भांडी घासण्याच्या स्पंजमध्ये असतात भरपूर बॅक्टेरिया, ब्रश वापरणं ठरेल का योग्य?

प्रत्येक स्वयंपाकघरात महिला भांडी स्वच्छ करण्यासाठी स्पंजचा वापर करतात.

फोटो स्रोत, Getty Images

    • Author, जास्मिन फॉक्स-स्कॅली

प्रत्येक स्वयंपाकघरात महिला भांडी स्वच्छ करण्यासाठी स्पंजचा वापर करतात. भांडी सहज स्वच्छ व्हावी यासाठी महिलांचे स्पंजला प्राधान्य असतं. बाजारातही स्पंजचे अनेक पर्याय उपलब्ध आहेत.

जेवणासाठी वापरलेल्या प्लेट्स आणि इतर भांडी स्वच्छ करण्यासाठी किचन स्पंजचा वापर केला जातो. पण हे किचन स्पंज नेहमी ओलसर, खरकटं अन्न असलेल्या जागेत म्हणजे बॅक्टेरिया वाढण्यासाठी पोषक असलेल्या ठिकाणी ठेवलेले असतात.

स्वयंपाकघरातील अशा घातक स्पंज ऐवजी मग आपण वॉशिंग ब्रशची निवड करावी का?

बॅक्टेरियाच्या अनेक प्रजाती आहेत. त्या प्रत्येक प्रजातीच्या राहण्याच्या, त्यांच्या उत्पत्तीच्या आणि त्या वाढण्याच्या अनेक जागा आहेत.

काही बॅक्टेरिया हे पृथ्वीच्या पृष्ठभागात अगदी खोलवर असतात, काही उकळत्या पाण्यातही वाढतात तर काही बॅक्टेरिया हे टुंड्रा प्रदेशातील गोठलेल्या घरातही निर्माण होतात.

ग्राफिक्स
ग्राफिक्स

'बॅक्टेरियांसाठी स्पंज म्हणजे स्वर्गच'

पण जेव्हा आपण एखाद्या बॅक्टेरियाला तुला कुठं राहायला आवडेल असं विचारलं, तर कदाचित तो बॅक्टेरिया तुमच्या स्वंयपाकघरातील स्पंजला पहिलं स्थान देईल.

होय, हे अगदी खरं आहे. असं दिसून आलं आहे की, आपण आपले प्लेट्स आणि ग्लासेस स्वच्छ करण्यासाठी जे स्पंज वापरतो, ते सूक्ष्मजीवांनी (मायक्रोबियल) भरलेले असतात.

बॅक्टेरियांसाठी स्पंज हे स्वर्गच आहेत. ते उबदार, ओलसर आणि सूक्ष्मजंतूंना मेजवानी देण्यासाठी, त्यांच्या वाढीसाठी पौष्टिक अन्नाच्या कणांनी भरलेले असतात.

2017 मध्ये, जर्मनीतील फुर्टवांगेन विद्यापीठातील सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ मार्कस एगर्ट यांनी स्वयंपाकघरातील वापरलेल्या स्पंजच्या बॅक्टेरियल मायक्रोबायोमवर नवीन डेटा प्रकाशित केला.

त्यांनी त्या स्पंजमध्ये तब्बल 362 सूक्ष्मजीवांच्या प्रजातींचा शोध लावला. काही ठिकाणी, बॅक्टेरियाची घनता प्रति चौरस सेंटीमीटर 54 अब्ज व्यक्तींपर्यंत पोहोचली होती.

"हे खूप मोठं प्रमाण आहे. आपल्याला मानवाच्या मलामध्ये आढळणाऱ्या बॅक्टेरियांच्या संख्येइतकं हे आहे," असं एगर्ट म्हणाले.

सूक्ष्मजंतूंना लपण्यासाठी आणि त्याची वाढ व्हावी यासाठी तुमच्या किचन स्पंजमधील छिद्रं भरपूर जागा देतात.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, सूक्ष्मजंतूंना लपण्यासाठी आणि त्याची वाढ व्हावी यासाठी तुमच्या किचन स्पंजमधील छिद्रं भरपूर जागा देतात.
Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

स्पंजमध्ये खूप छिद्रं आणि छोटे छोटे भाग असतात. प्रत्येक सूक्ष्मजीवांच्या समुदायाला त्याठिकाणी राहण्यासाठी जागा असते.

ड्यूक युनिव्हर्सिटीतील सिंथेटिक बायोलॉजिस्ट लिंगचाँग यू आणि त्याच्या टीमनं 2022 च्या अभ्यासासाठी स्पंजच्या जटिल वातावरणाचं मॉडेल तयार करण्यासाठी कॉम्प्युटरचा वापर केला.

त्यांना असं आढळलं की, विविध आकाराचे छिद्रं असलेल्या स्पंजमध्ये सर्वाधिक सूक्ष्मजीवांची वाढ होते. त्यानंतर त्यांच्या टीमनं सेल्यूलोज स्पंजमध्ये विविध प्रकारच्या इ कॉइलचे विविध घटक वाढवून त्या परिणामांची प्रतिकृती तयार केली.

"त्यांना असं आढळून आलं की स्वयंपाकघरातील स्पंजमध्ये वेगवेगळ्या आकारांचे छिद्रं असणं खूप महत्त्वाचं आहे (बॅक्टेरियाच्या वाढीस प्रोत्साहन देण्यासाठी)," असं एगर्ट सांगतात.

"हे योग्य कारण आहे, सूक्ष्मजंतूंसाठी, आपल्याकडे असे काही बॅक्टेरिया असतात, ज्यांना स्वतःलाच वाढायला आवडतं आणि आपल्याकडे असेही काही बॅक्टेरिया आहेत ज्यांना इतरांच्या सहवासाची गरज असते. एका स्पंजमध्ये इतक्या विविध संरचना किंवा कोपरे असतात की प्रत्येकाला तिथं स्थान मिळतं."

स्पंज नक्कीच बॅक्टेरियांसाठी चांगलं निवासस्थान असतं. परंतु, याचा अर्थ असा नाही की हे भांडे आपल्या आरोग्यासाठी धोकादायक ठरतात. बॅक्टेरिया सर्वत्र असतात, आपल्या त्वचेवर, मातीमध्ये आणि आपल्या सभोवतालच्या हवेतही.

सर्वच बॅक्टेरिया हानिकारक नसतात. खरं तर अनेक जीवाणू महत्त्वाची भूमिका पार पाडत असतात. महत्त्वाचा प्रश्न असा आहे की, स्पंजमध्ये आढळणारे बॅक्टेरिया चिंतेचे कारण आहेत का?

'या बॅक्टेरियाचा धोका कोणाला?'

एगर्ट यांच्या 2017 च्या अभ्यासात, त्यांनी सर्वात सामान्य प्रजातींचे डीएनए जुळवून पाहिले. प्रत्येक बॅक्टेरियमच्या अचूक प्रजातीची ओळख पटवणं शक्य नसलं तरी, दहा सर्वाधिक प्रचलित प्रजातींपैकी पाच प्रजाती त्या बॅक्टेरियाशी जवळून संबंधित होत्या, ज्यामुळं रोगप्रतिकारक शक्ती कमी असलेल्या व्यक्तींमध्ये संसर्ग होण्याची शक्यता असते.

मायक्रोवेव्हमध्ये स्पंज गरम करणं, साबणाच्या पाण्यानं धुणं यांसारख्या विशेष साफसफाईच्या उपायांनीही खूप फायदा झाला नाही. कारण यामुळं काही बॅक्टेरिया नष्ट झाले असले, तरी अधिक प्रतिकारक प्रजातींना पोसण्यासही तिथं संधी मिळाली.

"आमचा तर्क आहे की, स्वच्छतेसाठी आपण केलेल्या उपायांमुळं एक प्रकारच्या बॅक्टेरियाची निवड प्रक्रिया होऊ शकते. त्यातूनही काही जिवंत राहिलेले बॅक्टेरिया पुन्हा मोठ्या संख्येनं वाढू शकतात," असं एगर्ट म्हणतात.

"जर तुम्ही हे आणखी काही वेळा केलं, तर यामुळं साफसफाईसाठी अधिक चांगल्या प्रकारे जुळवून घेणारेही बॅक्टेरिया निर्माण होऊ शकतात."

ब्रशने धुणे हा अधिक आरोग्यदायी पर्याय असू शकतो. कारण ब्रश लवकर कोरडे होतात आणि त्यात कमी सूक्ष्मजंतू (मायक्रोब्स) असतात.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, ब्रशने धुणे हा अधिक आरोग्यदायी पर्याय असू शकतो. कारण ब्रश लवकर कोरडे होतात आणि त्यात कमी सूक्ष्मजंतू (मायक्रोब्स) असतात.

हे लक्षात घेणं महत्त्वाचं आहे की, एगर्ट यांनी शोधलेल्या कोणत्याही जीवाणूचा अन्न विषबाधा किंवा गंभीर आजाराशी संबंध नाही.

खरं तर, खाद्यजन्य आजारांमुळं रुग्णालयात दाखल झालेल्यांपैकी 90% फक्त पाच रोगजनकांवर (Pathogens) आधारित असू शकतात. त्यापैकी तीन जीवाणू आहेत - एस्चेरिचिया कोलाई, साल्मोनेला आणि कॅम्पिलोबॅक्टर.

आनंदाची गोष्ट म्हणजे हे जीवाणू स्पंजमध्ये आढळून येणं खूपच दुर्मिळ आहे.

"आम्हाला फक्त संभाव्य रोगजनक बॅक्टेरिया सापडले. म्हणजे असे बॅक्टेरिया जे कमकुवत प्रतिकारशक्ती असलेल्या व्यक्तींसाठी, वयस्कर लोकांसाठी किंवा लहान मुलांसाठी धोकादायक असू शकतात," असं एगर्ट म्हणतात.

"सामान्यतः, निरोगी व्यक्तीसाठी, स्वयंपाकघरातील स्पंजमधील बॅक्टेरिया हानिकारक नसतात."

'किचनसाठी स्पंज चांगला की ब्रश?'

2017 मध्ये, जेनिफर क्विनलन, यूएसमधील प्रेयरी व्ह्यू ए अँड एम युनिव्हर्सिटीमधील अन्न सुरक्षा क्षेत्रातील प्राध्यापिका. त्यांनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी फिलाडेल्फियातील 100 घरांमधून किचनमधील स्पंज गोळा केले.

त्या स्पंजपैकी फक्त 1 ते 2% स्पंजमध्ये मानवांमध्ये अन्न विषबाधेशी संबंधित बॅक्टेरिया असल्याचं त्यांना त्यात आढळून आलं. जे सापडले ते कमी प्रमाणातील हानिकारक बॅक्टेरिया होते.

या निष्कर्षाला 2022 च्या अभ्यासानं पुष्टी मिळाली. ज्यामध्ये नॉर्वेजियन फूड रिसर्च इन्स्टिट्यूट नोफिमाच्या शास्त्रज्ञ सॉल्वेग लँगस्रुड यांनी स्पंज आणि ब्रशेस धुतल्यानंतर आढळणाऱ्या जीवाणूंची तुलना केली.

त्यांना दोन्ही प्रकारच्या भांड्यांमध्ये निरुपद्रवी नॉन-पॅथोजेनिक बॅक्टेरियाचा एक सामान्य गट आढळला. ज्यामध्ये ॲसिनेटोबॅक्टर, क्रायसोबॅक्टेरियम, ॲनहायड्रोबॅक्टर, ॲन्टरोबॅक्टेरिया आणि स्यूडोमोनास यांचा समावेश आहे.

परंतु, ब्रशमध्ये एकूण बॅक्टेरियांची संख्या खूपच कमी होती.

किचन स्पंज नेहमी ओलसर, खरकटं अन्न असलेल्या जागेत म्हणजे बॅक्टेरिया वाढण्यासाठी पोषक असलेल्या ठिकाणी ठेवलेले असतात.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, किचन स्पंज नेहमी ओलसर, खरकटं अन्न असलेल्या जागेत म्हणजे बॅक्टेरिया वाढण्यासाठी पोषक असलेल्या ठिकाणी ठेवलेले असतात.

स्पंजवरील बहुसंख्य जीवाणू आजारपणास कारणीभूत नसतात, ते फक्त त्या स्पंजला दुर्गंधी आणतात. कालांतरानं ते नकोसे वाटतात," असं क्विनलन म्हणतात.

"तरीही, असं होण्याची शक्यता असते की जर तुम्ही कच्चं मांस किंवा चिकनची ग्रेव्ही साफ करण्यासाठी स्पंज वापरलात तर तिथे काही रोगजनक जीवाणू असू शकतात. अभ्यासात असं आढळून आलं आहे की, स्वयंपाकघरातील स्पंजपासून पॅथोजेन्स वेगळे काढले जाऊ शकतात."

म्हणजेच, तुमच्या स्पंजमध्ये वाढणारे बॅक्टेरिया सामान्यतः हानिकारक नसतात. तरी, साल्मोनेलासारखे धोकादायक बॅक्टेरिया स्पंजवर आले तर स्पंजची रचना ही या पॅथोजेनला वाढीसाठी आदर्श ठिकाण ठरु शकते.

लँगस्रुड यांच्या अभ्यासात, जेव्हा संशोधकांनी साल्मोनेलाला स्वयंपाकघरातील स्पंजमध्ये घातले तेव्हा ते वाढले. परंतु जेव्हा त्यांनी ब्रशमध्ये हा जीवाणू सोडला तेव्हा ते मरण पावल्याचे दिसून आले.

असं होऊ शकतं, कारण ब्रश अनेकदा वापरादरम्यान एकदम कोरडे होतात. ज्यामुळं साल्मोनेला जीवाणू नष्ट होतात. पण जर स्पंज दररोज वापरल्यास ते आतून ओलसर राहू शकतात.

हे संभाव्य रोगजनक बॅक्टेरिया नंतर आपल्या स्पंजमधून प्लेट्स, भांडी किंवा इतर ठिकाणी जाऊ शकतात.

'मग किचन स्पंज कधी बदलावा?'

मग तुम्ही तुमचा किचन स्पंज कधी आणि किती वेळा बदलावा?, क्विनलन यांच्या मते, स्वच्छतेच्या दृष्टीने आणि एक प्रमाण म्हणून पाहिल्यास तुम्ही ते आठवड्याला बदललं पाहिजे.

पण आठवड्याचा हा कालावधी वाढवायचा असेल किंवा तो स्पंज तुम्हाला आणखी वापरायचा असेल तर काही गोष्टी आपण करु शकतो.

"हे स्पंज स्वच्छ करण्याचे दोन सोपे मार्ग आहेत. तुम्ही ते सांयकाळी सर्वात शेवटी ते डिशवॉशरमध्ये ठेवू शकता, किंवा तुम्ही त्यांना एक मिनिट मायक्रोवेव्ह करू शकता. जोपर्यंत तुम्हाला त्यातून वाफ येताना दिसत नाही, तोपर्यंत तुम्ही तो मायक्रोवेव्हमध्ये ठेवू शकता. त्यामुळं बहुतेक पॅथोजन्स मरण पावतात म्हणजेच नष्ट होतात."

निश्चितपणे, अभ्यासातून असं दिसून आलं आहे की, तुमचा स्पंज डिशवॉशर किंवा मायक्रोवेव्हमध्ये ठेवल्यानं बॅक्टेरियांची संख्या कमी होते आणि तुमचा स्पंज ब्लीचमध्ये भिजवण्यापेक्षा अधिक प्रभावी ठरू शकतो.

परंतु एगर्ट यांच्या अभ्यासानुसार, यामुळं कालांतरानं अधिक प्रतिकारक प्रजातींची निर्मिती होऊ शकते. नंतर स्पंजची स्वच्छतेची ही पद्धत कमी प्रभावी ठरु शकते.

उकळत्या पाण्यात आणि जंतुनाशकामध्ये स्पंज टाकल्याने बहुतेक जीवाणू देखील नष्ट होतात. तरी काही जीवाणू जिवंत राहू शकतात. विशेषत: संरक्षण गमावलेले बायोफिल्म्स.

स्पंज नक्कीच बॅक्टेरियांसाठी चांगलं निवासस्थान असतं. परंतु, याचा अर्थ असा नाही की हे भांडे आपल्या आरोग्यासाठी धोकादायक ठरतात

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, स्पंज नक्कीच बॅक्टेरियांसाठी चांगलं निवासस्थान असतं. परंतु, याचा अर्थ असा नाही की हे भांडे आपल्या आरोग्यासाठी धोकादायक ठरतात

इतर टिप्समध्ये सांगता येण्यासारखी गोष्ट म्हणजे, स्पंज सिंकमध्ये ठेवू नका. सिंकमध्ये ते नसतील तर ते कोरडे राहतील. तो स्पंज पूर्णपणे कोरडा करुन त्यातील अन्नाचे कण देखील काढून टाका.

परंतु, काही लोक भांडी स्वच्छ करण्यासाठी पूर्णपणे वेगळ्या साधनांचा वापर करण्याचा विचार करू शकतात.

"मी किचन स्पंज वापरण्याचा विचारही करणार नाही. मला किचनमधील वातावरणात असं काही वापरणं निरर्थक वाटतं," असे एगर्ट म्हणतात.

"ब्रश खूप चांगला आहे. कारण त्यामध्ये कमी बॅक्टेरिया असतात आणि ते सहजपणे कोरडे होतात. ते स्वच्छ करणे देखील सोपं आहे."

बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.