You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
मोहन आणि मोहम्मद : स्वातंत्र्यासाठी एकत्र ते एकमेकांविरोधात उभे ठाकण्यापर्यंतच्या समांतर प्रवासाची कहाणी
- Author, रेहान फजल
- Role, बीबीसी हिंदी
सर्वसाधारणपणे लोक या दोन प्रभावशाली व्यक्तिमत्वांना महात्मा गांधी आणि मोहम्मद अली जिन्ना या नावानं ओळखतात. दोघांवर अगणित पुस्तकं लिहिण्यात आली आहेत. दोघांचंही बहुतांश आयुष्य ब्रिटिश वसाहतवादी राजवटीविरोधात लढण्यात गेलं.
अलीकडेच ख्यातनाम अर्थतज्ज्ञ लॉर्ड मेघनाद देसाई यांचं एक पुस्तक प्रकाशित झालं आहे. पुस्तकाचं नाव आहे, 'मोहन अँड मोहम्मद : गांधी जिन्ना अँड ब्रेकअप ऑफ ब्रिटिश इंडिया'.
या पुस्तकात देसाई लिहितात की, "मी मुद्दाम या दोन्ही व्यक्तिमत्वांसाठी त्यांच्या पहिल्या नावाचा वापर केला आहे. यामागचा हेतू त्यांचा अपमान करण्याचा नाही, तर ते फारसे प्रसिद्ध झालेले नसतानाच्या त्यांच्या आयुष्यावर प्रकाश टाकणं हा आहे."
"अर्थात ही काही लपलेली बाब नाही. मात्र फार थोड्या लोकांना माहिती आहे की हे दोघं प्रदीर्घ काळ समांतर आयुष्य जगले, तसंच अनेक बाबतीत त्यांच्यात बरचसं साम्य होतं."
हे दोघंही (महात्मा गांधी आणि मोहम्मद अली जिन्ना) गुजराती भाषिक कुटुंबातील होते. त्या दोघांच्या कुटुंबाची मूळं गुजरातमधील काठियावाड भागातली होती.
मोहनचे वडील करमचंद पोरबंदरच्या राजकुमाराचे दिवाण होते. मोहन पाच वर्षांचा झाल्यानंतर त्याचे वडील राजकोटला गेले आणि तिथले दिवाण झाले.
मोहम्मदचे आजोबा पूंजाभाई देखील राजकोटचे होते. गुजरातीमध्ये 'पूंजाभाई' नाव थोडंसं विचित्र वाटतं.
कारण या शब्दाचा अर्थ 'कचरा' असा होतो. मात्र त्याकाळच्या गुजरात किंवा संपूर्ण भारतातच नवजात बाळांचं नाव मुद्दाम असं काही विचित्र ठेवलं जात असे. त्यांना नजर लागू नये, हा त्यामागचा उद्देश.
मोहनला त्याची बहीण 'मुनिया' म्हणून हाक मारायची.
बॅरिस्टर होण्यासाठी लंडनला गेले मोहन आणि मोहम्मद
मोहम्मदचा जन्म 1876 सालच्या नाताळात कराचीत झाला होता. तो मोहनपेक्षा सात वर्षांनी लहान होता.
अर्थात मोहम्मदच्या वडिलांना सात अपत्यं होती. मात्र त्या भावंडांमध्ये सर्वात प्रसिद्ध होती, त्याची छोटी बहीण फातिमा. ती संपूर्ण आयुष्यभर त्याच्यासोबत राहिली.
मेघनाद देसाई लिहितात की, "हे दोघे वयाच्या 16 व्या वर्षी मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण झाले होते. ते दोघेही बॅरिस्टर होण्यासाठी लंडनला गेले होते. मोहननं इनर टेंपलमध्ये शिक्षण घेतलं. तर मोहम्मदनं लिंकन इन मध्ये."
"लंडनला जाताना मोहन 19 वर्षांचा होणार होता. तर मोहम्मद 1891 मध्ये लंडनला गेला. तेव्हा त्याचं वय फक्त 16 वर्षे होतं."
मोहनला त्यांचे कौटुंबिक मित्र मावजी दवे यांच्या सल्ल्यानं लंडनला पाठवण्यात आलं होतं. तर मोहम्मदला त्याच्या वडिलांचे इंग्रज मित्र सर फ्रेड्रिक क्रॉफ्ट यांनी लंडनला जाण्यास प्रोत्साहन दिलं होतं.
मोहन आणि मोहम्मद या दोघांचाही बालविवाह झाला होता. मोहनचं लग्न वयाच्या 13 व्या वर्षी झालं होतं. तर मोहम्मदचं लग्नं झालं तेव्हा त्याचं वय 15 वर्षे होतं.
मात्र मोहम्मदच्या लग्नानंतर काही दिवसांनीच तो परदेशात असताना त्याच्या पत्नीचं निधन झालं होतं.
मोहनच्या आधी मोहम्मद झाला होता काँग्रेसचा सदस्य
मोहन आणि मोहम्मद या दोघांनी लंडनमधील त्यांचं वास्तव्य अतिशय सुखद असल्याचं सांगितलं. 1930 च्या दशकात ब्रिटिश राजवटीतील भारताचं राजकारण न आवडल्यामुळे मोहम्मद लंडनला निघून गेले होते.
नंतर मोहम्मद म्हणाले की, जर ते भारतातील राजकारणात आले नसते, तर त्यांनी लंडनमध्येच राहणं पसंत केलं असतं. मोहम्मद यांनी तीन वर्षांमध्ये कायद्याचं शिक्षण पूर्ण केलं होतं.
हेक्टर बोलिथो यांनी 'जिन्ना: क्रिएटर ऑफ पाकिस्तान' हे पुस्तक लिहिलं आहे.
त्यात त्यांनी लिहिलं आहे, "लंडनमधील वास्तव्यादरम्यान जिन्नांनी नाटकातदेखील काम केलं. ते इंग्रजांप्रमाणेच पेहराव करू लागले होते."
"ते अनेकदा हाऊस ऑफ कॉमन्सच्या प्रेक्षक गॅलरीत जाऊन राजकीय चर्चा पाहत असत. दादाभाई नौरोजी यांनी ब्रिटिश संसदेत त्यांचं पहिलं भाषण केलं तेव्हा जिन्ना तिथे उपस्थित होते."
त्याकाळी ते लिबरल पार्टीच्या प्रभावाखाली होते. जोसेफ चेंबरलेन हे त्यांचे हिरो होते. लंडनमध्ये शिक्षण पूर्ण केल्यानंतर मोहन दक्षिण आफ्रिकेत गेले. तर मोहम्मद यांनी मुंबईत येऊन वकिली सुरू केली होती.
लंडनहून परतल्यानंतर लगेच या दोघांना त्यांच्या पेशामध्ये (वकिलीमध्ये) बराच संघर्ष करावा लागला होता. सुरुवातीला कोणताही अशील या दोघांकडे केस घेऊन येत नव्हता.
1905 मध्ये मोहम्मद काँग्रसचे सदस्य झाले. काँग्रेसमध्ये त्यांची भेट गोपाळकृष्ण गोखले आणि लोकमान्य टिळक यांच्यासारख्या नेत्यांशी झाली.
जिन्नांनी तर टिळकांचा खटलादेखील लढवला. बंगालच्या फाळणीच्या मुद्द्यावरून काँग्रेस मतभेद निर्माण झाले, तेव्हा मोहम्मद यांनी मवाळ गटाला पाठिंबा दिला.
त्याकाळी काँग्रेसमध्ये मुस्लीम सदस्यांची संख्या फारच कमी होती. 1896 मध्ये काँग्रेसमध्ये एकूण 709 सदस्य होते. त्यापैकी फक्त 17 जण मुस्लीम होते. जिन्ना काँग्रेसमध्ये आल्यानंतर सात वर्षांपर्यंत म्हणजे 1913 पर्यंत मुस्लीम लीगचे सदस्य झालेले नव्हते.
मुस्लीम लीगचा सदस्य झाल्यानंतर देखील जिन्ना मुस्लीम लीगला म्हणाले होते की त्यांनी काँग्रेसशी सहकार्य करावं. राजकीय कारकीर्दीच्या सुरूवातीच्या काळात जिन्ना हिंदू-मुस्लीम एकजूटीचे खंदे पाठिराखे होते.
1915 मध्ये झाली मोहन आणि मोहम्मद यांची पहिली भेट
मोहन दक्षिण आफ्रिकेतून भारतात परतल्यावर 1915 मध्ये या दोघांची पहिल्यांदा भेट झाली.
त्याआधी 16 ऑगस्ट 1914 ला लंडनमधील एका बैठकीत मोहन यांना सन्मानित करण्यात आलं होतं. मोहम्मददेखील तिथे उपस्थित होते. मात्र तेव्हा या दोघांचं समोरा-समोर बोलणं झालं नव्हतं.
1915 मध्ये हे दोघेही अहमदाबादमध्ये भेटले. प्रसिद्ध वकील आणि काँग्रेस नेते के एम मुंशी यांनी त्यांची भेट घडवून आणली होती.
1916 साली लखनौमध्ये झालेल्या काँग्रेसच्या अधिवेशनात जिन्ना यांनी अॅनी बेझेंट यांच्याबरोबर व्यासपीठावर बसण्यासाठी मोहनना आमंत्रित केलं होतं.
रामचंद्र गुहा यांनी 'गांधी द ईयर्स दॅट चेंज्ड द वर्ल्ड' हे पुस्तक लिहिलं आहे.
या पुस्तकात त्यांनी लिहिलं आहे, "ऑक्टोबर, 1916 मध्ये अहमदाबादला गुजरातचं प्रांतीय संमेलन झालं. त्यावेळेस अध्यक्षपदासाठी गांधींनीच जिन्नांच्या नावाचा प्रस्ताव दिला होता."
"ते मोहम्मद यांच्याबद्दल म्हणाले होते की, ते आपल्या काळातील विद्वान मुस्लीम आहेत. दोन्ही पक्षांच्या नजरेत ते सन्माननीय आहेत."
या बैठकीत मोहन यांनी मोहम्मद यांना विनंती केली की, त्यांनी गुजरातीमध्ये भाषण करावं. मग मोहम्मद यांनी गांधीजींचं म्हणणं ऐकत तोडक्या-मोडक्या गुजराती भाषेत भाषण केलं होतं.
नंतर गांधीजींनी त्यांच्या एका मित्राला पत्र लिहून त्या म्हटलं होतं, "त्याच दिवसापासून मी जिन्नांचा नावडता झालो."
असं असूनही पुढील जवळपास 10 वर्षे या दोघांनी एकाच व्यासपीठावरून सोबत काम केलं. भारतात परतल्यावर मोहन यांनी आधी पहिल्या महायुद्धात लढणाऱ्या ब्रिटिश सैन्यात भारतीय सैनिकांच्या भरतीची मोहीम सुरू केली होती.
त्यांच्या या मोहिमेत मोहम्मद यांनी त्यांना साथ दिली नाही. मोहन यांना ब्रिटिश सरकारनं कैसर-ए-हिंद या किताबानं सन्मानित केलं. मात्र 1919 मध्ये झालेल्या जालियावाला बाग हत्याकांडानंतर मोहन यांनी तो किताब परत केला.
1920 च्या दशकात या दोघांचे मार्ग वेगळे होण्यास सुरुवात झाली. मोहन काँग्रेसचे निर्विवाद नेते बनले. त्यांनी काँग्रेसचं रूपांतर एका संविधानवादी आणि अभिजनांच्या पक्षातून सर्वसामान्य भारतीयांच्या पक्षात केलं.
लंडनहून भारतात परतले मोहम्मद
इथूनच मोहम्मद आणि मोहन यांच्यातील मतभेदांना सुरुवात झाली. मोहम्मद यांनी मोहन यांना 'महात्मा' म्हणण्यास नकार दिला आणि काँग्रेसमधून राजीनामा दिला.
मोहन काँग्रेसचे नेते राहिले. 1930 च्या दशकात त्यांनी काँग्रेसचं सदस्यत्व सोडलं. मात्र तरीदेखील भारताला स्वातंत्र्य मिळेपर्यंत पक्षाच्या कामकाजात गांधीजींचं मत हाच अखेरचा शब्द मानला जात होता.
काँग्रेसमधील गांधीजींच्या वर्चस्वामुळे मोहम्मद इतके निराश झाले की, त्यांनी लंडनला परत जाण्याचा निर्णय घेतला. त्यांनी बॅरिस्टर म्हणून पुन्हा करियरची सुरुवात केली. ब्रिटनमधील प्रिव्ही कौन्सिलमध्ये त्यांची वकिली चालू लागली.
नोव्हेंबर, 1930 मध्ये लंडनमध्ये भारताबाबत पहिली गोलमेज परिषद पार पडली. त्यावेळी मोहम्मद यांना त्यात एक मुस्लीम नेता म्हणून आमंत्रण देण्यात आलं होतं.
या परिषदेत संपूर्ण भारताचा प्रतिनिधी म्हणून फक्त काँग्रेसलाच बोलवायला हवं होतं, या कारणास्तव काँग्रेसनं या परिषदेत सहभागी होण्यास नकार दिला होता.
1931 मध्ये दुसरी गोलमेज परिषद झाली. या परिषेदत सहभागी होण्यासाठी मोहन लंडनला गेले. मात्र या परिषदेत मोहम्मद सहभागी झाले नाही. तिसरी गोलमेज परिषददेखील लंडनमध्येच झाली. मात्र यामध्ये मोहन आणि मोहम्मद या दोघांनीही सहभाग घेतला नाही.
1935 मध्ये भारतात 'गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ॲक्ट' लागू करण्यात आला. तेव्हा जिन्ना यांना भारतात परतण्याची विनंती करण्यात आली. ते भारतात परतण्यास तयार झाले. 1937 मध्ये झालेल्या निवडणुकांमध्ये त्यांनी मुस्लिमांचं नेतृत्व केलं.
मुस्लीम लीगला या निवडणुकीत अपेक्षापेक्षा फार कमी जागा मिळाल्या. मुस्लिमांचे एकमेव प्रतिनिधी असल्याच्या त्यांच्या दाव्याला यामुळे मोठा धक्का बसला.
अनेक प्रांतांमध्ये काँग्रेस सर्वात मोठा पक्ष म्हणून पुढे आला. मात्र काँग्रेसनं मुस्लीम लीगबरोबर आघाडी सरकार बनवण्याचा विचार पूर्णपणे फेटाळला.
इथूनच पहिल्यांदा मोहम्मद यांच्या मनात एक वेगळा देश म्हणजे पाकिस्तान बनवण्याचा विचार आला. त्यांनी लंडन सोडलं आणि ते मुंबईतील मलबार हिलवरील त्यांच्या घरात राहू लागले.
पाकिस्तानच्या संकल्पनेचा जन्म
यानंतर मोहन आणि मोहम्मद, यांनी संपूर्ण आयुष्यभर एकमेकांबरोबरचे मतभेद दूर करण्याचे प्रयत्न केले. मात्र त्यात त्यांना यश आलं नाही. त्यांच्यातील मतभेदाचा मुद्दा होता, भारत एक राष्ट्र आहे की दोन राष्ट्र.
मेघनाद देसाई लिहितात, "काँग्रेसमधील बहुतांश लोकांना वाटत होतं की, भारत एक राष्ट्र आहे. अनेक शतकांपासून भारताचा एकत्रित इतिहास राहिला आहे. असा विचार असणाऱ्यांमध्ये जवाहरलाल नेहरू आणि मौलाना आझाद यांचा समावेश होता."
"भारत स्पष्टपणे हिंदू राष्ट्र नाही आणि मुस्लीम राष्ट्रही नाही. यामध्ये दोन्ही समुदायाची लोकं राहतात."
दुसऱ्या बाजूला, मोहम्मद यांचं म्हणणं होतं की, संख्येच्या दृष्टीकोनातून मुस्लीम अल्पसंख्यांक असल्यामुळे, हिंदू बहुसंख्याकांच्या अधिपत्यापासून त्यांच्या हितांचं रक्षण करण्याची आवश्यकता आहे.
मतदानातून सरकार स्थापन करण्याचा निर्णय झाला, तर हे उघड आहे की, ते कधीही सत्तेत येणार नाहीत. त्यामुळेच मुस्लिमांना त्यांच्या हितांचं रक्षण करण्यासाठी एक वेगळा देश बनवावा लागेल.
देसाई लिहितात, "मोहम्मद धार्मिक व्यक्ती नव्हते. ते नियमितपणे मशिदीत जाऊन नमाज पढत नसत. मात्र अल्पसंख्याक म्हणून मुस्लिमांच्या अधिकारांची त्यांना चिंता होती."
मोहन आणि मोहम्मद यांची भेट
सप्टेंबर 1944 मध्ये मुंबईत, मोहन आणि मोहम्मद यांची शेवटची महत्त्वाची भेट झाली होती. मोहन यांना वाटत होतं की, जर काँग्रेस आणि मुस्लीम लीगमध्ये तडजोड झाली, तर इंग्रजांना भारत सोडण्याशिवाय पर्याय राहणार नाही.
पहिल्या बैठकीसाठी, 9 सप्टेंबर 1944 ला मोहन, मोहम्मद यांच्या घरी गेले. ही बैठक आपल्याच घरी व्हावी यासाठी मोहम्मद आग्रही होते.
प्रमोद कपूर यांनी 'गांधी इन इलस्ट्रेटेड बायोग्राफी' हे पुस्तक लिहिलं आहे.
त्यात ते लिहितात, "9 सप्टेंबर ते 27 सप्टेंबर दरम्यान गांधीजी बिर्ला हाऊसमधून चौदा वेळा पायी चालत जवळच असलेल्या जिन्ना यांच्या घरी गेले. त्यांनी एकमेकांशी इंग्रजीतून चर्चा केली. यादरम्यान मोहन यांनी त्यांच्या वैद्याकडे मोहम्मद यांना पाठवलं."
"याच दरम्यान ईदचा सण आला. त्यावेळेस मोहन यांनी त्यांना लापशीची (दलिया) पाकिटं पाठवली. पत्रकारांनी जेव्हा मोहन यांना विचारलं की, मोहम्मद यांनी त्यांना काय दिलं. त्यावर मोहन यांनी 'फक्त फुलं' असं उत्तर दिलं."
बैठकीनंतर मोहम्मद यांनी एक वक्तव्यं जारी केलं. त्यात म्हटलं, "मला हे सांगण्यास खेद वाटतो की, मी मिस्टर गांधींना माझं मत पटवून देण्यात अपयशी ठरलो."
व्हॉईसरॉय लॉर्ड व्हेवेल यांनी त्यांच्या डायरीत लिहिलं आहे की, "मी खात्रीनं म्हणू शकतो, मला या चर्चेतून आणखी काहीतरी चांगलं निघण्याची अपेक्षा होती. दोन मोठी व्यक्तिमत्वं भेटली, मात्र त्यातून काहीही साध्य झालं नाही."
"निश्चितपणे यामुळं नेता म्हणून गांधींच्या प्रतिष्ठेला धक्का बसेल. मला वाटतं की, यामुळे जिन्नांच्या अनुयायांमध्ये त्यांचा प्रभाव नक्कीच वाढेल. मात्र एक समजूतदार व्यक्ती म्हणून त्यांच्या नावलौकिकात कोणतीही वाढ होणार नाही."
मोहन आणि मोहम्मद यांचं निधन
3 जून 1947 च्या रात्री भारत-पाकिस्तानच्या फाळणीची अधिकृत घोषणा झाली. त्याप्रसंगी जवाहरलाल नेहरू, मोहम्मद आणि लॉर्ड माऊंटबॅटन यांनी रेडिओवरून भारताच्या लोकांना उद्देशून भाषण केलं.
स्टॅनली वॉलपर्ट यांनी 'जिन्ना ऑफ पाकिस्तान' हे पुस्तक लिहिलं आहे.
या पुस्तकात ते लिहितात, "त्या दिवशी नेहरूंच्या भाषणातील शेवटचे शब्द होते, 'जय हिंद'. तर जिन्ना यांनी त्यांचं भाषण 'पाकिस्तान जिंदाबाद' म्हणून संपवलं. मात्र हे म्हणताना जिन्नांचा सूर काहीसा असा होता की, जणूकाही ते म्हणत आहेत, की पाकिस्तान आता मुठीत आहे."
7 ऑगस्ट 1947 च्या सकाळी मोहम्मद यांनी दिल्लीचा कायमचा निरोप घेतला. ते त्यांच्या बहिणीसोबत व्हॉईसरॉयच्या डकोटा विमानातून दिल्लीहून कराचीला पोहोचले.
जिन्ना जेव्हा कराचीतील गव्हर्नर हाऊसच्या पायऱ्या चढत होते, तेव्हा ते त्यांचे एडीसी एस. एम. अहसान यांना म्हणाले, "पाकिस्तानची स्थापना झाल्याचं मला माझ्या आयुष्यात पाहायला मिळेल, अशी मला आशा नव्हती."
मेघनाद देसाई लिहितात, "याप्रकारे इंग्लंडमधून शिक्षण घेऊन आलेल्या दोन गुजराती माणसांनी त्यांच्या आयुष्याचा बहुतांश भाग भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्याच्या कामी खर्ची घातला. मात्र या प्रयत्नांमध्ये ज्याची त्यांना आशा होती, ते त्यांना मिळू शकलं नाही."
"गांधीजींना भारताचा राष्ट्रपिता मानण्यात आलं. मात्र हे ते राष्ट्र नव्हतं, जे ते संपूर्ण आयुष्यभर पाहत आले होते. जिन्ना यांनीदेखील स्वातंत्र्यासाठी सुरुवातीला जो लढा दिला होता, ते राष्ट्र त्यांना मिळालं नाही. त्यांना एक नवीन देश बनवण्यात यश मात्र आलं."
भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर 13 महिन्यांच्या आत दोन्ही नेत्यांचं निधन झालं.
आधी 31 जानेवारीला मोहन यांची हत्या झाली. तर त्यानंतर 8 महिन्यांनी 11 सप्टेंबरला मोहम्मद यांनीदेखील जगाचा निरोप घेतला.
बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.