You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
तुमच्या गावात कसं असेल हवामान, हे सांगणारी 'भारत फोरकास्ट सिस्टीम' काय आहे?
- Author, अमृता दुर्वे
- Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी
तुमच्या तालुक्यात किंवा गावाच्या आसपास उद्या हवामान कसं असेल, याचा अधिक अचूक आणि अगदी स्थानिक पातळीवरील अंदाज वर्तवणं आता हवामान विभागाला लवकरच शक्य होणार आहे. कारण असा अंदाज वर्तवण्यासाठी भारताने एक नवीन हवामान अंदाज प्रणाली विकसित केली आहे. तिचं नाव आहे भारत फोरकास्ट सिस्टीम - Bharat Forecast System.
हे जगातलं सर्वाधिक रिझोल्युशन असणारं हवामान अंदाज मांडणारं कॉम्प्युटर मॉडेल असेल. ते तयार करण्यासाठी अर्का (Arka) आणि अरुणिका (Arunika) नावाच्या Indian Institute of Tropical Meteorology (IITM) मधल्या सुपर कम्प्युटर्सची मदत घेतली आहे.
या आधी 'प्रत्युष' नावाच्या सुपरकम्प्युटरला सर्व माहिती एकत्र करून, त्यावर प्रक्रिया करून हवामान अंदाज मांडण्यासाठी साधारण दहा तास लागायचे, पण नवा अर्का हा सुपरकम्प्युटर हेच काम चार तासांत करू शकतो.
ही भारतीय हवामान अंदाज प्रणाली भारत सरकारच्या पृथ्वी विज्ञान मंत्रालयाच्या अखत्यारित विकसित करण्यात आली आहे.
या हवामान अंदाज प्रणालीच्या उद्घाटनप्रसंगी केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी म्हटलं की, भारतीय हवामान खात्याची (IMD) अंदाज प्रणाली प्रगत होत आहे."
2047 चं उद्दिष्ट गाठण्यासाठी भारतीय हवामान विभाग काय योगदान देऊ शकतो हे पाहण्याची वेळ आली आहे. संभाव्य हानी टाळुन फायदे वाढवत भारतीय अर्थव्यवस्थेला सर्वोच्च स्थानी नेण्यासाठी भारतीय हवामान विभागाच्या भूमिकेवर आम्ही लक्ष केंद्रित केलं आहे.
हवामान विभागाचं काम हे अधिकाधिक तळागाळापर्यंत विकसित करण्याचं आमचं उद्दिष्ट असल्याचंही जितेंद्र सिंह यांनी म्हटलं.
भारत फोरकास्ट सिस्टीमची वैशिष्ट्यं
यापूर्वीची हवामान प्रणाली 12 किलोमीटरच्या क्षेत्रातला अंदाज वर्तवू शकत होती. पण हाय रिझोल्युशन असणारी ही नवीन प्रणाली सहा किलोमीटरच्या क्षेत्रापर्यंतचा हवामानाचा अंदाज अधिक अचूकपणे वर्तवू शकेल.
अगदी लहान भागांमध्ये हवामानात होणारे बदलही यामुळे अधिक स्पष्टपणे समजू शकतील. स्थानिक पातळीवर पंचायत किंवा काही गावांसाठीचा हवामानाचा अंदाजही त्यामुळे वर्तवता येईल.
देशभरातल्या 40 डॉप्लर रडारकडून मिळणारा डेटा या BFS मॉडेल साठी वापरला जाईल. रडारची ही संख्या हळूहळू वाढवत 100 पर्यंत नेण्याचीही योजना आहे.
भारत फोरकास्ट सिस्टीमचे फायदे
या प्रणालीमुळे शेतीसाठी अधिक अचूक हवामान अंदाज वर्तवण्यात आणि पिकांचे नुकसान टाळण्यास मदत मिळू शकेल.
अतिवृष्टी आणि चक्रीवादळासारख्या अतितीव्र हवामान संकटांचा अचूक अंदाज मांडता येईल ज्यामुळे आपत्ती व्यवस्थापन अधिक प्रभावीपणे करता येईल आणि जीवितहानी टाळता येईल.
भारताची ही हवामान अंदाज प्रणाली अशा काळात सुरू होत आहे, जेव्हा हवामान अधिक अनिश्चित होत चालले आहे आणि हवामान बदलातील तीव्रता वाढता आहे.
या नवीन अंदाज प्रणालीमुळे अंदाजामध्ये 30 टक्के सुधारणा होईल. हवामान बदलाच्या परिणामांना सामोरे जाण्यासाठी हे अत्यावश्यक आहे.
बीएफएस 2022 पासून प्रायोगिक तत्वावर कार्यरत आहे आणि मंत्रालयाच्या माहितीनुसार या प्रणालीनुसार अतिवृष्टीच्या घटनांचे अंदाज देण्यात 30 टक्के सुधारणा झाली आहे याशिवाय, चक्रीवादळांचा मार्ग आणि तीव्रतेचा अंदाज देण्यातही ही प्रणाली अधिक अचूक ठरली आहे.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)