महाराष्ट्रात कोरोनाचे आतापर्यंत किती रुग्ण? किती मृत्यू?

आरोग्य आणि कुटुंब मंत्रालयाने दिलेल्या 3 जूनपर्यंतच्या आकडेवारीनुसार, भारतातल्या कोरोना रुग्णांची संख्या 4026 वर जाऊन पोहोचली आहे.

महाराष्ट्राच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने दिलेल्या आकडेवारीनुसार जानेवारी 2025 पासून महाराष्ट्रात 14 जणांचा मृत्यू झाला आहे. महाराष्ट्रात सध्या कोरोनाचे 510 सक्रिय रुग्ण आहेत.

सध्या महाराष्ट्रातल्या कोरोना रुग्णांमध्ये सौम्य लक्षणे आढळली असून आरोग्य विभागाने नागरिकांना घाबरून न जाण्याचे आवाहन केले आहे.

राज्यात जानेवारीपासून 959 लोकांना कोरोनाची लागण झाली असून यातून 435 रुग्ण बरे झाल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे.

याआधी ठाण्यामध्ये एका कोरोना रुग्णाचा मृत्यू झाला असल्याची माहिती ठाणे महानगरपालिकेकडून देण्यात आली होती. ठाण्यातील मृत तरुण हा 21 वर्षांचा होता. गंभीर स्वरूपाच्या मधुमेहामुळे त्याला गुरुवारी (22 मे) रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.

23 मे रोजी रात्री त्याची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली. त्यानंतर 24 मे रोजी सकाळी त्याचं निधन झालं, अशी माहिती छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयचे अधीक्षक डॉ. अनिरुद्ध माळगावकर यांनी दिली होती.

दरम्यान, जानेवारी 2025 पासून 3 जूनपर्यंत सहव्याधीने ग्रस्त असलेले 13 तर इतर 1 असे एकूण 14 रुग्ण दगावले आहेत.

'घाबरण्याचं कारण नाही, पण सतर्कता महत्त्वाची'

शल्य चिकित्सक डॉ. कैलास पवार यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलंय, "सध्या मुंबईला कोरोनाच्या केसेस वाढत आहेत, अशा बातम्या माध्यमांमध्ये येत आहेत. कालही ठाण्यामध्ये तीन अँटीजन पॉझिटीव्ह आले आहेत. कन्फर्म नाहीये. पण आतापर्यंतचा जो काही अनुभव आहे, त्यानुसार, या माईल्ड केसेस आहेत."

"हा ओमिक्रॉनचाच सब-व्हेरियंट आहे. पण यामध्ये घाबरण्यासारखं काही नाहीये. हा साधा व्हायरस आहे. पण, पावसाळाच्या पार्श्वभूमीवर सतर्कता महत्त्वाची आहे. महासाथ संपुष्टात आली आहे. आपल्याला कोरोनासोबत जगण्याची सवय झालेली आहे. फक्त सतर्कता बाळगणं गरजेचं आहे," असंही त्यांनी म्हटलं आहे.

कुठे किती रुग्ण?

सिंगापूर, हाँगकाँगसारख्या अनेक देशांमध्ये कोव्हिड-19 च्या रुग्णांची संख्या पुन्हा एकदा वाढलेली आहे.

मात्र, भारतामधील परिस्थिती नियंत्रणात असल्याचं सांगण्यात आलंय.

थायलंड, हाँगकाँगसोबतच चीनमध्येही गेल्या काही महिन्यांमध्ये कोव्हिड-19 चे रुग्ण वाढले आहेत.

ओमिक्रॉन व्हेरियंटचा उपप्रकार असणाऱ्या JN.1 मुळे ही रुग्णसंख्या वाढल्याचं तज्ज्ञांनी म्हटलंय.

भारत सरकारच्या आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या वेबसाईटवर 3 जून 2025 पर्यंतच्या कोरोना रुग्णांचे तपशील देण्यात आले आहेत. त्यानुसार, भारतात सध्या एकूण 4026 रुग्ण सक्रिय आहेत.

सध्या केरळमध्ये सर्वाधिक 1416 सक्रिय रुग्ण आहेत. त्याखालोखाल 510 सक्रिय रुग्ण महाराष्ट्रात आहेत. तसेच दिल्लीत 393, गुजरातमध्ये 397, पश्चिम बंगाल 372, कर्नाटकात 311, तामिळनाडूत 215 रुग्ण आढळून आले आहेत.

सार्वजनिक आरोग्य विभागानं दिलेल्या माहितीनुसार, जानेवारी 2025 पासून आजपर्यंत महाराष्ट्रातील सहव्याधीने ग्रस्त असलेले 14 रुग्ण दगावले आहेत. यापैकी एका रुग्णास नेफ्रोटिक सिंड्रोम सह हायपोकॅल्सिमिक सीझर होते व दुसऱ्या रुग्णास कर्करोग होता.

तसेच तिसऱ्या रुग्णास ब्रेन स्ट्रोक (Cerebrovascular Disease) झाला होता आणि फिट येत होती, आणि चौथ्या रुग्णास डायबेटिक किटोअॅसीडोसीस (DKA with LRTI) आजार होता.

पाच्या रुगणास ILD (Interstitial Lung Disease ) होता. सहाव्या रुग्णास मधुमेह होता आणि 2014 पासून अर्धांगवायू झालेला होता.

सातव्या रुग्णास Severe ARDS with dilated aortic regurgitation हा आजार होता. आठव्या रुग्णास मधुमेह तर नवव्या रुग्णास मधुमेह व उच्च रक्तदाब होता. तर, दहाव्या रुग्णाला कार्डियाक अरिथमिया होता.

अकराव्या रुग्णास पार्किंसन आजार आणि उच्च रक्तदाब, बाराव्या रुग्णास मधुमेह, उच्च रक्तदाब आणि क्रोनिक रेंटल फेल्युअर होतं. तेराव्या रुग्णास हृदयविकार आणि टीबी होती. तर, चौदाव्या रुग्णामध्ये ताप आणि धाप लागणे ही लक्षणं होती.

कोरोनाचा नवा व्हेरियंट JN.1 काय आहे?

सिंगापूरमध्ये आतापर्यंत ज्या सँपल्सचं जीनोम सिक्वेन्सिंग करण्यात आलं, त्यात बहुतेक प्रकरणं JN.1 व्हेरियंटची आढळल्याचं इकॉनॉमिक टाईम्सने म्हटलंय.

पण हा JN.1 व्हेरियंट नवा नाही.

गेल्या काही काळापासून जगभरात आढळणाऱ्या ओमिक्रॉनचा हा सब-व्हेरियंट म्हणजे उप-प्रकार आहे.

दिल्लीच्या अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था म्हणजे एम्स (AIIMS) चे कम्युनिटी मेडिसिन विभागाचे प्राध्यापक डॉक्टर संजय राय हे कोव्हॅक्सिन या कोव्हिड लशीच्या तीनही टप्प्यांमध्ये प्रमुख संशोधक होते.

बीबीसी प्रतिनिधी चंदन जजवाडे यांनी त्यांच्याकडून कोव्हिड 19 च्या JN.1 व्हेरियंटबद्दल माहिती घेतली.

डॉ. संजय राय सांगतात, "JN.1 कोरोनाच्या ओमिक्रॉन व्हायरसचाच एक व्हेरियंट आहे. याचा शोध लागून वर्षभरापेक्षा अधिक काळ उलटलाय. हा काही नवीन व्हायरस नाही. हा गंभीर ठरू शकतो वा नाही, याबद्दल आपल्याकडे सगळी माहिती आहे. JN.1 व्हेरियंटला घाबरण्याची गरज नाही. तसे कोणतेही पुरावेही नाहीत. आता आढळलेल्या गोष्टींनुसार हा कॉमन सर्दी-खोकल्याप्रमाणे किंवा त्याहीपेक्षा सौम्य असू शकतो."

मुंबईनंतर ठाण्यातही रुग्ण; आरोग्य यंत्रणा अलर्ट मोडमध्ये

जगभरातील अनेक देशांमध्ये कोरोना विषाणूच्या नवीन व्हेरिएंटमुळे पुन्हा एकदा रुग्णसंख्या वाढू लागली आहे.

त्यामुळे, भारतातही सतर्कता वाढवण्यात आली असून, पुणे, मुंबई पाठोपाठ ठाण्यातही कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहेत.

या पार्श्वभूमीवर ठाणे सिव्हिल रुग्णालयात 40 खाटांचे विशेष कक्ष तातडीने तयार करण्यात आला असून, या मध्ये रुग्णांना लागणाऱ्या सर्व वैद्यकीय यंत्रणा सुसज्ज ठेवण्यात आल्या आहेत.

मुंबईत कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाल्यानंतर ठाण्यात देखील कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले असून, त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत.

कोव्हिडच्या पार्श्वभूमीवर मार्गदर्शक सूचना

कोव्हिड-19 च्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक आरोग्य विभागाकडून आवश्यक खबरदारी घेण्याबाबतच्या मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. त्यानुसार -

जिल्हा शल्य चिकित्सक, जिल्हा आरोग्य अधिकारी व वैद्यकीय आरोग्य अधिकारी, मनपा यांचे स्तरावर कोविड 19 साथरोग संदर्भात पूर्वतयारीचा आढावा विभागीय स्तरावर घेण्यात येत असून त्यामध्ये सर्व यंत्रणेला रुग्णालये सुसज्ज ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

त्याचबरोबर, आरटीपीसीआर चाचणी, ऑक्सीजन बेड, आयसीयू बेड, व्हेंटिलेटर बेड व ऑक्सिजन उपलब्धतेबाबत सर्व तयारी ठेवण्यासंदर्भात जिल्ह्यांना सूचना देण्यात आल्या आहेत.

नागरिकांनी घाबरून जाऊ नये, तथापि काळजी घ्यावी. खोकताना व शिंकताना रूमालाचा वापर करावा. गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे.

सर्दी, ताप, खोकला, घसादुखी, धाप लागणे इत्यादी लक्षणे असल्यास त्वरित जवळच्या शासकीय रुग्णालयास संपर्क साधून र्मोफत उपचार व आवश्यक तपासण्या करून घ्याव्यात. अशा प्रकारची लक्षणे, इतर आजाराने व्याधीग्रस्त लोकांमध्ये आढळून आल्यास विशेष दक्षता घेण्यात यावी, असे आवाहन सार्वजनिक आरोग्य विभागाने केले आहे.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)