जगभरात गोवरचा संसर्ग का वाढतोय? किती धोकादायक असतो हा आजार?

फेब्रुवारी महिन्यात अमेरिकेतील टेक्सास राज्यातील आरोग्य अधिकाऱ्यांनी गेल्या अनेक वर्षांमध्ये पहिल्यांदा एका बाळाचा गोवर झाल्यामुळे मृत्यू झाल्याची माहिती दिली.

साहजिकच ही बातमी चर्चेत आली. लवकरच गोवर झाल्यामुळे आणखी एका बाळाचा मृत्यू झाला. न्यू मेक्सिको या अमेरिकेतील आणखी एका राज्यात गोवरामुळे एका प्रौढ रुग्णाचा मृत्यू झाला. या तिघांनाही गोवर प्रतिबंधक लस देण्यात आली नव्हती.

2000 मध्ये अमेरिकेतून गोवराचं उच्चाटन झाल्याचं जाहीर करण्यात आलं होतं. 25 वर्षांनी अमेरिकेच्या सेंटर फॉर डिसिज कंट्रोल (सीडीसी) या आरोग्य संस्थेनं यावर्षी जानेवारी ते मे दरम्यान अमेरिकेत गोवरचे किमान 900 रुग्ण आढळल्याची माहिती दिली आहे.

गेल्या वर्षाच्या तुलनेत यात 200 टक्क्यांची वाढ झाली आहे. या बातमीविषयी चर्चा होण्यामागचं एक कारण हे देखील आहे की अमेरिकेचे नवे आरोग्य मंत्री रॉबर्ट एफ केनेडी ज्युनियर सुरुवातीपासूनच लसीकरणाबद्दल शंका व्यक्त करत आहेत.

फक्त अमेरिकाच नाही तर संपूर्ण जगभरातील मुलांसाठी हा आजार एक मोठी समस्या आहे. कोरोनाच्या संकटकाळात आजाराचे विषाणू वेगानं एका देशातून दुसऱ्या देशात संक्रमित होताना आपण पाहिलं होतं.

जागतिक आरोग्य संघटनेच्या एका प्रादेशिक संचालकांनी म्हटलं आहे की, ही जगानं सावध होण्याची वेळ आहे. मोठ्या प्रमाणात लसीकरण केल्याशिवाय या आजारापासून बचाव करणं खूप कठीण आहे.

त्यामुळेच या आठवड्यात आम्ही जगभरातून हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला की जगात गोवराचा संसर्ग का वाढतो आहे?

गोवर किंवा मीसल्स म्हणजे काय?

युरोपात गेल्या 25 वर्षांच्या तुलनेत 2024 मध्ये गोवराचे सर्वाधिक रुग्ण आढळले आहेत. यात सर्वाधिक रुग्ण रोमानियामध्ये आढळले आहेत. तिथे गोवराचे तीस हजारांहून अधिक रुग्ण नोंदवण्यात आले आहेत.

रोमानियास्थित डॉक्टर क्लॉडिया कोयोकारू या नवजात बाळांच्या आरोग्याच्या तज्ज्ञ आहेत. आम्ही त्यांना विचारलं की, आधुनिक काळात गोवराचे रुग्ण आढळत असल्याचं पाहून त्यांना काय वाटतं?

डॉक्टर क्लॉडिया यांनी उत्तर दिलं, "एका वर्षापेक्षा लहान वयाच्या बाळांना लस दिली जाऊ शकते. मला या गोष्टीचं वाईट वाटतं की, सामाजिक सुरक्षेचं माध्यम म्हणून इथे 'हर्ड इम्युनिटी' नव्हती. लोकं जेव्हा लस घेण्यास नकार देतात आणि मग त्यांच्या मुलांना हा आजार होतो, तेव्हा मला वाईट वाटतं."

हर्ड इम्युनिटी म्हणजे गोवरापासून बचाव करण्यासाठीच्या प्रतिरोधक क्षमतेचा अर्थ आहे की 95 टक्के लोकांना गोवरापासून संरक्षण करण्यासाठी लस देण्यात आलेली असावी.

यामुळे समुदायात गोवरच्या संसर्गाचा फैलाव होणं थांबवलं जाऊ शकतं. विशेषकरून मुलांना आणि ज्या लोकांची रोगप्रतिकार शक्ती कमी असते अशांना लस दिली पाहिजे.

गोवर आजाराचा एक असा धोका असतो की, जिथे लोकांनी याची लस घेतली नसेल तिथे हा आजार खूप वेगानं पसरतो.

डॉक्टर क्लॉडिया कोयोकारू म्हणतात की, 'हा एक अत्यंत संसर्गजन्य विषाणू आहे. जर एखाद्या व्यक्तीला लस देण्यात आली नाही, तर त्यात दुसऱ्या व्यक्तीला गोवरचा संसर्ग होण्याची शक्यता 90 टक्के असते.'

कोरोनाच्या संकटकाळात आपल्या सर्वांना 'आर रेट 'किंवा 'रीप्रॉडक्शन दरा'बद्दल समजलं.

आर रेटद्वारे हे लक्षात घेतलं जातं की, विषाणूचा प्रसार किती वेगानं होईल. ज्या समुदायात लोकांना लस देण्यात आलेली नाही, तिथे गोवराच्या एका रुग्णामुळे इतर 12 ते 18 जणांना आजाराचा संसर्ग होऊ शकतो. हा आजार वेगानं पसरण्याचं एक कारण म्हणजे याची लक्षणं लवकर समोर येत नाहीत.

डॉक्टर क्लॉडिया कोयोकारू सांगतात की, 'सुरुवातीला गोवर झालेल्या रुग्णाची तब्येत बिघडते, त्याला खूप ताप येतो. यादरम्यान त्याच्यामुळे इतर लोकांना सर्वाधिक संसर्ग होऊ शकतो.'

गोवरची लक्षणं

तीव्र ताप, सर्दी-पडसं, शरीरावर लाल पुरळ, नाक वाहणं, डोळे लाल होणं आणि तोंडात छोटे पांढरे डाग.

गोवराच्या लक्षणांबद्दल डॉक्टर क्लॉडिया कोयोकारू सांगतात की, सर्वसाधारणपणे रुग्णाच्या शरीरावर पुरळ किंवा लाल चट्टे येऊ लागतात. हे पुरळ किंवा चट्टे सहसा कानाच्या मागे किंवा डोक्यावर येतात.

मग ते हळूहळू चेहरा आणि शरीराच्या खालच्या भागात पसरतात. हे चट्टे किंवा पुरळ एक ते दोन आठवडे राहतात. ते गेल्यानंतर तिथली त्वचा सोलली जाते. अनेकजणांमध्ये हा गैरसमज आहे की गोवर हा मुलांना होणारा किरकोळ आजार आहे.

डॉक्टर क्लॉडिया कोयोकारू याबाबत इशारा देतात. या आजाराचा आरोग्यावर खूप विपरित परिणाम होतो. त्यामुळे आरोग्याच्या अनेक समस्या निर्माण होतात, असं त्या सांगतात.

डॉक्टर क्लॉडिया यांच्या मते, "गोवराचा संसर्ग झाल्यानंतर सहा महिने ते तीन वर्षांपर्यंत एकप्रकारे आपली रोगप्रतिकारक क्षमता संपते किंवा क्षीण होते. या दरम्यान आपल्या शरीरात इतर जीवाणू किंवा विषाणूंचा संसर्ग होऊ शकतो.'

उदाहरणार्थ, एन्सिफलायटीस, न्यूमोनिया, मेनिंजायटीस आणि टीबी. गोवर हा विषाणूमुळे होणारा आजार आहे. त्यावर अँटिबायोटिक्स किंवा अँटिव्हायरल औषधांनी उपचार केले जाऊ शकत नाहीत.

मात्र, आपण किंवा आपल्या कुटुंबातील सदस्य गोवराच्या रुग्णाच्या संपर्कात आल्यास आपण स्वत: आणि त्यांनादेखील लगेचच लस घेऊ शकतो.

गोवर झालेल्या रुग्णाच्या संपर्कात आल्यानंतर तीन दिवसांच्या आत जर लस देण्यात आली, तर आजाराच्या संसर्गाची शक्यता खूपच कमी होते.

जगभरात का होत आहे प्रसार?

गोवरपासून बचाव करण्यासाठी तयार करण्यात आलेली लस 1963 पासून उपलब्ध आहे. ही लस खूप प्रभावीही ठरली आहे. मग, गोवरचा संसर्ग युरोपच नाही तर संपूर्ण जगभरात का पसरत आहे?

रॉब बटलर, जागतिक आरोग्य संघटनेमध्ये संसर्गजन्य आजारांसंबंधीच्या विभागाचे संचालक आहेत.

रॉब म्हणतात की, गोवराच्या रुग्णांची संख्या वाढत आहे. 2023 आणि 2024 मध्ये जगभरात गोवरच्या रुग्णांच्या संख्येत वाढ झालेली दिसून आली आहे. 2025 मध्येही याच वेगानं संसर्ग पसरत आहे.

इथियोपिया, केनिया, सेनेगल, कॅमेरून आणि येमेन या देशांमध्ये गेल्या वर्षी गोवराचा संसर्ग वेगानं पसरला आहे. तिथे गोवराचे 23 हजार रुग्ण आढळले आहेत.

भारत, इंडोनेशिया, कॅनडा आणि अमेरिकेत देखील या आजाराचा संसर्ग वाढतो आहे. गेल्या वर्षी युरोपात गोवरचे एक लाख तीस हजार रुग्ण आढळले होते.

गोवर झाल्यावर कोणतेही विशेष उपचार नाहीत. बहुतांश रुग्ण पुरेशी विश्रांती आणि किरकोळ उपचारानं बरे होतात.

संसर्ग वेगानं पसरण्यामागचं कारण काय?

रॉब बटलर म्हणाले की, "यामागे मुख्यत: तीन कारणं आहेत. अशक्तपणा, गैरसमज आणि विश्वास. चार वर्षांपूर्वी मी जेव्हा आईला ब्रिटनमध्ये गोवरच्या संसर्गाबद्दल सांगितलं तेव्हा तिचा विश्वास बसला नाही. कारण तिला वाटलं की, गोवरचं पूर्ण निर्मूलन झालं आहे."

"मात्र, यातून आपल्या आरोग्य व्यवस्थेच्या उणीवाही समोर आल्या. गरीब किंवा खालच्या वर्गातील लोकांना गोवरचा धोका अधिक आहे. अशा परिस्थितीत सार्वजनिक आरोग्य व्यवस्था चांगली आहे असं म्हणणाऱ्या देशांमध्ये गोवरचा संसर्ग वाढतो आहे. त्यामुळे तिथल्या सरकारांनी आत्मपरीक्षण केलं पाहिजे."

जागतिक आरोग्य संघटना आणि अमेरिकेच्या सीडीसी या राष्ट्रीय आरोग्य संस्थेनं केलेल्या संशोधनातून समोर आलं आहे की, 2023 मध्ये दोन कोटी तीस लाखांहून अधिक मुलांना गोवरच्या लशीचा दुसरा डोस देण्यात आला नाही.

अनेक देशांमध्ये कोरोनाच्या संकटामुळंही मुलांना लहानपणीच दिल्या जाणाऱ्या लशींची मोहीम थंडावली होती. मुलांना गोवराच्या लशीचे दोन डोस दिले जातात. त्यासाठी अनेकदा पालकांना हॉस्पिटलमध्ये फेऱ्या माराव्या लागतात.

नोकरदार वर्गातील पालकांसाठी असं करणं सोपं नसतं. बटलर म्हणतात की, विश्वासाचा अभाव असणं हीदेखील लसीकरणाशी संबंधित मोठी समस्या आहे.

बटलर यांच्या मते, अनेकजण लस घेणं टाळतात, कारण त्यांना आरोग्य विभाग, देशातील नेते आणि लशीची निर्मिती करणाऱ्या कंपन्या यांच्यावर विश्वास नसतो. प्रत्येक समुदायात याचं स्वरुप वेगवेगळं असतं.

लसीकरण मोहीम कशी चालवण्यात यावी, याबाबत मतं घेण्यासाठी आरोग्य क्षेत्राबाहेरील लोकांचा देखील यात समावेश केला पाहिजे. उदाहरणार्थ, समाजशास्त्रज्ञांकडूनही हे लक्षात घेतलं जाऊ शकतं की, लोकांना कशा प्रकारच्या आरोग्य सेवा हव्या आहेत.

भारतात गोवरची लस

भारतात गोवर-रूबेला (एमआर) लसीचा पहिला डोस 9-12 महिने आणि दुसरा डोस 16-24 महिन्यांत दिला जातो.

डॉक्टर बेंजामिन डाबुश अँथ्रोपोलॉजिस्ट (मानववंशशास्त्रज्ञ) आणि लंडन स्कूल ऑफ ट्रॉपिकल मेडिसिनमध्ये सहाय्यक प्राध्यापक आहेत.

ते म्हणतात की, "कोरोनाच्या संकटानंतर लोक लस टाळण्याबद्दल अधिक बोलू लागले आहेत. मात्र, यामुळे आपली आरोग्य व्यवस्था कमकुवत होऊ शकते."

1998 मध्ये गोवरप्रतिबंधक एमएमआर लसीबद्दल भीती निर्माण झाली होती. अँड्र्यू व्हाइटफील्ड या माजी ब्रिटिश डॉक्टरचा एक शोधनिबंध प्रकाशित झाल्यानंतर ते जगभरात खूपच चर्चेत आले होते.

या शोधनिबंधात त्यांनी इशारा दिला होता की, ही लस आणि ऑटिझममध्ये संबंध असणं शक्य आहे. अर्थात अनेक वैज्ञानिक अभ्यासानंतर हा दावा चुकीचा असल्याचं आढळून आलं. त्यानंतर त्यांचा लेख हटवण्यात आला.

2010 मध्ये व्हाइटफील्ड यांना व्यावसायिक गैरवर्तणुकीमुळे यूके मेडिकल रजिस्टरमधून काढण्यात आलं.

मात्र, या लसीबद्दल आजही लोकाच्या मनात शंका आहे. डॉक्टर बेंजामिन डाबुश म्हणतात की गोवरच्या लसीमुळे लाखो मुलांची जीव वाचला आहे. असं असूनदेखील जर लोक याला घाबरत असतील तर अशावेळी व्यवस्थेच्या भूमिकेबद्दल प्रश्न उपस्थित झाले पाहिजे.

ते म्हणतात, "अलीकडेच लसीच्या एका क्लिनिकमध्ये माझं एका मुलाच्या वडिलांशी बोलणं झालं. त्यावेळेस ते म्हणाले की, लस घेण्यासाठी अपॉईंटमेंट मिळण्यासाठी त्यांना चार आठवडे लागले. आपल्या सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेसाठी ही किती महत्त्वाची बाब आहे, हा प्रश्न उपस्थित व्हायला हवा."

"गोवर हा एक धोकादायक आजार आहे. मुलांना याची लस देण्यात तत्परता दाखवली गेली पाहिजे."

कोरोनाच्या संकटानंतर जगभरात लसीकरणाबद्दल समाजात वेगवेगळी मतं आहेत. काही जणांना वाटतं की, लस घेणं ही वैयक्तिक बाब आहे. तर काही जणांना वाटतं की, हा एक सामाजिक जबाबदारीचा मुद्दा आहे.

डॉक्टर बेंजामिन डाबुश यांच्या मते, प्रत्येक देशात याबद्दल वेगवेगळी मतं असू शकतात. मात्र गोवरच्या संसर्गाच्या धोक्याकडे पाहता यातून मार्ग काढणं आवश्यक आहे.

डॉक्टर बेंजामिन यांना वाटतं की, प्रत्येक समाजात या मुद्द्याकडे वेगवेगळ्या प्रकारे पाहिलं जातं. अमेरिकेत वैयक्तिक स्वातंत्र्याला एक महत्त्वाचं मूल्य मानलं जातं. त्यामुळे लस घेण्याबाबतचा निर्णय लोकांच्या विवेकबुद्धीवर सोडण्याचा युक्तिवाद केला जातो.

मात्र, इतर अनेक देशांमध्ये असा युक्तिवाद केला जातो की आजारापासून बचाव करण्यासाठी लस घेणं ही एक नैतिक जबाबदारी आहे आणि ती सर्वांनीच पार पाडली पाहिजे. त्यामुळे प्रत्येक समाजात याबद्दल वेगवेगळा दृष्टीकोन आहे.

अमेरिकेचे आरोग्य मंत्री रॉबर्ट एफ केनडी ज्युनियर लसीबद्दल शंका व्यक्त करत आले आहेत. त्यामुळे त्यांच्या भूमिकेचा परिणाम इतर देशांवरही होईल का?

याबाबत डॉक्टर बेंजामिन डाबुश यांनी उत्तर दिलं की, "मला वाटतं, केनेडी त्यांच्या भूमिकेला व्हॅक्सिन हेजीटंन्सी म्हणण्याऐवजी, लस घेणं किंवा न घेणं हा लोकांचा वैयक्तिक निर्णय आहे असं म्हणतील. मात्र, यात हा धोका नक्कीच आहे की, त्यांचं वक्तव्यं इतर देशांमध्ये चुकीच्या पद्धतीनं घेतलं जाऊ शकतं."

"आपल्याला माहिती आहे की सध्या जगभरात चुकीची माहिती आणि बातम्या किती वेगानं पसरतात. असे निर्णय आपण पूर्णपणे लोकांवर सोडू शकत नाही."

लोकवस्त्यांमधील संसर्ग

अनेक देशांमध्ये मुलांना लस देण्याचं काम खूप कठीण असतं. उदाहरणार्थ, किरगिझस्तानमधील दुर्गम गावांमध्ये असणाऱ्या मुलांपर्यंत ही सुविधा पोहोचणं, ही अत्यंत आव्हानात्मक बाब आहे. कारण, हा डोंगराळ प्रदेश आहे.

युनिसेफच्या युरोप आणि मध्य आशियासाठीच्या इम्युनायझेशन तज्ज्ञ फातिमा चेंगीच म्हणाल्या की, किरगिझस्तानमध्येही गोवरच्या संसर्गाचा धोका वाढतो आहे. यावर्षी आतापर्यंत गोवरामुळे दोन मुलांचा मृत्यू झाला आहे.

"दुर्दैवानं अनेक देशांमध्ये लसीकरणाचं प्रमाण खूपच कमी आहे. मी गेल्या वर्षी माँटेनेग्रोमध्ये होती. तिथे अनेक भागांमध्ये लसीकरणाचं प्रमाण 25 टक्क्यांहून कमी होतं," असं त्या म्हणाल्या.

फातिमा चेंगीच आणि त्यांची टीम 22 देशांमध्ये काम करते. यातील अनेक देशांमध्ये स्थानिक समुदायांच्या वेगळ्या आवश्यकता आहेत. त्यानुसार तिथे आरोग्य सेवा पुरवण्याची आवश्यकता आहे.

फातिमा चेंगीज म्हणाल्या की, अनेकवेळा रोमा समुदायातील वस्त्यांमध्ये संसर्ग पसरतो.

"इतर लोकांच्या तुलनेत या समुदायातील मुलांना लस मिळण्याची शक्यता तीन पट कमी असते. आम्ही रोमा समुदायाच्या लोकांना सोबत घेऊन तिथे लस पोहोचवण्याचा प्रयत्न करतो. आधी आम्ही मुलांच्या पालकांना लशीच्या फायद्यांबद्दल माहिती देतो," असंही त्यांनी सांगितलं.

"मात्र 2025 मध्ये गोवरचा एवढ्या वेगानं प्रसार झाल्यानं आम्ही खूप आश्चर्यचकीत झालो. गेल्या पंचवीस वर्षांमध्ये पहिल्यांदा एवढे रुग्ण आढळले आहेत."

युरोप आणि मध्य आशियामध्ये गेल्या वर्षी गोवरमुळे 38 मुलांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. मात्र अपुरं रिपोर्टिंग आणि देखरेख करण्यातील हलगर्जीपणामुळे प्रत्यक्षात रुग्णांची संख्या यापेक्षा खूप अधिकही असू शकते.

फातिमा चेंगीज म्हणाल्या की, वेळीच योग्य पावलं उचलली नाहीत तर त्याचे काय परिणाम होऊ शकतात हे या प्रदेशातील लोकांना सांगण्यासाठी युनिसेफ आता अभियान चालवतं आहे. "आम्ही इम्युनायझेशन योजनेतील गुंतवणूक वाढवण्याचे देखील प्रयत्न करतो आहोत."

युनिसेफचा अंदाज आहे की, गोवरच्या प्रत्येक रुग्णावर उपचारापोटी 1,200 ते 1,400 डॉलरचा खर्च होतो. त्याउलट एका मुलाला लशीचे पूर्ण डोस देण्यासाठीचा खर्च फक्त 30 ते 40 डॉलर आहे.

फातिमा चेंगीज म्हणतात की, 'अनेकजणांना वाटतं की गोवर हा एक किरकोळ आजार आहे. मात्र प्रत्यक्षात तो एक जीवघेणा आजार आहे'. त्या पुढे म्हणतात की, 'या आजारापासून बचाव करण्याचा एकमेव मार्ग म्हणजे लस घेणं.'

त्या म्हणतात, 'या लशीबद्दल पालकांना चिंता वाटणं स्वाभाविक आहे. मात्र ही लस पूर्णपणे सुरक्षित आणि प्रभावी आहे. त्या पुढे म्हणतात की यावर्षी पुढे काय होणार हे माहित नाही. मात्र गोवर संसर्गाला आळा घातला जाऊ शकतो.'

आता पुन्हा आपल्या मूळ प्रश्नाकडे वळूया. तो म्हणजे जगभरात याचा संसर्ग इतका का वाढतो आहे?

इतर तज्ज्ञांनी ज्याप्रमाणे सांगितलं की, संसर्गामागे तीन कारणं आहेत. सुविधा, गैरसमज आणि विश्वास.

गोवरच्या संसर्गावर नियंत्रण मिळवण्यासाठी आपल्याला लस आणि त्याच्याशी निगडीत माहिती सोप्या आणि विश्वासार्ह पद्धतीनं लोकांपर्यंत पोहोचवावी लागेल.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)