अमेरिकेला हादरवणाऱ्या चीनच्या 'डीपसीक'शी संबंधित एकूण एक प्रश्नांची उत्तरं जाणून घ्या

चिनी कंपनीनं तयार केलेलं डीपसीक (DeepSeek) या आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) मॉडेलनं ॲपलच्या ॲप स्टोअरवर पहिलं स्थान मिळवलं आहे. यामुळे या क्षेत्रातील गुंतवणुकदारांमध्ये खळबळ उडाली असून काही तंत्रज्ञान कंपन्यांचे शेअर्स गडगडले.

20 जानेवारीला डीपसीकची ताजी आवृत्ती बाजारात आल्यानंतर या मॉडेलनं तंत्रज्ञान विश्व आणि जगभरात सर्वाचं लक्ष वेधून घेतलं आहे. त्याआधी आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या क्षेत्रातील लोकांनीदेखील डीपसीकची दखल घेतली होती.

डीपसीक ज्याप्रकारे विकसित झालं आहे त्यामुळे चॅटजीपीटीसह आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या क्षेत्रात प्रचंड गुंतवणूक करणाऱ्या सर्व अमेरिकन कंपन्यांचं धाबं दणाणलं आहे.

डीपसीकच्या या दाव्यामुळे चिप बनवणाऱ्या एनव्हीडिया (Nvidia)या आघाडीच्या कंपनीसह सर्व अमेरिकन तंत्रज्ञान कंपन्यांच्या शेअर्सना जबरदस्त दणका बसला. या कंपनीच्या बाजारमूल्यात सोमवारी (27 जानेवारी) प्रचंड घसरण झाली. अमेरिकेच्या इतिहासात याआधी इतक्या मोठ्या प्रमाणात एकाच दिवसात एखाद्या कंपनीच्या शेअर्सच्या किंमतीत इतकी घसरण झाली नव्हती.

अमेरिका आणि चीनच्या सरकारनं देखील याची दखल घेतली आहे.

सर्व जगाचं लक्ष वेधून घेणाऱ्या डीपसीकशी निगडीत सर्व महत्त्वाच्या मुद्द्यांबद्दल जाणून घेऊया.

डीपसीक (DeepSeek) काय आहे?

डीपसीक हे आर्टिफिशियल इंटेलिजन्सवर आधारित एक मोफत वापरता येणारं चॅटबॉट आहे. बऱ्याचअंशी चॅटजीपीटीप्रमाणेच ते गोष्टींचं आकलन करतं, समजून घेतं आणि काम करतं.

त्यामुळे ज्या गोष्टींसाठी चॅटजीपीटीचा वापर होतो त्याच गोष्टी डीपसीकचा वापर करून केल्या जाऊ शकतात.

चॅटजीपीटीच्या या आवृत्तीचं नाव R1 असं आहे.

ओपनएआयच्या 01 मॉडेलइतकंच डीपसीकचं मॉडेलदेखील शक्तीशाली असल्याचं म्हटलं जातं आहे. यात इतर कामं करण्याबरोबरच गणित आणि कोडिंगचाही समावेश आहे.

01 प्रमाणेच R1 देखील एक "रिझनिंग" मॉडेल आहे. म्हणजेच हे मॉडेल्स युजर्सना हळूहळू वाढता प्रतिसाद देतात. ते मानवाच्या समस्या किंवा कल्पनांच्या माध्यमांतून तर्कसंगत मांडणी करण्याच्या प्रक्रियेचं अनुसरण करतात.

डीपसीकचं R1 मॉडेलचं वैशिष्ट्यं म्हणजे ते त्याच्या प्रतिस्पर्धी आर्टिफिशियल इंटेलिजन्स मॉडेलपेक्षा कमी मेमरी वापरतात. परिणामी तेच काम करण्यासाठी लागणारा खर्च कमी होतो.

बैदूचं अर्नी (Baidu's Ernie) किंवा बाइटडान्सचं दाउबाओ (Doubao by ByteDance) सारख्या इतर असंख्य चीनी एआय मॉडेल्सप्रमाणे डीपसीकला देखील राजकीयदृष्ट्या संवेदनशील प्रश्नांची उत्तरं टाळण्याचं प्रशिक्षण देण्यात आलं आहे.

उदाहरणार्थ, बीबीसीनं जेव्हा डीपसीकच्या या अॅपला प्रश्न विचारला की 4 जून 1989 ला चीनमधील तिआनमेन चौकात काय झालं होतं. त्यावर डीपसीकनं त्या दिवशी झालेल्या हत्याकांड किंवा कत्तलीबद्दल कोणतीही माहिती दिली नाही.

कारण ही घटना चीनी सरकारच्या विरोधात जाणारी असणाऱ्या चीनमध्ये या घटनेबद्दल बोललं जात नाही.

डीपसीकनं असं उत्तर दिलं, "मला माफ करा, मी या प्रश्नाचं उत्तर देऊ शकत नाही. मी एक आर्टिफिशियल इंटेलिजन्सवर आधारित सहाय्यक असून उपयुक्त आणि कोणतीही हानी न पोहोचवणारी उत्तरं देण्यासाठी माझी रचना करण्यात आली आहे."

डीपसीकचं महत्त्वं का आहे? त्याची एवढी चर्चा का होते आहे?

सोमवारीच (27 जानेवारी) डीपसीकचं मोफत अॅप अमेरिकेत अॅपलच्या अॅपल स्टोअरवर सर्वाधिक डाउनलोड करण्यात आलेलं अॅप ठरलं आहे.

विशेष लक्षात घेण्यासारखी बाब म्हणजे, आर्टिफिशियल इंटेलिजन्ससाठी आवश्यक असलेलं अत्याधुनिक चिप तंत्रज्ञानाची विक्री चीनला करण्यावर अमेरिका बंधनं घालत असताना डीपसीकच्या अ‍ॅपचा उदय झाला आहे.

अमेरिकेकडून आर्टिफिशियल इंटेलिजन्ससाठी अत्याधुनिक चिपचा सातत्यपूर्ण पुरवठा होत नसताना, या क्षेत्रातील काम सुरू ठेवण्यासाठी आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या क्षेत्रात काम करणाऱ्या चिनी कंपन्यांनी त्यांच्या कामाची माहिती एकमेकांना दिली आहे. तसंच या तंत्रज्ञानाच्या विकासासाठी नवीन मार्गांचा प्रयोग केला आहे.

या प्रयोगांमुळे आर्टिफिशियल इंटेलिजन्सचे असे मॉडेल्स समोर आले आहेत ज्यांना पूर्वीपेक्षा कितीतरी कमी संगणकीय शक्तीची (computing power) आवश्यकता आहे.

याचाच अर्थ त्यामुळे आधी विचार केला जात होता त्यापेक्षा खूपच कमी खर्च या तंत्रज्ञानाच्या विकासासाठी येतो आहे. त्यामुळे आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या उद्योगावर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे.

या महिन्याच्या सुरुवातीला डीपीसीक-आर1 (DeepSeek-R1) लाँच करण्यात आलं होतं.

गणित, कोडिंग आणि मानवी भाषा समजून त्यातून निष्कर्ष काढण्याच्या संगणकीय प्रणालीची क्षमता यासारख्या कामांमध्ये वापर केला असता डीपसीकच्या अ‍ॅप चॅटजीपीटी विकसित करणाऱ्या ओपनएआय या कंपनीच्या नव्या एआय मॉडेल्सच्या "तोडीस तोड कार्यक्षमतेचं" असल्याचा कंपनीला अभिमान आहे.

डीपसीकनं हे मॉडेल अतिशय कमी खर्चात विकसित करण्यात आल्याचा दावा केला आहे. डीपसीकनं हे मॉडेल 60 लाख डॉलर्समध्ये (48 लाख पौंड) विकसित केल्याचं सांगितलं जातं आहे.

तर ओपनएआयचं जीपीटी-4 मॉडेल विकसित करण्यासाठी 10 कोटी डॉलर्सहून अधिक खर्च आल्याचा ओपनएआयचे प्रमुख सॅम अल्टमन यांनी सांगितलं होतं. त्या तुलनेत डीपसीकला आलेला खर्च खूपच कमी आहे.

त्यामुळे अमेरिकन कंपन्यांचं आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या क्षेत्रातील वर्चस्व आणि या कंपन्या त्यासाठी ओतत असलेलं प्रचंड भांडवल यासंदर्भात मोठं प्रश्नचिन्ह निर्माण झालं असून चीनी कंपन्या या क्षेत्रात अमेरिकेला मागे टाकणार का ही चिंता निर्माण झाली आहे.

त्यातूनच आर्टिफिशियल इंटेलिजन्स क्षेत्राचं आणि जगाचं लक्ष, डीपसीक आणि पर्यायानं चीनी कंपन्यांवर केंद्रित झालं आहे.

अमेरिकन तंत्रज्ञान कंपन्यांचे शेअर्स का गडगडले?

डीपसीकच्या यशामुळे आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या क्षेत्रात प्रगती करण्यासाठी खूप मोठी गुंतवणूक आणि अतिशय अत्याधुनिक चिप हाच मार्ग असल्याच्या मान्यतांना धक्का बसला आहे.

"मर्यादित संगकीय सुविधा असताना किंवा कमी खर्चात आर्टिफिशियल इंटेलिजन्सचे मॉडेल विकसित करता येऊ शकतात हे डीपसीकनं सिद्ध केलं आहे," असं वी सन म्हणतात. ते काउंटर पॉईंट रिसर्चमध्ये मुख्य एआय विश्लेषक आहेत.

ते म्हणाले, "एकीकडे डीपसीकनं अतिशय कमी खर्चात एआय मॉडेल विकसित केलेलं असताना ओपनएआयनं यावर प्रचंड खर्च केला आहे. ओपनएआयचं बाजारमूल्य 157 अब्ज डॉलर इतकं आहे. त्यामुळे या क्षेत्रात आघाडी राखण्याच्या ओपनएआयच्या क्षमतेबाबत डीपसीकमुळे प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. "

त्यात डीपसीक ही पूर्णपणे खासगी मालकीची कंपनी असल्यामुळे तिच्या शेअर्सची खरेदी गुंतवणुकदारांना करता येत नाही.

एकीकडे डीपसीकची प्रचंड लोकप्रियता आणि दुसरीकडे हे मॉडेल विकसित करण्यासाठी आलेला अतिशय कमी खर्च यामुळे बाजारात खळबळ उडाली आहे.

27 जानेवारीला शेअर बाजारावर त्याचा जबरदस्त परिणाम झाला. नॅसडॅक हा अमेरिकेतील तंत्रज्ञान कंपन्यांचा निर्देशांक 3 टक्क्यांहून अधिक घसरला. ही घसरण मुख्यत: जगभरातील चिप उत्पादक कंपन्या आणि डेटा सेंटर्स यांच्या शेअर्सच्या विक्रीमुळे झाली होती.

याचा अनेक अमेरिकन कंपन्यांना मोठा फटका बसला.

डीपसीकचा धक्का इतका प्रचंड होता की अमेरिकन तंत्रज्ञान कंपन्यांच्या बाजारमूल्यात तब्बल 1 ट्रिलियन डॉलरची घसरण झाली होती.

एनव्हिडिया (Nvidia) ला सोमवारी (27 जानेवारी) आतापर्यंतचा सर्वात मोठा फटका बसला. कंपनीच्या शेअर्सच्या किंमतीत 17 टक्क्यांची मोठी घसरण झाली. बाजारमूल्याच्या दृष्टीनं ही चिप उत्पादक कंपनी जगातील सर्वात मोठी कंपनी होती.

मात्र शेअर्सची किंमत कोसळल्यानंतर तिचं बाजारमूल्य 3.5 ट्रिलियन डॉलरवरून 2.9 ट्रिलियन डॉलरवर आलं. त्यामुळे बाजारमूल्यानुसार अॅपल आणि मायक्रोसॉफ्टनंतर ती तिसऱ्या क्रमांकावर घसरली, अशी माहिती फोर्बसनं दिली आहे.

एएसएमएल (ASML) या डच चिप उपकरण उत्पादक कंपनीच्या शेअर्सच्या किंमतीत त्यामुळे अचानक 10 टक्क्यांहून अधिकची घसरण झाली होती.

सिमेन्स एनर्जी (Siemens Energy) ही कंपनी आर्टिफिशयल इंटेलिजन्सशी संबंधित हार्डवेअर म्हणजे उपकरणांचं उत्पादन करते. या कंपनीच्या शेअर्स देखील तब्बल 21 टक्क्यांनी कोसळले होते.

"आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या क्षेत्रात कमी किंमतीच्या चिनी अ‍ॅपची कल्पना तशी आघाडीवर नव्हती. त्यामुळे डीपीसीकच्या यशामुळे बाजाराला थोडासा आश्चर्याचा धक्का बसला आहे," असं फिओना सिनकोटा म्हणाल्या. त्या सिटी इंडेक्समध्ये वरिष्ठ बाजार विश्लेषक आहेत.

"जेव्हा अचानक अशा प्रकारचं कमी किमतीचं आर्टिफिशियल इंटेलिजन्सचं मॉडेल समोर येतं, तेव्हा त्यातून त्या कंपनीच्या प्रतिस्पर्धी कंपन्यांच्या नफ्याबद्दल चिंता निर्माण होते. विशेष करून या कंपन्यांनी आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या अधिक खर्चिक पायाभूत सुविधांमध्ये आधीच केलेल्या गुंतवणुकीच्या रकमेचा विचार करता ही चिंता असते," असं त्या म्हणाल्या.

सिंगापूरस्थित तंत्रज्ञान क्षेत्रातील इक्विटी सल्लागार वे-सर्न लिंग यांनी बीबीसीला सांगितलं की "यामुळे आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या संपूर्ण पुरवठा साखळीतील (या क्षेत्रातील विविध उपकरणं, उत्पादनांवर काम करणाऱ्या कंपन्या) गुंतवणूक रुळावरून घसरू शकते किंवा त्यावर विपरित परिणाम होऊ शकतो."

मात्र वॉल स्ट्रीटवरून बॅंकिंग क्षेत्रातील दिग्गज कंपनी असलेल्या सिटीनं इशारा दिला की आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या क्षेत्रातील ओपनएआयसारख्या अमेरिकन कंपन्यांच्या वर्चस्वाला डीपसीक आव्हान देऊ शकत असतानाच, चिनी कंपन्यांसमोर असणाऱ्या समस्या आर्टिफिशियल इंटेलिजन्समधील त्यांच्या प्रगतीत अडथळा निर्माण करू शकतात.

"या क्षेत्रातील अपरिहार्यपणे अधिक प्रतिबंधात्मक वातावरणात, अमेरिकेला असणारा अधिक अत्याधुनिक चिप्सचा पुरवठा ही एक फायद्याची बाब आहे," असं त्यांच्या विश्लेषकांनी एका अहवालात म्हटलं आहे.

गेल्या आठवड्यात अमेरिकन तंत्रज्ञान कंपन्या आणि परकी गुंतवणुकदारांच्या एका गटानं द स्ट्रारगेट प्रोजेक्टची (The Stargate Project) घोषणा केली.

आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या क्षेत्रातील चॅटजीपीटी आणि इतर भागीदारंनी स्थापन केलेली ही नवी कंपनी असून ती टेक्सासमध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या पायाभूत सुविधांसाठी तब्बल 500 अब्ज डॉलरची गुंतवणूक करते आहे.

साहजिकच अमेरिकन कंपन्या इतकी महाकाय गुंतवणूक आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या क्षेत्रात करत असताना चीनी कंपन्या मात्र अतिशय स्वस्तात एआय मॉडेल विकसित करत असल्यामुळे गुंतवणुकादारांमध्ये चिंतेचं वातावरण निर्माण झालं आहे. त्याचाच परिणाम होत अमेरिकेच्या तंत्रज्ञान कंपन्याना फटका बसला आहे.

सोमवारी अमेरिकन शेअर बाजाराला धक्का बसल्यानंतर अमेरिकेतील महत्त्वाचे निर्देशांक मंगळवारी (28 जानेवारी) स्थिरावले आहेत. न्यूयॉर्कमध्ये डाऊ जोन्स निर्देशांक, एस अॅंड पी 500 निर्देशांक आणि नॅसडॅक निर्देशांक अनुक्रमे 0.3 टक्के, 1 टक्के, 2 टक्क्यांनी वाढले होते.

अर्थात अमेरिकन शेअर बाजाराला सोमवारी बसलेल्या धक्क्याचे पडसाद जगभरातील शेअर बाजारांमध्ये उमटले होते.

डीपसीक कंपनी नेमकी कुणाची आहे?

डीपसीक कंपनीची स्थापना 2023 मध्ये लिआंग वेनफेंग यांनी चीनच्या आग्नेय भागातील हांगझाऊ शहरात केली.

लिआंग वेनफेंग 40 वर्षांचे असून ते माहिती आणि इलेक्ट्रॉनिक्स इंजिनीअर आहेत. डीपसीकला भांडवली मदत करणाऱ्या हेज फंडाचीही स्थापना त्यांनी केली होती.

ते हाय फ्लायर (High-Flyer)या हेज फंडाचे मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत. हा फंड गुंतवणुकीचे निर्णय घेण्यापूर्वी आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करून आर्थिक बाबींचं विश्लेषण करतो. याला क्वांटिटेटिव्ह ट्रेडिंग असं म्हणतात.

2019 मध्ये 100 अब्ज युआन (1.3 कोटी डॉलर) हून अधिक रकमेची उभारणी करणारा हाय फ्लायर हा चीनमधील पहिला क्वांट हेज फंड बनला होता.

लिआंग गेल्या वर्षी एका भाषणात म्हणाले होते की, "जर अमेरिका व्कांटिटेटिव्ह ट्रेडिंगचं क्षेत्र विकसित करू शकते तर चीन का नाही करू शकत?"

ते पुढे म्हणाले होते, "अनेकदा आपण असं म्हणतो की अमेरिकन आर्टिफिशियल इंटेलिजन्स मॉडेल आणि चीनी आर्टिफिशयल इंटेलिजन्स मॉडेलमध्ये एक किंवा दोन वर्षांचा गॅप असतो. मात्र खरी दरी मूलभूत स्वरुप आणि अनुकरण यामध्ये आहे. जर यात बदल झाला नाही तर चीन नेहमीच अनुयायी राहील."

लिआंग यांनी एनव्हिडिया ए 100 (Nvidia A100) चिपचं एक स्टोअर उभारलं होतं. एनव्हिडियाच्या चिपची चीनला निर्यात करण्यावर आता बंदी आहे. चिपच्या या संग्रहामुळे लिआंग यांना डीपसीक लॉंच करता आली.

तज्ज्ञांच्या मते त्या चिपची संख्या जवळपास 50,000 इतकी होती. स्वस्त आणि कमी दर्जाच्या चिप्सबरोबर जोडलेल्या या चिप्स अजूनही आयातीसाठी उपलब्ध आहेत.

अलीकडेच आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या क्षेत्रातील तज्ज्ञ आणि चीनचे पंतप्रधान ली किआंग यांच्यातील बैठकीत लिआंग दिसले होते.

डीपसीकच्या यशामुळे सिलिकॉन व्हॅलीतील अनेक मॉडेलना का धक्का बसला आहे असं विचारला असता, लिआंग म्हणाले, "चीनी कंपन्यांकडे आतापर्यंत अमेरिकन कंपन्यांचं अनुकरण करणाऱ्या म्हणूनच पाहिलं जात होतं. मात्र एका चीनी कंपनीनं आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या क्षेत्रातील नवा संशोधक किंवा इनोव्हेटर म्हणून पुढे येताना पाहून त्यांना आश्चर्य वाटलं आहे."

जुलै 2024 मध्ये 'द चायना अकॅडमी'ला दिलेल्या एका मुलाखतीत लिआंग म्हणाले होते की त्यांच्या आर्टिफिशियल इंटेलिजन्स मॉडेलच्या आधीच्या आवृत्तीवरील प्रतिक्रियेमुळे त्यांना आश्चर्य वाटलं.

"या मॉडेलची किंमत हा इतका संवेदनशील मुद्दा असेल असं आम्हाला वाटलं नव्हतं," असं ते पुढे म्हणाले.

"आम्ही आमच्या गतीनं वाटचाल करत होतो, मॉडेलच्या विकासासाठी होणाऱ्या खर्चाचं आकलन करत होतो आणि त्यानुसार किंमत ठरवत होतो," असं लिआंग म्हणाले.

डीपसीक, चॅटजीपीटी, गुगुल जेमिनी यांच्यात कोण वरचढ?

स्वस्त चीनी डीपसीक आणि ओपनएआयचं चॅटजीपीटी, गुगलचं जेमिनी या महागड्या अमेरिकन आर्टिफिशियल इंटेलिजन्स मॉडेलमध्ये काय फरक आहे. काही महत्त्वाच्या निकषांच्या आधारे ही तुलना करण्याचा प्रयत्न बीबीसीनं केला.

1) लेखन सहाय्यक

चॅटजीपीटीचं नाव आलं की त्यामागचं एक लोकप्रिय कारण म्हणजे लेखन करण्यासाठी लोकांना चॅटजीपीटीची मदत होते.

माहिती गोळा करण्यापासून ते ती संक्षिप्त स्वरुपात मांडण्यापर्यंत चॅटजीपीटी उपयुक्त ठरतं. अगदी एखाद्या विषयावर ब्लॉग लिहिण्यासंदर्भात देखील चॅटजीपीटीचा वापर जगभरात अनेक क्षेत्रात केला जातो आहे.

चॅटजीपीटी आणि डीपसीकची तुलना करताना बीबीसीनं "इतिहासातील सर्वोत्तम स्कॉटिश फुटबॉल खेळाडूंवर एक ब्लॉग लिहिण्यास" सांगण्यापूर्वी, या दोन्ही मॉडेलना स्कॉटलंडमधील आजवरच्या सर्वोत्तम फुटबॉल खेळाडूंची थोडक्या माहिती देण्यास सांगितलं.

त्यावर डीपसीकनं काही सेकंदांमध्ये उत्तर देत टॉप दहा फुटबॉलपटूंची यादी दिली. त्यात लिव्हरपूल आणि सेल्टिकचा केनी डॅलग्लिश पहिल्या क्रमांकावर होता. वेगवेगळ्या क्लबमधील खेळाडू कोणत्या स्थानावर खेळले याबाबत डीपसीकनं थोडक्यात माहिती दिली. तसंच त्यांच्या कामगिरीचीही माहिती दिली.

डीपसीकनं ब्रायन लॉड्रप आणि हेरनिक लार्सन या दोन बिगर स्कॉटिश खेळाडूंची देखील माहिती दिली. त्यानंतर ब्लॉग पोस्ट तयार करून देताना डीपसीकनं सर्व खेळाडूंच्या कारकिर्दीची विस्तृत माहिती दिली.

तर यावर उत्तर देताना चॅटजीपीटीनं अनेक खेळाडूंची नावं दिली. त्यात पुन्हा एकदा "किंग केनी"चं नाव यादीत सर्वात वर होतं.

चॅटजीपीटीनं ब्लॉग पोस्ट तयार करून दिली आणि सर्व खेळाडूंच्या करियरची माहिती दिली.

उदाहरण म्हणून घेतलेल्या या चाचणीत डीपसीक हे मॉडेल चॅटजीपीटी या प्रसिद्ध अमेरिकन मॉडेलच्या तोडीचं निघालं.

2) कोडिंग

आर्टिफिशियल इंटेलिजन्सवर आधारित आधुनिक मॉडेल्समुळे कोडिंगच्या क्षेत्रावर मोठा प्रभाव पडला आहे. कोडिंगच्या क्षेत्रातील लोक चॅटजीपीटीचा वापर मोठ्या प्रमाणात करताना दिसत आहेत.

त्यामुळेच गेल्या आठवड्यात जेव्हा चॅटजीपीटीमध्ये काही तांत्रिक अडचण निर्माण झाली होती, तेव्हा संगणकाच्या क्षेत्रातील लोकांकडून एक्स या सोशल मीडिया व्यासपीठावर अनेक गंमतीशीर पोस्ट आल्या होत्या. त्या म्हटलं होतं की त्यांना त्यांचं काम करता आलं नाही कारण त्यांचा विश्वासू सहाय्यक काम करत नव्हता.

या क्षेत्रात चॅटजीपीटी आणि डीपसीकची तुलना केली असता काय दिसतं?

जेवियर अगिरे दक्षिण कोरियातील एक एआय संशोधक आहेत.

त्यांनी एका पोस्टमध्ये लिहिलं आहे की "मी डीपसीकमुळे चांगलाच प्रभावित झालो आहे. कोडिंग करताना कोडिंगमधील एआय चॅटबॉटच्या मर्यादा जाणून घेण्याचा प्रयत्न आम्ही अनेकदा करतो."

"मी आज एक गुंतागुंतीचा प्रश्न यासाठी वापरला. चॅटजीपीटी 01 या समस्येवर उत्तर देऊ शकलं नाही. मग मी डीपसीककडे ती समस्या दिली. डीपसीकनं त्यावरचं उत्तर दिलं."

त्यांनी असंही सांगितलं की कोडिंगच्या क्षेत्रातील लोकांनी या मॉडेल्सचा एकत्रितपणे वापर केल्यास त्यांना अधिक फायदा होऊ शकतो. गुगलच्या क्रोम डेव्हलपर एक्सपिरियन्सचे प्रमुख अॅडी ओस्मानी यांचंही असंच मत आहे.

ते म्हणाले की क्लॉड सोनेट आणि ओपनएआयचं 01 मॉडेल यापेक्षा डीपसीक "खूपच स्वस्त" आहे.

3) विचारमंथन करणाऱ्या कल्पना आणि त्यांचा विस्तार

बीबीसीनं चॅटजीपीटी आणि डीपसीकला लहान मुलांसाठी चंद्रावर राहणाऱ्या एका मुलाच्या कथेसंदर्भात कल्पना सुचवण्यास सांगितलं.

चॅटजीपीटीनं काही सेकंदांमध्ये उत्तर दिलं आणि सहा व्यवस्थितपणे मांडणी केलेल्या कल्पना दिल्या. अर्थात या कथा म्हणजे काही हॅरी पॉटरला मागे टाकतील अशा कथा नव्हत्या. मात्र सुरुवातीच्या टप्प्यात त्या योग्यरितीनं मांडणी केलेल्या कथा होत्या.

तर दुसऱ्या बाजूला डीपसीकनं फक्त एकच कल्पना सादर केली. ती 387 शब्दात होती. त्यात नुसती कल्पना नव्हती तर चंद्रावर राहणाऱ्या मुलाची व्यवस्थित मांडलेली कथा होती.

चॅटजीपीटीनं फक्त कथा कल्पना सुचवल्या होत्या तर डीपसीकनं एक आख्खी कथाच लिहून दिली होती.

4) शिक्षण आणि संशोधन

पहिलं महायुद्ध ही एक युरोपियन राष्ट्रांमधील अतिशय गुंतागुंतीच्या संघर्षातून निर्माण झालेली घटना होती. इतिहासातील या गुंतागुंतीच्या घटना चॅटबॉट्स कसं हाताळतात हे पाहण्यासाठी चॅटबॉट्सना त्याबद्दल प्रश्न विचारण्यात आला.

चॅटजीपीटीनं यासंदर्भात विस्तृत माहिती देत त्यातील महत्त्वाच्या मुद्द्यांची मांडणी केली. तर डीपसीकनं दिलेली माहिती विसृत नव्हती तर थोडक्यात होती आणि त्यात महत्त्वाचे मुद्दे आणि घटना यांची माहिती दिली होती.

गुगलच्या जेमिनीनं चॅटजीपीटी आणि डीपसीक प्रमाणेच माहिती दिली.

विविध चॅटबॉटना सोपे प्रश्न विचारून त्यांची तुलना करण्याचा हा प्रयत्न होता. अर्थात तथाकथित आर्टिफिशियल इंटेलिजन्स स्पर्धेतील विजेता कोण हे ठरण्यास अजून बराच वेळ आहे.

मात्र अमेरिकन कंपन्यांनी तंत्रज्ञानात कितीही साधनसंपत्तीचा वापर केला असला तरी कमी खर्चात त्यांच्या तोडीस तोड कामगिरी कशी केली जाऊ शकते हे त्यांच्या चीनी प्रतिस्पर्ध्यांनी दाखवून दिलं आहे.

प्राध्यापक नील लॉरेन्स, केंब्रिज विद्यापीठात कॉम्प्युटर सायन्स आणि तंत्रज्ञान विभागात मशीन लर्निंगचे डीपमाईंड प्राध्यापक आहेत.

त्यांना वाटतं की चॅटबॉटच्या क्षेत्रात आगामी काळात येऊ घातलेल्या अनेक नव्या संशोधनांचा विचार करता हे फक्त हिमनगाचं टोक आहे.

त्यांना वाटतं की या क्षेत्रात अजून बरंचकाही व्हायचं आहे आणि त्यातून अनेक गोष्टी विकसित होत जाणार आहेत. या क्षेत्रात अनेक नवोदितांसाठी मोठ्या संधी आहेत. तसंच या क्षेत्रातील प्रस्थापितांमधून असे नवे विकसक किंवा संशोधक पुढे येण्याची शक्यता कमी आहे.

चीनमध्ये डीपसीकच्या यशाचे काय पडसाद उमटले आहेत?

डीपसीकच्या उदयामुळे चीनच्या सरकारला आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या क्षेत्रात मोठी चालना मिळणार आहे. चीन पाश्चात्य देशांवर अवलंबून नसलेलं तंत्रज्ञान निर्माण करण्याचा प्रयत्न करतो आहे.

चीनच्या कम्युनिस्ट पक्षानं यावर कोणतीही प्रतिक्रिया दिली नसली तरी सिलिकॉन व्हॅली आणि वॉल स्ट्रीटवरील बलाढ्य तंत्रज्ञान कंपन्यांची झोप उडाल्याच्या आणि अमेरिकन शेअर बाजार गडगडल्याची नोंद घेण्याची उत्सुकता चीनी प्रसारमाध्यमांमध्ये दिसून आली.

"चीनची तंत्रज्ञान क्षेत्रातील ताकद आणि स्वावंलबन याचा पुरावा म्हणून चीनमद्ये डीपसीकच्या यशाकडे पाहिलं जातं आहे," असं मरिना झांग म्हणतात. त्या सिडनीच्या तंत्रज्ञान विद्यापीठात सहाय्यक प्राध्यापिका आहेत.

त्या म्हणाल्या, "चीनच्या इनोव्हेशन 2.0 चं प्रमाणीकरण म्हणून डीपसीकच्या यशाकडे पाहिलं जातं आहे. हे चीनमधील उद्योजकांच्या तरुण पिढीकडून दिल्या जात असलेल्या स्वदेशी तंत्रज्ञानातील नेतृत्वाचं एक नवीन युग असल्याचं मानलं जातं आहे."

चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी आर्टिफिशियल इंटेलिजन्सला सर्वोच्च प्राधान्य जाहीर केलं आहे. त्यामुळे कपडे, फर्निचर यासारख्या इतर उत्पादनांक़डून अत्याधुनिक चिप, इलेक्ट्रिक वाहनं आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्सकडे वळणाऱ्या चीनसाठी डीपसीकसारखे स्टार्ट-अप खूप महत्त्वाचे आहेत.

अमेरिका का हादरली? ट्रम्प यांना काय वाटतं?

डीपसीकच्या यशाची दखल अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी देखील घेतली आहे.

डोनाल्ड ट्रम्प यांनी याबाबत म्हटलं आहे की हा अमेरिकन कंपन्यांना "जागं करणारा इशारा" आहे. या कंपन्यांनी आर्टिफिशियल इंटेलिजन्सची "स्पर्धा जिंकण्यावर" लक्ष केंद्रित केलं पाहिजे.

मार्क अँड्रीसेन अमेरिकेच्या सिलिकॉन व्हॅलीतील भांडवली गुंतवणुकदार आणि डोनाल्ड ट्रम्प यांचे सल्लागार आहेत. मार्क यांनी डीपीसीक-आर1 चं वर्णन "आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या क्षेत्रातील स्पुटनिक क्षण" (AI's Sputnik moment)असं केलं.

1957 मध्ये तत्कालीन सोविएत युनियननं स्पुटनिक हा मानवाच्या इतिहासातील पहिला कृत्रिम उपग्रह अवकाशात सोडून अमेरिकेसह सर्व जगाला धक्का दिला होता. अंतराळ संशोधनाच्या क्षेत्रात तेव्हा रशियानं अमेरिकेला मागे टाकलं होतं.

तेव्हापासून एखाद्या क्षेत्रातील अतिशय धक्का देणाऱ्या आणि त्या क्षेत्राचं स्वरुप बदलून टाकणाऱ्या घटनेला 'स्पुटनिक क्षण' (Sputnik moment) असं म्हटलं जातं.

त्यावेळेस सोविएत युनियनच्या तंत्रज्ञानातील कामगिरी हा अमेरिकेसाठी धक्काच होता. अमेरिका त्यासाठी तयार नव्हती. तसंच काहीसं आता डीपसीक-आर1 च्या माध्यमातून आर्टिफिशयल इंटेलिजन्सच्या क्षेत्रात झाल्याचं मार्क अंड्रीसेन यांचं म्हणणं आहे.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)