तुमचा फोन अचानक गरम होतो का? फोनचं नुकसान टाळण्यासाठी 'या' गोष्टी लक्षात ठेवा

मोबाईल फोन

फोटो स्रोत, Getty Images

तुमचाही फोन अचानक गरम होतो का? फोनला थंड करण्याची गरज आहे असा मेसेज मोबाईलच्या स्क्रीनवर दिसू लागतो का?

उन्हात असताना फोनसोबत असं अनेकदा होतं. पण कधीकधी आपण आडोशाला किंवा सावलीच्या ठिकाणी उभे असलो तरी फोन गरम होऊ लागतो. इतकंच काय, कधीकधी आपण घरात बसलो असतानाही फोन असा गरम होऊ शकतो.

असं का होतं, फोन गरम झाला तर काय करायचं आणि फोनचं तापमान कसं मोजायचं हे जाणून घेऊयात.

फोन गरम का होतो?

फोन गरम होण्यामागे अनेक कारणं असू शकतात. चला, ती समजून घेऊ.

  • एकतर, फोनवर थेट प्रखर सूर्यप्रकाश पडत असेल तर तो गरम होतो. दुसरं, फोनच्या सीपीयू प्रोसेसरवर ताण पडला तरीही फोन गरम होतो.
  • फोनवर एकाचवेळी अनेक ॲप्स उघडले असतील, तरी फोन गरम होत असल्याचं लक्षात येईल.
  • फोनमध्ये जागा, मेमरी आणि ऊर्जा जास्त प्रमाणात वापरणारे अ‍ॅप्स फोन गरम करतात.
  • खराब बॅटरी किंवा चार्जिंग केबलमुळेही फोन गरम होऊ शकतो.
  • कधी-कधी वायरलेस चार्जिंगमुळेही फोनचं तापमान वाढतं.
  • फोन सतत आणि दीर्घकाळ वापरल्यास बॅटरी गरम होऊ शकते.
  • व्हिडीओ स्ट्रिमिंग जास्त वेळ पाहिल्यास फोन गरम होतो.
  • फोनचे सॉफ्टवेअर अपडेट करताना देखील फोन गरम होऊ शकतो.
  • फोनमध्ये मालवेअर किंवा व्हायरस आल्यासही फोन गरम होतो.

ही माहिती ॲपल आणि एअरटेल डेटा कंपनीच्या वेबसाइटवर फोन गरम होण्याची कारणं म्हणून सविस्तर दिली आहे.

फोनचं तापमान कसं मोजायचं?

आयफोन असो वा अँड्रॉईड, फोनचं तापमान मोजणं अतिशय सोपं आहे. फोनच्या सेटिंगमध्ये जाऊन बॅटरी इन्फो या पर्यायावर क्लिक केल्यास ते दिसतं.

पण तुमच्या फोनमध्ये तशी सोय नसेल, तर थर्ड पार्टी ॲप वापरूनही फोनचं तापमान मोजता येतं.

थेट सूर्यप्रकाश पडतो अशा जागी ठेवल्यानं फोन गरम होऊ शकतो.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, थेट सूर्यप्रकाश पडतो अशा जागी ठेवल्यानं फोन गरम होऊ शकतो.

त्यासाठी सीपीयू-झेड, कूलर मास्टर आणि एआयडीए 64 अशी काही ॲप्स उपलब्ध आहेत. ती फोनच्या तापमानाची माहिती देतात.

आपण हे समजून घ्यायला हवं की, फोनमध्ये दिसणारं तापमान 35 अंश सेल्सिअसपर्यंत असेल तर बाहेरून फोन गरम होणं सामान्य आहे.

ते तापमान 36 ते 43 अंश सेल्सिअसपर्यंत गेले, तरीही घाबरण्याची गरज नाही. पण जर तापमान यापेक्षा जास्त झालं, तर फोन तातडीने थंड करणं गरजेचं आहे.

मोबाईल फोन

फोन गार कसा करायचा?

फोन थंड करण्याचे किंवा फोनचं तापमान परत सामान्य पातळीवर येऊ शकेल, असे अनेक उपाय आहेत.

पण हे लक्षात ठेवायला हवं की, फोन थंड करण्यासाठी कधीही फ्रीज किंवा फ्रीझरमध्ये ठेवू नये. तापमानात अचानक झालेल्या बदलानं स्क्रीन फुटू शकते.

फोनमध्ये तापमान मोजण्याचे फिचर नसेल, तर थर्ड पार्टी अ‍ॅपद्वारे तापमान जाणून घेता येतं.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, फोनमध्ये तापमान मोजण्याचे फिचर नसेल, तर थर्ड पार्टी अ‍ॅपद्वारे तापमान जाणून घेता येतं.

फोन थंड करण्यासाठी तुम्ही खालील उपाय वापरू शकता.

सगळे ॲप्स बंद करा - अनेकदा आपण वापरत नसलो तरी खूप ॲप्स बॅकग्राऊंडला उघडलेले असतात. त्यामुळे फोन गरम होऊ शकतो.

यातले बहुतेक ॲप्स हे उर्जा खाणारे असतात. त्यामुळे फोनच्या प्रोसेसरला गरज नसताना जास्त काम करावं लागतं.

त्यामुळे तुमच्या फोनचं तापमान वाढलं की आधी सगळे ॲप्स बंद करा.

फोनवर थेट सूर्यप्रकाश पडू देऊ नका

फोन कधीही थेट ऊन्हात किंवा उष्णतेच्या संपर्कात येऊ देऊ नका. अन्यथा फोन गरम होऊ शकतो. उन्हाळ्यात गाडीतील डॅशबोर्डवर ठेवलेला फोन गरम होतो.

बर्फाची खोली किंवा कोल्ड स्टोरेजसारख्या खूप थंड ठिकाणी देखील फोन नेऊ नये.

फोन गरम होण्याआधीच सर्व अ‍ॅप्स बंद करा.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, फोन गरम होण्याआधीच सर्व अ‍ॅप्स बंद करा.

फोनचं कव्हर काढा – फोनचं संरक्षण करण्यासाठी आपण कव्हर लावतो. पण काही वेळा यामुळे उष्णता आत अडकते. जर तुमचा फोन सतत गरम होत असेल, तर हलकं आणि हवा खिळती राहील असं कव्हर वापरा.

फोन एअरप्लेन मोडवर ठेवा – सतत वायफाय किंवा ब्लूटुथ चालू ठेवणं फोन गरम होण्याचं एक कारण असू शकतं. त्यामुळे थोडा वेळ फोनला एअरप्लेन मोडवर ठेवणं उपयोगी ठरू शकतं.

जंक क्लिन करा – फोनमध्ये अनावश्यक फाईल्स, अ‍ॅप्स, आणि डेटा साठलेला असतो. आपण जे अ‍ॅप्स वापरत नाही, ते अनइन्स्टॉल करायला हवेत. शिवाय कॅशे आणि नको असलेले फोल्डर आणि फाईल्स डिलीट करायला हव्यात.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)