कुणाल कामरा : राजकारण्यांवर विनोद, व्यंग, उपहास करणं हा गुन्हा ठरतो का?

या प्रकरणात, काहींनी कुणाल कामराची बाजू घेतली आहे तर काहींनी त्याचा विनोद हा आक्षेपार्ह असल्याचा ठपका ठेवत ही 'ऍक्शनला रिऍक्शन' असल्याचं म्हटलंय.

फोटो स्रोत, Youtube/Kunal Kamra

फोटो कॅप्शन, या प्रकरणात, काहींनी कुणाल कामराची बाजू घेतली आहे तर काहींनी त्याचा विनोद हा आक्षेपार्ह असल्याचा ठपका ठेवत ही 'ऍक्शनला रिऍक्शन' असल्याचं म्हटलंय.
    • Author, विनायक होगाडे
    • Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी

कॉमेडियन कुणाल कामरानं स्टँड-अप कॉमेडीच्या माध्यमातून सत्ताधारी पक्षातील नेत्यांची खिल्ली उडवून टीका करण्याचं प्रकरण सध्या चर्चेत आहे.

विनोद, काही गाणी, उपहास, शेरेबाजी आणि राजकीय भूमिका यांनी भरलेला असा हा स्टँड-अप कॉमेडीचा साधारण पाऊण तासाचा शो 'नया भारत' या नावानं युट्यूबवर प्रसिद्ध झाला. त्यानंतर या गदारोळास सुरुवात झाली.

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरील गाणं महाराष्ट्रात विशेष व्हायरल झालं आणि त्यावर शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांकडून हिंसक प्रतिक्रिया आली.

ज्या स्टुडीओमध्ये हा कार्यक्रम शूट झाला होता, त्या हॅबिटॅट कॉमेडी क्लबची शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांकडून तोडफोड करण्यात आली.

अर्थातच, या सगळ्या गदारोळात काहींनी कुणाल कामराची बाजू घेतली तर काहींनी त्याचा विनोद हा आक्षेपार्ह असल्याचा ठपका ठेवत ही 'ऍक्शनला रिऍक्शन' असल्याचं म्हटलं. खुद्द एकनाथ शिंदे यांनी बीबीसी मराठीच्या मंचावर अशी प्रतिक्रिया दिली आहे.

कॉमेडियन कुणाल कामराने आपली मर्यादा ओलांडली का? त्याचा विनोद हा उपहासात्मक नसून तो अनादर करणारा आहे का? मूळातच, राजकारणावर विनोद, व्यंग, उपहास करणं हा गुन्हा ठरतो का?

या आणि अशा काही प्रश्नांचा हा उहापोह...

ग्राफिक्स
ग्राफिक्स

'एक नागरिक म्हणून चिंतेचा विषय'

समाजातील चुकीच्या गोष्टींवर आणि प्रवृत्तींवर विनोद, व्यंग अथवा उपहासातून भाष्य करणं ही परंपरा काही नवी नाही.

कविता, विडंबन, वात्रटिका, व्यंगचित्र, मीम वा स्टँड-अप कॉमेडी अशा वेगवेगळ्या माध्यमातून व्यंगकार राजकीय घडामोडींवर विनोदी ढंगानं भाष्य करताना दिसतात.

रविवारी रात्री एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वातील शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी मुंबईतील खार येथील हॅबिटॅट कॉमेडी क्लबची तोडफोड केली.

फोटो स्रोत, ANI

फोटो कॅप्शन, रविवारी रात्री एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वातील शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी मुंबईतील खार येथील हॅबिटॅट कॉमेडी क्लबची तोडफोड केली.

कुणाल कामरा प्रकरणाबाबत आम्ही सुप्रसिद्ध व्यंगचित्रकार मंजूल यांच्याशी चर्चा केली. एक कार्टूनिस्ट म्हणून नव्हे तर एक नागरिक म्हणून माझ्यासाठी हा चिंतेचा विषय आहे, असं ते म्हणतात.

बीबीसी मराठीशी बोलताना ते घडलेल्या प्रकाराबाबत फार उद्वेगानं व्यक्त झाले.

श्याम रंगीला

ते म्हणाले की, "खरं तर कुणाल कामरावर एफआयआर झालेला असला तरीही सर्वाधिक भुर्दंड स्टुडीओच्या मालकाला भोगावा लागला आहे. स्टुडीओ फोडून शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी एकप्रकारे दहशत पसरवण्याचा प्रयत्न केला आहे."

स्टँड-अप कॉमेडियन श्याम रंगीला यांनाही असंच वाटतं.

ते मोदींची नक्कल करण्यासाठी ओळखले जातात. या प्रकरणावर बीबीसी मराठीशी बोलताना ते म्हणाले की, "मला हे सगळं पाहून दु:खं होतं. आपल्या परफॉर्मन्समुळे त्या जागेचं एवढं नुकसान केलं जाणं ही आमच्यासाठी तसेच भारतातील स्टँड-अप कॉमेडीसाठी फारच दु:खद आणि भीतीदायक गोष्टही आहे. अशा प्रकारामुळे इतर स्टुडीओवालेही अशीच काहीशी भूमिका घेतील की, तुम्ही इथे अमुक-तमुक गोष्टीवर कॉमेडी करु शकत नाही."

'कुणाल कामराचा विनोद सुद्धा भरकटल्यासारखा'

कार्टूनिस्ट आलोक देखील स्टुडीओ फोडण्याच्या कृतीचा निषेध करतात.

ते म्हणतात की, "तुम्ही काहीतरी व्यक्त झाल्यावर समोरचा त्यावर हिंसकपणे व्यक्त होतो, हे फार गंभीर आहे. स्टुडीओची तोडफोड करताना तिथे पोलीसही उपस्थित असल्याचं दिसतंय. कशाचीच भीती उरली नसल्याची ही परिस्थिती आहे. ज्यांच्यावर कायदा आणि सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी आहे, त्यांच्याच पक्षाचे लोक अशी कृत्ये करतात, तेव्हा परिस्थिती अधिक भीषण असल्याचं जाणवतं."

मात्र, सध्याच्या भरकटलेल्या परिस्थितीमध्ये कुणाल कामराचा विनोद सुद्धा भरकटल्यासारखा आहे, असं ते आवर्जून नमूद करतात.

विनोद, काही गाणी, उपहास, शेरेबाजी आणि राजकीय भूमिका यांनी भरलेला असा हा स्टँड-अप कॉमेडीचा साधारण पाऊण तासाचा शो 'नया भारत' या नावानं युट्यूबवर प्रसिद्ध झाला आहे.

फोटो स्रोत, Youtube/Kunal Kamra

फोटो कॅप्शन, विनोद, काही गाणी, उपहास, शेरेबाजी आणि राजकीय भूमिका यांनी भरलेला असा हा स्टँड-अप कॉमेडीचा साधारण पाऊण तासाचा शो 'नया भारत' या नावानं युट्यूबवर प्रसिद्ध झाला आहे.

आपला मुद्दा पटवून देण्यासाठी ते सुप्रसिद्ध कार्टूनिस्ट आर. के. लक्ष्मण यांचं एक विधान उद्धृत करतात. "आर. के. लक्ष्मण असं नेहमी म्हणायचे की, राजकीय व्यंग करताना एक 'डिग्नीफाईड इरेव्हरन्स' (Dignified Irreverence) असला पाहिजे. 'इरेव्हरन्स' (अनादर) असलाच पाहिजे; मात्र, तो 'डिग्नीफाईड' (प्रतिष्ठा राखून) असला पाहिजे."

तो कुणाल कामराच्या विनोदात नसल्याचं ते सांगतात.

मंजूल

एकनाथ शिंदेंवर टीका आणि राजकीय व्यंग करण्यासारख्या अनेक गोष्टी आहेत. त्यासाठी त्यांना 'रिक्षावाला' म्हणण्याची गरज नाहीये, असा मुद्दा ते मांडतात.

मात्र, तरीही कुणाल कामराला आपला विनोद आणि राजकीय व्यंग करण्याचं स्वातंत्र्य असून झालेल्या तोडफोडीचा निषेध व्हायला हवा, हा मुद्दाही ते अधोरेखित करताना दिसतात.

'व्यंगकाराने विसंगती शोधायची असते'

मराठीतले सुप्रसिद्ध वात्रटीकाकार रामदास फुटाणे यांना कुणाल कामराने केलेली राजकीय टीका द्वेषातून केली असल्याचं वाटतं.

तोडफोड करणं अयोग्य आहे, असं सांगत असतानाच ते व्यंगकाराची भूमिका कशी असली पाहिजे, याबाबत अधिक उहापोह करताना सांगतात की, "ज्या व्यक्तीबाबत तुम्ही लिहिता, त्या व्यक्तीबाबत तुमच्या मनात द्वेष असता कामा नये. व्यंगकाराने विसंगती शोधायची असते. नेमक्या विसंगतीवर त्याला बोट ठेवता आलं पाहिजे. त्याला व्यक्तीपेक्षा व्यक्तींच्या प्रवृत्ती शोधता आल्या पाहिजेत आणि प्रवृत्तीत जर विसंगती दिसली तर त्या प्रवृत्तीवर विनोद वा व्यंगात्मक कविता करता आली पाहिजे."

रामदास फुटाणे

"दुसरी गोष्ट म्हणजे, कुणाल कामराने जे लिहिलंय ते एकनाथ शिंदे या व्यक्तीबाबत अत्यंत द्वेषातून लिहिलंय आणि कुणाच्या तरी प्रचारासाठी लिहिलेलं आहे, असं जाणवतं. व्यंग हे कुठल्याही राजकीय पक्षाच्या प्रचारासाठी असता कामा नये." असं ते सांगतात.

याउलट श्याम रंगीला यांना वाटतं. कुणाला कामरा कोणत्याही पक्षाचा प्रवक्ता होऊन कॉमेडी करत नाहीयेत तर सध्या ज्या घडामोडी आहेत, त्यावर फक्त कॉमेडीच्या माध्यमातून व्यक्त होतो आहे, असं त्यांना वाटतं.

"खुद्द राजकारणातच एवढी कॉमेडी सुरु आहे की, वेगळ्या कॉमेडीची गरज नाहीये. काल जो एखाद्या पक्षात असतो तो दुसऱ्या दिवशी दुसऱ्याच पक्षात जातो. तोडफोड करणाऱ्यांना ही गोष्टच दिसत नाहीये की काल ज्यांना आपण पाठिंबा देत होतो, तो काल दुसऱ्या पक्षात होता आणि आज वेगळ्याच पक्षात आहे. कॉमेडियन तर या सगळ्या घटना दाखवणारा आरसा आहे. तो जे सुरु आहे, ते कॉमेडीच्या माध्यमातून लोकांसमोर आणतो आहे," असं श्याम रंगीला म्हणतात.

"सध्या 'सटायर' खतरे में है"

मात्र, राजकीय भूमिका घेऊन या प्रकरणाकडं पाहणं ही वेगळी गोष्ट असून फक्त एक नागरिक म्हणून याकडे पाहिल्यास राजकीय व्यंगावर तोडफोडीची प्रतिक्रिया येणं, ही निषेधार्ह गोष्ट आहे, असं कार्टूनिस्ट मंजूल सांगतात.

ते म्हणतात की, "टीव्ही चॅनेल्स वा माध्यमांमध्ये अशी चर्चा केली जात आहे की, कंगना रणौतचं घर तोडलं जात होतं तेव्हा निषेध करणारे हे लोक काय करत होते? एखादा व्यक्ती संवैधानिक पदावर असल्यावर त्याच्यावर तुम्ही टीका करु शकत नाही, अशी यांची भूमिका आहे. ही काय राजेशाही आहे का? हे जर असंच सुरु राहिलं तर कायद्याचं राज्य या गोष्टीवर कुणाचा विश्वास राहिल?"

"अभिव्यक्ती स्वातंत्र्य वगैरे ठिक आहे, पण त्याचा गैरफायदा घेऊन बोलणार असाल तर हा एकप्रकारचा व्यभिचार, स्वैराचार आणि एकप्रकारे सुपारी घेऊन बोलण्याचं काम आहे," अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बीबीसीच्या मंचावर दिली आहे.
फोटो कॅप्शन, "अभिव्यक्ती स्वातंत्र्य वगैरे ठिक आहे, पण त्याचा गैरफायदा घेऊन बोलणार असाल तर हा एकप्रकारचा व्यभिचार, स्वैराचार आणि एकप्रकारे सुपारी घेऊन बोलण्याचं काम आहे," अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बीबीसीच्या मंचावर दिली आहे.

कुणाल कामराने केलेल्या विनोदामध्ये आणि त्या गाण्यामध्ये कोणताही अनादर नव्हता, असं व्यंगचित्रकार गौरव सर्जेराव यांना वाटतं.

ते 'मार्मिक' या साप्ताहिकासाठी व्यंगचित्रे काढतात. शिवसेना पक्षाचे संस्थापक बाळासाहेब ठाकरे या साप्ताहिकाचे संस्थापक होते. सध्या शिवसेनेचे दोन्ही गट आपणच बाळासाहेब ठाकरेंचेच वारस असल्याचं सांगतात.

"ते ज्या पक्षाचा वारसा सांगतात, त्या पक्षाचे संस्थापक बाळासाहेब ठाकरे हे स्वत: व्यंगचित्रकार होते. आणि हे व्यंगाला घाबरुन अशाप्रकारचं पाऊल उचलतात, ही अतिशय वाईट गोष्ट आहे," असं गौरव सर्जेराव सांगतात.

कार्टूनिस्ट आलोक
Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

बीबीसी मराठीशी बोलताना ते म्हणाले की, "कुणाल कामराने कुठेही कोणत्याही नेत्याचं नाव घेतलेलं नव्हतं. त्यात कुठेही शिवीगाळ केलेली नाहीये. त्यामुळे, अनादराचा प्रश्नच नाहीये. आजूबाजूला घडणाऱ्या गोष्टीवरच त्यात भाष्य आहे. 'गद्दार' वा 'रिक्षावाला' हे शब्द कुणाल कामराने नव्याने आणलेले नाहीयेत. याआधी अनेकांनी केलेल्या टीकेमध्ये हे सगळे शब्द वापरले गेले आहेत."

"सध्या 'सटायर' (Satire) खतरे में है" असं ते म्हणतात.

कार्टूनिस्ट मंजूल यांनाही असंच वाटतं. माफी न मागण्याची कुणाल कामराची ठाम भूमिका फार गरजेची होती, असं ते आवर्जून सांगतात.

"अमुक एखाद्या सत्ताधारी व्यक्तीचं कार्टून तुम्ही काढू शकत नाही, अशा प्रकारच्या नोटीसा मलाही आलेल्या होत्या. मात्र, याला बळी पडलो तर ते आपल्यावर आणखी बंधनं लादण्याचा प्रयत्न करत राहतील, हे उघड आहे", असं ते सांगतात.

ते म्हणतात की, "2017 मध्ये मलाही अशा सूचना आल्या होत्या की, तुम्ही नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्यावर कार्टून काढू शकत नाही. आणि आता तर अशी अवस्था आली आहे की, तुम्ही देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेंवरही राजकीय व्यंग करु शकत नाही. थोडक्यात, ही यादी वाढतच चालली आहे आणि दबावाला बळी पडलो तर ही यादी वाढतच जाईल."

या माध्यमातून पूर्ण कॉमेडी इंडस्ट्रीवरच हल्ला करण्यात आला आहे, असं श्याम रंगीला यांना वाटतं.

व्यंग आणि अनादर यांच्यामधील सीमारेषा कशी ओळखायची?

अशा घटना घडतात तेव्हा 'सेल्फ-सेन्सॉरशीप' अधिक वाढतं, असं गौरव सर्जेराव म्हणतात.

ते म्हणतात की, "मी भलेही निर्भिडपणे कार्टून काढत असलो तरीही मला दोनवेळा विचार करावा लागतो की, याचे काय परिणाम होऊ शकतील. जेव्हा मला दोनवेळा विचार करण्याची गरज भासणार नाही, तेव्हा खऱ्या अर्थाने आपण लोकशाही देशात आहोत, असं म्हणण्यासारखी परिस्थिती असेल."

मात्र, अभिव्यक्ती स्वातंत्र्य असलं तरीही राजकीय व्यंगकारानं सद्सद्वविवेक राखला पाहिजे, असं कार्टूनिस्ट आलोक यांना वाटतं. राजकीय व्यंग करत असताना आपण आर. के लक्ष्मण यांच्या 'डिग्नीफाईड इरेव्हरन्स'चा मुद्दा नेहमी लक्षात ठेवतो, असं सांगतात.

दिवंगत व्यंगचित्रकार आर. के. लक्ष्मण

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, दिवंगत व्यंगचित्रकार आर. के. लक्ष्मण

ते म्हणतात की, "सध्याची आजूबाजूची परिस्थिती फारच भीषण झाली आहे, हे खरंच आहे. पण तरीही एक ह्यूमरिस्ट, स्टँड-अप कॉमेडियन वा कार्टूनिस्ट अशा 'सटायर रिलेटेड' कोणत्याही प्रोफेशनमध्ये तुमची ही जबाबदारी आहे की, सगळ्यांच्या डोक्याचा कंट्रोल गेला आहे तर किमान तुमचा तरी तो गेला नाही पाहिजे. तुम्हाला डोकं शांत ठेवून चांगला विनोद करता येऊ शकतो."

दुसऱ्या बाजूला, कार्टूनिस्ट मंजूल वेगळं मत मांडताना दिसतात.

ते म्हणतात की, "व्यंग आणि अनादर यांच्यामधील सीमारेषा त्या-त्या काळानुसार निश्चित होतात. ही सीमारेषा तेव्हा असू शकते जेव्हा परिस्थिती सामान्य असते. ही सध्याची परिस्थिती सामान्य नाहीये, ती झुंडशाहीनं भरलेली आहे. अशा काळात, निशस्त्र पद्धतीनं व्यक्त होणाऱ्यांनीच फक्त काळजी घ्यावी आणि शिष्टाचार पाळावा, असं म्हणणं गैर ठरेल."

अशा घटनांचा नेमका काय परिणाम होतो, याविषयी बोलताना श्याम रंगीला म्हणतात की, "मी 2014 च्या आधी टीव्हीवर राजकीय व्यंग करणारे अनेक कार्यक्रम स्वत: पाहिले आहेत. सोनिया गांधी आणि मनमोहन सिंग यांच्यावर करण्यात आलेले विनोद पाहिलेले आहेत. त्यांचे व्हीडिओदेखील आता पुन्हा व्हायरल होत आहेत."

"स्वत: माझ्यासोबत 2017 मध्ये असाच प्रकार घडला. मी 'लाफ्टर चॅलेंज' शोमध्ये होतो आणि तिथे मी नक्कल करायला गेलो होतो. त्यामध्ये कोणतीही राजकीय टीका सोडा, राजकीय भाष्यंही नव्हतं. फक्त नक्कल होती. मात्र, त्यावरही बंदी आणण्यात आली. टिव्हीवरुन तो कार्यक्रम हटवण्यात आला. न्यूज चॅनेलवर तर 'पॉलिटीकल सटायर'वर एक शो चालायचा. आता या सगळ्या गोष्टी बंद झाल्या आहेत. हा सगळा फरक 2014 नंतरचा आहे, हे तर स्पष्टच आहे," असं ते सांगतात.

राजकीय व्यंग करणं कायद्यानं गुन्हा ठरतो का?

राजकीय व्यंग करणं हे कायद्याच्या कक्षेत बसतं का? कायद्याच्या कक्षेत कोणत्या प्रकारची टीका ही दंडास पात्र ठरते, हे जाणून घेण्यासाठी आम्ही कायदेतज्ज्ञ उल्हास बापट यांच्याशी चर्चा केली.

कुठल्याही लोकशाहीमध्ये ज्या अनेक गोष्टी आवश्यक असतात, त्यापैकी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे अभिव्यक्ती स्वातंत्र्य ही आहे. राजकीय व्यंग करणं वा टीका करणं ही बाब अभिव्यक्ती स्वातंत्र्यामध्ये समाविष्ट होते आणि ते फार महत्त्वाचं असल्याचं ते सांगतात.

गौरव सर्जेराव

ते सांगतात की, "19 व्या कलमानुसार आपल्याला अभिव्यक्ती स्वातंत्र्य मिळालं आहे. एखाद्यानं जर विडंबनात्मक कविता केली किंवा कुणी आपली मतं स्पष्टपणाने मांडली तर त्यात काहीही चूक नाहीये. अर्थात कुठलाच अधिकार हा अनिर्बंध नसतो. त्याप्रमाणे, अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरही या 19 कलमामध्ये दहा बंधनं घातलेली आहेत."

कुठल्याही लोकशाहीमध्ये ज्या अनेक गोष्टी आवश्यक असतात, त्यापैकी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे अभिव्यक्ती स्वातंत्र्य ही आहे, असं कायदेतज्ज्ञ उल्हास बापट सांगतात.

फोटो स्रोत, X/Kunal Kamra

फोटो कॅप्शन, कुठल्याही लोकशाहीमध्ये ज्या अनेक गोष्टी आवश्यक असतात, त्यापैकी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे अभिव्यक्ती स्वातंत्र्य ही आहे, असं कायदेतज्ज्ञ उल्हास बापट सांगतात.

ही बंधनं कोणती आहेत, याची माहिती देताना ते सांगतात की, "थोडक्यात सांगायचं झालं तर, भारताची सार्वभौमता, एकात्मता, राज्याची सुरक्षितता, परकीय देशांशी संबंध, सार्वजनिक सुव्यवस्था, सभ्यता आणि नितीमत्ता, न्यायालयाचा अवमान, अब्रूनुकसान किंवा अपराधास चिथावणी या गोष्टी असतील तर त्यावर वाजवी निर्बंध सरकारला घालता येतात. मी ते गाणं नीट ऐकलं नाहीये, मात्र असं विडंबनात्मक गाणं एखाद्या नेत्यावर केलेलं असेल तर हा कायद्यानुसार गुन्हा नाहीये. पण त्यापुढे जी घटना घडली आहे, की एका विशिष्ट पक्षाच्या लोकांनी जाऊन त्या स्टुडीओची तोडफोड केली आहे, ती कृती मात्र निश्चितच गुन्हा आहे, यात काहीच शंका नाही."

"तुम्हाला एखादी गोष्ट पटली नाही तर तुम्ही पोलिसांत वा न्यायालयात जा. तुम्ही जाऊन तोडफोड करु शकत नाही. मी ते गाणं ऐकलेलं नसलं तरीही असं एखादं व्यंगात्मक गाणं करणं, यात काहीही दोष नाहीये. प्रथमदर्शनी पाहता, ते गाणं दहा बंधनांचंही उल्लंघन करणारं आहे, असं मला वाटत नाही. धाक निर्माण करण्यासाठी अशाप्रकारे तोडफोड करणं ही गोष्ट मात्र लोकशाहीला मारक आहे," असं ते सांगतात.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)