You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
कोव्हिडचा 'JN.1' व्हेरियंट किती गंभीर आहे? तज्ज्ञांचा सल्ला काय आहे?
सिंगापूर, हाँगकाँगसारख्या अनेक देशांमध्ये कोव्हिड-19 च्या रुग्णांची संख्या पुन्हा एकदा वाढलेली आहे. भारतामधली परिस्थिती नियंत्रणात असल्याचं सांगण्यात आलंय.
27 एप्रिल ते 3 मे सिंगापूर 2025 च्या आठवड्यामध्ये सिंगापूरमध्ये कोव्हिडचे 14 हजार 200 नवे रुग्ण आढळल्याचं सिंगापूरच्या आरोग्य मंत्रालयाने सांगितलंय, तर त्या आधीच्या आठवड्यामध्ये कोव्हिडचे 11 हजार 100 रुग्ण आढळले होते.
तर थायलंड, हाँगकाँगसोबतच चीनमध्येही गेल्या काही महिन्यांमध्ये कोव्हिड-19 चे रुग्ण वाढले आहेत.
ओमिक्रॉन व्हेरियंटचा उपप्रकार असणाऱ्या JN.1 मुळे ही रुग्णसंख्या वाढल्याचं तज्ज्ञांनी म्हटलंय.
भारत सरकारच्या आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या डॅशबोर्डनुसार, भारतात सध्या (28 मे 2025) कोव्हिडचे 1010 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. त्यापैकी 383 रुग्ण महाराष्ट्रात आहेत.
JN.1 काय आहे?
सिंगापूरमध्ये आतापर्यंत ज्या सँपल्सचं जीनोम सिक्वेन्सिंग करण्यात आलं, त्यात बहुतेक प्रकरणं JN.1 व्हेरियंटची आढळल्याचं इकॉनॉमिक टाईम्सने म्हटलंय.
पण हा JN.1 व्हेरियंट नवा नाही.
गेल्या काही काळापासून जगभरात आढळणाऱ्या ओमिक्रॉनचा हा सब-व्हेरियंट म्हणजे उप-प्रकार आहे.
दिल्लीच्या अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था म्हणजे एम्स (AIIMS) चे कम्युनिटी मेडिसिन विभागाचे प्राध्यापक डॉक्टर संजय राय हे कोव्हॅक्सिन या कोव्हिड लशीच्या तीनही टप्प्यांमध्ये प्रमुख संशोधक होते.
बीबीसी प्रतिनिधी चंदन जजवाडे यांनी त्यांच्याकडून कोव्हिड 19 च्या JN.1 व्हेरियंटबद्दल माहिती घेतली.
डॉ. संजय राय सांगतात, "JN.1 कोरोनाच्या ओमिक्रॉन व्हायरसचाच एक व्हेरियंट आहे. याचा शोध लागून वर्षभरापेक्षा अधिक काळ उलटलाय. हा काही नवीन व्हायरस नाही. हा गंभीर ठरू शकतो वा नाही, याबद्दल आपल्याकडे सगळी माहिती आहे. JN.1 व्हेरियंटला घाबरण्याची गरज नाही. तसे कोणतेही पुरावेही नाहीत. आता आढळलेल्या गोष्टींनुसार हा कॉमन सर्दी-खोकल्याप्रमाणे किंवा त्याहीपेक्षा सौम्य असू शकतो."
तज्ज्ञांचा सल्ला काय आहे?
डॉ. संजय राय सांगतात, "कॉमन कोल्डही कोरोना व्हायरसच्याच कुटुंबातील आहे. कोरोना व्हायरसचं कुटुंब हजारोंचं आहे पण या कुटुंबातले फक्त सात घटक माणसांसाठी अडचणी निर्माण करतात. नेहमीच्या सर्दीशी संबंधित चार व्हायरस आधीपासूनच अस्तित्त्वात होते. त्यानंतर 2004-04 मध्ये चीनमधूनच सार्स-1 ला होता. 2012-13 मध्ये मिडल ईस्टमधून मर्स - मिडल ईस्ट रेस्पिरेटरी सिंड्रोम आला. यानंतर 2019 साली कोरोना व्हायरस - 2 (SARS-CoV-2) आला ज्याला आपण कोव्हिड-19 आजार म्हणतो."
ज्याप्रमाणे घरामध्ये एकाला सर्दी झाल्यानंतर घरातल्या सगळ्यांना होते, पण हे आजारपण इतकं गंभीर नसतं. कोरोनाही आता असाच झाल्याचं डॉ. राय सांगतात.
सिंगापूरच्या आरोग्य मंत्रालयानुसार, "सध्याच्या घडीला LF.7 आणि NB1.8 (JN.1 चा सब व्हेरियंट) हे सिंगापूरमध्ये पसरत असलेल्या कोव्हिड-19 साठी प्रामुख्याने जबाबदार आहेत. आतापर्यंत ज्या प्रकरणांमध्ये जीनोम सिक्वेन्सिंग करण्यात आलं त्यापैकी दोन तृतीयांश रुग्ण याचेच आहेत. JN.1 हा तो व्हेरियंटही आहे ज्याचा वापर सध्याच्या कोव्हिड-19 लशी तयार करण्यासाठी केला गेलाय."
हा व्हेरियंट पूर्वीच्या कोरोना व्हेरियंट्सप्रमाणे लोकांना गंभीर आजारी पाडत नसला तरी तो ज्या वेगाने पसरतोय, ते चिंताजनक असल्याचं तज्ज्ञांचं म्हणणं आहे.
पण डॉ. संजय राय सांगतात, "सर्दी-खोकला काही एकदाच होत नाही. पुन्हा पुन्हा होऊ शकतो. कोरोनाचेही 10 हजार व्हेरियंट्स आहेत आणि तो पूर्णपणे बदललेला आहे. कोव्हिडच्या काळात जेव्हा आम्ही पाहणी केली होती तेव्हा त्यादरम्यान जवळपास प्रत्येक व्यक्तीच्या शरीरात अँटीबॉडीज आढळल्या होत्या. म्हणजे जवळपास सगळ्यांना कोव्हिड होऊन गेला होता."
कोव्हिडचे काही रुग्ण हॉस्पिटलमध्ये दाखल झाल्याच्या बातम्या आल्या आहेत. मुंबईच्या एका हॉस्पिटलमध्ये कोरोनाचे दोन रुग्ण दाखल आहेत, पण यामध्ये घाबरण्याची बाब नसल्याचं महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी म्हटलंय.
एखाद्या व्यक्तीवर साध्या सर्दीमुळेही हॉस्पिटलमध्ये दाखल होण्याची पाळी येऊ शकते, असं डॉ. संजय राय सांगतात.
JN.1 ची लक्षणं आणि भारताची सज्जता
कोरोना व्हायरसच्या या व्हेरियंटची लागण झाल्यास आढळणारी लक्षणं ही ओमिक्रॉनपेक्षा फारशी वेगळी नाहीत.
JN.1चा संसर्ग झालेल्या रुग्णांमध्ये घसा खवखवणं, थकवा, डोकेदुखी आणि कफसारखी लक्षणं आढळतात.
पण अनेकांबाबत या गोष्टी त्यांचं एकूणच आरोग्य आणि रोगप्रतिकारक शक्तीवरही अवलंबून असतील.
JN.1 च्या काही रुग्णांमध्ये डायरिया आणि डोकेदुखीही आढळते.
सिंगापूर आणि हाँगकाँगमधली वाढती रुग्णसंख्या पाहता भारतात सोमवारी (19 मे) आरोग्य सेवांच्या महासंचालकांच्या अध्यक्षतेखाली एक उच्चस्तरीय बैठक झाल्याचं पीटीआय वृत्तसंस्थेने म्हटलंय. यामध्ये नॅशनल सेंटर फॉर डिसीज कंट्रोल, इमर्जन्सी मेडिकल रिलीफ डिव्हिजन, डिझास्टर मॅनेजमेंट सेल, इंडियन काऊन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च आणि केंद्र सरकारच्या हॉस्पिटल्समधले तज्ज्ञ सहभागी झाले होते.
एका अधिकाऱ्याचा दाखल देत पीटीआयने या वृत्तात म्हटलंय, "भारतामध्ये कोव्हिड _19ची परिस्थिती सध्या नियंत्रणात असल्याची चर्चा या बैठकीत झाली. भारतात 19 मे 2025 पर्यंत कोव्हिड-19 चे 257 रुग्ण आहेत. देशाची मोठी लोकसंख्या पाहता हा आकडा अतिशय कमी आहे. यापैकी जवळपास सगळी प्रकरणं गंभीर नाही. कुणालाही हॉस्पिटलमध्ये जाण्याची गरज भासलेली नाही."
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)