भारतातील एक महत्त्वाचं केंद्र असलेला सिंध प्रांत फाळणीनंतर पाकिस्तानात कसा गेला?

पाकिस्तानातील सिंध प्रांताबाबत भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी एक वक्तव्यं केलं. त्यानंतर पाकिस्ताननं त्यावर तिखट प्रतिक्रिया दिली. पाकिस्ताननं याला 'विस्तारवादी विचारसरणी' म्हटलं.

पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयानं याला 'प्रक्षोभक आणि विकृतीकरण' करणारं वक्तव्यं म्हटलं.

रविवारी (23 नोव्हेंबर) राजनाथ सिंह म्हणाले होते, "भलेही सिंध, भारताचा भाग नसेल. मात्र सांस्कृतिकदृष्ट्या विचार करता तो नेहमीच भारताचा भाग राहील."

ते म्हणाले, "सीमा बदलू शकतात. न जाणो भविष्यात सिंधचा पुन्हा एकदा भारतात समावेश होईल."

राजनाथ सिंह यांनी भाजपाचे ज्येष्ठ नेते लाल कृष्ण आडवाणी यांनी लिहिलेल्या पुस्तकाचा संदर्भ दिला. राजनाथ सिंह म्हणाले की, फक्त सिंधच नाही, तर संपूर्ण भारतात हिंदू समुदाय सिंधू नदीला पवित्र मानायचे.

1947 ला देशाची फाळणी झाल्यानंतर सिंध, पाकिस्तानात गेलं. त्यावेळेस सिंधमधील लाखो हिंदूंनी तिथून स्थलांतर केलं आणि ते भारतात येऊन वसले.

लालकृष्ण आडवाणी यांचं बालपणदेखील सिंधमध्येच गेलं होतं. त्यांचं कुटुंबं सिंधमधून भारतात स्थलांतरित झालं होतं. 2005 मध्ये आडवाणी सिंधमध्ये गेले होते. त्यावेळेस ते कराचीला गेले होते.

फाळणीत सिंध गेलं पाकिस्तानच्या वाट्याला

ब्रिटिश इंडियामध्ये सिंध त्यावेळच्या बॉम्बे प्रोव्हिंसमध्ये यायचं.

फाळणीनंतर भारतानं जे राष्ट्रगीत स्वीकारलं, त्यातसुद्धा सिंधच्या नावाचा उल्लेख आहे.

एनसायक्लोपीडिया ब्रिटानिकानुसार, सध्याच्या काळात सिंधची सीमा पूर्वेला भारताच्या गुजरात आणि राजस्थान या राज्यांना लागून आहे. तर सिंधच्या वायव्येला बलुचिस्तान आहे आणि ईशान्येला पाकिस्तानातील पंजाब प्रांताची सीमा आहे.

हा प्रदेश सिंधू डेल्टा म्हणजे त्रिभुज प्रदेशात वसलेला आहे. सिंधू नदीच्या नावावरून या प्रदेशाला सिंध हे नाव पडलं आहे.

सिंध सरकारच्या मानवाधिकार आयोगानुसार, या प्रांतात 30 जिल्हे आहेत. या प्रांताची एकूण लोकसंख्या जवळपास 5.5 कोटी आहे.

सिंध प्रांताचं एकूण क्षेत्रफळ 1 लाख 40 हजार चौरस किलोमीटर आहे.

2017 च्या जनगणनेनुसार, सिंध प्रांतातील 91.3 टक्के लोकसंख्या मुस्लीम आहे, तर 6.5 टक्के लोक हिंदू आहेत. सिंधमधील उमरकोट जिल्हा आजदेखील हिंदू बहुसंख्यांक आहे.

बीबीसीच्या एका वृत्तानुसार, पाकिस्तानातील बहुतांश हिंदू लोक सिंध प्रांतात राहतात.

सिंधू संस्कृतीचं केंद्र

सध्याच्या सिंध प्रांताला प्राचीन भारतातील एक महत्त्वाचं केंद्र मानलं जातं. सिंधू नदीच्या किनाऱ्यावर प्राचीन सिंधू संस्कृती विकसित झाली होती.

इथल्या मोहनजोदडो या प्राचीन शहराला जगातील सर्वात प्राचीन नागरी व्यवस्थेत गणलं जातं. सिंधू नदीच्या किनाऱ्यावर जवळपास 4 हजार वर्षांपूर्वी वसलेल्या या शहराचा शोध गेल्या शतकातच लागला होता.

मोहनजोदडोच्या अवशेषांना युनेस्कोनं 1980 मध्ये जागतिक वारसा स्थळ जाहीर केलं होतं.

ब्रिटानिकानुसार, ईसवीसन 711 मध्ये सिंधवर अरबांनी ताबा मिळवला. 16 व्या आणि 17 व्या शतकात सिंधवर मुघलांची राजवट (1591-1700) होती. त्यानंतर तिथे अनेक स्वतंत्र सिंधी राजघराण्यांची राजवट होती.

1542 मध्ये सिंधमधील उमरकोट किल्ल्यातच मुघल बादशाह अकबरचा जन्म झाला होता.

1843 मध्ये हा प्रदेश इंग्रजांच्या ताब्यात आला.

इथल्या सिंधी हिंदू कुटुंबांचा व्यापार आणि आर्थिक बाबींमध्ये मोठा प्रभाव होता. मात्र फाळणीनंतर झालेल्या स्थलांतराच्या वेळेस अनेक सिंधी कुटुंबं भारत किंवा इतर देशांमध्ये निघून गेले.

सिंधू नदीमुळे हा प्रदेश सुरुवातीपासूनच समृद्ध होता. इथे प्रामुख्यानं कापसाची लागवड केली जाते. आजदेखील सिंधची राजधानी असलेले कराची शहर, पाकिस्तानातील प्रमुख औद्योगिक केंद्रांपैकी एक आहे.

मकली नेक्रोपोलिस, सिंधचं सांस्कृतिक केंद्र

हा प्रदेश सांस्कृतिकदृष्ट्या अतिशय समृद्ध आहे. युनेस्कोनं इथल्या अनेक प्राचीन स्थळांना जागतिक वारसा स्थळ म्हणून जाहीर केलं आहे.

कराचीपासून 140 किलोमीटर अंतरावर असलेल्या मकली हिल नेक्रोपोलिसमध्ये अनेक प्राचीन मकबरे आहेत.

युनेस्कोच्या वेबसाईटनुसार, पाकिस्तानातील सिंध प्रांतात ठट्टाजवळ असलेलं मकली नेक्रोपोलिस, जगातील सर्वात मोठ्या आणि अद्भूत दफनभूमींपैकी (कब्रस्तान) एक आहे.

इथे संत, कवी, धनाढ्य व्यक्ती, गव्हर्नर, राजकुमार, बादशाह आणि राण्यांच्या कबरी, मकबरे आणि स्मारके आहेत. याला जगातील सर्वात मोठ्या दफनभूमींमध्ये गणलं जातं.

ठट्टाच्या मकलीमध्ये असलेले हे ऐतिहासिक स्मारक जवळपास 10 चौरस किलोमीटर परिसरात विस्तारलेलं आहे. इथे जवळपास 5 लाख कबरी आणि मकबरे आहेत.

इथल्या वास्तुकलेत मुस्लीम, हिंदू, फारसी, मुघल आणि गुजराती वास्तुशैलीचा अतिशय उत्तम संगम दिसतो.

या मकबऱ्यांचं वैशिष्ट्यं म्हणजे त्यांच्या निळ्या चमकदार टाईल्स, बारीक नक्षीकाम, सुंदर कॅलीग्राफी आणि आकर्षक भूमितीय डिझाईन. त्यामधून कधीकाळी इथे भरभराटीला आलेल्या संस्कृतीची सर्जनशीलता आणि अध्यात्मिकता दिसून येते.

इथे साम्मा कालखंडातील (1351-1524) शेख जियोचा मकबरादेखील आहे.

14 वं शतक ते 17 व्या शतकादरम्यान ठट्टा ज्ञान, कला आणि संस्कृतीचं एक प्रमुख केंद्र होतं. सिंध प्रदेशातील सांस्कृतिक वारशाला आकार देण्यात याची महत्त्वाची भूमिका होती.

धर्मांतरामुळे देखील राहिलं चर्चेत

हिंदू धर्मस्थळांवरील हल्ले आणि धर्मांतराच्या मुद्द्यावरून देखील सिंध प्रांत चर्चेत राहिलं आहे.

2021 मध्ये अमेरिकन काँग्रेसमन ब्रॅड शेरमन यांनी आरोप केला होता की, सिंधमध्ये हिंदू आणि ख्रिश्चन कुटुंबांना जबरदस्तीनं धर्मांतर करायला लावलं जातं आहे.

पाकिस्तानच्या मानवाधिकार आयोगाच्या एका अहवालातदेखील, सिंधमध्ये हिंदू मुलींना जबरदस्तीनं धर्मांतर करायला लावल्याचा उल्लेख करण्यात आला आहे.

2023 मध्ये पाकिस्तानातून भारतात आलेल्या सीमा हैदरच्या मायदेशी परतण्यावरून सिंध प्रांतातील दरोडेखोरांनी हिंदूंच्या धर्मस्थळांवर आणि घरांवर हल्ला करण्याची धमकी दिली होती.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)