डिजिटल डिटॉक्स : सारखा-सारखा मोबाईल पाहण्याची सवय कशी सोडवता येईल?

फोटो स्रोत, Getty Images
- Author, राजवीर कौर गिल
- Role, बीबीसी पंजाबी प्रतिनिधी
तुमचा मोबाईल फोन उत्तम सुरू स्थितीत आहे आणि आणि तुमच्याकडे वेळही आहे. पण त्या वेळेमध्ये तुम्ही मोबाईल वापरत नसाल तर?
मग अशा वेळेत काय करायचं हे सुरुवातील समजणारच नाही. पण अशी संधी किंवा वेळ मिळाला तर तो वेळ स्वतःसाठी वापरायला पाहिजे.
या वेळेत अनेकवेळा पुढं ढकलली जाणारी कामं पूर्ण करायला हवी. पुस्तक वाचणं, एखादं अपूर्ण चित्र पूर्ण करणं किंवा कुटुंबाशी बोलणं. यालाच म्हणतात डिजिटल डिटॉक्स.
एकेकाळी आपल्या जीवनात प्रचंड महत्त्वाच्या असलेल्या गोष्टींचं गांभीर्य आपल्याला पुन्हा एकदा लक्षात यावं या उद्देशानं डिजिटल डिटॉक्स केलं जातं.
आजघडीला आपण डिजिटल उपकरणांवर इतके विसंबून आहोत की, आता ही उपकरणं दूर ठेवण्यासाठीही आपल्याला अॅप्सची म्हणजेच नव्या तंत्रज्ञानाची गरज भासत आहे.
त्यामुळंच आता डिजिटल डिटॉक्सच्या अॅप्सची चर्चा होत आहे. ही अॅप्स कसं काम करतात आणि डिजिटल डिटॉक्ससाठी आपण काय करायला हवं याबाबत जाणून घेऊया.
डिजिटल डिटॉक्स अॅप्स काय आहेत?
आयफोन आणि अँड्रॉईड मोबाईलवर चालणारे अनेक अॅप्स सध्या अॅप स्टोरमध्ये उपलब्ध आहेत.
मोबाईल किंवा एकूणच स्क्रीन टाईम कमी करण्यासाठी आणि डिजिटल उपकरणांवरचं अवलंबित्व कमी करण्यासाठी मदत करणारे हे अॅप्स असतात. म्हणजेच, त्यांचा उद्देश मोबाईलच्या स्क्रीनपासून दूर नेऊन आपला वास्तविक जीवनाशी संबंध वाढवणे हा असतो.
गुगल प्ले स्टोअरवरील एका अशाच डिजिटल डिटॉक्स अॅप बाबत असं म्हटलं आहे की, "स्वतःशी, इतरांशी आणि जगाशी पुन्हा मैत्री करण्यासाठी मोबाईलबरोबरची मैत्री जरा कमी करा."
"तुम्ही सारखे फोनवर असता का? तुम्हाला जगापासून दूर जाण्याची भीती वाटते का? नेटवर्क मिळालं नाही तर तुम्ही घाबरता का? तसं असेल तर डिजिटल डिटॉक्सची वेळ आली आहे असं समजा," असंही एका अॅपनं म्हटलं आहे.

फोटो स्रोत, Getty Images
मुळात हे अॅप्स विशिष्ट कालावधीसाठी फोन बंद करतात. हा वेळ 10 मिनिटांपासून ते 10 दिवस, एक महिना किंवा त्याहून जास्तही असू शकतो.
फोन किती वेळ बंद ठेवायचा आहे, हे तुम्ही स्वतः ठरवू शकता. या दरम्यान सर्व सोशल मीडिया अॅप्स बंद राहतील आणि फक्त आपत्कालीन कॉलची सुविधा उपलब्ध असेल.
काही अॅप्स फोन कॉल करण्याची परवानगी देतात आणि काही कॉलच्या वेळेची मर्यादाही ठरवतात.
पण त्याचवेळी , डिजिटल डिटॉक्स अॅप निवडताना सावध असणेही महत्त्वाचे आहे.
डिजिटल डिटॉक्स अॅप्स कसे काम करतात?
वर सांगितल्याप्रमाणे हे अॅप्स मोबाईल फोन ठराविक काळासाठी बंद करतात. पण काही अॅप्स कोणते सोशल मीडिया अॅप्स बंद करायचे आणि कोणते नाही हे निवडण्याची परवानगीही देतात.
मी स्वतः हे अनुभवलं आहे. एकदा सुटीच्या दिवशी मी काही वेळ फोनपासून ब्रेक घेण्याचा निर्णय घेतला. एका अॅपच्या मदतीनं जवळपास तीन तास मी फोन डिटॉक्स मोडवर ठेवला.

पण सवयीनुसार मी फोन हातात घेऊन पाहिला तर स्क्रीनवर काही मनोरंजक संदेश सल्ल्याच्या स्वरुपात दिसले. त्यात,
- तुम्ही फिरायला जाऊ शकता.
- तुम्ही तुमचे आवडते पदार्थ बनवू शकता.
- तुम्ही कुटुंबासोबत बसून चहा घेत वेळ घालवू शकता.
- तुम्ही बागकाम करू शकता.
असे अनेक मेसेज स्क्रीनवर येत राहिले. त्यामुळं मी फोन खाली ठेवला. खरं तर, हे तीन तास दिवसातील सर्वात अर्थपूर्ण तास ठरले. माझ्या मनाला आणि मेंदूला थोडी विश्रांती मिळाली आणि मलाही शांत वाटलं.
डिजिटल डिटॉक्सची गरज का आहे?
डिजिटल डिटॉक्स अॅप्स हे फोनचा वापर हा अत्यंत गरजेच्या कामापुरताच मर्यादीत करतात.
इंग्रजी वृत्तपत्र द हिंदू मधील एका वृत्तानुसार, भारतात 86 टक्के प्रौढ स्मार्टफोन वापरतात. त्यापैकी 30 टक्के लोक दररोज सुमारे सहा तास स्क्रीनवर घालवतात. मित्रांशी संपर्कात राहण्यासाठी असो, किंवा सोशल मीडियावर, YouTube वर मनोरंजनासाठी किंवा गेमिंग साइट्सवर असो.
रेडसीअर स्ट्रॅटेजी च्या 2024 च्या अहवालानुसार, भारतात सरासरी स्क्रीन टाइम 7.3 तास आहे.
असा जास्त स्क्रीन टाइम शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी धोकादायक असल्याचं तज्ज्ञांचं मत आहे.
"आपण अनेकदा कुटुंबासह एकाच घरात राहूनही स्वतःला त्यांच्यापासून वेगळे केलेलं असतं," असं कुटुंब मानसशास्त्रज्ञ जसलिन गिल म्हणतात.
त्यांच्या मते, "मूळ मानवी स्वभाव हा एकटं नव्हे तर समाजात राहण्याचा आहे. समाजाची सुरुवात मानवांच्या एकत्र राहण्याच्या प्रवृत्तीपासूनच झाली. पण अनावश्यक स्क्रीन टाइम आपल्यावर मर्यादा घालत आहे. त्यामुळं प्रियजनांशी बोलण्याऐवजी आपण फोनवर वेळ घालवतोय."

"मेंदूशी संबंधित अनेक आजार एकाकीपणाशी संबंधित असतात. तुम्ही तुमचे दुःख किंवा समस्या कोणाशीही शेअर करत नाही आणि अशा बाबतीत मदतीसाठी एआय सारख्या गोष्टींवर अवलंबून राहता तेव्हा परिस्थिती मानसिक आजारात बदलते," असं जसलिन सांगतात.
मानवी विकास हा परस्पर संवाद, अनुभव आणि विचारांच्या देवाणघेवाणीशी जोडलेला आहे. तो आता बराच कमी झाला असल्याचंही त्या सांगतात.
निरोगी मन आणि निरोगी शरीराबद्दलही त्यांनी मत मांडलं आहे.
"मानवी मेंदू एवढा शक्तिशाली आहे की, तो निरोगी माणसालाही आजारी बनवू शकतो. तसंच जर कोणी आजारी असेल तर त्याच्या आत्मशक्तीने तो निरोगी होण्याच्या दिशेने वाटचाल करू शकतो," असं त्या सांगतात.
"पण एकटेपणा बराच काळ राहिला तर जेव्हा लोक मानसिक आजारांसोबत शारीरिक आजारांनाही बळी पडतील," असं त्या सांगतात.
डिजिटल डिटॉक्सचा अनुभव
शिक्षिका असलेल्या अमरजित कौर या वर्षी जूनमध्ये सुटीवर होत्या. त्यावेळी त्यांना जाणवलं की सामान्य दिवसांमध्ये त्यांना शाळा, मुलं आणि पालकांकडून इतके फोन येतात की ती मुलांसोबत त्यांना जास्त वेळ घालवता येत नाही.
त्यांचं एक मूल सहावीत तर एक जहावीत आहे. संपूर्ण सुटी त्यांच्याबरोबर घालवता येईल, असं त्यांना वाटलं.
पण दोन आठवड्यांनंतरही त्यांना मुलांबरोबर वेळ घालवता आलं नाही. कारण त्या मोबाईलमध्ये व्यस्त होत्या. तिचा बहुतांश वेळ सोशल मीडिया किंवा नातेवाईक, मित्रांशी फोनवर बोलण्यात जायचा.
नंतर त्यांनी फोनचा वापर कमी करण्याचा प्रयत्न केला. पण सारखं लक्ष फोनकडं जायचं म्हणून ते कठिण गेलं, असं त्या सांगतात.
अमरजीत यांच्या मते, "फार काही गरज नसतानाही, त्या अधूनमधून व्हॉट्सअॅप तपासत होत्या."
शेवटी, एका मित्राच्या सल्ल्यानुसार, त्यांनी डिजिटल डिटॉक्स अॅपची मदत घेतली.
"मी अशा अॅपबद्दल कधीच ऐकलं नव्हतं. पहिल्या दिवशी मी फक्त दोन तास फोन बंद केला. मुलांनाही मी तेच करायला सांगितलं. त्यांनीही होकार दिला," असं त्या म्हणाल्या.

फोटो स्रोत, Getty Images
अमरजीत कौर यांच्या मते, "त्यानंतर, सुटीमध्ये मी सुमारे आठ तास फोन बंद ठेवला. यामुळं मला जास्त वेळ आणि सोबतच मनःशांती मिळाली. आम्ही उर्वरित सुट्टी एकत्र घालवली. मी मुलांसोबत वेळ घालवला आणि त्यांना चांगलं समजून घेतलं."
त्या म्हणतात की, डिजिटल डिटॉक्स हा आता त्यांच्या जीवनातील महत्त्वाचा भाग बनला आहे.
शाळा आणि स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या मुलांसाठी डिजिटल डिटॉक्स आणखी महत्वाचे ठरतं, असं जसलीन गिल म्हणतात.
"स्क्रीनपासून दूर राहिल्यास विद्यार्थी अधिक लक्ष केंद्रित करू शकतात. त्यामुळे त्यांना दिरंगाई टाळता येते आणि मानसिक ताणही कमी होतो."
फोनशिवाय आपली अनेक महत्त्वाची कामं थांबू शकतात, पण आपण मानवी सवयी आणि गरजा विसरता कामा नये, असंही जसलिन म्हणतात.
बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.











