ग्राहक वारंवार मोबाईल फोन का बदलत आहेत?

मोबाईल पाहताना महिला

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, मोबाईल फोनच्या उत्पादनात भारत जगात दुसऱ्या क्रमांकावर आहे.
    • Author, भरत शर्मा
    • Role, बीबीसी प्रतिनिधी

'अरे यार! हा फोन दीड वर्षांपूर्वीच विकत घेतला होता. मात्र तो आतापासूनच हँग होतो आहे.'

'गॅलरीत तर भरपूर फोटो आहे, स्टोरेजचा प्रॉब्लेम होणार.'

'माहित नाही यार, काय करू, रिपेअर करून घेऊ का.?'

'बॅटरीचा प्रॉब्लेम दिसतोय यार, नवीन विकत घेऊन टाक.'

'याचं काय करू?'

'घरी आजीला देऊन टाक किंवा एक्सचेंज करून घे, नवा फोन थोडा स्वस्त पडेल.'

दिल्लीतील एका मेट्रो स्टेशनवर महाविद्यालयातील 2 विद्यार्थ्यांमधील या संवादातून भारतातील मोबाईल फोनच्या बाजारपेठेसंदर्भातील अनेक गोष्टी एकाचवेळी दिसून येतात.

मात्र ही परिस्थिती नेहमीच अशी नव्हती.

Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

31 जुलै 1995 हा तो महत्त्वाचा दिवस. याच दिवशी भारतात पहिल्यांदा मोबाईल फोनची रिंग वाजली होती.

त्यावेळचे कम्युनिकेशन मंत्री असलेले सुखराम आणि पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री ज्योति बसू यांच्यात पहिला कॉल झाला होता.

तेव्हापासून भारतात मोबाईल फोनचा इतका धडाक्यानं विस्तार झाला की, आता देशातील 85.5 टक्के कुटुंबांमध्ये किमान 1 स्मार्टफोन आहे. या सर्व कालावधीत मोबाईल फोननं आणि भारतानं बराच मोठा पल्ला गाठला आहे.

आता मोबाईल फोन हे फक्त बोलण्याचं उपकरण राहिलेलं नाही. आता ते अनेकांसाठी बँक, कॅमेरा, गेमिंग कंसोल, व्हीडिओ कॉलर, क्लासरूम आणि टीव्हीदेखील आहे.

सरकारच्या आकडेवारीनुसार, सर्वाधिक मोबाईल फोनचं उत्पादन करणाऱ्या देशात भारत जगात दुसऱ्या क्रमांकावर आहे. देशात मोबाईल फोनचं उत्पादन करणारे 300 कारखाने आहेत.

भारतात दरवर्षी तब्बल 33 कोटी मोबाईल फोनचं उत्पादन होतं. याव्यतिरिक्त परदेशातून येणारे मोबाईल फोन वेगळेच. सध्या भारतात सरासरी 1 अब्ज मोबाईल फोनचा वापर होतो आहे.

भारतात 215 अब्ज डॉलर किमतीच्या मोबाईलची विक्री होते आहे. त्यामुळे स्मार्टफोनच्या बाजारपेठेत भारत जगात तिसऱ्या क्रमांकावर आहे.

स्वस्त किंवा परवडणारे आणि प्रीमियम, अशा दोन्ही प्रकारच्या मोबाईल फोनची दणकून विक्री होते आहे. भारताची मोबाईल फोनची निर्यातदेखील वाढली असून 2024-25 मध्ये ती 24.1 अब्ज डॉलरवर पोहोचली आहे.

मोबाईल फोन स्वस्त झाले आहेत का?

या सर्व आकडेवारीदरम्यान एक महत्त्वाचा प्रश्न मनात येतो, तो म्हणजे आता ग्राहक वारंवार मोबाईल फोन का बदलत आहेत? त्यांचं नवीन फोन विकत घेण्याचं प्रमाण का वाढलं आहे?

मोबाईल फोन स्वस्त झाले आहे का की फायनान्सचा प्रश्न सुटल्यामुळे ईएमआयवर फोन घेणं लोकांसाठी सोपं झालं आहे का?

मोबाईल फोन तुलनेनं कमी टिकत आहेत का आणि जुन्या फोनइतके मजबूत नाहीत का?

सॉफ्टवेअर अपडेट आणि हार्डवेअरमधील बदलांनी नवीन फोन घेणं आवश्यक झालं आहे का?

मोबाईल पाहणाऱ्या मुली

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, सेल्युलर तंत्रज्ञानात झालेला बदल हे ग्राहकांना मोबाईल फोन बदलावा लागण्यामागचं मोठं कारण आहे.

मोबाईल फोन ग्राहकांचा दृष्टीकोन पूर्णपणे बदलला आहे का?

की हे सर्व मुद्दे खरे आहेत!

तंत्रज्ञान तज्ज्ञ मोहम्मद फैसल अली कवूसा याचा संबंध व्यापक बदलांशी जोडतात. त्यांच्या मते जर तुम्ही कन्झ्युमर इलेक्ट्रॉनिक्सबाबत ग्राहकांचं वर्तन पाहिलं तर त्यात खूप बदल झाला आहे.

एक काळ असा होता की टीव्हीबद्दल लोकांना वाटायचं की ही वस्तू अनेक पिढ्यांसाठी घरात येते आहे. वडील विकत घ्यायचे किंवा काहीवेळा आजोबा विकत घ्यायचे आणि मुलगा-नातू ते वापरायचे.

मात्र आता तुम्हाला दिसतं की एकाच पिढीत अनेक टीव्ही बदलले जातात. हा पिढीमधील बदल आहे. त्यांना वाटतं की अपडेट राहावं. तसंच ही पिढी हा खर्चदेखील करू शकते.

वारंवार नवीन मोबाईल फोन विकत का घ्यावा लागतो?

यावर कवूसा यांनी बीबीसीला सांगितलं, स्मार्टफोनचा विचार करता, एकतर सेल्युलर तंत्रज्ञानात बदल होत आहेत. 3जी, 4जी आणि 5जी तंत्रज्ञान आलं आहे. काही वर्षांनी 6जी तंत्रज्ञानदेखील येईल. नवीन मोबाईल फोन विकत घेण्यामागं हे एक मोठं कारण आहे.

याशिवाय काहीवेळा फोन हँग होऊ लागतो किंवा धीमा होतो. काहीवेळा बॅटरीच्या समस्या येऊ लागतात. या कारणांमुळे ग्राहक नवीन मोबाईल फोन विकत घ्यायचा विचार करू लागतो.

मात्र फोनमध्ये लॅग का येतो? असं तर नाहीना की मोबाईल फोनचा वापरच इतका वाढला आहे की त्यामुळे मोबाईलची क्षमता लवकरच कमी होते.

काउंटरपॉईंट रिसर्च ही जागतिक पातळीवर तंत्रज्ञानाच्या बाजारपेठेत संशोधन करते. या कंपनीचे रिसर्च संचालक तरुण पाठक याच मुद्द्यांकडे लक्ष वेधतात.

ते म्हणतात की आधी फीचर फोन(बटणांचा वापर करावा लागणारे मोबाईल फोन) असायचे. त्यात आपण कॉल करायचो, थोडाफार गेम खेळायचो. सरासरी दिवसातून दोन तास फोनचा वापर करायचो.

मात्र आता भारतात मोबाईल फोनचा रोजचा वापर सरासरी सहा ते साडे तासांचा आहे. यात तिप्पट वाढ झाली आहे. दिवसाचा एक चतुर्थांश वेळ लोक फोनवर घालवत आहेत. त्यामुळे त्यांना अपाय होण्याचा धोकादेखील वाढला आहे.

कवूसा यांचंही म्हणणं आहे की स्मार्टफोन हे नेहमी, वारंवार वापरलं जाणारं उपकरण आहे. तो हातात असतो, खाली पडतो. त्यामुळे फोन डॅमेज होण्याचा धोका असतो. त्यात 19-20 चा फरकदेखील पडतो. मग आपण तक्रार करू लागतो की फोनमध्ये प्रॉब्लेम येतो आहे.

मोबाईल पाहणारी मुलगी

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, मोबाईल टिकाऊ होण्यासाठी त्याला युनिबॉडीमध्ये बनवलं जातं आहे आणि त्यामुळे त्याची दुरुस्ती करणं कठीण होत चाललं आहे.

2017 मध्ये स्मार्टफोनचं मार्केट शिखरावर होतं. त्यावर्षी जगभरात 1.4-1.5 अब्ज स्मार्टफोन विकले गेले होते. मग ही बाजारपेठ स्थिरावत गेली आणि आता त्यात घसरण होते आहे. आता जगभरातील स्मार्टफोनची बाजारपेठ 1.2 अब्ज डॉलरची आहे.

तरुण पाठक यांनी बीबीसीला सांगितलं, याचा अर्थ असा आहे की लोक आहे तो फोन अधिक काळ वापरत आहेत. जर आपण आकडेवारीकडे पाहिलं तर लोक दोन वर्षांत स्मार्टफोन बदलतात या कल्पनेला कोणताही आधार दिसून येत नाही.

अर्थात जाणकारांना ही गोष्टदेखील मान्य आहे की ग्राहकांकडे मोबाईल फोन बदलण्यासाठी अनेक कारणंदेखील आहेत.

शिबानी, टेक रिव्ह्यूवर आहेत आणि सीएनबीसी-टीव्ही 18 मध्ये अँकर आहेत. त्या म्हणतात की बहुतांशवेळा मोबाईल फोन अपडेट आल्यामुळे, बॅटरी कमकुवत झाल्यामुळे आणि हार्डवेअरच्या मर्यादेमुळे 'निरुपयोगी' होतात.

काळानुरुप अ‍ॅप्स आणि ऑपरेटिंग सिस्टमना अधिक प्रोसेसिंग पॉवर आणि मेमरीची आवश्यकता आहे. त्यामुळे फोनचे जुने मॉडेल अधिक काळ चालू शकत नाहीत.

शिबानी यांच्या मते, रिप्लेसमेंट पुश किंवा चेंज सायकल, पूर्णपणे नैसर्गिक नाही. किंबहुना अंशत: डिझाईनना दिली जात असलेली पसंती हे त्यामागचं कारण आहे. यात टिकाऊपणापेक्षा इनोवेशन स्पीड आणि ग्राहकांच्या संख्येला महत्त्व दिलं जातं.

ग्राफिक कार्ड

वॉशिंग मशीन किंवा मायक्रोवेव्ह सारखी उपकरणं दशकातून एकदा विकत घेतली जातात. मात्र मोबाईल फोन असं उत्पादन झालं आहे की ते अपग्रेड होतात आणि त्यातून नफ्याचं चक्र सुरू राहतं.

शिबानी बीबीसीला म्हणाल्या, "भलेही मोबाईल फोनचं उपकरण काम करत असेल, मात्र अपडेट थांबल्यानंतर ते काम करू शकत नाहीत. काही कंपन्या सहा वर्षांचं सॉफ्टवेअर अपडेट आणि सिक्युरिटी पॅच देतात. मात्र अशांची संख्या फार थोडी आहे."

"अनेकजण असे आहेत की ते अजूनही तीन ते पाच वर्षे फोन वापरत आहेत. मात्र पूर्वी जसं मोबाईल फोन विकत घेणं म्हणजे महागडी किंवा मोठी बाब मानली जायची, तसं आता राहिलेलं नाही."

शिबानी यांच्या या मुद्द्याशी तरुण पाठकदेखील सहमत आहेत. ते म्हणतात, "एक गोष्ट खरी आहे की फोनमध्ये बरेच बदल झाले आहेत. उदाहरणार्थ बॅटरी. आता फास्ट चार्जिंग आलं आहे. बॅटरीची चार्ज सायकल बदलली आहे. तीन-चार वर्षआनंतर बॅटरीची क्षमता कमी होते."

"त्यामुळे लोकांना तीन-चार वर्षानंतर मोबाईल फोन बदलावाच लागतो. असे फार थोडे ब्रँड आहेत, जे सॉफ्टवेअर किंवा सिक्युरिटी अपडेट पाच-सहा वर्षांसाठी देतात."

"फोनमध्ये साठवण्यात येणाऱ्या माहितीचं प्रमाण इतकं जास्त आहे की फोनमधील स्टोरेज क्षमता संपते. बॅटरी, रॅमप्रमाणेच मेमरीचं देखील चक्र असतं. या गोष्टींची एक शेल्फ लाईफ असते."

मोबाईल फोन दुरुस्त करणं इतकं खर्चिक का असतं?

अनेकांचं म्हणणं आहे की जेव्हा ग्राहक कंपनीच्या स्टोअरवर मोबाईल फोन दुरुस्तीसाठी नेतात, तेव्हा त्यासाठी येणारा खर्च ऐकून ते फोन दुरुस्त करण्याऐवजी नवीन फोनच विकत घ्यायचा विचार करू लागतात. हा मुद्दा खरा आहे का?

यावर शिबानी म्हणतात, "मोबाईल फोनची स्क्रीन तुटली किंवा खराब झाली, तर ती दुरुस्त करण्यासाठी नवीन फोनच्या निम्मी रक्कम लागते. मग अशावेळी ग्राहक विचार करतो की नवीनच फोन विकत घ्यावा. मात्र आपण सुदैवी आहोत की भारतात अशी दुकानंदेखील आहेत, जी कंपनीच्या स्टोअरच्या तुलनेत दहा टक्के खर्चातच या दुरस्त्या करतात."

"मात्र फोनवर दीड लख खर्च करणारा ग्राहक अशा दुकानांमध्ये फोन नेत नाही. अनेकदा दुरुस्तीचा खर्च जास्त असण्यामागं रिपेअर इकोसिस्टम बंद असणं हे कारण असतं."

फोनची दुरुस्ती करणारी व्यक्ती

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, फोन टिकाऊ होण्यासाठी युनिबॉडी बनवली, तर दुरुस्ती करणं कठीण होईल.

रिपेअर कॉस्ट किंवा दुरुस्तीच्या खर्चासंदर्भात तरुण पाठक, फोनचे सुटे भाग महाग होण्याकडे लक्ष वेधतात. ते म्हणतात, "फोनची दुरुस्ती महागडी का असते? कारण सेमीकंडक्टर महाग झाला आहे. आधी मोबाईल फोनमध्ये एलसीडी स्क्रीन असायची."

"मात्र आता 60-70 टक्के फोनमध्ये ओलेड स्क्रीन असते. ती महाग असते. मोबाईल फोनचे सुटे भाग महाग झाले आहेत आणि पॉवरफुल झाले आहेत. प्रोसेसर, कॅमेरा यांच्याबाबतीत ही बाब बरोबर आहे. उत्पादन खर्चाच्या दृष्टीनं पाहिलं तर त्यात वाढ होते आहे."

पाठक पुढे म्हणतात की अनेक मर्यादादेखील आहेत. फोनच्या हार्डवेअरमधील इनोवेशन कमी झालं आहे. कॅमेरे आहे तसेच आहेत. फोनचा आकार, डिझाईन यासारखे बदल मात्र होत असतात.

एक मोठा बदल म्हणजे फोनच्या युनिबॉडीचं डिझाईन आलं आहे. दुरुस्तीकरण्यायोग्य आणि टिकाऊपणा या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत.

फोन टिकाऊ होण्यासाठी युनिबॉडी बनवली, तर दुरुस्ती करणं कठीण होईल.

ग्राफिक कार्ड

ते म्हणाले, "आधी फोन सहजपणे उघडता यायचे. बॅटरी सहज निघायची. मात्र आता तसं राहिलेलं नाही. सुटे भाग वेगवेगळे नसतात तर इंटिग्रेटेड असतात. कंपन्या टिकाऊ फोन बनवतात. फोन जास्त दिवस टिकावेत आणि कार्बन उत्सर्जन कमी व्हावं असा त्यांचा प्रयत्न असतो."

"मात्र जर दुरुस्त्या वाढल्या तर इलेक्ट्रॉनिक कचरादेखील वाढेल. त्यामुळेच दुरुस्ती करण्यायोग्य की टिकाऊपणा हा वेगळा मुद्दा आहे. जर आपण असं म्हटलं की कंपन्या सुट्या भागांनुसार त्यांची शेल्फ लाईफ कमी करत आहेत तर ते चुकीचं ठरेल."

कवूसा हा मुद्दा लॅपटॉपच्या उदाहरणानं समजावतात. त्यांच्या मते लॅपटॉपमध्ये आधी रॅम आणि स्टोरेज वेगळे व्हायचे.

रॅम, हार्ड ड्राईव्ह खराब झाली तर ती बदलता यायची. मात्र आता ते मदरबोर्डला जोडून येऊ लागले आहेत.

त्यामुळे त्यातील एकही गोष्ट खराब झाली तर सगळंच बदलावं लागतं. डिझाईनच्या पातळीवर दुरुस्तीऐवजी रिप्लेसमेंटकडे कल वाढतो आहे.

सेकंड हँड मोबाईल फोनच्या बाजारपेठेची वाढ

जाणकारांचं म्हणणं आहे की लोकांच्या सवयी बदलल्या आहेत. ते लवकर मोबाईल फोन बदलत आहेत, ही गोष्ट खरी आहे. मात्र याचा अर्थ असा नाही की फोनचा टिकाऊपणा कमी होतो आहे.

तरुण पाठक म्हणतात, "आता लोक सेकंड हँड फोन विकत घेत आहेत आणि ही बाजारपेठ वेगानं विस्तारते आहे. याव्यतिरिक्त लोक फोन वापरल्यानंतर लोक घरातील कोणाला तरी देतात, विकतात किंवा रिप्लेसमेंटमध्ये देतात."

"त्यामुळे फोनची लाईफसायकल किंवा जीवनचक्र वाढलं आहे. आधी फोन मूळ ग्राहकाकडे असतो, नंतर सेंकड हँड म्हणूनही दोन वर्षे वापरला जातो. ग्राहकाचं वर्तन, दृष्टीकोन बदलतो आहे, मात्र फोनचं आयुष्यदेखील वाढतं आहे."

5जी तंत्रज्ञान आल्यानंतर भारतातील सेकंड हँड मोबाईल फोनची बाजारपेठ एकदम वाढली होती आणि आजही हा वेग कायम आहे.

स्मार्टफोनचे दुकान

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, जगभरातील सेकंड हँड स्मार्टफोनच्या बाजारपेठेत भारत आता तिसऱ्या क्रमांकावर आहे.

एकता मित्तल यांनी सीसीएस इनसाइटवर लिहिलं आहे की भारता आता जगभरातील सेकंड हॅंड स्मार्टफोन बाजारेपेठेत तिसऱ्या क्रमांकावर आहे. भारताच्या पुढे फक्त चीन आणि अमेरिका आहे.

2024 मध्ये ही बाजारपेठ 10 टक्क्यांनी वाढली आणि 57 लाख फोनची विक्री झाली. नव्या फोनच्या बाजारपेठेतील तेजी यावर्षी कमी झाली, मात्र सेकंड हँड फोनची बाजारपेठ विस्तारते आहे.

कवूसा यांचं म्हणणं आहे की फोनच्या दुरुस्तीचा खर्च अधिक आहे, ही गोष्ट खरी आहे. मात्र त्याचबरोबर ते या ट्रेंडला ग्राहकांच्या वर्तणुकीशी, दृष्टीकोनाशीदेखील जोडतात.

सेलच्या नावाखाली काही महिन्यांमध्ये किंवा वर्षभरात लाँच होणारे नवनवीन मोबाईल फोनमध्ये तंत्रज्ञानाच्या पातळीवर अनेक बदल झालेले असतात का?

शिबानी यावर म्हणतात, "कॅमेऱ्याची गुणवत्ता, डिस्प्ले, एआय फीचर, बॅटरीची क्षमता या गोष्टींबाबत गेल्या काही वर्षांमध्ये बरेच बदल झाले आहेत. मात्र दरवर्षी लॉंच होणारं मॉडेल म्हणजे मोठ्या बदलाचं निदर्शक नाही."

तरुण पाठक म्हणतात की बटणापासून टच स्क्रीनपर्यंतचा बदल हा मोबाईल फोनच्या विश्वातील सर्वात मोठा बदल असल्याचं म्हणता येईल. मात्र आता तंत्रज्ञानात बदल होताना दिसत नाहीत.

ग्राफिक कार्ड

डिझाईन बदलतं आहे. फोन स्लिम, कॉम्पॅक्ट, कलरफूल, फोल्डेबल होत आहेत. दरवर्षी तुम्ही पाहिलं तर तीन वर्षांपूर्वीचा कॅमेरादेखील आजच्या फोनला चांगली टक्कर देईल. सॉफ्टवेअरबद्दल बोलायचं तर एआय आलं आहे. तो बदल आहे आणि यूआय लेव्हलवर काही बदल झाले आहेत.

आता जिथून हा विषय, कहाणी सुरू झाली पुन्हा तिथेच परतूया. काऊंटरपॉईंटच्या इंडिया स्मार्टफोन ड्युरेबिलिटी कन्झ्युमर स्टडीनुसार, 79 टक्के ग्राहकांना वाटतं की फोनची ड्युरेबिलिटी म्हणजे टिकाऊपणा खूप आवश्यक आहे.

ओव्हरहीटिंग (41 टक्के), बॅटरी ड्रेन (32 टक्के) आणि ॲक्सिडेंटल डॅमेज (32 टक्के) या गोष्टींची त्यांना जास्त चिंता वाटते. दर तीनपैकी एक व्यक्ती स्मार्टफोन दुरुस्तीवर 5,000 रुपयांहून अधिक खर्च करतो.

89 टक्के लोकांचा फोन बंद पडतो, तेव्हा पर्सनल डेटाची सर्वाधिक चिंता वाटते. कारण कुटुंबाचे फोटो आणि बँकिंग क्रेडेन्शियल त्याच फोनमध्ये राहण्याचा धोका असतो.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)