स्टँडअप कॉमेडी जगभरात भरतेय गल्ले अन् भारतात होतायत हल्ले

कुणालनं जिथं कार्यक्रम सादर केला, त्या 'द हॅबिटॅट'च्या स्टुडिओवर हल्ला करण्यात आला.

फोटो स्रोत, Kunal Kamra, The Habitat and Guftagu

    • Author, यश वाडेकर
    • Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी

ब्लूमबर्ग या वृत्त संस्थेने मे 2024 मध्ये एक अहवाल प्रकाशित केला, ज्यामध्ये स्टँडअप कॉमेडियन सिनेअभिनेत्यांपेक्षा अधिक कमाई करत असल्याचं समोर आलं.

बॉलीवूडच्या हिशेबात सांगायचं, तर सुपरस्टार शाहरूख खानपेक्षा अधिक कमाई आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्टँडअप कॉमेडियन करत आहेत.

स्टँडअप कॉमेडी हा कलाप्रकार भारतात अगदी प्राथमिक अवस्थेत आहे, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. कारण इनमीन दहा-पंधरा वर्षांपूर्वी म्हणजे 2011 नंतर हा कलाप्रकार भारतात आला आणि आता कुठे खुलताना दिसतोय.

भारतात खऱ्या अर्थानं स्टँडअप कॉमेडीला भरभराट आली ती कोरोनाच्या लॉकडाऊननंतर.

भारतात एकीकडे ज्यावेळी मोठमोठ्या सिनेअभिनेत्यांचे चित्रपट बॉक्स ऑफिसवर दणकून आपटत होते, त्याचवेळी स्टँडअप कॉमेडीच्या कार्यक्रमांच्या तिकीटबारीवर हाऊसफुल्लचे बोर्ड लागत होते.

मात्र, हे सगळं आताच चर्चेचं कारण काय? तर भारतातील स्टँडअप कॉमेडीतल्या आघाडीच्या कलावंतांपैकी एक असलेल्या कुणाल कामराचं प्रकरण.

कुणाल कामराच्या शोनंतर एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वातील शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी मुंबईतील खार येथील हॅबिटॅट कॉमेडी क्लबची तोडफोड केली होती.

फोटो स्रोत, ANI

फोटो कॅप्शन, कुणाल कामराच्या शोनंतर एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वातील शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी मुंबईतील खार येथील हॅबिटॅट कॉमेडी क्लबची तोडफोड केली होती.

कुणाल कामरानं त्याच्या 'नया भारत' या स्टँडअप कॉमेडी शोमध्ये महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर व्यंगात्मक गाणं सादर करून, वादाला तोंड फोडलं. कुणालनं जिथं कार्यक्रम सादर केला, त्या 'द हॅबिटॅट' स्टुडिओवर हल्ला करण्यात आला.

या प्रकरणावर आम्ही मुंबई मधील क्लब चालकांशी बोलायचा प्रयत्न केला पण सध्याचं वातावरण बघता बहुतांश जणांनी याविषयी बोलणं टाळलं.

खरंतर, भारतीय स्टँडअप कॉमेडी उद्योगाला राजकीय पक्ष आणि धार्मिक गटांकडून अशा रोषाचा सामना करावा लागण्याची ही काही पहिलीच वेळ नाहीय. यापूर्वीही अनेकदा असे हल्ले, टीका, ट्रोलिंग झालेली आहे.

या निमत्तानं स्टँडअप कॉमेडीच्या जगताचा बीबीसी मराठीनं आढावा घेतला.

स्टँडअप कलाकार आणि वाद

स्टँडअप कॉमेडीच्या क्षेत्रातल्या कलावंतांना विरोध करण्याची सुरुवात झाली ती AIB ने आयोजित केलेल्या रोस्टपासून. या कार्यक्रमात आक्षेपार्ह भाषेचा वापर झाल्याचा आरोप करण्यात आला. त्यानंतर तन्मय भट्टसह अनेक कलावंतांवर खटला भरण्यात आला.

यानंतर एका पॉडकास्टमध्ये बोलताना तन्मय भट म्हणाला होता की, AIB रोस्टच्या वादानंतर मुंबईत राहण्यास घरही मिळेनासं झालं होतं.

ग्राफिक्स

मुनव्वर फारूकीला तर तुरुंगात जाऊन यावं लागलं होतं. ही 2021 ची घटना. इंदौरमधील एका कार्यक्रमात मुनव्वर फारुकीवर हिंदू देवतांबद्दल आक्षेपार्ह विनोद केल्याचा आरोप करण्यात आला.

विशेषतः भगवान राम आणि सीता यांच्यावर केलेल्या विनोदांमुळे काही गट आक्रमक झाले. या सगळ्या प्रकारानंतर मुनव्वरला अटक करण्यात आली आणि त्याची रवानगी तब्बल एक महिन्यासाठी तुरुंगात झाली.

वीर दासला शिक्षा झाली नाही, मात्र भयंकर ट्रोलिंगचा सामना करावा लागला.

मुनव्वर फारूकी

फोटो स्रोत, Facebook/The Habitat - Comedy and Music Cafe

फोटो कॅप्शन, मुनव्वर फारूकी

वीर दास 2021 मध्ये अमेरिकेत 'I come from two Indias' या शीर्षकाखाली एक स्टँडअप सादर करत होता. यात त्याने भारतातील स्त्रीसुरक्षा, धार्मिक द्वेष आणि राजकीय परिस्थितीवर भाष्य केलं.

काही लोकांनी हे भाष्य 'देशद्रोह' मानलं, तर काहींना ते 'वास्तववादी आणि धाडसी' वाटलं. त्यामुळे विरोध आणि पाठिंबा अशा दोन्ही गोष्टी वीर दासबाबत दिसून आल्या. तरीही वीरविरोधात तक्रारी दाखल व्हायच्या त्या झाल्याच. मात्र, त्याला कुठलीही शिक्षा अद्याप झाली नाही.

अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या मृत्यूनंतर प्रसारमाध्यमांनी घेतलेल्या भूमिकेवर कॉमेडियन डॅनीलने एक स्टँडअप केला होता. यामुळे त्याला मोठ्या प्रमाणावर विरोध झाला. परिस्थिती लक्षात घेता, त्याने नंतर माफी मागितली.

आधी कलाकार, आता स्टुडिओच टार्गेट

कॉमेडीमुळे लोकांच्या विरोधाला कलाकारांना सामोरं जावं लागलं आहे. पण हे झालं कलाकारांबाबत.

जसा एखादा गट कलाकारांना टार्गेट करताना दिसतो, तसाच कलाकारांना व्यासपीठ उपलब्ध करून देणाऱ्या स्टुडिओंनाही टार्गेट केल्याच्या घटना गेल्या काही काळात वाढल्या आहेत.

मुंबईत शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी एकनाथ शिंदेंवरील गाण्याचं निमित्त करून, कुणाल कामरानं जिथं कार्यक्रम सादर केला, त्या 'द हॅबिटॅट कॉमेडी क्लब'वर हल्ला करत तोडफोड केली.

स्टँड अप शोमुळे एखाद्या मंचाचं नुकसान केल्याने नव्याने आकार घेणाऱ्या आणि मोठ्या प्रमाणात विस्तारत असलेल्या भारतीय कॉमेडी क्लब व्यवसायावर याचा वाईट परिणाम होतोय, असं जाणकारांचं मत आहे.

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही. YouTube मजुकरात जाहिरातींचा समावेश असू शकतो.

YouTube पोस्ट समाप्त

द हॅबीटॅटने तोडफोडीनंतर काही काळासाठी शटडाउन करण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी प्रसिद्ध केलेल्या एका निवेदनात म्हटलं आहे की, "अलीकडील घटनांमुळे आम्हाला पुन्हा विचार करायला लावले की, कसे जेव्हा जेव्हा कलाकार मर्यादा ओलांडतो, तेव्हा आम्हाला कसे दोषी ठरवले जाते आणि लक्ष्य केले जाते.

"फक्त एक स्टेज उपलब्ध करुन त्यांची सर्जनशीलता शोधण्यात, त्यांची प्रतिभा निर्माण करण्यात आणि काहीवेळा नवीन करिअर शोधण्यासाठी प्रोत्साहित करण्यासाठी मदत करतो."

"एखादा कलाकार रंगमंचावर असताना त्या काळासाठी तो रंगमंच त्याच्याच मालकीचा असतो. तो त्याची कला सादर करतो, ते विचार आणि शब्द हे त्या कलाकाराचेच असतात," असं निवेदनात त्यांनी म्हटलं.

'मनमोहन सिंग यांच्यावरही विनोद झाले, पण असा विरोध नाही झाला'

हॅबिटॅटच्या निर्णयानंतर या क्षेत्रातील अनेक कॉमेडी क्लब चालकांनी आता स्टँडअप शो भरवताना विचार करावा लागतो, असं सांगितलं.

गुरुग्राममधील प्रसिद्ध 'गुफ्तगु कॅफे' चालवणारे साहिल यांनी बीबीसी मराठीशी बोलताना सांगितलं, "आम्ही 2018 पासून ओपन माईक करायचो. पण स्टँडअप शो हे 2022 पासून सुरू केले. त्यानंतर आम्ही कॉमेडी शो रेकॉर्ड करण्यासाठी आमचा स्वत:चा सेटअप तयार केला."

हॅबिटॅट तोडफोडीनंतर या व्यवसायावर झालेल्या परिणामांवर बोलताना साहिल यांनी सांगितलं की, "या घटनेनंतर आमच्या व्यवसायावर खूप परिणाम झाला आहे. तिकीट विक्री खूप कमी झाली आहे. लोकांच्या मनात भीती बसली आहे की, जर आपण तिथे गेलो आणि काही घडलं तर काय? हे सुरक्षित नाही."

ग्राफिक्स

साहिल पुढे म्हणाले, "या घटनेनंतर असा संदेश गेला आहे की, स्टँडअप कॉमेडी शो पाहण्यास जाणं सुरक्षित नाही आणि हे चुकीचं आहे, लोक इथे थकवा, नैराश्य विसरण्यासाठी यायचे. आता हे उलटच झालं आहे.

"कलाकार पण घाबरले आहेत, कोणालाच माहिती नाही की आपण एखादा विनोद केला तर त्याचा काय परिणाम होईल.

"याआधी पण विनोद केलाच जायचा ना? माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्यावर पण किती विनोद केले जायचे पण तेव्हा अशा प्रकारच्या घटना दिसल्या नाहीत. मग आता विनोद केला तर असं का होतंय? आम्हाला पटेल तेच बरोबर म्हणण्यात काही अर्थ नाही."

एखादा गट कलाकारांना टार्गेट करताना दिसतो, तसाच कलाकारांना व्यासपीठ उपलब्ध करून देणाऱ्या स्टुडिओंनाही टार्गेट केल्याच्या घटना अलिकडच्या काळात वाढल्या आहेत

फोटो स्रोत, Guftagu club

फोटो कॅप्शन, एखादा गट कलाकारांना टार्गेट करताना दिसतो, तसाच कलाकारांना व्यासपीठ उपलब्ध करून देणाऱ्या स्टुडिओंनाही टार्गेट केल्याच्या घटना अलिकडच्या काळात वाढल्या आहेत

या घटनेनंतर कार्यक्रम भरवताना तुम्ही काय काळजी घेता, या प्रश्नाला उत्तर देताना साहिल यांनी आता खूप गोष्टी लक्षात घ्याव्या लागतात, असं सांगितलं.

ते म्हणतात, "काही लोक फक्त प्रसिद्धीसाठी येतात. त्यासाठी ते काहीही करू शकतात. पण आता आम्ही काळजी घेतो. नव्या लोकांना संधी देताना आम्ही खूप विचार करुन निर्णय घेतो आहे. पण अचानक तिकिटांची विक्री आणि प्रेक्षकांची संख्या कमी झाल्यामुळे जे समजूतदार कलाकार आहेत, ते सध्या ब्रेक घेत आहेत. सगळी माणसंच आहेत. अशा वातावरणात त्यांनाही भीती वाटतंच असेल."

स्टँडअप शो प्रसारित करण्याआधी तपासण्याचा नवा पायंडा

साहिल यांच्याशी बोलताना हे जाणवलं की, ते आता अधिक सर्तकतेनं हा व्यवसाय करत आहेत. कोणताही शो झाल्यानंतर त्याचं रेकॉर्डिंग आधी या क्लबकडून तपासलं जातं, मगच ते प्रसारित करण्यासाठी दिलं जातं.

ते म्हणतात, "आता एखादी रेकॉर्डिंग झाल्यास आधी आम्ही ते तपासतो, यात काही वादग्रस्त तर नाही ना? ते तपासूनच आम्ही ते त्यांना सुपूर्द करतो.

"इथे येणाऱ्या प्रेक्षकांची आम्हाला काळजी आहे. त्यामुळे आता आम्ही ठरवलं आहे. राजकीय विनोदासाठी आम्ही आमचा मंच उपलब्ध करुन देणार नाही. पण कलाकर आपल्या मर्यादेत राहून करत असतील तर काही अडचण नाही. शेवटी कलाकार हाच त्याच्या कंटेंटसाठी जबाबदार आहे. क्लब नाही," साहिल सांगतात.

जसा एखादा गट कलाकारांना टार्गेट करताना दिसतो, तसाच कलाकारांना व्यासपीठ उपलब्ध करून देणाऱ्या स्टुडिओंनाही टार्गेट केल्याच्या घटना गेल्या काही काळात वाढल्या आहेत.

फोटो स्रोत, Facebook/The Habitat - Comedy and Music Cafe

फोटो कॅप्शन, जसा एखादा गट कलाकारांना टार्गेट करताना दिसतो, तसाच कलाकारांना व्यासपीठ उपलब्ध करून देणाऱ्या स्टुडिओंनाही टार्गेट केल्याच्या घटना गेल्या काही काळात वाढल्या आहेत.

या सगळ्या घडामोडींमध्ये आपल्या रोजच्या जीवनातील ताण विसरुन काही काळासाठी का असेना हसण्यासाठी येणाऱ्या लोकांचा विचार साहिल यांना सतावतो आहे.

"आम्ही या कलाप्रकारासाठी काम करायचो, नवे कलाकार तयार व्हावेत ही आमची इच्छा होती. जास्तीत जास्त प्रेक्षकांपर्यंत पोहोचता यावं, असं आम्हाला वाटायचं. विरंगुळा म्हणून आमच्याकडे अगदी डॉक्टर्स त्यांच्या रुग्णांना पाठवायचे.

"लोकांच्या आयुष्यात एवढं दु:ख आहे. आम्हाला आणि कलाकारांना मेसेज येतात की, तुमच्या शोमुळे आम्हाल बरं वाटलं. या कामातून मिळणारं समाधान आमच्यासाठी महत्त्वाचं होतं, पण आता वेगळेच मुद्दे उपस्थित केले जात आहेत," साहिल सांगतात.

फक्त क्लबच नाही, तर छोटेखानी मंचावरही हॅबिटॅटचा परिणाम

बंगळुरुचे नवित हे एक कॉमेडी क्लब चालवतात. भारतातील कॉमेडी क्लब व्यवसायाबाबत त्यांच मत साहिलपेक्षा वेगळं आहे. त्याचा 'जस्ट बीएलआर' हा क्लब थोडा वेगळा आहे. इथे बार्किंग पद्धतीने प्रेक्षकांना आकर्षित केलं जातं.

बार्किंग म्हणजे एखादा स्टँडअप कॉमेडीयन हा क्लबच्या बाहेर उभं राहून विनोद सांगतात. मग तिथे उपस्थित असणाऱ्यांना जर तो विनोद आवडला, तरच ते तिकिट खरेदी करतात.

मात्र, सध्याच्या परस्थितीचा त्यांच्याही व्यवसायावर परिणाम होत असल्याचं नवित यांनी सांगितलं.

नवित पुढे म्हणतात की, "आम्ही फक्त ओपन माईक कार्यक्रम करतो. म्हणजे आमच्याकडे कधीच शो रेकॉर्ड केला जात नाही. त्यामुळे कार्यक्रमात घडलेले विनोद बाहेर फारसे पसरत नाहीत. आम्ही दिवसातून असे तीन ओपन माईक शो करतो. त्यामुळे बाकी क्लबला ज्या गोष्टींची भीती आहे, ती आम्हाला थोडी कमी आहे. पण तिकीट विक्रीवरती या घटनेचा परिणाम झाला एवढं मात्र नक्की."

स्टँडअप कॉमेडीच्या माध्यमातून दलितांचा आवाज मांडणाऱ्या कलाकारांना मंच मिळवण्यात अडचण येत आहे.

फोटो स्रोत, Instagram/Blue Material

फोटो कॅप्शन, स्टँडअप कॉमेडीच्या माध्यमातून दलितांचा आवाज मांडणाऱ्या कलाकारांना मंच मिळवण्यात अडचण येत आहे.

स्टँडअप कॉमेडीच्या माध्यमातून दलितांचा आवाज मांडणाऱ्या कलाकारांना मंच मिळवण्यात अडचण येत आहे.

द हॅबिटॅटमध्ये 'ब्ल्यू मटेरियल' नावाने एक स्टँडअप शो होत असे.

आजवर स्टँडअप कॉमेडीयन्सनी अनेक विषय हाताळले असले, तरी भारतीय समाजाचं वास्तव असणाऱ्या जातिव्यवस्थेवर मात्र फारच कमी कलाकारांनी भाष्य केलं आहे. 'ब्ल्यू मटेरियल' हा कार्यक्रम नेमका इथेच वेगळा ठरतो.

स्टँडअपच्या साहय्याने आपलं जगणं आणि सामाजिक सत्य मांडू पाहणाऱ्या ब्ल्यू मटेरियल टीमला या वातावरणात कार्यक्रम करण्यासाठी कोणत्या अडचणी येत आहेत, हे जाणून घेण्यासाठी या टीमचा सदस्य आणि स्टँडअप कलाकार रवी गायकवाडशी आम्ही संपर्क साधला.

नेहा ठोंबरे, रवी गायकवाड आणि अंकुर तांगडे

फोटो स्रोत, nehathombare/ankurtangde/bluematerial/instagram

फोटो कॅप्शन, नेहा ठोंबरे, रवी गायकवाड आणि अंकुर तांगडे

याबाबत बोलताना रवी म्हणाला की, "कुणाल कामराची घटना होण्याआधीही कुणी जात-सामाजिक भेदभाव या विषयांसाठी मंच उपलब्ध करुन देण्यास उत्सुक नसतच. पण आता संपूर्ण व्यवसायावरच दबाव वाढल्यामुळे परिस्थिती आणखी कठीण झाली आहे."

"मुंबई, दिल्ली आणि बंगळूरु येथे आम्ही अशा विषयांवर ओपन माईक चालू करणाच्या विचारात होतो. यामुळे नव्या कलाकारांना व्यक्त होण्यास व्यासपीठ मिळणार होतं. पण द हॅबिटॅटची तोडफोड झाल्यानंतर आम्हाला आमची कला सादर करण्यासाठी मंच मिळणे कठीण झाले आहे," रवी सांगतो.

कुणाल कामरा

फोटो स्रोत, X/@kunalkamra88

फोटो कॅप्शन, कुणाल कामरा

या घटनेमुळे ओपन माईकच्या वेळी कलाकारांना देण्यात येणारा वेळ कमी करण्यात आल्याचं ही रवीनं सांगितलं. तसंच, मुंबईमध्ये असे कार्यक्रम भरवणारे निर्मात्यासोबत मिळून यावर तोडगा काढण्याचा प्रयत्न रवी करतो आहे.

याबाबत रवी म्हणतो, "मुंबईतले कॉमेडी क्लब चालवणारे या घटनेनंतर घाबरले आहेत. द हॅबिटॅटसारखं आपल्या पण क्लबची तोडफोड होईल, अशी भीती त्यांच्या मनात आहे. आमचा सारख्या 40 निर्मात्यांचा एक ग्रुप आहे. आम्ही लवकरच एक बैठक घेऊ. कदाचित त्यानंतर काही गोष्टी बदलतील."

द हॅबिटॅट क्लबची तोडफोड असो की समय रैनाच्या 'इंडियाज् गॉट लॅटन्स'चा वाद असो, या घटनांमुळे भारतात स्टँडअप कॉमेडी कलाकार आणि क्लब चालकांच्या समोर अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. आणि हे प्रश्न सध्याच्या वातावरणात तरी अनुत्तरीतच आहेत.

बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.