; काय आहे संपूर्ण प्रकरण?
हरियाणातल्या पंचकुला भागात एका गाडीत एकाच कुटुंबातल्या 7 जणांचा मृतदेह सापडले.
एएनआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, पंचकुला जिल्ह्यातल्या सेक्टर 27 मध्ये ही गाडी पार्किंगला उभी होती.
रहिवाशी भागातल्या एका घराबाहेर रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या बंद कारमध्ये काही लोक बसले असल्याचं लक्षात आलं.
पोलिसांच्या प्राथमिक तपासात या कुटुंबाची ओळख पटली आहे. हे कुटुंब देहरादूनमधील आहे.
42 वर्षांचे प्रवीण मित्तल, त्यांचे आई-वडील, पत्नी, दोन मुली आणि एक मुलगा अशी या कुटुंबातील व्यक्तींची ओळख पोलिसांनी सांगितली.
पंचकुलाच्या पोलीस उपायुक्त हिमाद्री कौशिक, तसंच कायदा आणि सुव्यवस्थेचे उपायुक्त अमित दहिया यांनी प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे. शिवाय, फॉरेन्सिक टीमनं घटनास्थळी पोहोचून तपासासाठी आवश्यक नमुने गोळा केले आहेत.
आता हे मृतदेह पंचाकुलामधीलच एका खासगी रुग्णालयात शवगृहात ठेवण्यात आले आहेत, अशी माहिती पोलिसांनी दिली.
पोलिसांचं म्हणणं काय?
पंचकुलाच्या पोलीस उपायुक्त हिमाद्री कौशिक यांनी दिलेल्या माहितीनुसार, "सहा लोकांना ओजस हॉस्पिटलला आणलं गेलं आहे अशी माहिती आम्हाला मिळाली. आम्ही तिथे पोहोचेपर्यंत त्या सर्वांचा मृत्यू झालेला होता. तसंच, आणखी एका व्यक्तीला सेक्टर 6 मधल्या सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचं समजलं. त्यालाही मृत घोषित करण्यात आलं होतं."
हिमाद्री कौशिक यांनी पुढे सांगितलं की, "सद्यस्थितीत हे आत्महत्येचं प्रकरण असावं असा अंदाज आहे. मात्र, यावर अजूनही तपास सुरू आहे."
तर पोलीस उपायुक्त अमित दहिया यांनी सांगितलं की, "सध्या झालेल्या प्राथमिक तपासात ही आत्महत्या वाटत आहे. याचा आम्ही सखोल तपास करत आहोत. उच्चस्तरीय चौकशी करण्याचीही चर्चा सुरु आहे. आम्ही यासाठी पाच पथके तयार केली आहेत. मृत व्यक्ती देहरादूनच्या असल्याचं सांगितलं जातंय. त्यामुळे आमच्या एका टीमने देहरादूनमधल्या त्यांच्या कुटुंबाला याची माहिती दिली आहे. आम्ही या प्रकरणाचा सात ते आठ अँगल्सनी तपास करत आहोत."
तर देहरादून पोलीस म्हणाले, "हरियाणातील पंचकुलामध्ये एकाच कुटुंबातील सात जणांनी आत्महत्या केल्याची माहिती मिळाली. या कुटुंबाबद्दल माहिती मिळाली आहे की, मृत प्रवीण मित्तल यांचं कुटुंब जवळपास 8-9 महिन्यांपूर्वी देहरादूनमधील कोलागढमध्ये एका भाड्याच्या घरात राहत होतं. सध्या हे कुटुंब देहरादूनमध्ये राहत नव्हतं."
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पंचकुलात घटनास्थळी जी गाडी सापडली आहे, ती देहरादूनच्या गंभीर सिंह नेगी यांच्या नावावर आहे.
पोलिसांनी पुढे सांगितलं की, "गंभीर सिंह नेगी यांनी सांगितलं की, मृत प्रवीण मित्तल यांच्याशी त्यांची एका स्वयंसेवी संस्थेच्या कामासंदर्भात भेट झाली होती. मृत प्रवीण आधी चाइल्ड लाइफ केअर मिशन नावानं स्वयंसेवी संस्था चालवायचे. या दरम्यान झालेल्या मैत्रीमुळे गंभीर नेगी यांनी प्रवीण चालवत असलेली गाडी स्वत:च्या नावावर फायनान्स करून दिली होती."
पोलिसांचं म्हणणं आहे की सध्या हे कुटुंब चंदीगडमध्ये वास्तव्यास होतं.
मृतांचे नातेवाईक काय म्हणाले?
मृतांचे नातेवाईक असलेले संदीप अग्रवाल म्हणाले, "हे सर्वजण मागच्या एक-दीड वर्षांपासून पंचकुला येथेच राहत होते. त्याआधी ते डेहराडून येथे राहायचे. त्याआधी देखील चंदिगढमध्येच राहत होते.
"पोलिसांनी आम्हाला सुसाईड नोट दाखवलेली नाही, पण त्यामध्ये असं लिहिलेलं आहे की मीच यांच्यावर अंत्यसंस्कार करेन आणि मीच त्यांचा नातेवाईक आहे. माझ्या सासऱ्यांना काहीही म्हणून नये असं देखील त्यामध्ये लिहिलेलं आहे."
स्थानिकांनी काय पाहिलं?
प्रत्यक्षदर्शी पुनीत राणा यांनी बीबीसीला सांगितलं की, "मृतांमध्ये एकूण सात लोक होते. त्यात तीन लहान मुलं देखील आहेत. आमच्या घराजवळ एक गाडी बराच वेळ उभी होती. गाडीच्या काचा टॉवेलने झाकलेल्या होत्या. आम्ही जवळ जाऊन गाडीत कोण आहे हे बघायचा प्रयत्न केला. गाडीत एक माणूस होता आणि बाकीचे लोक झोपलेले होते. तो म्हणाला की आम्हाला हॉटेल मिळालं नाही त्यामुळे इतर सर्वजण गाडीतच झोपले आहेत. मला त्यांची शंका आली मी त्या व्यक्तीला गाडीतून बाहेर यायला सांगितलं. त्याला पाणी पाजलं , त्यानंतर तो म्हणाला की आमच्यावर बँकेचा खूप दबाव आहे, मीही पाच मिनिटात मरेन कारण मीही विष प्यायलो आहे."
ही गाडी सापडली त्याच भागात पुनित राणा राहतात. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, "ही घटना आमच्या घराच्या मागच्या बाजूला झाली. उत्तराखंडची नंबर प्लेट असलेली एक गाडी आमच्या गाडीच्या मागे उभी होती. आम्ही ती तिकडून हटवण्याची विनंती करायला गेलो.
"चालक, एक वयस्कर महिला आणि मुलं गाडीत पुढे बसले होते. ते इथं सत्संगासाठी आले होते अशी माहिती त्यांनी दिली. पण, रात्री हॉटेल न सापडल्यामुळे गाडीतच झोपले."
पुनित सांगतात, काही वेळाने त्यांचं पुन्हा गाडीकडे लक्ष गेलं. आतमधले लोक काहीशा संशयास्पद अवस्थेत दिसले.
"आम्ही टॉर्च मारून गाडीच्या आतमध्ये पाहिलं. सगळ्यांनी उलट्या केल्या होत्या. मी काही त्रास होतोय का असं विचारलं आणि जिवंत असलेल्या एका माणसाला बाहेर यायची विनंती केली," पुनित सांगत होते.
"जिवंत असलेल्या व्यक्तीनं आम्हाला सांगितलं की, त्यांच्यावर खूप कर्ज आहे. बोलत असतानाच ती खाली कोसळली."
पुनित सांगतात की, पोलिस काही मिनिटांतच घटनास्थळी दाखल झाले. मात्र, रुग्णवाहिका यायला वेळ लागला.
महत्त्वाची माहिती
मानसिक आजारांवर औषधं आणि थेरपीद्वारे उपचार घेणं शक्य आहे.
त्यासाठी तुम्हाला मानसतज्ञांची मदत घ्यावी लागेल. जर तुम्हाला किंवा तुमच्या जवळच्या कुणालाही मानसिक त्रासाची लक्षणं दिसत असतील तर खालील हेल्पलाइन नंबरवर फोन करून मदत घेता येऊ शकते.
- सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालय - 1800-599-0019
- इन्स्टिट्यूट ऑफ ह्युमन बिहेवियर अँड अलाइड सायन्सेस - 9868396824, 9868396841, 011-22574820
- नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मेंटल हेल्थ अँड न्यूरो सायन्सेस - 080 - 26995000
- विद्यासागर इन्स्टिट्यूट ऑफ मेंटल हेल्थ अँड अलाइड सायन्सेस - 011 2980 2980
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)