प्रवाशांना झालेल्या मनस्तापाबद्दल सीएसएमटीत आंदोलन करणाऱ्यांवर गुन्हा दाखल, रेल्वे पोलिसांची कारवाई

मुंबई लोकल

फोटो स्रोत, Getty Images

    • Author, अल्पेश करकरे
    • Role, बीबीसी मराठीसाठी

मुंब्रा दुर्घटनेबाबत ठाणे रेल्वे पोलिसांनी मध्य रेल्वेच्या अभियंत्याविरोधात चुकीच्या पद्धतीने गुन्हा नोंदवला, असा दावा करत हे गुन्हे मागे घेण्यात यावेत या मागणीसाठी सेंट्रल रेल्वे मजदूर संघाच्यावतीने (सीआरएमएस) सीएसएमटीत 6 नोव्हेंबर रोजी आंदोलन करण्यात आले होते.

यामुळे लोकल सेवा विस्कळीत झाली. तसेच प्रवाशांना झालेला मनस्ताप यामुळे सीएसएमटी रेल्वे पोलिसांनी बुधवारी (12 नोव्हेंबर) रात्री सेंट्रल रेल्वे मजदूर संघाचे पदाधिकारी आणि आंदोलकांवर गुन्हा दाखल केला.

जून 2025 मध्ये मुंब्रा दुर्घटनेत पाच प्रवाशांचा मृत्यू झाला, तर नऊ प्रवासी जखमी झाले.

या घटनेबाबत 'व्हीजेटीआय'ने दिलेल्या अहवालानुसार आणि तपास अधिकाऱ्यांनी केलेल्या तपासानुसार, ठाणे रेल्वे पोलिसांनी 1 नोव्हेंबर रोजी मध्य रेल्वेचे वरिष्ठ विभागीय अभियंता समर यादव आणि सहाय्यक विभागीय अभियंता विशाल डोळस यांच्याविरोधात गुन्हे दाखल केले.

हे गुन्हे मागे घेण्यासाठी सेंट्रल रेल्वे मजदूर संघाने 6 नोव्हेंबर रोजी सीएसएमटी स्थानकात आंदोलन केले, या आंदोलनाचा परिणाम लोकलची सेवा आणि प्रवाशांवर झाला.

मोटरमन, व्यवस्थापकांच्या दालनाबाहेर ठिय्या आंदोलन सुरू केले होते. मोटरमन, लोकल व्यवस्थापकांना डांबून ठेवण्यात आल्याने, त्यांना कर्तव्यावर जाता आले नाही. परिणामी, लोकल सेवा एक तास बंद होती.

या आंदोलनात सीआरएमएस संघटनेचे प्रमुख प्रवीण वाजपेयी व त्यांच्यासह इतर 100 ते 200 आंदोलक सहभागी होते.

आंदोलन संपल्यावर सीआरएमएस संघटनेचे पदाधिकारी एस. के. दुबे आणि विवेक सिसोदिया यांच्यासह इतर 30 ते 40 आंदोलक हे अचानकपणे डीआरएम कार्यालयाकडून मोटरमन दालनाबाहेर आले.

तेथे घोषणाबाजी करत मोटरमनला दालनाबाहेर येण्यास अडथळा निर्माण केला. त्यामुळे लोकल सेवा पूर्णपणे ठप्प झाली.

याप्रकरणी सीएसएमटी रेल्वे पोलिसांनी सीआरएमएसचे पदाधिकारी एस.के.दुबे, विवेक सिसोदिया आणि इतर आंदोलकांवर गुन्हा दाखल केला आहे.

याप्रकरणी अद्याप कोणालाही अटक झाली नाही. मात्र हे गुन्हे फक्त आंदोलनाशी संबंधित असून सँडहर्स्ट रोड स्थानकादरम्यान झालेल्या दोन मृत्यूंशी या गुन्ह्याचा संबंध नसल्याची माहिती पोलीस अधिकाऱ्याने दिली.

मुंबईतील सँडहर्स्ट रोड स्थानकाजवळच्या ट्रॅकवर गुरुवारी सायंकाळी चार ते पाच प्रवाशांना लोकल रेल्वेने उडवल्याची घटना घडली होती.

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल स्थानकात 5 नोव्हेंबर रोजी सायंकाळी रेल्वे कर्मचाऱ्यांनी तीव्र आंदोलन केलं. त्यामुळं रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आणि लोकल थांबल्या होत्या.

लोकल बंद असल्यानं लोकांनी रेल्वे रुळावरूनच घरी चालत जायला सुरुवात केली होती. काही प्रवासी मशिद बंदर ते सँडहर्स्ट रोड स्थानकाजवळील ट्रॅकवरून जात होते, तेव्हाच पाठीमागून आलेल्या लोकलने चार प्रवाशांना उडवले.

यात दोन जणांचा मृत्यू झाला. तर दोन जण जखमी असल्याची माहिती मुंबई महापालिका आपत्कालीन विभागाने दिली आहे.

दोन जखमींवर जेजे रुग्णालयात उपचार सुरू होते.

नेमके काय घडले?

सीएसएमटी रेल्वे स्थानकामध्ये गुरुवारी (6 नोव्हेंबर 2025) सायंकाळी 05 वाजून 50 मिनिटांच्या दरम्यान मोटरमन आणि इतर मध्य रेल्वे कर्मचाऱ्यांनी आंदोलन सुरू केलं होतं.

मुंब्रा इथं 9 जूनला झालेल्या अपघात प्रकरणी दोन रेल्वे अभियंत्यांना जबाबदार धरत गुन्हा दाखल करण्यात आला.

त्याचा विरोध करण्यासाठी आणि इतर मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आलं, अशी माहिती रेल्वे प्रशासनानं दिली.

पन्नास ते साठ मोटरमन आणि इतर काही मध्य रेल्वे कर्मचारी अचानक सीएसएमटी रेल्वे स्थानकामध्ये येऊन बसले आणि त्यांनी आंदोलन सुरू केलं.

मुंबई लोकल

ऐन गर्दीच्या वेळी झालेल्या या आंदोलनानं मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आणि प्रवाशांचे प्रचंड हाल झाले.

आंदोलनामुळं अनेक प्रवासी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल स्थानक आणि मध्य रेल्वेच्या इतर स्थानकांमध्ये खोळंबले होते.

अंदाजे 5.50 ते 6.45 वाजेपर्यंत म्हणजे सुमारे तासभर हे आंदोलन सुरू होतं, म्हणून सीएसएमटीमधून लोक सुटल्या नाहीत.

त्यामुळं मध्य रेल्वे मार्गावरील स्थानकांमध्ये वाट पाहणारे प्रवासी कंटाळून ट्रॅकवरूनच घरी जायला निघाले. काही प्रवासी मशीद बंदर ते सँडहर्स्ट रोड स्थानकादरम्यान ट्रॅकवरून चालत गेले.

पण इकडे कर्मचाऱ्यांचं आंदोलन थांबलं आणि एकापाठोपाठ लोकल सुरू झाल्या. त्यावेळी सीएसएमटीहून कल्याणला जाणाऱ्या एका लोकलने ट्रॅकवरून चालणाऱ्या प्रवाशांना उडवले.

दोन प्रवाशांचा मृत्यू, दोन जखमी

सायंकाळी 6.50 वाजेच्या दरम्यान ही घटना घडली.

मशीद बंदर स्थानकात एक तास लोकलची वाट पाहिल्यानंतर काही प्रवासी घरी जाण्यासाठी रेल्वे ट्रॅक वरून चालत निघाले होते.

तेव्हा एका लोकलने मागून चार ते पाच प्रवाशांना धडक दिली. मुंबई महापालिका प्रशासनाच्या आपत्कालीन विभागाकडून याबाबत माहिती देण्यात आली.

मुंबई लोकल

रेल्वे प्रशासन, पोलीस आणि उपस्थित लोकांच्या मदतीने या प्रवाशांना जवळच असलेल्या जे जे रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं.

यामध्ये एका अनोळखी व्यक्तीसह हेली मोहम्मया या 19 वर्षीय महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर कैफ चौगुले या 22 वर्षीय आणि खुशबू 45 वर्षीय जखमींवर जे जे रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाचं कारण काय?

मु्ंब्रा इथं 9 जून 2025 रोजी एक मोठा अपघात झाला होता. त्या प्रकरणाची अंतर्गत चौकशी सुरू होती.

या चौकशीमध्ये मध्य रेल्वेच्या दोन अभियंत्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

मुंब्रा इथं रेल्वे अभियंत्यांनी पावसामुळं खचलेल्या जागेच्या दुरुस्तीचे काम वेळेत न करता दुर्लक्ष केलं, त्यामुळं हा अपघात झाल्याचं एफआयआरमध्ये नमूद करण्यात आलं होतं.

पावसामुळे रुळाखालील खडी आणि माती वाहून गेल्याची कल्पना असतानाही रेल्वेचे सिनियर सेक्शन इंजिनियर आणि असिस्टंट डिव्हिजनल इंजिनियर यांनी दुर्लक्ष केल्याचा ठपका ठेवण्यात आला होता.

पण रेल्वे कर्मचारी युनियनने याला विरोध दर्शवला.

मुंबई लोकल

मुंब्रा आणि ठाणे स्थानकादरम्यान दोन लोकल एकमेकांना घासल्या गेल्याने झालेल्या अपघातात 5 जणांचा मृत्यू झाला होता, तर 9 जण जखमी झाले होते.

मोठ्या पावसानंतर रेल्वे रुळाचे किरकोळ काम करून वेल्डिंग न केल्याने दोन रेल्वे रुळ वरखाली होऊन एकमेकांच्या अगदी जवळ आल्याने प्रवासी घासले गेले होते असा व्हिजेटीआयचा अहवाल याप्रकरणी देण्यात आला आहे.

कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल

कर्मचाऱ्यांनी गुरुवारी सुरू केलेल्या आंदोलनामुळे संध्याकाळच्या 'पीक आवर'मध्ये लोकलसेवा थांबल्याने हजारो प्रवासी स्थानकांवर खोळंबले होते.

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनलहून लाखो प्रवासी सायंकाळच्या वेळेमध्ये लोकलद्वारे उपनगरीय भागात प्रवास करतात.

त्यांना रेल्वे कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाचा मोठा फटका बसला. तब्बल एक तास मध्य रेल्वे वरील लोकल पुढे सरकल्या नव्हत्या.

मुंबई लोकल

फोटो स्रोत, Getty Images

सायंकाळी 6:45 मिनिटांनी लोकलची वाहतूक पुन्हा सुरू झाली असली तरी, या आंदोलनामुळे काही पुढील तास लोकल 40 ते 45 मिनिटे उशिराने धावत होत्या अशी माहिती प्रवाशांनी दिली.

अचानक झालेल्या या आंदोलनामुळे कामावरून घरी परतणाऱ्या चाकरमान्यांना मध्य रेल्वे वरील सर्व स्थानकात मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला.

तसंच काही प्रवाशांनी थेट रुळावरून चालत जाण्याचा निर्णय घेतला आणि अपघात घडला.

रेल्वे प्रशासनाने या संदर्भात काय म्हटले?

मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी स्वप्निल लीला यांनी या संदर्भात बोलताना म्हटलं की, या कर्मचाऱ्यांचा आंदोलनामुळे मध्य रेल्वेच्या लोकल 5.50 मिनिट ते 6 वाजून 45 मिनिटांपर्यंत प्रभावित झाल्या होत्या.

मुंब्रा इथे झालेल्या अपघातात लोहमार्ग पोलिसांनी 2 अभियंत्यांवर गुन्हे दाखल केले, त्याच्या विरोधात मध्य रेल्वेच्या कर्मचाऱ्यांनी हे आंदोलन केल्याचंही त्यांनी सांगितलं.

कर्मचारी डीआरएम कार्यालयासमोर शांतते आंदोलन करणार असल्याचं सांगण्यात आलं होतं. यामध्ये कर्मचाऱ्यांचा मागण्यासंदर्भात वरीष्ठ अधिकाऱ्यांशी बोलून वाहतुकीवर परिणाम होऊ नये, म्हणून चर्चा घडवली आणि रेल्वे सेवा सुरळीत करण्याचा प्रयत्न केला, असंही त्यांनी सांगितंलं.

"या दरम्यान सँडहर्स्ट रोड स्थानकाजवळ सीएसएमटीवरून कल्याणला जाणाऱ्या एका लोकलचा ट्रॅकवरून जाणाऱ्या चार लोकांना धक्का लागला."

प्रवासी संघटना आक्रमक; यास जबाबदार कोण ?

या घटने संदर्भात रेलयात्री परिषदेचे अध्यक्ष सुभाष गुप्ता म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस वर रेल्वे कर्मचारी युनियनने केलेल्या आंदोलनामुळे प्रवाशांना याचा फटका बसला.

काही रेल्वे प्रवाशांचा दुर्दैवी मृत्यू झाला. यासंदर्भात युनियन आणि कर्मचाऱ्यांना जबाबदार धरून त्यांच्यावर गुन्हा दाखल करत कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली.

महाराष्ट्र रेल्वे प्रवासी संघटनेनं ह्यास जबाबदार कोण ? रेल्वे प्रवाशांना वेठीस धरणाऱ्या ह्या रेल्वे प्रवाशांवर कारवाई होणार का ? असे प्रश्न उपस्थित केले.

मुंबई लोकल

फोटो स्रोत, Getty Images

ठाणे रेल्वे प्रवासी संस्थेचे नंदकुमार देशमुख यांनी, याप्रकरणी चौकशी करून कारवाई कऱण्याची मागणी केली.

बीबीसी मराठीने या प्रकरणी नॅशनल रेल्वे मजदूर युनियनचे सेक्रेटरी वेणू नायर यांच्याशी संपर्क साधला.

नायर यांनी म्हटलं की, "लोकांना त्रास होईल असं काम आम्ही कधीच केलं नाही आणि करणारही नाही. मुंब्रा प्रकरणात आमच्या दोन कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला हे अत्यंत चुकीचे आहे.

या विरोधात आमच्या कर्मचाऱ्यांनी डीआरएम कार्यालयाजवळ शांततेत आंदोलन केलं. यामध्ये कुठेही लोकांना त्रास देण्याचा विषय नाही. लोकल अपघात झाला ही घटना दुर्दैवी आहे. प्रवासी संघटना जे आरोप करत आहेत, त्यात काही तथ्य नाही."

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)