You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
कुणाचा गूढ मृत्यू, तर कुणाला देश सोडून पळून जावं लागलं; पुतिन यांच्यासमोर रशियातील अब्जाधीश हतबल
- Author, व्हिटाली शेवचेंको
- Role, बीबीसी मॉनिटरिंग रशिया एडिटर
रशिया-युक्रेन युद्ध सुरू असताना, रशियातील अब्जाधीशांची संख्या आतापर्यंतच्या उच्चांकी पातळीवर पोहोचली आहे.
रशियातील श्रीमंतांची संख्या वाढलेली असली तरी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्या 25 वर्षांच्या कार्यकाळात, रशियातील श्रीमंत आणि शक्तिशाली लोकांचा राजकीय प्रभाव जवळपास संपुष्टात आला आहे.
रशियातील श्रीमंत आणि शक्तिशाली लोकांना 'ऑलिगार्क' म्हणून ओळखलं जातं.
ही सर्व परिस्थिती रशियाच्या राष्ट्राध्यक्षांसाठी चांगलीच गोष्ट आहे. पाश्चात्य देशांनी घातलेल्या निर्बंधांमुळे रशियातील अत्यंत धनाढ्य लोक लक्ष्य झाले होते. मात्र तरीदेखील ते व्लादिमीर पुतिन यांचे विरोधक झालेले नाहीत. पुतिन यांच्या कॅरट अँड स्टीक धोरणांमुळे रशियातील अतीश्रीमंत लोक मुकाट्यानं त्यांना पाठिंबा देत आहेत.
रशियातील माजी बँकिंग अब्जाधीश ओलेग टिंकोव्ह यांना हा दबाव कशाप्रकारे काम करतो ते अचूकपणे माहित आहे.
युद्धाला 'वेडेपणा' म्हटलं अन् गमावले अब्जावधी डॉलर्स
इन्स्टाग्रामवर त्यांनी हे युद्ध म्हणजे 'वेडेपणा' असल्याची टीका केल्यानंतर दुसऱ्याच दिवशी क्रेमलिनमधून त्यांच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्यात आला.
त्यांना सांगण्यात आलं की, जर बँकेच्या संस्थापकाशी असलेले सर्व संबंध तोडण्यात आले नाहीत, तर त्यांच्या टिंकॉफ बँकेचं राष्ट्रीयीकरण केलं जाईल. त्यावेळेस ही रशियातील दुसरी सर्वात मोठी बँक होती.
"मी किंमतीबद्दल बोलू शकलो नाही. हे एकप्रकारे ओलीस ठेवल्यासारखंच होतं. तुम्हाला जे देऊ केलं जातं, तेच स्वीकारावं लागतं. मी यात वाटाघाटी करू शकलो नाही," असं टिंकोव्ह यांनी न्यूयॉर्क टाइम्सला सांगितलं
एक आठवड्याच्या आत व्लादिमीर पोटॅनिन यांच्याशी संबंधित एका कंपनीनं ही बँक विकत घेत असल्याचं जाहीर केलं. व्लादिमीर पोटॅनिन हे सध्या रशियातील पाचवे सर्वात श्रीमंत उद्योगपती आहेत. ते लढाऊ विमानांच्या इंजिनांना निकेलचा पुरवठा करतात. बँकेचं जे खरं मूल्यं होतं, त्याच्या फक्त 3 टक्के किंमतीला ती विकली गेली, असं टिंकोव्ह म्हणाले.
अखेर, टिंकोव्ह यांच्याकडे कधीकाळी असलेल्या संपत्तीपैकी जवळपास 9 अब्ज डॉलर (6.5 अब्ज पौंड) (जवळपास 80 हजार 820 कोटी रुपये) त्यांनी गमावले आणि ते रशिया सोडून गेले.
पुतिन यांच्या कार्यकाळात हतबल झालेले रशियन ऑलिगार्क
पुतिन रशियाचे राष्ट्राध्यक्ष होण्याआधी जी परिस्थिती होती. त्यापेक्षा आताची परिस्थिती पूर्णपणे वेगळी आहे.
सोव्हिएत युनियनचं विघटन झाल्यानंतरच्या वर्षांमध्ये, काही रशियन लोक प्रचंड श्रीमंत झाले होते. पूर्वी सरकारी मालकीच्या असलेल्या मोठ्या उद्योगांची मालकी घेऊन आणि देशाच्या नव्यानं उदयाला येत असलेल्या भांडवलशाहीच्या संधींचा फायदा घेऊन त्यांनी प्रचंड संपत्ती कमावली होती.
त्यांनी नव्यानं मिळवलेल्या या संपत्तीमुळे, रशियातील राजकीय अस्थिरतेच्या काळात त्यांचा प्रभाव वाढला आणि त्यांची ताकद वाढली. रशियातील हे अत्यंत धनाढ्य लोक 'ऑलिगार्क्स' म्हणून ओळखले जाऊ लागले.
बोरिस बेरेझोवस्की हे रशियातील सर्वात शक्तीशाली ऑलिगार्क होते. 2000 मध्ये पुतिन यांना राष्ट्राध्यक्षपदापर्यंत पोहोचवण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावल्याचा दावा केला होता. काही वर्षांनी त्यांनी याबद्दल माफी मागितली होती.
2012 मध्ये त्यांनी लिहिलं होतं, "मला हे ओळखण्यात अपयश आलं की भविष्यात ते लोभी, अत्याचारी आणि सत्ता बळकावणारे हुकुमशहा होतील, तसंच स्वातंत्र्य पायदळी तुडवतील आणि रशियाचा विकास थांबवतील."
बेरेझोवस्की यांनी कदाचित त्यांची भूमिका वाढवून सांगितली असेल, मात्र रशियातील ऑलिगार्क सत्तेच्या सर्वोच्च पातळीवर सूत्रं हलवण्यास नक्कीच सक्षम होते.
बेरेझोवस्की यांनी माफी मागितल्यानंतर, वर्षभराहून थोड्या अधिक दिवसांनी ते युकेमध्ये निर्वासित असताना गूढ परिस्थितीत मृतावस्थेत सापडले होते. तोपर्यंत, रशियातील ऑलिगार्कीचा देखील पूर्णपणे शेवट झालेला होता.
24 फेब्रुवारी 2022 ला पुतिन यांनी युक्रेनवर पूर्ण आक्रमण करण्याचा आदेश दिला होता. त्यानंतर काही तासांतच त्यांनी क्रेमलिनमध्ये रशियातील सर्वात श्रीमंत लोकांना बोलावलं होतं.
रशियातील ऑलिगार्कच्या झालेल्या स्थितीमुळे त्यांच्या संपत्तीला मोठा फटका बसणार हे माहित असूनही या अत्यंत श्रीमंत लोकांना पुतिन यांच्या धोरणाला विरोध करण्यासाठी फारसं काही करता आलं नव्हतं.
"मला आशा आहे की या नव्या परिस्थितीत, आपण सर्व तितक्याच चांगल्या प्रकारे आणि प्रभावीपणे काम करू," असं त्यावेळेस पुतिन या श्रीमंतांना म्हणाले होते.
या बैठकीला उपस्थित असलेल्या एका पत्रकारानं जमलेल्या अब्जाधीशांचं वर्णन, 'चेहरा फिकट पडलेले आणि अपुरी झोप झालेले' असं केलं होतं.
आधी संपत्ती घटली, मग अतोनात वाढ
युक्रेनवरील आक्रमणापूर्वीचा काळ रशियातील अब्जाधीशांसाठी अत्यंत वाईट होता. या आक्रमणानंतरचा काळदेखील तसाच होता.
फोर्ब्स मासिकानुसार, एप्रिल 2022 पर्यंतच्या एक वर्षाच्या कालावधीत युद्ध, निर्बंध आणि घसरलेला रुबल (रशियाचं चलन) यामुळे रशियातील अब्जाधीशांची संख्या 117 वरून 83 पर्यंत घसरली.
या सर्वांनी एकत्रितपणे 263 अब्ज डॉलर (जवळपास 23 लाख 61 हजार 740 कोटी रुपये) गमावले होते. म्हणजेच प्रत्येकानं त्याच्या संपत्तीतील सरासरी 27 टक्के भाग गमावला होता.
मात्र नंतरच्या वर्षांमध्ये असं दिसून आलं की पुतिन यांच्या युद्धाच्या अर्थव्यवस्थेचा भाग म्हणून त्यांना प्रचंड फायदे मिळवता आले.
युद्धावर प्रचंड खर्च करण्यात आल्यामुळे 2023 आणि 2024 मध्ये रशियामध्ये 4 टक्क्यांहून अधिकची आर्थिक वाढ झाली. रशियातील अती-श्रीमंतांसाठी देखील हे फायद्याचं ठरलं. ते जरी संरक्षणाशी संबंधित करारांमधून थेट अब्जावधींची कमाई करत नसले तरीदेखील त्यांचा फायदा होत होता.
2024 मध्ये, रशियातील निम्म्याहून अधिक अब्जाधीशांनी लष्कराला पुरवठा करण्यात काही भूमिका बजावली किंवा त्यांना या आक्रमणातून फायदा झाला, असं फोर्ब्सच्या वेल्थ टीमचे गिआकोमो टोग्निनी म्हणाले.
"जे लोक थेटपणे यात सहभागी नव्हते, मात्र ज्यांचे क्रेमलिनशी कोणत्या तरी कारणानं संबंध आहेत, अशांचा यात समावेश नाही. मला वाटतं की असं म्हणणं चुकीचं ठरणार नाही की रशियात व्यवसाय करणाऱ्या प्रत्येकाला सरकारशी संबंध ठेवणं आवश्यक आहे," असं ते बीबीसीला म्हणाले.
फोर्ब्सच्या यावर्षीच्या श्रीमंतांच्या यादीमध्ये, रशियातील आतापर्यंतचे सर्वाधिक म्हणजे तब्बल 140 अब्जाधीश होते. या सर्व अब्जाधीशांची एकत्रित संपत्ती 580 अब्ज डॉलर (जवळपास 52 लाख 8 हजार 400 कोटी रुपये) आहे. युक्रेनवरील आक्रमणाच्या एक वर्ष आधी नोंदवलेल्या आतापर्यंतच्या सर्वाधिक रकमेपेक्षा ती फक्त 3 अब्ज डॉलरनं (जवळपास 26 हजार 940 कोटी रुपये) कमी होती.
पुतिन यांचं फायदा आणि शिक्षा देण्याचं धोरण
पुतिन यांनी एकीकडे त्यांच्याशी निष्ठावान असलेल्या लोकांचा फायदा करून दिला आहे. तर दुसरीकडे ज्यांनी त्यांचे आदेश किंवा धोरणं स्वीकारण्यास नकार दिला आहे, अशांना सातत्यानं शिक्षा केली आहे.
कच्च्या तेलाच्या उद्योगातील बडे उद्योगपती (ऑईल टायकून) मिखाईल खोदोरकोव्स्की यांच्याबाबतीत काय घडलं, हे रशियातील लोकांना चांगलंच आठवतं. मिखाईल हे एकेकाळी रशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती होते. मात्र 2001 मध्ये लोकशाहीचं समर्थन करणारी संघटना सुरू केल्यानंतर त्यांना 10 वर्षे तुरुंगात राहावं लागलं.
युक्रेनवर रशियानं आक्रमण केल्यापासून, रशियातील जवळपास सर्वच अती श्रीमंत, धनाढ्य लोक गप्पच राहिले आहेत. ज्या मोजक्या लोकांनी या आक्रमणाला उघडपणे विरोध केला आहे, त्यांना रशिया सोडून पलायन करावं लागलं आहे आणि त्यांची बहुतांश संपत्ती तिथेच सोडावी लागली आहे.
युक्रेन युद्ध लक्षात घेता, रशियातील सर्वात श्रीमंत लोक पुतिन यांच्यासाठी स्पष्टपणे महत्त्वाचे आहेत. यातील बहुतांश जण पाश्चात्य देशांनी घातलेल्या निर्बंधांचे लक्ष्य झाले आहेत. यात 24 फेब्रुवारी 2022 ला पुतिन यांनी क्रेमलिनमध्ये बोलावलेल्या 37 उद्योगपती, व्यावसायिकांचा समावेश आहे.
पाश्चात्यांच्या निर्बंधांचा उलटा परिणाम
पाश्चात्य देशांना जर या श्रीमंतांना गरीब करायचं होतं आणि त्यांना क्रेमलिनच्या म्हणजे पुतिन यांच्या सत्तेच्या विरोधात उभं करायचं होतं, तर ते यात अपयशी ठरले आहेत. कारण रशियातील अब्जाधीशांची संपत्ती तशीच राहिली आहे आणि त्यांच्यात असहमती किंवा विरोधाचा अभाव आहे.
रशिया सोडून अब्जावधी डॉलर्ससह पाश्चात्य देशांमध्ये पळून जाण्याचा जर या श्रीमंतांपैकी कोणी विचार केला असेल, तर निर्बंधांमुळे ते अशक्य झालं.
"रशियातील अब्जाधीश देशाच्या आणि सरकारच्या पाठिशी उभे राहतील याची खातरजमा करण्यासाठी पाश्चात्य देशांनी शक्य ते सर्व केलं," असं सेंटर फॉर युरोपियन पॉलिसी ॲनालिसिस (सीईपीए)चे ॲलेक्झांडर कोलियांडर म्हणतात.
ते बीबीसीला म्हणाले, "त्यांच्यापैकी कोणाकडेही रशियातून बाहेर पडण्यासाठी कोणतीही योजना, कल्पना किंवा स्पष्ट मार्ग नव्हता. त्यांच्या मालमत्तांवर निर्बंध घालण्यात आले होते. त्यांची खाती गोठवण्यात आली होती, त्यांच्या मालमत्ता जप्त करण्यात आल्या होत्या."
"या सर्व गोष्टींमुळे पुतिन यांना अधिक प्रभावीपणे रशियातील अब्जाधीशांना, त्यांच्या मालमत्तांना आणि त्यांच्या संपत्तीला एकत्र करता आलं. तसंच रशियाच्या युद्धाशी निगडीत अर्थव्यवस्थेला पाठिंबा देण्यासाठी या सर्वांचा वापर करणं शक्य झालं."
युक्रेनवरील आक्रमणाच्या पार्श्वभूमीवर परदेशी कंपन्या बाहेर पडल्यामुळे एक पोकळी निर्माण झाली. क्रेमलिनशी चांगले संबंध असलेल्या उद्योगपतींनी ही पोकळी लगेचच भरून काढली. त्यामुळे या उद्योगपती, व्यावसायिकांना अतिशय फायदेशीर मालमत्ता स्वस्तात खरेदी करता आली.
यातून "प्रभावशाली आणि सक्रिय निष्ठावंतांची एक नवीन फौज" तयार झाली, असं कार्नेगी रशिया युरेशिया सेंटरच्या ॲलेक्झांड्रा प्रोकोपेंको म्हणतात.
"या लोकांचं हित, फायदा रशिया आणि पाश्चात्य देशांमध्ये सतत संघर्ष होत राहण्यावर अवलंबून आहे," तर पूर्वीचे मालक परत येणं, ही त्यांची सर्वात मोठी भीती आहे, असं त्या म्हणतात.
गियाकोमो टोग्निनी यांच्यानुसार, फक्त 2024 मध्येच, या मार्गानं रशियात 11 नवीन अब्जाधीशांचा उदय झाला आहे.
युद्ध सुरू असताना आणि पाश्चात्य देशांनी निर्बंध घातलेले असताना देखील - काही बाबतीत तर याच कारणांमुळेच, रशियाच्या नेत्यानं देशातील प्रमुख शक्तिशाली, प्रभावशाली लोकांवर मजबूत पकड ठेवली आहे.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)